विश्वाच्या सर्वांत जास्त पावन मानवाचा संदेश हळूहळू प्रामाणिक आणि न्याय पसंत करणार्या सज्जनांपर्यंत पोहोचत गेला आणि हळूहळू प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांत भर पडत गेली आणि विरोध करणार्या ‘मक्का’वासीयांचा विरोधही तीव्र होत गेला.
विरोधकांच्या प्रेषितविरोधी प्रोपगंड्याचादेखील प्रेषितांना लाभ होत राहिला. त्यांच्या विरोधी प्रोपगंड्यामुळे प्रेषितांचा संदेश दूरदूर पसरत गेला. परिणामी बर्याच प्रतिष्ठित जणामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना भेटण्याची उत्कंठा वाढत गेली. लोक प्रेषितांची भेट घेऊ लागले.
पुढे जाण्यापूर्वी एका विचित्र घटणेवर आपण लक्ष घालू या. झाले असे की, त्या काळात ‘तुफैल बिन अम्र दोसी’ नावाचे एक अतिशय प्रसिद्ध कवी आणि सज्जन गृहस्थ होते. ते ‘मक्का’ शहरात आले तेव्हा कुरैश कबिल्याच्या काही जणांनी त्यांची भेट घेतली व सांगितले, ‘‘हे तुफैल! तुमचे आमच्या शहरात आगमन झाले आहे. येथे मुहम्मद(स) यांचे कर्म आमच्यासाठी असहनीय झाले आहे. त्याचे बोल एखाद्या जादूप्रमाणे मनावर भुरळ घालतात. तो भावाभावांत आणि पतीपत्नीत दुरावा निर्माण करीत आहे. जो माणूस त्याला भेटतो, तो स्वतःस त्याच्याच स्वाधीन करतो आणि आपल्या परिवार व समाजाचा वैरी बनतो. म्हणून आम्ही तुम्हालादेखील या संकटाची पूर्वसूचना देत आहोत. तुम्ही त्यास मुळीच भेटू नका. त्याचे काहीही ऐकू नका. त्याच्याशी काहीच बोलू नका. अन्यथा तुम्हीदेखील वशीकरणाच्या आहारी जाल.’’
तुफैल यांनी स्वतः हा वृत्तान्त आपल्या शब्दांत अशा प्रकारे सांगितले की, ‘‘त्या कुरैशजणांनी माझ्याकडून वचन घेतल्याशिवाय मला सोडले नाही. मी ‘हरम’कडे जाताना कानामध्ये कापूस खुपसून जात असे, जेणेकरून मुहम्मद(स) यांचे शब्द माझ्या श्रवणी येऊ नयेत. एकदा प्रेषित मुहम्मद(स) ‘काबा’मध्ये ईशस्मरणासाठी उभे होते. त्यांची वाणी ऐकण्याची माझ्या मनात तीव्र उत्कंठा निर्माण झाली. मी कानातील बोळे काढून प्रेषित ईशस्मरणात उच्चारीत असलेली वाणी ऐकू लागलो. खरोखरच प्रेषितवाणी अत्यंत प्रभावी आणि चित्ताकर्षक होती. मी कवीमनाचा माणूस असूनही अशी सत्यवाणी यापूर्वी कधीच कोणाच्या तोंडून ऐकलेली नव्हती. त्यांच्या वाणीत सत्य ओतप्रोत होते. मग मी विचार केला की, मी स्वतः एक कवी आहे. आपल्या विवेकबुद्धीने भल्या-बुर्याचा विचार करण्याची माझ्यात पात्रता आहे. मग सरळच प्रेषित मुहम्मद(स) यांची भेट घेऊन त्यांचे विचार प्रत्यक्षात ऐकण्यात काय वावगे आहे. जे बुद्धीला पटेल ते स्वीकारू आणि जे पटणार नाही, ते सोडून देऊ.
