हे जग चांगले आणि वाईटाचे घर आहे. दोन्ही चांगल्या आणि वाईट शक्तींना या जगात स्वातंत्र्य आहे. परिणामतः दोघेही निरंतर लढाई लढत आहेत. एकमेकांवर वर्चस्व स्थापन करण्याचे प्रयत्न सतत दोघांकडूनही होत असतात. याचमुळे स्वाभाविकपणे इस्लामपुढे या जगात अडथळे निर्माण केले गेले आहेत. इस्लामच्या अनुयायींचे अस्तित्व स्वीकारले जात नाही आणि सहनसुध्दा केले जात नाही. प्रत्येक धर्माच्या इतिहासात आपणास हे पाहावयास मिळेल. मुस्लिमांनी हे अडथळे दूर कसे करावेत? इस्लाम या स्थितीला तोंड देण्यास समर्थ आहे. या अडथळ्यांना दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे म्हणजेच ‘जिहाद’ आहे. यास अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे (जिहाद करणे) असे म्हणतात.
जिहादचा शब्दशः अर्थ होतो एखादे ध्येय गाठण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊनच प्रयत्नांचे स्वरुप ठरते. यास संधीसाधूपणा म्हणणे चुकीचे आहे. हे कार्य अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. प्रत्येक प्रयत्न करण्यामागे काही विशिष्ट हेतु असतो. हे साध्य प्राप्त करण्याचे साधन असते साध्य नव्हे. प्रचलित स्थितीच्या स्वरुपास आणि गांभीर्यास अगोदरच समजून घेतले तर अपेक्षित साध्य प्राप्त करणे सोईस्कर जाते. हे तत्त्व आत्मसात न केल्यास कठीण परिश्रमही वाया जातात. हे मूर्खपणाचे प्रयत्न सिध्द होते आणि ते अस्वाभाविक ठरते. अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे (जिहाद) हे त्या त्या स्थितीनुरुप ठरते. इस्लामने तीन प्रकार जिहादचे सांगितले आहेत ज्यांना परिस्थितीनुसार उपयोगात आणले जाऊ शकते.
१) आंतरिक जिहाद २) ज्ञानासाठी व धर्म प्रचारासाठी जिहाद ३) लढाईद्वारा (युध्द) जिहाद.
१) आंतरिक जिहाद: मुस्लिम समाजाच्या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी छेडलेले युध्द हा आंतरिक जिहाद आहे, कारण या दुष्ट प्रवृत्तींमुळे इस्लामच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होतो. हा फार गंभीर धोका आहे आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याविरुध्द खालील शब्दांत चेतावणी दिली आहे,
‘‘माझ्यापूर्वी जे काही प्रेषित अल्लाहने या भूतलावर पाठविले होते त्यांचे अनुयायी प्रामाणिक होते. त्यांनी त्यांच्या प्रेषितांच्या शिकवणींना श्रध्दापूर्वक स्वीकारले. परंतु त्या अनुयायींनंतरचे अश्रध्दावंत आणि अप्रामाणिक अनुयायीं होते. त्यांचे कृत्य त्या प्रेषितांच्या शिकवणींविरुध्द होते. जो अशा अप्रामाणिक लोकांविरुध्द भांडत राहिला तोच खरा अनुयायीं होता. ज्यांनी तोंडी विरोध केला तेसुध्दा खरे श्रध्दाळू होते. इतरजन आपल्या मनात अशा गोष्टींना वाईट समजून गप्प बसत असत. परंतु ही श्रध्दाशीलता अगदी शेवटच्या थरातील आहे आणि यानंतर श्रध्देच्या एक अणुचेही अस्तित्व शिल्लक राहत नाही.’’ (मुस्लिम)
अर्थातच वरील हदीस हे फक्त बातमी अथवा कथन नाही. हा एक आदेश आहे. एक दिव्य आदेश! याद्वारे मुस्लिमांना सावधान करण्यात आले आहे की अशा परिस्थितीला त्यांनासुध्दा सामोरे जावे लागणार आहे. अशा स्थितीत कोणती कृती करावी हे सूचित करण्यात आले आहे. या हदीसीद्वारे दोन गोष्टी स्पष्ट होतात.
१) कोणत्याही प्रकारचे दुष्कर्म अथवा दुष्प्रवृत्ती मुस्लिम समाजात बोकाळली तरी तिचा नायनाट करण्यासाठी ‘जिहाद’ (अथक प्रयत्न) आवश्यक आहे.
२) दुष्प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठीचे उपाय आणि त्यासाठीचा (श्रध्दाशीलतेचे) अग्रक्रम.
दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी उत्तम उपाय त्याविरुध्द आमनेसामने आरपारची लढाई करणे हा आहे. आरपारची लढाई करण्याची हिंमत नसेल तर तोंडी सामना प्रचलित दुष्प्रवृत्तींविरुध्द करणे आवश्यक आहे. त्या दुष्प्रवृत्तींचा तोंडी धिक्कार केला पाहिजे. लोकांमध्ये त्याविरुध्द जागृती निर्माण केली पाहिजे. अल्लाहच्या कोपचे भय लोकांना दाखविले पाहिजे. यानंतरसुध्दा लोकांनी ऐकले नाही तर त्यांना कडक शब्दांत तंबी दिली पाहिजे.
जर तोंडी स्पष्टपणे जाहीररित्या दुष्प्रवृत्तींचा धिक्कार करणेसुध्दा अशक्य असेल तर लोकांनी प्रचलित दुष्प्रवृत्तींचा मनातल्यामनात धिक्कार केला पाहिजे. तो या दुष्प्रवृत्तींविरुध्द इतका संवेदनशील बनतो की त्यांचा विचारसुध्दा त्याला अस्वस्थ करुन सोडतो. दुष्प्रवृत्ती त्याच्यासाठी मनाला क्लेष देणारी ठरते. त्याची प्रखर इच्छा असते की दुष्प्रवृत्तींचा नायनाट लवकर व्हावा. त्याची मनोमन प्रार्थना असते की जे कोणी दुष्प्रवृत्तींने ग्रस्त आहेत त्यांना सन्मार्ग प्राप्त व्हावा. त्याला दुष्प्रवृत्तींच्या परिणामांची जाणीव असते आणि त्या दुष्प्रवृत्तींपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो. श्रध्दाशीलतेचा हा सर्वांत शेवटचा टप्पा आहे. अशा प्रकारे या तीन पध्दतींद्वारा मुस्लिम समाज सर्व प्रकारच्या दुष्प्रवृत्तींपासून शुध्द होऊ शकतो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. या तिन्ही पध्दती म्हणजे जिहाद होय. या तीन प्रकारांतील प्रत्येक प्रकार हा सत्य प्रस्थापनेसाठीचा लढा आहे आणि इस्लामची साक्ष देणारा आहे. सत्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘जिहाद’ आहे हाच अल्लाहच्या मार्गातील जिहाद (जिहाद फीसबिलिल्लाह) आहे.
समाजातील दुष्प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे यास अल्लाहच्या मार्गात जिहाद करणे (जिहाद फीसबीलिल्लाह) असे वरील हदीसमध्ये म्हटले आहे. काही ठिकाणी या प्रयत्नास दुष्प्रवृत्तींचे परिवर्तन करणे असे म्हटले आहे.
‘‘ज्यानी दुष्प्रवृत्ती पाहिली तर त्याने तिला आपल्या हाताने बदलले पाहिजे जर ती व्यक्ती असे करू शकत नाही तर तोंडी रोखले पाहिजे. जर ती व्यक्ती तोंडी प्रतिकारसुध्दा करू शकत नसेल तर मनातल्या मनात दुष्प्रवृत्तीस वाईट समजले गेले पाहिजे आणि ही अगदी खालच्या दर्ज्याची श्रध्दा आहे.’’ (मिश्कात)
दुसऱ्या ठिकाणी या कृत्यास ‘निषिध्द मानणे’ असे म्हटले आहे कुरआनोक्ती आहे,
‘‘सत्कृत्यांचा आदेश द्या आणि दुष्कृत्यांचा नायनाट करा.’’ (कुरआन ३१: १७)
‘‘सत्कृत्यांसाठी एकमेकांचे अनुकरण करा आणि दुष्कृत्यांविरुध्द एकमेकांची मने वळवा.’’ (तिरमीजी)
वरील संदर्भावरून आपण या निर्णयाप्रत येतो की ‘‘प्रयत्नाची पराकाष्ठा समाजातील दुष्प्रवृत्तींविरुध्द करणे’’ तसेच ‘‘समाजातील दुष्कृत्यें आणि दुष्प्रवृत्तींमध्ये परिवर्तन घडवून आणणे’’ आणि ‘‘समाजातील लोकांची मने दुष्प्रवृत्तीविरुध्द तयार करणे’’ इ. सर्व एकाच प्रयत्नाची (जिहाद फीसबिलील्लाह) रूपे आहेत. आपण ज्याची निवड कराल तर ते ध्येयप्राप्तीकडे आपणास काही बदल न होता प्रवृत्त करते.
