Home A इस्लामी व्यवस्था A इस्लामी कायद्याने प्रदान केलेले दंडविधान आणि त्याचे नियम व पद्धती

इस्लामी कायद्याने प्रदान केलेले दंडविधान आणि त्याचे नियम व पद्धती

Justice
इस्लामने गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यासाठी ‘हद‘, मृत्यूदंड व देहदंड अर्थात ‘किसास‘ चे कलम लागू केले आहे. मात्र हे लागू करण्यासाठी ज्या अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत, त्या कधीकधी पूर्ण होत नाहीत. मग अशा परिस्थितीत गुन्हेगारास मुक्त सोडावे की अपराधानुसार शिक्षा द्यावी? शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये गुन्हेगारास निश्चितच शिक्षा मिळावी, अशी भूमिका आहे. अन्यथा समाज हा उपद्रवमुक्त होणार नाही. याकरिता त्यावर दंडविधान लागू करण्यात आले आहे. म्हणून आपण इस्लामी कायद्याने प्रदाने केलेले दंडविधान आणि त्याचे नियम व पद्धतींचा थोडक्यात अभ्यास करु या. त्याचप्रमाणे इस्लामी दंडविधानाचा वर्तमान दंडविधानाशी तुलणात्मक वेध घेऊ या, जेणेकरून वर्तमान दंडविधानातील त्रुट्या आणि कमतरता दूर करण्याची विवेकबुद्धी मिळावी.
दंडविधानाचे उद्दिष्ट
‘किसास‘ अर्थात शारीरिक क्षती व हानीचा जशास तसा बदला घेण्याच्या शिक्षेचा जो हेतु आणि उद्देश आहे, तोच दंडविधानाचासुद्धा आहे. इस्लामी तत्त्वज्ञ माननीय जीलई म्हणतात की, अपराध अगर गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये, गुन्हेगाराने परत तो गुन्हा करू नये आणि इतरांनीही यापासून बोध घ्यावा, हाच दंडविधानाचा मूळ हेतु आहे. शिवाय विनाकारण आणि अतिरिक्त शिक्षा देण्याची इस्लामने मनाई केली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गुन्हेगारास केवळ तंबी केल्यास परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल अथवा हलका चोप देऊन किंवा दमदाटी करून तो परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल तर एवढ्यावरच काम भागवावे. अथवा त्यास गुन्हा केल्याची जाणीव करून देण्यासाठी धिक्कारून बोलण्यामुळे अथवा कैद करून ठेवल्याने परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल तर अतिरिक्त शिक्षा देणे योग्य नसल्याचे इस्लामी कायद्याने म्हटले आहे.
दंडविधानाचा एक हेतु हा अपराध्याचे मनपरिवर्तन करून त्यात सुधारणा घडविणेसुद्धा आहे. त्याला आपल्या पाप अगर अपराधावर पश्चत्ताप झाला. तर समजा हे त्याच्यात सुधार झाल्याचे चिन्ह होय. जर त्यास कैदेची शिक्षा दिली आणि त्याला आपल्या दुष्कर्मावर पश्चात्ताप झाला आणि त्याने ईश्वरासमोर आपल्या करणीची माफी मागितली तर त्यास कैदमुक्त करण्यात येईल.
दंडविधानाचे आणखीन एक उद्दिष्ट असे की गुन्हेगाराने ज्याच्यावर शारीरिक अत्याचार केला, त्याच्या मनात खदखदणारा गुन्हेगाराविषयीचा संताप थंड व्हावा आणि त्याचे मन-मस्तिष्क गुन्हेगाराविषयी द्वेश आणि वैरमुक्त व्हावे.(संदर्भ : दुर्रे मुख्तार, अल-बहरुर्राइक, फतावा हिन्दिया आलमगीरिया)
दंडविधानाची मर्यादा
शरीअतने विविध अपराधांवर दंडविधान लागू केले असले तरी या बाबतीत खबरदार केले की गरज असेल तेवढेच दंडविधान लागू करण्यात यावे. विनाकारण आणि हकनाक अपराध्यास छळू नये. नसता दंडविधानाचा हेतु नष्ट होईल. म्हणूनच अपराध्याचा एखादा अवयव निकामी होण्याइतपत कठोर मारझोड होता कामा नये.(संदर्भ : अलमुग्नी)
दंडविधानाचे प्रकार
शरीअत अर्थात इस्लामी कायद्यात दंडविधानाचे विविध स्वरुप व प्रकार वर्णन करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, शारीरिक शिक्षा, आर्थिक दंड, कैदेची शिक्षा, शहराबाहेर करणे अर्थात तडीपार करणे वगैरे विशेष उल्लेखनीय होय. शारीरिक शिक्षा म्हणजे गुन्हेगारास दंडात्मकरित्या मृत्यूची शिक्षा देणे, कोरडे मारणे ही विशेष शिक्षा होय. पुढे या प्रकारांवर थोडी वर्णनात्मक चर्चा करण्यात येत आहे.