असा विचार करून मी प्रेषित मुहम्मद(स) हे घरी जात असताना त्यांच्यासोबत चालू लागलो. रस्त्यात मी प्रेषितांच्या विरोधकांच्या प्रोपगंड्याबाबत सविस्तर वृत्तान्त सांगितला. प्रेषितांच्या घरी पोहोचल्यावर मी त्यांना निवेदन केले की, त्यांनी आपली शिकवण स्पष्ट करावी. यावर प्रेषितांनी इस्लाम धर्माबाबतीत माहिती दिली. ईश्वराची शपथ! प्रेषितांच्या मुखाने वदलेल्या वाणीपेक्षा जास्त सुंदर आणि सत्याधिष्ट वाणी मी इतरत्र कोठेच ऐकली नाही. त्यांनी वदलेल्या दिव्य कुरआनाने माझे अंतःकरण खूप प्रभावित झाले. मग कोणताही विलंब न लावता मी इस्लामचा स्वीकार केला आणि त्यांच्या जमातीत सामील झालो. त्यांचा निरोप घेऊन मी आपल्या कबिल्यात आलो आणि कबिल्याच्या लोकांना इस्लामचा संदेश ऐकविला. ते सर्वजणसुद्धा खूप प्रभावित झाले.’’
याचप्रमाणे आणखीन एक प्रमुख कवी आशा बिन कैस मक्का शहरात आला. त्याचीसुद्धा इस्लामविरोधी लोकांनी गैरसमजूत केली. त्याला सांगण्यात आले की, मुहम्मद(स) भोगविलासास निषिद्ध ठरवितात. मद्यपानाची मनाई करतात. हे ऐकल्यावर त्याच्या मनातदेखील प्रेषित मुहम्मद(स) यांना भेटण्यासाठी संकोच निर्माण झाला. त्याची अवस्था पाहून विरोधकांनी त्यास सांगितले, ‘‘सध्या तुम्ही परत जाऊन चांगला विचार करा आणि पुढच्या वर्षी येऊन मुहम्मद(स) यांची भेट घ्या.’’ तो तसाच परत गेला. परंतु पुढच्या वर्षी येण्यापूर्वीच तो मरण पावला.
यापेक्षा जास्त एक विलक्षण घटणा घडली. अराशी नावाचा एक माणूस ‘मक्का’ शहरात आला. त्याच्यासोबत एक उंट होता. इस्लामद्रोह्यांचा म्होरक्या ‘अबू जहल’ याने त्याच्या उंटाचा सौदा केला, परंतु रक्कम देण्यास मागेपुढे करू लागला. अराशी आपल्या उंटाची रक्कम मिळविण्यासाठी कुरैश कबिल्यांच्या बर्याच सरदारांना भेटला. परंतु कोणीही त्याचे पैसे अबू जहलकडून मिळवून देऊ शकला नाही. एका सरदाराने टिगलटवाळी करण्याच्या हेतुने त्याला सांगितले की, ‘‘तू मुहम्मद(स) यांना भेट, ते तुझा हक्क मिळवून देतील.’’ अराशीने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची भेट घेऊन सविस्तर वृत्तान्त सांगितला आणि आपला हक्क मिळवून देण्याची विनंती केली. त्याची परिस्थिती ऐकताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) उठले आणि अराशीला घेऊन सरळ ‘अबू जहल’च्या घरी पोहोचले. घरावर थाप मारली. आतून प्रश्न आला की, ‘‘कोण आहे?’’
‘‘मी आहे मुहम्मद(स)! बाहेर या,’’ प्रेषित उत्तरले. ‘अबू जहल’ बाहेर आला. अराशीसोबत प्रेषित मुहम्मद(स) यांना पाहताच वस्तुस्थितीची त्यास कल्पना आली. प्रेषित मुहम्मद(स) हे अराशीचा हक्क मिळवून देण्यासाठी आलेले आहेत, हे न समजण्याएवढा मूर्खही तो नव्हता. तो अरब समाजाचा अत्यंत चतुर आणि मुत्सद्दी माणूस होता. आपल्या बाबतीत प्रेषितांच्या मनात खदखदणारा संताप, अन्याय व अत्याचाराविरोधी असलेल्या भावना आणि सत्याच्या समर्थनाची तीव्र मानसिकता प्रेषितांच्या डोळ्यांत पाहूनच त्याचे धैर्य खचले. आदर्श चारित्र्य असलेल्या प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर तोंड उघडण्याची त्याच्यात हिमतच उरली नाही. त्याच्या सर्वांगास दरदरून घाम फुटला. हे दृष्य पाहून ‘अराशी’ देखील आश्चर्याने थक्क झाला. कारण त्याने कुरैश कबिल्यांच्या मोठमोठ्या सरदारांना आपला हक्क मिळवून देण्याची विनंती केली होती. परंतु कोणत्याही सरदारात ‘अबू जहल’सारख्या व्यक्तीसमोर उभे राहण्याचे धैर्य नव्हते. परंतु याच ‘अबू जहल’ला प्रेषितांच्या नजरेचा सामना करणे अशक्य झाले होते. तो ताबडतोब घरात गेला आणि रक्कम मोजून ‘अराशी’ला देऊन टाकली.
