मा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) याचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या काकांना संबोधन करून सांगितले, ‘‘हे काकावर्य! मी लोकांशी केवळ कलम्याची (अर्थात एकेश्वरवाद स्विकार करण्याची) मागणी करतो. हा कलमा (धर्मसूत्र) असा आहे की, लोकांना याचा स्विकार केल्यास पूर्ण अरबदेश तुमच्या अधिपत्याखाली येईल आणि अरबेतर लोक त्यांना जिझिया (नागरीक कर) देतील. हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकीत झालेत व म्हणाले, ‘‘तुमच्या पितावर्याची शपथ! असे असल्यास तुमच्या एका नव्हे, तब्बल दहा ‘कलम्यांचा’ आम्ही स्विकार करू. आम्हांला सांगा की तो कलमा कोणता आहे? अबू तालिब (प्रेषितांचे काका) यांनी पण विचारले की, हे पुतण्या! तो कलमा कोणता आहे? यावर प्रेषितांनी (स.) सांगितले, ‘‘तो कलमा, ‘‘ला-इलाहा इल्लल्लाह आहे.’’ (हदीस : मस्नद अहमद, निसाई)
भावार्थ
कलमा-ए-तौहीद (एकाच ईश्वराच्या उपासनेचे सूत्र) ‘ला इलाहा इल्लल्लाह’ केवळ एक धर्मसूत्र नसून पूर्ण एकेश्वरवादी व्यवस्था आहे, जे माननीय जीवनाच्या संपूर्ण व्यवहारांशी व संपूर्ण बाबींशी संबंधीत आहे. केवळ नमाज व रोजा पर्यंतच मर्यादित नसून, या कलम्याच्या आधारावर राजकीय व्यवस्था प्रस्थापित करणे अभिप्रेत आहे. जर हे वास्तव नसते तर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी याचा हा अर्थ स्पष्ट केलाच नसता की, ‘‘अरब देश तुमच्या अधिपत्याखाली येईल व अरबेतर लोक तुम्हांस जिझिया (कर) देतील, प्रे. मुहम्मद (स.) यांनी अशावेळी ही चर्चा केली जेव्हा अरबमधील कुरैश कबील्याचे नेतेगण, आपले प्रमूख सरदार ‘अबू तालीब’ (प्रेषितांचे काका) यांच्याकडे, त्यांचे पुतणे ह. मुहम्मद (स.) यांची तक्रार घेऊन आले होते की, अबू तालीब यांनी आपले वजन वापरून, दबाव घालून प्रेषितांचे इस्लाम प्रचार कार्य थांबवावे. प्रेषितांनी आपले काका, अबू तालीब यांना सांगितले की, हे काकावर्य! माझ्या उजव्या हातात सूर्य व डाव्या हातात चंद्र आणून दिले तरी मी इस्लामचे प्रचार कार्य बंद करणार नाही. इथपावेतो ईश्वर यास प्रस्थापित करो अथवा याच अवस्थेत मला मृत्यू येवो. इस्लाम दर्शनाचा वास्तविक अर्थ असाच आहे व दिव्य कुरआनमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा शब्दप्रयोग झाला आहे, तिथे केवळ ‘राजकीय वर्चस्वच’ अभिप्रेत आहे.
ह. अब्बाज (र.) कडून कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘इस्लामची गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म (व्यवस्था) मानून, आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून, आनंदीत झाला. (हदीस : बुखारी व मुस्लीम)
भावार्थ
सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञा पालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्रनियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित (स.) यांच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ट आहे. त्याचा फैसला आहे की, मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम जीवनधर्मावर चालायचे आहे. आणि प्रेषित (स.) यांच्या खेरीज कोणत्याही माणसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन पार पाडायचे नाही. ज्या माणसाची अशी अवस्था होईल तेव्हा समजून घ्या की त्याने इमानची गोडी प्राप्त केली.
मा. अबु अमाया (र.) कथन करतात की, ह. मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘ज्याने अल्लाहकरीता दोस्ती केली आणि अल्लाहकरीता दुश्मनी (शत्रूता) केली आणि अल्लाहकरीता दिले आणि अल्लाहकरीता रोखून ठेवले, त्याने आपल्या इमानास (श्रद्धेस) परिपूर्ण केले. (हदीस : बुखारी)
भावार्थ
माणसाचे प्रेमभाव अथवा वैरभाव आपल्या व्यक्तिगत गरजेपोटी आणि ऐहीक लाभासाठी नसावे तर केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच असावे. ही अवस्था म्हणजे त्याचे इमान परिपूर्ण झाले.
0 Comments