वरील हदीसींद्वारे (प्रेषितवचन) हेच सिध्द होते की जिहाद ‘ही सामुदायिक जबाबदारी आहे. मुस्लिम समाजाचे ‘जिहाद’ हे सामूहिक कर्तव्य आहे. व्यक्ती, समाज व राष्ट्र यापासून वेगळे जाऊ शकत नाही. प्रत्येकाचा या ‘जिहाद’मध्ये वाटा असतोच. जिहाद ह्या महत्त्वाच्या जबाबदारीत मात्र प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्याचा वाटा त्याने उचलावा हे त्याचे कर्तव्य ठरते. कुरआनने या मुद्यास स्पष्ट करताना खुलासा केला आहे,
‘‘श्रध्दावंत पुरुष व श्रध्दावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भले पणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगम्बराचे आदेश पाळतात, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच.’’ (कुरआन ९: ७१)
याचाच अर्थ असा होतो की भलेपणाचा आदेश देणे व वाईट गोष्टींपासून रोखणे ही मुस्लिमाची शाश्वत ओळख आहे. इस्लामचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जिथे जिथे मुस्लिम आहे तिथे तो हे कर्तव्य पार पाडतच असतो. जो मुस्लिम आहे त्याला हे कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. इस्लामी शासनासंबंधी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘अल्लाह मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. हे ते लोक आहेत ज्यांना आम्ही जर पृथ्वीवर सत्ता बहाल केली तर ते नमाज कायम करतील, जकात देतील, सत्कर्मांचा आदेश देतील. आणि वाईटाला प्रतिबंध करतील, आणि सर्व बाबींचा अंतिम परिणाम अल्लाहच्या अखत्यारित आहे.’’ (कुरआन २२: ४१)
वरील कुरआन आयतीनुसार हेच स्पष्ट होते की मुस्लिम व्यक्तिशः आणि सामान्यतः वाईट कृत्यांना (दुराचार) बहर आलेला पाहूच शकत नाही. मुस्लिम सत्तेत आला तर प्रथम वाईटाला प्रतिबंध करतो. दुराचाराचा समूळ नायनाट हे त्याच्या शासनाचे ध्येय ठरते.
२) ज्ञानासाठी व धर्म प्रचारासाठी जिहाद: या जिहादच्या प्रकारामध्ये इस्लामवर घेतलेले आक्षेप, शंकाकुशंका आणि इस्लामाविरुध्द प्रचलित चर्चेला आणि दुष्प्रचाराला चोख उत्तर देऊन इस्लामबद्दलचे आक्षेप, शंकाकुशंका आणि दुष्प्रचार समूळ नाहीसे करणे आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा मक्का शहरातील कार्यकाल हा याच प्रकारच्या जिहादचा कार्यकाल होता. अल्लाह कुरआनमध्ये आदेश देत आहे,
‘‘तर हे पैगम्बर (स.) अश्रध्दावंतांचे म्हणणे मुळीच ऐकू नका आणि या कुरआननिशी त्यांच्याबरोबर जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा करा.’’ (कुरआन २५: ५२)
त्यांच्याबरोबर (अश्रध्दावंतांच्या) कुरआननिशी प्रयत्नांची पराकाष्ठा करा म्हणजे तुम्ही अश्रध्दावंतांसमोर कुरआनच्या त्या तपशीलास ठेवा ज्यामध्ये इस्लामची सत्यता उघड केली आहे. याद्वारे त्यांच्या श्रध्दाहीनतेच्या निष्फळ चर्चेला रोखू शकता. कुरआनचे दाखले देऊन तुम्ही त्यांचे वादग्रस्त मुद्दे खोडून काढू शकता. तुम्ही हे नियमित करत राहा. शेवटी ते त्यांचे खोटे पुरावे घेऊन पळ काढतील. यासाठी कृतीत सातत्य आणि स्वभावात संयम आवश्यक आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अशा प्रकारच्या जिहादला जिभेचा जिहाद (तोंडी जिहाद) म्हटले आहे. त्यांचे कथन आहे,
‘‘श्रध्दाहीन लोकांविरुध्द तुमच्या धनाने, तुमच्या तनाने आणि तुमच्या संभाषणाद्वारे जिहाद करा.’’ (अबू दाऊद)
या प्रकारच्या जिहादमध्ये व्यक्ती आपल्या बुध्दीचातुर्याने सुसज्ज होऊन शत्रूचा मुकाबला करतो. हे युध्द शत्रुच्या बुध्दीचातुर्याचा आणि तात्त्विकतेचा किल्ला जमीनदोस्त होईपर्यंत चालूच राहते. ज्ञानाची प्रत्येक शाखा या कामासाठी उपयोगात आणली जाते. भौतिकशास्त्र, इतिहास, संस्कृति, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, दर्शनशास्त्र; थोडक्यात सर्व प्रकारच्या ज्ञानशाखांचा उपयोग केला जातो. कुरआन ज्या पध्दतीने आक्षेपांना आणि वादग्रस्त मुद्यांना सडेतोड उत्तर देतो ते सर्व अद्वितीय आहे. यासंदर्भातील खालील दिव्य प्रकटन पाहू या.