दंडविधानानुसार मृत्यूदंड
इस्लामी कायद्यात ‘किसास‘(बदला घेण्याची शिक्षा) नुसार मृत्यूदंड देता येतो, याव्यतिरिक्त दंडविधानानुसारसुद्धा मृत्यूदंड देण्याची शिक्षा देणे वैध आहे. त्याचप्रमाणे समलिंगी संभोग करणार्यांना मृत्यूदंड देता येईल, चोरी करणार्यांचे हात कापता येतील, धारदार शस्त्रांचा वापर न करता(लाठी, दगडांचा वापर करून) खून करणार्याससुद्धा दंडविधानानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देता येईल, जादूगिरी करणार्यालासुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय दारू पिणार्यास चौथ्यांदा हा अपराध केला असेल तर त्यासही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. या दंडविधानासाठी प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या या वचनाचा आधार घेण्यात आला आहे,
‘‘माननीय वैलहम हुमैरी(र.) यांनी म्हटले की मी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना विचारले,
‘आम्ही एका थंड प्रदेशात राहतो. तेथे खूप थंडी लागत असल्याने गव्हापासून मदिरा तयार करण्यात येते व ती मदिरा उष्णता व शक्ती प्राप्त करण्यासाठी पिण्यात येते. तेव्हा अशा परिस्थितीत दारू पिणे वैध आहे काय?‘
‘‘त्या दारूमध्ये नशा आहे काय?‘‘ प्रेषितांनी विचारले.
‘‘होय! ती दारू पिल्याने झिंग चढते,‘‘ मी उत्तरलो.
‘‘मग ती दारू पिऊ नये.‘‘ प्रेषित म्हणाले.
‘‘मात्र लोक ऐकणार नाहीत.‘‘ मी म्हणालो.
‘‘तर मग ते दारू सोडेपर्यंत त्यांच्याशी सशस्त्र लढाई करा.‘‘
प्रेषित म्हणाले.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – अबू दाऊद)
याशिवाय आणखीन एका प्रेषितवचनाचा या दंडविधानास आधार आहे, तो असा की एकदा प्रेषित मुहम्मद(स.) यानी म्हटले,
‘‘ईश्वर एक आहे, अशी ग्वाही देणार्या कोणत्याही मुस्लिमाची हत्या वैध(हलाल) नाही, मात्र तीन कारणास्तव त्याची हत्या वैध ठरते. प्रथम असे की, विवाहित असूनही व्यभिचार करण्याच्या अपराधास्तव, त्याची हत्या करण्यात येईल. दुसरे असे की, त्याने एखाद्याची हत्या केली असेल तर ‘किसास‘(मृत्यूदंडाच्या शिक्षे) नुसार त्याची हत्या करण्यात येईल आणि तिसरे असे की त्याने इस्लामचा त्याग केला असेल तर त्याची हत्या करण्यात येईल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह-मुस्लिम)
आणखीनही अशा बर्याच प्रेषितवचनांच्या आधारे इस्लामी दंडविधानानुसार मृत्युदंडाची शिक्षा देता येते.
