प्रेषित्वावर विश्वास अर्थहीन होतो जर या श्रध्देत सर्व प्रेषित येत नाहीत. कुरआन अशा लोकांना श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणत नाही जे काहींना तर प्रेषित मानतात आणि इतर प्रेषितांना नाकारतात. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांशी द्रोह करतात आणि इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात, आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही, तसेच अश्रध्दा व श्रध्दा यांच्या दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय करतात ते सर्व पक्के अश्रध्दावंत (काफीर) आहेत आणि अशा अश्रध्दावंतांसाठी आम्ही अशी शिक्षा तयार करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित व तिरस्करणीय करून सोडणारी असेल. याविरूध्द जे लोक अल्लाह आणि त्याच्या सर्व प्रेषितांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत, त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू आणि अल्लाह मोठा क्षमा करणारा व दया करणारा आहे.’’ (कुरआन ४: १५०-१५२)
वरील ईशवाणी स्पष्ट करीत आहे की एखाद्या प्रेषितालासुध्दा नाकारणे म्हणजे पक्के अश्रध्दावंताचे (काफीर) लक्षण आहे. जर एखादा व्यक्ती प्रेषितांपैकी एका प्रेषितालासुध्दा नाकारत असेल अथवा त्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्याने सर्व प्रेषितांना नाकारल्यासारखे आणि अविश्वास ठेवल्यासारखे आहे. हे काही मामुली आदेश नाहीत. हे सत्याला धरून आहे की एका प्रेषिताला नाकारणे हे घोर पाप आहे. प्रत्येक प्रेषित अल्लाहकडून पाठविला गेला आहे आणि तो लोकांना दिव्यसंदेश पोहोच करीत असतो. अशा प्रकारे प्रेषित त्या काळातील लोकांचा शासक असतो जो अल्लाहकडून नियुक्त केला गेलेला होता. एखादी व्यक्ती प्रेषितांपैकी एका प्रेषितावर विश्वास ठेवत नसेल तर त्याने या सृष्टीचा स्वामी अल्लाहच्या प्रभुत्वावर अविश्वास ठेवला आणि त्याचे आज्ञापालन केले नाही हे सिध्द होते. हा अल्लाहविरुध्द विद्रोह आहे. एका प्रेषितावरील अविश्वास इतर सर्व प्रेषितांवरील विश्वासाला तार्किक दृष्ट्यासुध्दा कुचकामी ठरवितो. हे असे आहे की एक मनुष्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना मान्य करतो, परंतु एका अधिकाऱ्याला मान्य करीत नाही. अशाने ती व्यक्ती सरकारची विश्वासु ठरत नाही. ही त्याची लहर (स्वच्छंदता) आहे. त्याचे मानने अथवा न मानने हे मूल्यहीन ठरते. प्रेषित्वाच्या बाबतीत जर कोणी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असेल तर अल्लाह अशांना पक्के अश्रध्दावंत (काफीर) ठरवितो. नूह (अ) यांच्या लोकसमुदायाला उद्देशून अल्लाहने निर्णय दिला ज्याला कुरआनने कायमचेच सुरक्षित करून ठेवले आहे,
‘‘आणि त्यांना सांगितले की जा, त्या लोकसमूहाकडे ज्याने आमच्या वचनांना खोटे ठरविले आहे. सरतेशेवटी त्या लोकांना आम्ही नष्ट करून सोडले. हीच स्थिती नूह (अ) यांच्या लोकसमूहाची (राष्ट्राची) झाली, जेव्हा त्यांनी पैगंबरांना खोटे ठरविले, आम्ही त्यांना बुडवून टाकले आणि जगभरातील लोकांसाठी एक धडा देणारे संकेत बनविले, आणि या अत्याचाऱ्यांसाठी आम्ही एक वेदनादायक कोप उपलब्ध करून ठेवला आहे.’’ (कुरआन २५: ३६-३८)
नूह (अ.) यांच्या लोकांनी तर फक्त एका प्रेषितांनाच नाकारले होते. सरतेशेवटी अल्लाहने त्यांच्या या घोर अपराधापायी (काफीर) त्यांना बुडवून टाकले. आणि जगभरातील लोकांसाठी एक धडा देणारे शाश्वत असे संकेत त्या घटनेला बनविले. त्या लोकांनी इतर प्रेषितांबद्दल तर काहीच म्हटले नव्हते अथवा त्यांना नाकारलेही नव्हते.
आपण हे पाहिले आहे की प्रेषित आपल्या लोकसमूहात म्हणजे राष्ट्रात यासाठी येत असत की लोकांनी त्यांचे अनुकरण अल्लाहच्या इच्छेनुसार करावे. जो कोणी प्रेषिताची आज्ञाधारकता स्वीकार करतो तो खरे तर अल्लाहचीच आज्ञाधारकता स्वीकारतो. म्हणून प्रेषितांपैकी एकाचा अस्वीकार करणे म्हणजेच अल्लाहच्या इच्छेविरुध्द वागणे आणि त्याच्या आदेशांचे पालन न करणे होय. हे काय विद्रोह आणि घोर अश्रध्देचे लक्षण नव्हे? अल्लाहच्या प्रत्येक प्रेषितावर श्रध्दा न ठेवता खऱ्या श्रध्दावंताचा दावा करणे हे न्यायसंगत आहे काय?
प्रेषित्वाबद्दल वर सविस्तर जी चर्चा झाली आहे त्यात प्रेषित्वावरील श्रध्देचा साधारण आराखडा देण्यात आला आहे ते काही परिपूर्ण असे विवरण नाही. इस्लामी प्रेषित्वाच्या संकल्पनेला येथे पूर्णपणे स्पष्ट करणे हे या संक्षिप्त अभ्यासाचा उद्देश मुळीच नाही. इस्लामच्या प्रेषित्वाचे खरे स्वरूप आणि खरी इस्लामी संकल्पनासुध्दा या विवेचनाने पूर्णपणे पुढे येणे अशक्य आहे. इस्लामी प्रेषित्वाची संकल्पना तेव्हाच खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते आणि साकारली जाते जेव्हा मनुष्य अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आज्ञांकित होऊन त्यांना शरण जातो. असे करणे जेव्हा मनुष्यासाठी अनिवार्य सिध्द होते. मनुष्य तत्त्वतः मुहम्मद (स.) यांना प्रेषित मानतो जसे तो इतर प्रेषितांना मानतो आणि इतर प्रेषितांवरसुध्दा तसाच विश्वास ठेवतो जसा तो मुहम्मद (स.) यांच्यावर ठेवतो. परंतु व्यवहारात आणि आचरणात मात्र फक्त आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचेच अनुकरण करतो. आणि हेसुध्दा त्या निष्ठेने की फक्त मुहम्मद (स.) यांचेच आज्ञाकित होणे अत्यावश्यक आहे अनिवार्य आहे. सर्व प्रेषित अल्लाहचे संदेशवाहक होते म्हणून मनुष्य जेव्हा प्रेषित्वाच्या संकल्पनेवर श्रध्दा ठेवतो तेव्हा वर नमूद केलेल्या तार्किक वैशिष्ट्यांचा आणि अटींचा तो स्वीकारच करीत असतो आणि तेव्हाच तो खऱ्या अर्थाने इस्लामी प्रेषित्वाचा स्वीकार करून श्रध्दावंत (मुस्लिम) बनतो.
0 Comments