‘‘आणि (यात हा गर्भित उद्देशही आहे) की जेव्हा कधी ते तुमच्यासमोर एखादी निराळी गोष्ट (अथवा चमत्कारिक प्रश्न) घेऊन आले त्याचे योग्य उत्तर वेळीच आम्ही तुम्हाला देऊन टाकले आणि उत्तम प्रकारे गोष्टीची उकल केली.’’ (कुरआन २५: ३३)
या प्रकारच्या जिहादसाठी कुरआनने खालीलप्रमाणे मूलतत्त्व सांगितले आहे,
‘‘हे पैगम्बर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित, आणि लोकांशी विवाद करा अशा पध्दतीने जी उत्तम असेल.’’ (कुरआन १६: १२५)
या पध्दतीच्या यशात त्याचे गुण दडून बसले आहेत. उत्तम पध्दत आणि चर्चेची कुरआनची पध्दतीद्वारे इस्लाम संदेश लोकांना दिल्यास ते तुमच्या जवळ येऊ लागतात. लोक त्यांच्या वादग्रस्त मुद्यांची सत्यता पडताळून पाहू लागतात आणि इस्लामसाठी (सत्यासाठी) त्यांची मने उघडी करू लागतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा तुमचा एक न् एक शब्द बुध्दीविवेकपूर्ण असेल आणि श्रोत्यांचा समजण्यासाठी सहज सुलभ असेल. भाषाशैली आणि वक्त्याचे खरे भावनिक गांभीर्यसुध्दा आवश्यक आहे. या बौध्दिक अथवा तोंडी जिहादची दुसरी आवश्यकता आहे. संयम आणि दृढता. वरकरनी हे जरी गुण सहाय्यभूत दिसत असले तरी त्यांची जिहादच्या सफलतेसाठी निकडीची गरज आहे. हे सर्वश्रुत आहे की इस्लामच्या आमंत्रणास चांगला प्रतिसाद कधीच मिळत नाही. अश्रध्दावंतामध्ये इस्लामचा प्रसार करताना त्यांच्यापासून प्रामाणिकपणाची आणि गांभीर्यपूर्वक ऐकून घेण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे कारण अश्रध्दावंत हे खुल्या मनाचे कधीच नसतात. इस्लामचा प्रसार करताना आपणास नेहमीच अनुभव येतो की अश्रध्दावंत हे पूर्वग्रहदूषित आणि भावनाशील असतात, तसेच भ्रामक आणि चुकीच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांनी ते ग्रासलेले असतात. गंभीर चर्चेला ते लबाड बुध्दीने आणि कठोर शब्दांत धक्कादायक अविर्भावात उत्तर देतील. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यांपेक्षा मृदुवाणी, अधिक श्रध्दापूर्वक, गांभीर्यपूर्वक आणि विवेकपूर्वक आवाहन दुसरे कोण करू शकेल? तरी त्यांना अशा वेळी असहाय परिस्थितीला तोंड द्यावेच लागत होते. अल्लाहने त्यांना खालील शब्दांत सचेत केले आहे,
‘‘मुस्लिमांनो, तुम्हाला प्राण व वित्त या दोहींच्या परीक्षा द्याव्याच लागतील, आणि तुम्ही ग्रंथधारक व अनेकेश्वरवादींकडून पुष्कळशा त्रासदायक गोष्टी ऐकता. जर या सर्व स्थितीत तुम्ही संयम आणि ईशपरायणतेच्या वर्तनावर दृढ राहाल तर हे मोठे धाडसाचे कार्य होय.’’ (कुरआन ३: १९६)
हे अगदी साहजिक आहे की ही मौखिक इस्लामची साक्ष (मौखिक जिहाद) व्यक्तीपुढे संकटांचे वावटळ उभे करते. या स्थितीला त्याला नियमित तोंड द्यावेच लागते. असे नेहमीच घडते की शुभेच्छा कठोर टीकेला शीघ्र घेऊन येतात तर शुभ संदेशाच्या मागे शिव्या खाव्या लागतात. चर्चा करताना दगड खावे लागतात. किस्सा येथेच थांबत नाही तर इस्लाम प्रचारकाला चीरनिद्रा (खून) दिली जाते. परंतु इस्लामची साक्ष अशा घटनांकडे दुर्लक्ष करून समस्त मानवजातीला तिच्या निर्माणकर्त्याच्या उपासनेकडे आमंत्रित करण्यास प्रवृत्त करते. हे कार्य अशा संकटांसह आणि नकारांसह चालूच राहिले पाहिजे. परिस्थिती कितीही बिकट असो मुस्लिमाने त्या परिस्थितीशी समझोता करण्याचा विचारसुध्दा मनात आणू नये. अल्लाहने असा परिस्थितीत प्रेषित मुहम्मद (स.) यांना बजावून सांगितले,
‘‘तर हे पैगम्बर (स.) तुम्हाला ज्या गोष्टीची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून सांगा, हाक देऊन सांगा (जाहीररित्या) आणि अनेकेश्वरवादींची अजिबात पर्वा करू नका.’’ (कुरआन १५: ९४)
इस्लामचे आमंत्रण देणे हे तेव्हाच जिहाद सिध्द होईल जेव्हा विरोधांच्या आणि संकटांच्या वावटळामध्ये इस्लामची साक्ष देणे अविरत चालत राहील.