कोरड्यांची शिक्षा
व्यभिचार, दारू पिणे वगैरेची कोरडे मारून शिक्षा देण्याचे प्रमाण कुरआन व प्रेषितवचन शास्त्रात आहे. मात्र दंडविधानानुसार कोरडे मारण्याची शिक्षा देण्याचे प्रमाण आहे काय? तर याबाबतीत इस्लामी कायदातज्ञांची भूमिका आहे की, दंडविधानानुसारही अपराध्यास कोरडे मारण्याची शिक्षा देता येते. कारण पत्नीने पतीची अवज्ञा केल्यास हलक्या-फुलक्या पद्धतीने पत्नीस मारण्याची परवानगी कुरआनात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की ‘हद‘च्या शिक्षेव्यतिरिक्त इस्लामी दंडविधानानुसार कोरडे मारण्याची शिक्षा देता येते, मात्र जास्तीतजास्त दहाच कोरडे मारण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी परवानगी दिली आहे. इस्लामी विधीशास्त्रज्ञ माननीय कासानी यांनी म्हटले आहे की ज्या अपराधांची ‘हद‘नुसार शिक्षा तजवीज करण्यात आलेली नाही, त्यासंबंधी तत्कालीन शासकाने अथवा न्यायाधीशाने चोप देण्याची, कैद करण्याची, दमदाटी करण्याची शिक्षा अपराधाच्या गांभीर्यानुसार ठरवावी. शिवाय इस्लामी दंडविधानात कोरडे मारण्याची शिक्षा द्यावी.(संदर्भ : बदायुस सनाएअ)
कोरडे मारण्याची मर्यादा
इस्लामी कायद्याची अशी भूमिका आहे की अपराधानुसार जी शिक्षा ‘हद‘च्या प्रमाणात असते, त्यापेक्षा थोडी कमी असावी. उदाहरणार्थ, व्यभिचाराच्या अपराधाची ‘हद‘ स्वरुपाची शिक्षा शंभर कोड्याची आहे, मात्र दंडविधानानुसार एंशी कोरडे मारण्यात येतील, व्यभिचाराचा चुकीचा आरोप लावण्याच्या अपराधास्तव ‘हद‘ स्वरुपाची शिक्षा जी काही असेल, त्यापेक्षा दंडविधानात कमी देण्यात येईल. त्याचप्रमाणे दारु पिणे, चोरी करणे वगैरेच्या शिक्षेसंबंधी नियम आहे.
कोरड्यांची किमान मर्यादा
जेवढे कोरडे मारून दंडविधानाच्या शिक्षेचा हेतु पूर्ण होत असेल, तेवढे कोरडे मारावेत. अर्थात कमीतकमी तीन आणि जास्तीतजास्त एकोणचाळीस कोरडे मारता येतील.(संदर्भ : अलमुग्नी)
कैद व बंदीवान बनविण्याची शिक्षा
अर्थातच माणसाचे व्यक्तीगत स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे कैद करण्याची शिक्षा देणे होय. म्हणजे त्याला आपल्या मर्जीने काहीही करता येऊ नये. अशा रितीने म्हणजेच अपराध्याला कैद करून ठेवण्याची शिक्षा इस्लामी दंड विधानात आहे.(संदर्भ : अलमुग्नी)
इस्लामी कायद्यात असेदेखील आहे की वेळ पडल्यास कैदेबरोबरच गुन्हेगारास कोरड्यांचीही शिक्षा देण्यात येईल. अर्थातच हे अपराधाचे गांभीर्य समोर ठेवूनच निश्चित करण्यात येईल आणि आर्थिक दंडही आकाण्यात येईल.(संदर्भ : अल बहरुराईक)
कैदेच्या शिक्षेचे प्रकार
कैदेचे दोन प्रकार आहेत, एक विशिष्ट मुदतीपर्यंतची कैद आणि मुदत निश्चित न केलेली कैद अथवा आजीवन कैद. आजीवन कैद ही अपराध्याच्या सुधारणास्तव असो की इतर कोणत्याही हितासाठी असो, यांचा आपण खाली अभ्यास करणारच आहोत.
विशिष्ट मुदतीपर्यंतची कैद
इस्लामी कायद्याने काही अपराधांची कैदेची शिक्षा देण्याची मुदत निश्चित केली आहे. उदाहरणार्थ, शिवीगाळ करणे अथवा अभद्र शब्दांचा वापर करण्याची कैदेची शिक्षा देण्याची मुदत निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे दारू पिणे, व्यापारात दगाबाजी करणे अगर व्याजाचा व्यवहार करण्याची शिक्षा कैदेच्या स्वरुपात निश्चित केली आहे. म्हणजे आपल्या अपराधाचा पश्चात्ताप होऊन ईश्वरासमोर क्षमा-याचना केल्यास ही मुदत पूर्ण होते.
खोटी साक्ष देणार्या गुन्हेगारास एका वर्षाची कैद, इस्लामी शासनाच्या कारभारावर विनाकारण टीका करण्याच्या अपराधास्तव एका महिन्याची कैद ठरविण्यात आली आहे.(संदर्भ : एहकामुस सुलतानिया)
बेमुदत कैदेची शिक्षा
एखाद्या व्यक्तीस बांधून सिंह अगर हिंस्त्र पशुसमोर टाकणे, कडक उन्हात हातपाय बांधून ठेवणे, समलिंगी संभोग करणे वगैरेसारख्या घोर अपराधांवर बेमुदत कैदेची शिक्षा देण्याची दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला फूस लावून नेणे, तिच्या आईवडिलांविरुद्ध भडकावणे वगैरेसारख्या अपराधांसाठीही बेमुदत कैदेची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय समाजात अंधश्रद्धा पसरविण्याच्या धर्माचा आधार घेऊन धर्मविरोधी गोष्टी पसरविण्याच्या अपराधास्तव गुन्हेगारास आजीवन कैदेची शिक्षा देण्याची इस्लामी दंडविधानात निश्चित करण्यात आली आहे.