इस्लामद्रोह्यांची टिगल उडविण्याची योजना त्यांच्यावरच उलटली. अशा प्रकारे ईश्वरी क्रांतीचे आंदोलन पुढे जात होते आणि विरोधकांचे सर्व मनसुबे त्यांच्यावरच उलटत होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ठार मारण्याची योजनासुद्धा इस्लामद्रोह्यांच्या विचाराधीन होती. परंतु दोन कबिल्यात दीर्घकाळ उद्भवणार्या संघर्षाच्या भीतीपोटी ही योजना रखडली. शेवटी त्यांनी आणखीन एक योजना आखली. ती अशी की, प्रेषित मुहम्मद(स) यांचे लाडके काका अबू तालिब यांच्यावर दबाव टाकण्यात यावा की, त्यांनी इस्लामी क्रांतीच्या आंदोलनकर्त्यांना आपल्या सुरक्षासीमेच्या बाहेर काढावे. त्यांची कोणत्याही प्रकारे पाठराखण करू नये. अशा प्रकारच्या कुटील योजनेमागे ‘उमैया’ परिवाराच्या सरदारांचे डोके चालत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे हाशिम परिवाराचे होते. हाशिम परिवाराशी हेवा बाळगणार्या ‘उमैया’ परिवाराच्या सरदारांना ही गोष्ट मुळीच सहन होण्यासारखी नव्हती की, ‘हाशिम’ परिवारात ‘प्रेषित’ असावा.
उत्बा, शैबा, सुफयान, अबुल बख्तरी, अस्वद, अबू बहल, वलीद बिन मुगैरा, हिज्जाज व त्याची दोन्ही मुले नुबैह व मुनब्बिह आणि आस बिन वाईलसारख्या मोठमोठ्या सरदार व प्रतिष्ठितजणांचे एक शिष्टामंडळ प्रेषितांचे काका ‘अबू तालिब’ यांच्याकडे येऊन म्हणाले, ‘‘हे अबू तालिब! आपला लाडका पुतण्या मुहम्मद(स) आमच्या उपास्य, विभूती आणि दैवतांचा अपमान करतो. आमच्या धर्माची विटंबना व अनादर करतो. आमच्या वडिलोपार्जित धर्मप्रथा व कर्मकांडास चुकीची पद्धत आणि मूर्खतापूर्ण कार्य म्हणतो. आमच्या श्रद्धांना क्षती पोहचवितो. वाडवडिलांचा अपमान व अनादर करतो. म्हणून एकतर तुम्हीच त्यांना आवर घाला किवा आमच्या दोघांच्या मध्यात न पडता बाजूला व्हा. आम्ही काय करायचे ते पाहून घेऊ.’’
‘अबू तालिब’ यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना समजावून आणि शांत करून परत केले. प्रेषित मुहम्मद(स) यांनी नित्यनेमाने आपले प्रचारकार्य सुरुच ठेवले आणि विरोधक मात्र वैफल्याच्या आहारी गेल्याने आणखीनच संतापले.