३) लढाईद्वारा (सशस्त्र) जिहाद: शारीरिक सामर्थ्यांसह जिहाद त्यांच्याविरुध्द असतो जे इस्लामच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. जोपर्यंत अडथळा दूर होत नाही तोपर्यंत जिहाद सुरूच राहतो. जिहादची ही शेवटची पायरी आहे. यास किताल (युध्द) सुध्दा म्हणतात. व्यावहारिकतः हा प्रकार कठीण परंतु धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे निकडीचे महत्त्व कुरआनने प्रखर केले आहे,
‘‘तुमच्यावर युध्द नियत केले आणि तुम्हाला ते योग्य वाटत नाही. परंतु शक्य आहे की जी गोष्ट तुम्हाला नापसंत असेल तीच तुमच्यासाठी अधिक चांगली असेल आणि हेही शक्य आहे की जी गोष्ट तुम्हाला पसंत असेल ती तुमच्यासाठी वाईट असेल. अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही.’’ (कुरआन २: २१६)
युध्द मुस्लिमांसाठी आणि इस्लामसाठी कसे चांगले आहे याचा खुलासा खालील कुरआनोक्तीमध्ये युध्दाचा हेतु सांगताना केला आहे,
‘‘आणि त्यांच्याशी तोपर्यंत युध्द करा जोपर्यंत उपद्रव शिल्लक राहील आणि अल्लाहसाठीच धर्म होईल. नंतर जर ते परावृत्त झाले तर लक्षात ठेवा की अत्याच्याऱ्यांशिवाय कुणाशीही शत्रुत्व ठेवू नका.’’ (कुरआन २: १९३)
युध्द करण्याची परवानगी यासाठी देण्यात आली की उपद्रव भूतलावर शिल्लक राहू नये आणि अल्लाहच्या मर्जीनुसार आणि आदेशानुसार जीवन व्यतीत करण्यासाठी मार्ग सुकर व्हावा. कुरआनमध्ये उपद्रवासाठी ‘फितना’ हा शब्द वापरात आला आहे ज्याचा अर्थ होतो की लोकांना इस्लामपासून रोखणे आणि आपल्या निर्माणकर्त्याच्या उपासनेपासून परावृत्त करणे हा असा गुन्हा आहे ज्याचा समकक्ष गुन्हा दुसरा कोणताही नाही. एखाद्या निरपराध व्यक्तीचा खून करण्यापेक्षा हा भयंकर गुन्हा ‘उपद्रव’ (फितना) आहे. कारण व्यक्तीचा खून केला तर त्याला या क्षणिक ऐहिक जीवनापासून वंचित ठेवले जाते, परंतु व्यक्तीला जर अल्लाहच्या उपासनेपासून परावृत्त केले तर त्या व्यक्तीला अल्लाहचा खरा दास बनण्यापासून रोखले जाते आणि त्याच्या खऱ्या जगाचा सर्वनाश करून परलोकातील देणग्यांपासून वंचित केले जाते. अर्थातच दोन्ही कृत्ये निंदनिय आहे. परंतु दोघांतून एकाची निवड करावयास सांगितले तर एखादा वेडा मनुष्य पहिल्यास दुसऱ्यावर प्राधान्य देईल. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘उपद्रव माजविणे (फितना) हत्या करण्यापेक्षा वाईट आहे.’’ (कुरआन २: १०१)
याबाबत दोन पर्याय असूच शकत नाही. अल्लाहच्या आज्ञाधारकतेला सर्व गोष्टींवर प्राधान्य दिले तर इस्लामच्या मार्गातील अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांना आव्हान देऊच शकत नाही. स्वतःचे अथवा दुसऱ्याचे जीव या कामी लागले तरी बेहत्तर! कुरआन जिहादच्या महत्त्वाबद्दलचे वर्णन खालीलप्रमाणे करीत आहे,