कैदेचे स्वरुप
कारागृह स्वच्छ असावे. लघवी, शौच आणि स्नान करण्याची, कपडे धुण्याची मुबलक व्यवस्था असावी. कैद्याला पोटभरून मात्र अत्यंत साधे जेवण असावे. त्याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात यावी. झोपायला नरम गादी वगैरे न देता अत्यंत साधे बिछाणे व पांघरून द्यावे. थंडी, ऊन्ह, पाऊस वगैरेसारख्या बाबींपासून पूर्ण संरक्षण होण्यासारखी स्वच्छ खोली असावी. कैद्याला जर एखादी कला-कौशल्य येत असेल अथवा काम करण्याची पात्रता त्याच्यात असेल तर त्यानुसार त्याच्याकडून सेवा करून घेतली जाऊ शकते. मात्र त्याला जमातीसह नमाज पढण्याची, जुमाची नमाज पढण्याची, ईदची नमाज पढण्याची, हज करण्याची, एवढेच नव्हे तर कोणाच्या अंत्यविधित सामील होण्याची आणि एखाद्या रोग्याची विचारपूस करण्याची परवानगी नसेल. कारण हे सर्व करण्यासाठी त्याला कैदेच्या बाहेर जावे लागेल.
शहरातून बाहेर काढण्याची शिक्षा
‘हद‘ आणि ‘दंडविधान‘ या दोन्ही प्रकारात शहराबाहेर घालण्याची शिक्षा तजवीज करण्यात आली आहे. ‘हद‘ प्रकारच्या शिक्षेमध्ये अविवाहित असलेल्या व्यभिचारी व्यक्तींना आणि धर्मद्वेशी पक्षाकडून लढणार्यास शहराबाहेर घालवण्याची शिक्षा देण्यात येते. त्याचप्रमाणे व्यभिचार्याला दंडविधानानुसार शहराबाहेर करण्याची शिक्षा देण्यात येईल.(संदर्भ : इब्ने आबेदीन)
शहराबाहेर घालवण्याच्या शिक्षेचे स्वरुप
शहराबाहेर घालवण्याची अगर तडीपार करण्याची अट अशी आहे की, अपराध्यास शहरापासून सत्तर किलोमीटर दूर टाकण्यात यावे. अर्थात शहराच्या चारी दिशांना तो कमीतकमी सत्तर किलोमीटरच्या अंतराबाहेर असावा.(संदर्भ : अलमुग्नी)
आर्थिक दंडाची शिक्षा
दंडविधानानुसार गुन्हेगारास आर्थिक दंड करण्याचा अर्थ असा आहे की, इस्लामी शासक अथवा न्यायाधीश त्याच्या दंडाची रक्कम शासकीय खात्यात जमा करील आणि अपराधी जेव्हा आपल्यात सुधारणा घडवून आणील तेव्हा त्याची जमा करण्यात आलेली संपत्ती परत करण्यात येईल. मात्र तो जर स्वतःची सुधारणा करण्यासाठी तयार नसेल तर त्याची रक्कम त्यास परत न करता शासकीय ताब्यात घेण्यात येईल. अपराध्याकडून घेण्यात आलेल्या संपत्तीचे तीन प्रकार असू शकतात. पहिला प्रकार निधिद्ध संपत्तीचा. उदाहरणार्थ, दारु विक्रीचा पैसा, नाच गाण्याचा आणि मूर्ती विकून मिळविलेला पैसा अगर इतर अवैध मार्गाने मिळविलेली संपत्ती होय. हा पैसा अगर संपत्ती नष्ट करण्यात येईल. दुसर्या प्रकारची संपत्ती ही परिवर्तनीय असू शकते. उदाहरणार्थ, क्रीडा व खेळातून मिळविलेला पैसा वा त्याची साधने आणि आर्थिक चलन वगैरे ही संपत्ती परिवर्तीत करण्यात येईल. तिसरा प्रकार म्हणजे जंगम अगर स्थायी संपत्तीचा होय. उदाहरणार्थ, जमीन-जुमला, घर-इमारत वगैरे या प्रकारच्या संपत्तीवर शासन ताबा मिळवील.(संदर्भ : अल-फतावा हिंदिया)
संबंधित पोस्ट
November 2024 Rabi'al Thani 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *