ईमानच्या वरील व्याख्येवरून कोणीही मनुष्य ईमानखेरीज ‘मनुष्य’ होऊ शकत नाही, हे तुम्ही स्वतःच समजू शकता. बीज व वृक्ष यांचे जे नाते आहे तसेच नाते ईमान व इस्लाम यांचे आहे. बीजाशिवाय वृक्ष उगवूच शकत नाही. असे होऊ शकते की बीज जमिनीत पेरले जावे परंतु जमीन खराब असल्या कारणाने अगर हवा व पाणी योग्य रीतीने न मिळाल्यामुळे वृक्ष निस्तेज व खुरटलेली होईल. अगदी याच तऱ्हेने जो मनुष्य मुळातच ईमान बाळगत नसेल तर तो मुस्लिम होणे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. असे मात्र जरूर शक्य आहे की एखाद्या व्यक्तीच्या अतःकरणात ईमान आहे परंतु आपल्या इच्छाशक्तीच्या कमकुवतपणामुळे अथवा कमी प्रतिच्या शिक्षण संस्कारामुळे व कुसंगतीमुळे तो परिपूर्ण व पक्का मुस्लिम असणार नाही.
ईमान व इस्लामच्या दृष्टीने सर्व माणसांचे चार प्रकार आहेत.
- जे ईमानधारक आहेत. त्यांचा ईमान त्यांना संपूर्णपणे ईशआज्ञांचे पालन करणारे बनवितो. ईश्वरास अप्रिय असलेल्या गोष्टींपासून ते स्वतःला अशा प्रकारे वाचवितात जसे विस्तवाला हात लावण्यापासून मनुष्य स्वतःला वाचवितो. ईश्वरास प्रिय जे आहे ते अशा तन्मयतेने व मनःपूर्वक करतात, जसे मनुष्य आनंदाने धनद्रव्य प्राप्त करतो. असा मनुष्य खराखुरा मुस्लिम आहे.
- मनुष्य ईमान तर बाळगतो परंतु त्याचा ईमान दृढ व मजबूत नसतो आणि तो परिपूर्णपणे अल्लाहचे आज्ञापालन करणारा नसतो. हे जरी खालच्या श्रेणीचे लोक असले तरीही ते मुस्लिमच आहेत. हे लोक ईश्वराच्या आज्ञेची अवहेलना व अवज्ञा करीत आहेत तेव्हा त्यांच्या अपराधाच्या दृष्टीने ते शिक्षेस पात्र आहेत परंतु त्यांची अवस्था अपराध्यांची आहे, बंडखोर व द्रोही माणसाची नाही. याचे कारण असे आहे की ते सर्वसत्ताधीश सम्राटाला सम्राट मानतात व त्याच्या नियम-विधींचा नियमविधी म्हणून स्वीकार करतात.
- जे लोक ईमान तर बाळगत नाहीत परंतु ते अशी कृत्ये करीत असतात जी ईशनियमांशी अनुकूल व सुसंगत असे वाटतात, हे लोक वास्तविकपणे विद्रोही आहेत. त्यांची बाह्यत्कारी सत्कृत्ये वास्तविकपणे ईश्वराच्या आज्ञापालनातील आचरण नव्हे, म्हणून ती कृत्ये मूल्यहीन आहेत. सम्राटाला सम्राट न मानणाऱ्या व त्याच्या नियम-विधींना नियम-विधी न मानणाऱ्या माणसाप्रमाणे त्यांचे उदाहरण आहे. अशी व्यक्ती, ईश नियमाविरुद्ध नसणारे एखादे असे कृत्य करताना दिसत असेल तर तो सम्राटासमीप आपल्या कर्तव्याचे पालन करणारा व त्याचे नियम व विधींचे पालन करणारा आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. कोणत्याही अवस्थेत त्याची गणना विद्रोही लोकांतच होईल.
- जे लोक ईमान तर बाळगत नाहीतच परंतु आचरणाच्या दृष्टीनेसुद्धा दुष्ट व दुराचारी आहेत, असे लोक सर्वांत वाईट दर्जाचे आहेत. याचे कारण ते द्रोहीही आहेत तसेच ते विघ्न निर्माण करणारे आहेत. ते अत्याचारी आणि उपद्रवी आहेत.
मानवसमूहाच्या या विभाजनाने हे स्पष्ट होते की ईमानावरच वास्तविकपणे मनुष्याच्या यशाचे श्रेय अवलंबून आहे. इस्लाम मग तो परिपूर्ण असो अथवा अपूर्ण असो, तो केवळ ईमानरूपी बीजानेच निर्माण होतो. जेथे ईमान नसेल तेथे त्याच्या जागी ‘कुफ्र’च असेल व कुफ्रचा अर्थ ईश्वराशी विद्रोह असा आहे, मग तो विद्रोह अल्पप्रमाणात असो की फार मोठ्या प्रमाणात असो.
परोक्ष (अदृश्य) यावर श्रद्धा (ईमान)
परोक्षावरील श्रद्धेचा अर्थ असा आहे की जे काही तुम्हास माहीत नाही ते माहीत असणाऱ्याकडून जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. ईशसत्तेशी व ईशगुणांशी तुम्ही परिचित नाही. तुम्हाला हेही ठाऊक नाही की त्याचे फरिश्ते (दूत) त्याच्या आदेशाबरहुकूम सर्व विश्वाची कामे करील असून तुम्हाला चोहोबाजूने त्यानी वेढलेले आहे. तुम्हास हेही माहीत नाही की, ईशइच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे? तुम्हाला पारलौकिक जीवनासंबंधीचा खरा वृत्तांत ठाऊक नाही. या सर्व गोष्टीचे ज्ञान तुम्हाला अशा माणसाकडून प्राप्त होते जो सत्यनिष्ठा, सरळपणा, ईशभय, अत्यंत पवित्र जीवन व बुद्धियुक्त आहे. त्याचे ऐकून तुम्हाला असे पटते की तो जे काही सांगत आहे, ते सर्व सत्य असून त्याच्या सर्व गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आहेत. यालाच परोक्षावरील श्रद्धा (ईमान-बिल-गैब) म्हणतात. अल्लाहचे आज्ञापालन करण्यासाठी व त्याच्या इच्छेनुसार आचरण करण्यासाठी परोक्षावरील श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण असे की, प्रेषिताखेरीज अन्य कोणाकडूनही तुम्हाला उचित ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही व उचित ज्ञानाखेरीज तुम्ही इस्लामच्या जीवनपद्धतीवर नीटपणे आचरण करू शकत नाही.
0 Comments