‘‘जर अल्लाह लोकांना एक दुसऱ्याकरवी हटवीत नसता तर मठ आणि चर्च व सिनेगॉग आणि मशिदी ज्यात अल्लाहचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जाते, सर्व उद्ध्वस्त केली गेली असती. अल्लाह जरूर त्या लोकांना सहाय्य करील जे त्याला सहाय्य करतील. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे.’’ (कुरआन २२: ४०)
वरील कुरआनोक्तीने आणखी स्पष्ट होते की जर धर्मासाठी शस्त्रांचा वापर केला गेला नाही तर उपद्रव मुळासकट नाहीसे केले जाऊ शकत नाहीत आणि धर्म लयास जातो. दुराचारी धार्मिक आचरणास विरोध करतात आणि धार्मिक स्थळांना उद्ध्वस्त करू लागतात. याच एकमेव कारणामुळे बळाचा वापर धर्माला अखंड करण्यासाठी अनिवार्य आहे.
बळाचा वापर करून धर्माच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सशस्त्र जिहाद म्हणतात. सशस्त्र जिहादचे स्वरुप वेगवेगळे आहेत म्हणून त्यांचा सामना करण्यासाठीचे उपाय एकसारखे असू शकत नाहीत. त्यांचे दोन प्रकार आहेत-
१) पहिल्या प्रकारात ते अडथळे आणि संकट येतात जी नवमुस्लिमांना भेडसावतात. नवमुस्लिमांना त्रास दिला जातो आणि अनेक प्रकारे मानहानी केली जाते. त्यांना त्यांचा नवीन धर्म सोडून पुन्हा जुन्या धर्माकडे बळजबरीने आणले जाते.
२) मुस्लिमांना इस्लाम धर्माची शिकवण मुस्लिमेतरांना न देण्यास भाग पाडले जाते किवा त्यांना इस्लामच्या ज्ञानापासून दूर अतिदूर ठेवण्याचे षङयंत्र रचले जाते.
वरील दोन प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठीसुध्दा दोन प्रकारच्या जिहादचा वापर केला जातो. पहिला प्रकार हा कठीण आणि फक्त निराशादायीच नसून तो अत्यंत आव्हानात्मकसुध्दा आहे. या आक्रमणाला बचावात्मकरित्या सामोरे जावे लागते. हे बचावात्मक युध्दच म्हणावे लागेल. अल्लाहने या प्रकारचे युध्द करण्यास खालील दिव्य आदेशाने अनुमती दिली आहे,
‘‘परवानगी दिली गेली युध्द करण्याची त्या लोकांना ज्यांच्याविरुध्द युध्द सुरू आहे, कारण ते अत्याचारपीडित आहेत. आणि अल्लाह निश्चितपणे त्यांच्या मदतीस समर्थ आहे. हे ते लोक आहेत जे आपल्या घरातून नाहक बाहेर काढले गेले, केवळ या अपराधापायी की ते म्हणत होते, आमचा पालनकर्ता अल्लाह आहे.’’ (कुरआन २२: ३९-४०)
वरील दिव्य प्रकटन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मदीना कालखंडात अवतरित झाले. दिव्य आदेशाचे त्यात समर्थन दिले आहे. मुस्लिमांना मक्केतील आक्रमक कुरैश जमातीविरुध्द शस्त्र हातात घेण्याची परवानगी दिली गेली. त्यांच्यावर कुरैश सैन्याने आक्रमण केले होते. म्हणून त्यांच्याविरुध्द युध्द पुकारण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा जेव्हा कुरैशांनी आक्रमण केले तेव्हा त्यांच्याविरुध्द युध्द पुकारले गेले. हे युध्द बचावात्मक स्वरुपाचे होते.