अशाच प्रकारे आणखीन काही दिवस लोटल्यावर परत एक शिष्टमंडळ अबू तालिब यांची भेट घेऊन म्हणाले,
‘‘आम्ही मागणी केली होती की, आपल्या लाडक्या पुतण्यापासून आम्हास वाचवा. परंतु आपण आमच्या मागणीचा विचारदेखील केला नाही. आम्ही आमच्या धर्म, दैवत आणि वाडवडिलाविषयी आपल्या पुतण्याच्या मुखाने होणारा अपमान मुळीच सहन करू शकत नाही. तुम्ही त्यांना आवर घाला, अन्यथा आम्ही तुमच्याशीदेखील दोन हात करायला मागेपुढे पाहणार नाही.’’ अबू तालिब यांनी पाहिले की, प्रकरण गंभीर होत आहे. म्हणून त्यांनी आपले लाडके पुतणे प्रेषित मुहम्मद(स) यांना बोलावून म्हटले, ‘‘बेटा! माझ्यावर एवढे ओझे टाकू नकोस की, ज्याला उचलणे माझ्या शक्तीबाहेर होईल!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना काकांचे शब्द ऐकल्याने हे कळून चुकले की आपण ज्या आधारशीलेवर पाय ठेवून उभे होतो, ती आधारशीला आता सरकणार आहे. हे लक्षात आल्यावरसुद्धा आणि या अत्यंत नाजूक परिस्थितीतही आपल्या अतिश्रेष्ठ पदाचा मान भंग न होऊ देता म्हटले,
‘‘हे काकावर्य! ईश्वराची शपथ! या लोकांनी जर माझ्या उजव्या हातात सूर्य आणि डाव्या हातात चंद्र ठेवून मागणी केली की, मी या कार्यास सोडून द्यावे, तरी मी हे कार्य तडीस नेणारच. निश्चितच हे ईश्वरी आंदोलन यशस्वी होईल!’’
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आतून बोलणारी हीच ती शक्ती होय, जिच्यामुळे इतिहासात अभूतपूर्व परिवर्तन घडत असते. त्यांचा हा निर्धार पाहून अबू तालिब यांचेदेखील काळीज हेलावले. त्यांनी मोठ्या प्रेमाने म्हटले, ‘‘बेटा! तुला जे योग्य वाटते ते कर! तू आपला संदेश पोहोचविण्याचे कार्य सुरु ठेव. मी कोणत्याही कठीण परिस्थितीत तुला वार्यावर सोडणार नाही! ’’
अशाच प्रकारची एक घटना माननीय हमजा(र) आणि मा. उमर(र) यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर घडली. कुरैश कबिल्याचे काहीजणांचे शिष्टमंडळ प्रेषितांचे काका अबू तालिब यांना भेटून म्हणाले, ‘‘सर्व परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोरच आहे. आपल्या पुतण्याला (अर्थात प्रेषित मुहम्मद(स)) यांना बोलावून घ्यावे. आपणांसमोर असा करार व्हावा की, त्यांनी आता आम्हास छेडू नये. आम्हीही त्यांना छेडणार नाहीत. त्यांनी आमच्या लोकांना त्यांच्या धर्माचा उपदेश करू नये. आमचाही त्यांच्या धर्माशी काहीच संबंध नसेल.’’
‘अबू तालिब’ यांनी प्रेषित मुहम्मद(स) यांना बोलावून सर्व प्रकार सांगितला. प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरैशच्या शिष्टमंडळास उत्तर दिले की, ‘‘माझे एक धर्मसूत्र आहे. तुम्ही जर याचा स्वीकार केला तर संपूर्ण अरबजण तुमच्या वंशात येईल आणि संपूर्ण विश्वातील मानव तुमचेच नेतृत्व स्वीकारतील!’’
या ठिकाणी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शब्दांवर दृष्टी टाकल्यास हे सिद्ध होते की, त्यांचा धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हते, तर ती एक परिपूर्ण जीवनव्यवस्था होती. अरबी भाषेत प्रेषितांच्या प्रस्तावित धर्मास ‘दीने हक’ असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘दीने हक’ म्हणजेच सत्यावर आधारित जीवनव्यवस्था. जन्मापासून मरेपर्यंत मानवाच्या आचारविचाराची ही संहिताच असून ती केवळ एखाद्या विशिष्ट समाजापुरती किवा राष्ट्रापुरती वा विशिष्ट काळापुरती मर्यादित नसून प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक राष्ट्र, वंश व प्रदेशाच्या आणि प्रत्येक भाषा बोलणार्या मानवासाठी आहे. हीच विश्वव्यापी जीवनव्यवस्था म्हणजेच ‘इस्लाम’ होय.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची निर्णयशक्ती एवढी अफाट आहे की, शत्रूंची संख्या व शक्ती आपल्या व आपल्या अनुयायांच्या संख्या व शक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असूनसुद्धा त्यांना आपल्या इस्लामी आंदोलनाच्या यशाची पूर्ण खात्री होती. जणू ते अंधारात उभे राहून सांगत होते की, ‘रात्रीचा अंधार संपेल व सकाळचा सूर्य उगवेल.’
‘हज’चा प्रसंग मोठा विचित्र असायचा. दूरदूरच्या प्रदेशातून भाविक ‘हज’ करण्यासाठी मक्का शहरात येत असत. याच संमेलनाप्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपला सत्यसंदेश हजयात्रेकरूना देत. विरोधकांच्या अंगाचा तिळपापड होई. प्रत्येकास प्रेषितांची भेट न घेण्याची वा त्यांच्याशी न बोलण्याची सूचना करणे विरोधकांना शक्य नव्हते. यामुळे काय करावे हे त्यांना सुचत नव्हते.
अशाच एका ‘हज’ मोसम येण्यापूर्वी विरोधकांमधील ‘वलीद बिन मुगैरह’ याच्या निवासस्थानी विरोधकांच्या सरदारांची सभा घेण्यात आली. वलीद म्हणाला, ‘‘हजचा मोसम जवळ येत आहे. दूरदूरच्या शहरांतून अरबजण ‘हज’ करण्यासाठी येतील. मुहम्मद(स) यांच्याविषयी व त्यांच्या धर्माविषयी बरीच माहिती त्यांना मिळाली आहे. ते लोक मुहम्मद(स) यांना भेटण्याचे व त्यांचा धर्मसंदेश जाणून घेण्याचे प्रयत्न करतील. तेव्हा वेळीच काही उपाय करावा लागेल की जेणेकरून ते मुहम्मद(स) यांना भेटू नयेत.
या उपायाच्या मुद्यावर खूप चर्चा रंगली. बर्याच क्लुप्त्या आणि योजना लोकांनी सांगितल्या. कोणी म्हणाले, ‘‘आपण मुहम्मद(स) हे जादूगार असल्याचे सांगू या,’’ तर कोणी म्हणाले, ‘मुहम्मद(स) हे कवी असल्याचे सांगू या किवा त्यांना पिशाच्च लागल्याचे भासवू या, जेणेकरून लोक त्यांची भेट घेणे टाळतील.’’ परंतु शेवटी सर्व चर्चा निष्फळ ठरली आणि सर्वजण म्हणाले की, ‘‘हे वलीद! तुम्हीच योग्य तो निर्णय द्यावा.’’ वलीदलादेखील काही सुचत नव्हते. कारण तोदेखील दूरदृष्टी ठेवणारा एक मुत्सद्दी स्वभावाचा अनुभवी माणूस होता. त्याला या गोष्टीची चांगलीच कल्पना होती की, प्रेषित मुहम्मद(स) यांचा संदेश रद्दबातल ठरविण्याकरिता कोणतेच ठोस, तर्कसंगत व बुद्धीनिष्ठ कारण नव्हते. सत्याचा इन्कार करण्यासाठी कोणताच पुरावा नसतो. सत्य कधीही लपविल्याने लपत नसते. दिवसाढवळ्या तोंडावर चादर पांघरल्याने रात्र होत नसते. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले आणि शेवटी त्याच्याही मुखावर सत्य आलेच व तो ताडकन उठून म्हणाला, ‘‘आपण योजिलेल्या योजनांचा काहीच उपयोग होणार नाही. मुहम्मद(स) यांचा संदेश निश्चितच यशस्वी होईल. त्यांचा धर्म सर्व जगावर प्रस्थापित होणारच. आपण सर्वजण विनाकरण मूर्खासारखे काहीही उपाय करीत असून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यांच्या संदेशास मिळणारे यश आणि आपली नामुष्की अटळ आहे. सध्या काम भागविण्यापुरते एवढे करता येईल की, मुहम्मद(स) यांच्यावर ते जादूगार असण्याचा आरोप करण्यात यावा. लोकांना पूर्वसूचना द्यावी की मुहम्मद(स) यांना भेटू नका. ते आपल्या भेटणार्यांना जादूने प्रभावित करतात आणि परिणामी पती-पत्नी, भाऊ-भाऊ आणि बाप-लेकात शत्रुत्व निर्माण होते.’’
असत्यवाद्यांचे असेच असते. सत्य कळून चुकल्यावरसुद्धा केवळ खोट्या अहंकारापोटी सत्याचा इन्कार करून इतरांनाही सत्यापासून वंचित ठेवण्याचे कुटिल षडयंत्र रचत असतात. ‘वलीद बिन मुगैरह’ हा याचे बोलके उदाहरण आहे. अशा प्रकारचे लोक प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक काळात असतात.
‘माननीय रबिआ बिन उबैदा(र) म्हणतात की, ‘‘मी दहा वर्षांचा होतो तेव्हा मी पाहिले, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) प्रत्येक कबिल्याच्या लोकांना भेटून सांगत असत की, ‘‘मी तुमच्या व संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शन व कल्याणासाठी एकमेव ईश्वराकडून पाठविण्यात आलेला प्रेषित आहे. मी तुम्हास उपदेश करतो की, केवळ एकमेव ईश्वरच उपासनेस पात्र आहे. त्याला सोडून कोणाचीही उपासना करू नये. मूर्तीपूजेचा त्याग करा. ईश्वराने नेमून दिलेल्या जीवनव्यवस्थेचा स्वीकार करा. म्हणून तुम्ही माझे प्रेषितत्व स्वीकार करून या ईश्वरी आंदोलनात सहभागी व्हा. मी ईश्वराची संपूर्ण संहिता स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडील.’’
प्रेषितांचा संदेश संपताच त्यांचा कट्टर व माथेफिरु विरोधक घोषणा करीत असे, ‘‘हे लोकांनो! हा माणूस तुम्हास ‘लात’ व ‘उज्जा’ (त्या काळातील अरबचे दैवत) च्या पूजेपासून रोखत आहे. तुमचा धर्म भ्रष्ट करीत आहे. तुम्ही त्याचे मुळीच ऐकू नका.’’
अशा तर्हेने ‘जुल मजाज’ च्या बाजारात प्रेषित मुहम्मद(स) एकदा धर्मोपदेश करीत होते, तेव्हा ‘अबू जहल’ याने माती उचलून त्यांच्या अंगावर टाकली आणि लोकांना त्यांच्याजवळ न फिरकण्याची चेतावणी दिली.
सत्यविरोधकांना जेव्हा हे कळून चुकले की, आपल्या सर्व उपाययोजना आणि कटकारस्थाने अयशस्वी ठरत आहेत. कोणतीही योजना निष्फळ ठरत आहे. प्रेषित मुहम्मद(स) यांचे आंदोलन दिवसेंदिवस यशाच्या मार्गावर वाटचाल करीत होते. त्यांच्या अनुयायांत दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यांना त्यांच्या निश्चयापासून आणि उद्दिष्टापासून परावृत्त करणे अशक्यप्राय होते. त्यामुळे विरोधकांनी हे आंदोलन दडपण्यासाठी सौदेबाजीची नीती अवलंबिली, त्यामुळे मोठ्या नम्रता व नरमाईने प्रेषित मुहम्मद(स) यांना विनंती केली की, ‘‘हे मुहम्मद(स)! आपले जुने वैरभाव सोडून द्या. झालं गेलं विसरून जा. आम्हीदेखील तुमच्याजवळ येऊ शकतो. मात्र तुम्ही केवळ एवढेच करा की, आमच्या विभूती व दैवतांविरुद्ध अपशब्द काढू नका. शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या कुरआनातील नियम संहितेत थोडासा बदल करा किवा वाटल्यास एखाद्या नवीन संहितेवर आधारित नवीन कुरआन सादर करा की, ज्यामध्ये आमच्या प्राचीन धर्माविषयी व दैवतांविषयी अपमानजनक मजकूर नसावा.’’
प्रेषित मुहम्मद(स) यांनीदेखील नम्रपणे उत्तर दिले, याचे सर्वस्वी अधिकार एकमेव ईश्वरालाच असून माझ्या अखत्यारीत काहीही नाही. त्या माणसापेक्षा जास्त अत्याचारी आणि दुर्दैवी माणूस कोण असेल, जो ईश्वराच्या संदेश आणि वाणीमध्ये स्वतःची वाणी वा विचार जोडून ईश्वरी संदेशात भेसळ करील.’’