दुसऱ्या प्रकारच्या जिहादवर चर्चा करण्याअगोदर आपण त्याच्या स्वरुपाविषयी तपशीलात जाऊ या. मागील प्रकरणात मुस्लिमांचे कर्तव्याविषयी आपण चर्चा केली आहे. आपण पाहिले आहे की इस्लाम धर्म समस्त मानवजातीसाठी आहे. इस्लाम हे एकमेव सत्य आहे. पारलौकिक मुक्तीसाठी इस्लाम ही पूर्वअट आहे. इस्लामव्यतिरिक सर्व असत्य आहे आणि अल्लाहजवळ अमान्य आहे. मुस्लिमांना इस्लामच्या या स्थितीला सुरक्षित आणि शाबूत ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. इस्लाम संदेश समस्त जगाला देण्यासाठी मुस्लिम जबाबदार आहेत. ते सत्याचे साक्षी आहेत. मुस्लिमांनी लोकांना अल्लाहचे आज्ञाधारक बनवून त्यांना पारलौकिक जीवनाचा सर्वनाश करण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अनिवार्य आहे. या दोन वैशिष्ट्यांमुळे मुस्लिमांनी फक्त त्यांच्याच समाजात घुटमळत न बसता सर्व जगाच्या भल्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात इस्लाम संदेश पोहचविला पाहिजे. असे करताना ज्यांची हृदये इस्लामसाठी खुली नाहीत, त्यांच्यावर बळजबरी करता येणार नाही. दुसऱ्यांवर या बाबतीत पहारेकरी बनून राहण्याची परवानगी इस्लाम देत नाही. जोरजबरदस्तीच्या वातावरणात इस्लामला जवळून पारखणे शक्य होत नाही. शासनव्यवस्थेचा परिणाम जनमानसावर होत असतो. अशा स्थितीत इस्लामी समाजव्यवस्थेला जनमानसात रुजविण्यासाठी शासनव्यवस्था इस्लामी असणे क्रमप्राप्त ठरते. कारण प्रचलित व्यवस्था ही दुसऱ्या व्यवस्थेला आपल्या समाजात शिरकाव करू देत नाही. म्हणून जोपर्यंत गैरइस्लामी व्यवस्था समाजात प्रभावी आहे तोपर्यंत इस्लामी तात्त्विक आणि राजकीय व्यवस्था जनमानसात रूजत नाही. इस्लामच्या प्रगतीतील हा मोठा अडथळा आहे. जगातील प्रचलित सर्व समाजव्यवस्था इस्लामच्या मार्गातील प्रमुख अडथळे आहेत. याउपर ठपका हा ठेवला जातो की इस्लामी शासनव्यवस्था इतर शासन अथवा समाजव्यवस्थेला सामावून तर घेत नाही. परंतु पूर्ण सत्ता मुस्लिम राज्यकर्त्यांचा हातातसुध्दा न देता स्वतःकडे ठेवते. अशा स्थितीत इस्लामच्या सार्वभौमत्वालाच आव्हान दिले जाते. मग अशा परिस्थितीत बचावात्मक पवित्रा न घेता बळाचा वापरच योग्य ठरतो. याच कारणाने कुरआनने बचावात्मक पवित्र्याचे समर्थन फार काळ केल्यानंतर परिस्थितीनुरूप बळाचा वापर करण्यास अनुमती दिली आहे,
‘‘तो अल्लाहच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शनासह आणि सद्धर्मासह पाठविले आहे की त्याचे इतर सर्व धर्मांवर सर्व प्रकारे वर्चस्व प्रस्थापित करावे. मग अनेकेश्वरवादींना हे कितीही असह्य का होईना!’’ (कुरआन ९: ३३)
‘‘इतर सर्व धर्मांवर सर्व प्रकारे वर्चस्व प्रस्थापित करावे’’ याचा अर्थ इस्लामने तात्त्विक आणि राजकीयदृष्ट्या सर्व धर्मांवर वर्चस्व स्थापित करावे. याचमुळे अल्लाह पुढे आदेश देतो,
‘‘व सर्व मिळून अनेकेश्वरवादींशी लढा द्या, जसे ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात. आणि समजून असा की अल्लाह ईशपरायणांच्या समवेत आहे.’ (कुरआन ९: ३६)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या जिहादला सतत चालणारी प्रक्रिया म्हटले आहे. ही मुस्लिमांची न संपणारी गरज आणि जबाबदारी आहे. त्यांनी मुस्लिमांना बजावून सांगितले की ‘‘जिहाद माझ्या काळापासून जो सुरू झाला तो तसाच शेवटपर्यंत म्हणजे दज्जालशी माझा शेवटचा अनुयायी लढेपर्यंत चालूच राहणार आहे. (कयामतपर्यंत) हा जिहाद क्रूर शासकाच्या क्रूर कारवायांना पाहून स्थगित होणार नाही की एखाद्या न्यायाधीशाच्या तथाकथित निवाड्यानेसुध्दा थांबू शकणार नाही.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) आणि चार आदर्श खलीफा (शासक) यांनी परदेशातील शासनकर्त्यांना इस्लामचे आमंत्रण दिले होते. जेव्हा त्यांच्याकडून हे आमंत्रण स्वीकारले गेले नाही तेव्हा त्यांना बळाने इस्लामच्या प्रभुत्वाखाली आणले गेले. त्यांना इस्लामच्या व्यवस्थेच्या अंकित ठेवणे हे वरील उद्देशाला धरूनच होते. (‘‘इतर धर्मांवर सर्व प्रकारे इस्लामचे वर्चस्व स्थापिक करावे’’) म्हणून हा जिहाद बचावात्मक प्रकारचा नव्हता तर सकारात्मक कार्यवाही होती. म्हणून यास सकारात्मक जिहाद म्हणू या. या प्रकारच्या जिहादला समजून घेण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.