विरोधी सरदारांनी अशी मागणीसुद्धा केली की, ‘‘हे मुहम्मद(स)! तुम्ही आपल्या आंदोलनकार्यांतून गुलाम, दास, तुच्छ लोक, गोरगरीब व आर्थिक दुर्बळ लोक बाजूला करा. त्यांना काढून टाका. मग आमच्यासारखे प्रतिष्ठित, चांगल्या दर्जाचे व सरदारवर्गाचे लोक आपल्या सभेत व मैफलीत बसून आपला उपदेश व संदेश अवश्य ऐकतील. तुमच्या या अतिसामान्य अनुयायांमध्ये आमच्यासारखे उच्च दर्जाचे, सरदार असलेले व प्रतिष्ठित लोक कसे बसू शकतील?’’
विरोधकांची ही पाखंडी व विषम मागणी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी साफ धुडकावून लावली व म्हणाले, ‘‘माझ्या या प्रामाणिक आणि सज्जन अनुयायांनी प्रत्येक प्रकारचा स्वार्थ त्यागून माझी साथ दिली आहे. यामुळे त्यांना अमानुष छळास बळी पडावे लागले आहे. आपले सर्वस्व त्यागून माझी साथ देणार्यांना मी मुळीच त्यागू शकत नाही.’’
मानवांदरम्यान उच्चनीचतेचा भेदभाव ईश्वरास मुळीच मान्य नाही. केवळ पैशामुळे, गोर्या वर्णामुळे, चांगल्या वंशात जन्मल्यामुळे कोणीच उच्च होऊ शकत नाही. या खुळचट बाबींवर कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा आधारित नाही. या उलट ज्या दुर्बल आणि व्यवसायाने गुलाम व आर्थिक मागास लोकांनी आपले सर्वस्व त्यागून आणि कठोरहृदयीजणांचा अमानुष छळ सोसून प्रेषित मुहम्मद(स) यांची साथ दिली, तेच ईश्वरासमोर खरे प्रतिष्ठित होत. म्हणूनच प्रेषितांनी या पाखंडी सरदारांची मागणी धुडकावली. अशा प्रकारची मानवांदरम्यान समानता केवळ इस्लाममध्येच आढळते. कारण ईश्वरासमोर संपूर्ण मानवजात समान दर्जाची असते. उच्चनीच, वर्ण, वंश आणि आर्थिक दुर्बल व सबळांच्या दरम्यान फरक असण्याचा प्रश्नच येत नाही.
इस्लामविरोधक सरदार तेथून रिकाम्या हाती परतले. आता मात्र विरोधकांनी आणखीन एक जबरदस्त योजना तयार केली. विरोधकांची ‘कुरैश’ कबिल्यातील लोकांची भली मोठी परिषद भरवून या परिषदेचा प्रतिनिधी अतिशय मुत्सद्दी व चाणाक्ष बुद्धी असलेला ‘उत्बा बिन रबिआ’ यास नियुक्त करून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे असा संदेश देऊन पाठविले की, ‘‘आमच्या परिषदेच्या सर्व सदस्यांकडून ‘उतबा बिन रबिआ’ या प्रतिनिधीमार्फत संदेश देण्यात येतो की, आपणास जर संपत्ती हवी असेल तर आम्ही संपत्तीचा ढीग तुमच्या समोर लावू. सरदारी आणि शासन हवे असल्यास आपणास आम्ही आपले सर्वोच्च सरदार आणि शासक स्वीकारु. या सर्व बाबींपैकी जे हवे असेल ते द्यायला आम्ही तयार आहोत. आपणच सांगा की, आपणास काय हवे आहे?’’
परिषदेचा प्रतिनिधी ‘उत्बा बिन रबिआ’ संदेश घेऊन प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे आला व परिषदेचा संदेश कळविला. यावर आदरणीय प्रेषितांनी उत्तरादाखल दिव्य कुरआनच्या ‘सूरह हामी…म’च्या काही आयती वाचून दाखविल्या, ह्यांचा अनुवाद आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत.
‘‘(एकमेव ईश्वराने म्हटले की,) हे हामी.. म असून हे मोठ्या मेहरबान, असीम दयाळू व कृपाळू असलेल्या (एकमेव ईश्वरा) कडून पाठविण्यात आले आहे. हा एक लेख असून याची एकन् एक आयत शुद्ध व अतिशय स्पष्ट आहे. हे दिव्य कुरआन अरबी भाषेत विवेकबुद्धीने विचार करणार्यांसाठी आहे. कुरआन (ईश्वरावर श्रद्धा ठेवणार्यांसाठी) खूशखबर आणि शुभवार्ता देणारा, तसेच (सत्य वा ईश्वराचा इन्कार करणार्यांना) तंबी करणारा आहे. करिता त्या (अर्थात मक्कावासी) पैंकी बहुसंख्य जणांनी याचा इन्कार केला आणि (चेष्टेने) हसून म्हटले की, आमची मने, त्या सत्याच्या विरोधात आहेत, ज्याकडे तुम्ही निमंत्रित करता. तसेच ते आमच्या कानांसाठी त्रासदायक आहेत आणि आमच्या व तुमच्यादरम्यान एक पडदा रोधक बनला असून तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करीत राहू.’’(संदर्भ : दिव्य कुरआन)
हे ऐकल्यावर प्रतिनिधी ‘उतबा’ उठला आणि आपल्या लोकांमध्ये जाऊन म्हणाला, ‘‘मी मुहम्मद(स) यांच्या तोंडून असे अभूतपूर्व आणि कमालीचे वचन व वाणी ऐकली की, यापूर्वी आणि इतरत्र कोणाच्याही तोंडून अशी वाणी ऐकली नाही. ईश्वराची शपथ! ती काही जादू आणि काव्य नाही मुळी, ईश्वराची शपथ! मला तर वाटते की, या अतिप्रभावी वाणीचा काहीतरी मोठा परिणाम होणार दिसतो. हे कुरैशच्या परिवारजणांनो! माझे ऐकले तर बरे होईल. त्या माणसास आहे त्या परिस्थितीत राहू द्या. अरबजणांनी त्यावर जय मिळविला तर तुमची सुटका होईल, परंतु त्याने जर सर्व अरबजणांवर जय मिळविला तर त्याचे राज्य हे तुमचे राज्य होईल. त्याच्यामार्फत तुम्ही सर्वजणांत भाग्यशाली व्हाल.’’
खरोखरच ‘उतबा बिन रबिआ’ मुत्सद्दी होता. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या वाणीचा किती काटेकोर अनुमान ‘उतबा’ने लावला! त्याला हेदेखील कळून चुकले की, प्रेषित मुहम्मद(स) यांनी सादर केलेला धर्म म्हणजे इतर धर्मांसारखा केवळ पूजापाठ आणि कर्मकांडापुरता मर्यादित धर्म नसून त्या धर्मामुळे एक अख्खे राज्य उदयास येणार आहे. त्या मुत्सद्दी विरोधकाने या प्रेषितवाणीच्या पाठीमागे एका महान क्रांतीचा सूर्य उगवताना अनुभवला आहे.
कुरैश कबिल्याच्या विरोधकांप्रमाणेच असाच एक प्रस्ताव ‘सीरिया’ देशाच्या सरदारांनी प्रेषित मुहम्मद(स) यांची जातीने भेट घेऊन सादर केला. या वेळीसुद्धा प्रेषितांनी असे उत्तर दिले की,
‘‘तुम्ही जसे सांगत आहात त्यापेक्षा माझे धर्मप्रकरण खूप भिन्न आहे. सत्य प्रचार व प्रसाचाराचा माझा हेतू संपत्ती व शासन मिळविणे हा मुळीच नसून मला स्वयं एकमेव ईश्वराने तुमच्या (व संपूर्ण मानवजाती) कडे आपला प्रेषित नियुक्त करून पाठविले आहे. त्यामुळे मी ईश्वराचे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचविले आहे. जर तुम्ही माझे धर्मनिमंत्रण स्वीकाराल तर, हे तुमच्यासाठी ऐहिक आणि पारलौकिक लाभ मिळण्याचे शाश्वत माध्यम ठरेल आणि जर तुम्ही यास नाकारले तर मी धैर्याने ईश्वराच्या पुढील आदेशाची वाट पाहीन.’’
0 Comments