प्रथमतः इस्लामला जबरदस्तीने स्वीकारण्याचा हेतु या जिहादचा मुळीच नाही. इस्लामचा स्वीकार करणे याचा संबंध मनाशी आहे की ज्यामुळे बळाने काहीच करता येत नाही. म्हणून इस्लाम बळजबरीने कोणावरही थोपवता येत नाही. कुरआनमध्ये वारंवार सांगितले गेले आहे की अल्लाहची इच्छा आहे की मनुष्यजातीमध्ये जगात कोणीही अश्रध्दावंत राहू नये. अल्लाहने सर्वांना मुस्लिम (आज्ञाधारक) म्हणून जन्माला घातले आहे आणि त्यांना (समस्त मानवजातीला) अल्लाहने इच्छिले असते तर त्याच्या या निर्मितीला मुस्लिम बनवले असते. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जर अल्लाहने इच्छिले असते तर सर्व मानवांना बोध दिला असता.’’ (कुरआन १३: ३१)
मग त्याने (अल्लाहने) प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायींमध्ये बळाने मुस्लिम बनविण्यासाठी भेदभाव केला नसता. अशा प्रकारची अट ही मानवनिर्मितीच्या उद्देशाविरुध्द आहे म्हणून त्याला अस्वीकार्य केले गेले. अल्लाहने स्पष्टपणे सांगितले आहे की मनुष्य हा धर्माच्या बाबतीत स्वतंत्र आहे. त्याच्यावर या बाबतीत जोरजबरदस्ती करू नये.
‘‘धर्माच्या बाबतीत जोरजबरदस्ती नाही.’’ (कुरआन २: २५६)
अशा परिस्थितीत, अल्लाह इस्लामविषयी जोरजबरदस्तीला योग्य कसे ठरवील? आणि प्रेषित मुहम्मद (स.) त्यांच्या अनुयायींना इस्लाम धर्मासाठी जोरजबरदस्ती करण्याची परवानगी कसे बरे देतील?
१) याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या देशातील मुस्लिमांनी जर त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर त्यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन त्या अत्याचाराचा प्रतिकार करू नये. अत्याचाराविरुध्द दोन हात करणे हे धर्मकार्य आहे आणि त्यात ती व्यक्ती मारली गेली तर शहीद (हुतात्मा) बनते.
अनुमती कशी मिळेल? वरील दिव्योक्तीने हेच सिध्द होते की कोणालाही इस्लामचा स्वीकार करण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही. प्रत्येकाला धर्माबाबतचे स्वातंत्र्य आहे. त्याला पसंत पडले तर इस्लामच्या स्वीकार करील अन्यथा अस्वीकार करील.
२) जिहाद ही काही मोहिम अथवा चळवळ नाही की शासकवर्गाला बळाने दासत्वाच्या स्थितीत परिवर्तीत करावे. जिहाद वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या विरोधी आहे. होय जिहाद ही मानवजातीचे कल्याण करण्यासाठीची मोहीम जरूर आहे. सत्याला या भूतलावर स्थापित करून मानवाचे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवनात कल्याण करणे हेच एकमेव ध्येय जिहादचे आहे. अल्लाहच्या दासत्वात पूर्णपणे आलेला समाज इतरांचे दासत्व कसे बरे स्वीकार करील? असा समाज दुसऱ्यांपासून काही लाभ प्राप्त करण्यासाठी धडपड करत नाही तर दुसऱ्यांच्या फायद्यासाठीच (लोक परलोकचा फायदा) प्रयत्नशील राहतो.
0 Comments