- एका अल्लाह वर ईमान (श्रद्धा)
- इस्लामच्या प्रमुख संदेशपैकी महत्त्वाचे संदेश म्हणजे एका अल्लाह वर ईमान (श्रद्धा) आणणे हे आहे. फक्त अल्लाह आहे व तो एक आहे या गोष्टीवरच नव्हे तर तर तो एकटा या सृष्टीचा निर्माता, स्वामी, शासक व व्यवस्थापक आहे या वस्तुस्थितीवर देखील ईमान आणणे आवश्यक आहे. त्याच्याचमुळे ही सृष्टी अस्तित्वात आहे. आणि सृष्टीमधील प्रत्येक वस्तू अस्तित्वात ठेवण्यासाठी या उपजीविकेची (Subsistence) वा शक्तीची (Energy) आवश्यकता आहे ती उपलब्ध करून देणारा अल्लाह आहे. सार्वभौमत्वाचे सर्व गुण फक्त त्याच्याच ठायी आहेत आणि याबाबतीत दुसरा कोणीही त्याचा थोडा सुद्धा भागीदार नाही. ईशत्वाच्या सर्व गुणांनी फक्त तोच संपन्न आहे. आणि त्यापैकी कोणताही गुण इतरांजवळ नाही. साऱ्या सृष्टीला आणि त्यामधील प्रत्येक वस्तूला तो एका दृष्टिक्षेपात पाहतो, प्रत्यक्ष जाणतो. न केवळ वर्तमान परंतु त्याच्या भूत भविष्यालाही! अशी ही दृष्टी व ज्ञान त्याच्याशिवाय इतर कोणास नाही. तो सदैव आहे व राहील. त्याच्या शिवाय इतर सर्व काही नाशवंत आहे. तो स्वतःहून जिवंत व अस्तित्वात आहे. न तो कोणाची संतती आहे, न त्याला संतती आहे. त्याच्याशिवाय या जगात जे काही आहे ते त्याची निर्मिती आहे आणि जगामध्ये सृष्टीच्या पालनकर्त्यासमान किवा त्याचा पुत्र वा कन्या म्हणता येईल अशा दर्जाचा कोणी नाही. तोच लोकांचा उपास्य आहे. उपासनेत त्याच्याबरोबर दुसऱ्या कोणास सहभागी करणे हा सर्वात मोठा गुन्हा व सर्वात मोठा द्रोह आहे. तोच प्रार्थना याचना ऐकणारा आहे. त्याचा स्वीकार करणे वा न करणे हे त्याच्याच हाती आहे. त्याची प्रार्थना न करणे हा अनाठायी गर्व आहे आणि त्याच्याशिवाय इतरांसमोर हात पसरणे अज्ञान आहे. त्याच्याबरोबर इतरांचीही प्रार्थना करणे म्हणजे ईशत्वामध्ये त्याच्याबरोबर इतरांनाही सहभागी ठरविणे होय.
इस्लामच्या अल्लाह संबंधीच्या या दृष्टिकोनामुळे काही गोष्टी स्वाभाविकपणे अपरिहार्य होतात.
- फक्त एकटा ईश्वरच मानवाचा खरा उपास्य आहे. भक्ती व आज्ञापालन फक्त एकट्या ईश्वराचेच होऊ शकते. मानवाने भक्ती व आज्ञापालन करावे अशी योग्यता त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची नाही.
- फक्त तोच एकटा सृष्टीतील सर्व शक्तींचा अधिपती आहे आणि माणसाचे मागणे पुरे करणे त्याच्याच अधिकारात आहे. माणसाने फक्त त्याच्याजवळ याचना केली पाहिजे आणि त्याच्याशिवाय इतर कोणाजवळ याचना केली जाऊ शकते हा विचार देखील केला जाऊ नये.
- तोच एकटा माणसाच्या भाग्याचा स्वामी आहे. माणसाचे भाग्य चांगले वा वाईट करण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्येही नाही. माणसाचे आशास्थान तोच आहे व त्याचेच भय बाळगले पाहिजे. त्याच्या शिवाय इतर कोणाकडूनही आशा-अपेक्षा करू नये व त्याच्याशिवाय इतर कोणाचे भय बाळगू नये.
- तोच एकटा माणसाचा व जगाचा निर्माता व स्वामी आहे. माणसाची व साऱ्या जगाची वास्तविकता याचे प्रत्यक्ष व संपूर्ण ज्ञान फक्त त्यालाच आहे. फक्त तोच जीवनाच्या गुंता-गुंतीच्या व्यवहारात माणसाचे योग्य मार्गदर्शन करू शकतो व योग्य आचार संहिता देऊ शकतो.
- माणसाचा निर्माता व स्वामी ईश्वर आहे आणि तोच या जमिनीचाही, ज्यावर माणूस वसतो, स्वामी आहे, म्हणून माणसावर इतर कोणाची व त्याची स्वतःची सत्ता असणे हा उघड उघड ईशद्रोह आहे. त्याचप्रमाणे माणसाने स्वतः कायदे करणे किवा दुसऱ्या व्यक्तीच्या अगर संस्थेच्या कायदे करण्याच्या अधिकारास मान्य करणे हाही द्रोह आहे.
- सर्वश्रेष्ठ सत्तेचा खरा स्वामी अल्लाह असल्याने त्याचा कायदा हा वस्तुतः सर्वश्रेष्ठ कायदा आहे. अल्लाहने दिलेल्या परवानगीनुसार सर्वश्रेष्ठ कायद्याच्या आधीन राहून व त्या अनुषंगाने कायदे करण्याचा अधिकार माणसास आहे.
- प्रेषितत्व
प्रेषित म्हणजे ती व्यक्ती जिच्यामार्फत ईश्वर आपला कायदा लोकांना देतो, हा कायदा आम्हाला प्रेषितांच्याकडून दोन प्रकारे प्राप्त होतो. एक, अल्लाहची वाणी जी प्रेषितांवर अवतरित होत असते, ती म्हणजे पवित्र कुरआन. दुसरी, प्रेषितांनी आपल्या अनुयायींना ईश्वराच्या मार्गदर्शनासाठी आपल्या उक्ती, कृती व आदेशाने दिलेली शिकवण. ती म्हणजे सुन्नत (प्रेषितांची आचरण पद्धती)
प्रेषितांवरील श्रद्धेचे महत्व हे आहे की ही श्रद्धा नसेल तर ईश्वरावरील ईमान हा निव्वळ एक तात्विक विचार बनतो. ईशभक्तीच्या श्रद्धेला एक संस्कृती, एक सभ्यता आणि एक जीवन पद्धतीचे स्वरूप देण्याचे काम प्रेषितांचे वैचारिक व व्यावहारिक मार्गदर्शन करीत असते. त्याच्याद्वारे आम्हाला कायदा प्राप्त होतो आणि या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून एकेश्वरवादानंतर (तौहीद) प्रेषितत्वावर ईमान (श्रद्धा) आणल्याखेरीज कोणीही प्रत्यक्षात श्रद्धावंत होऊ शकत नाही.
- ‘आखिरत’ (परलोक)
इस्लामचे तिसरे संदेश ‘आखिरत’ (परलोक) हे असून याचे महत्व हे आहे की याचा इन्कार करणारा नास्तिक बनतो आणि ईश्वर, प्रेषित आणि पवित्र कुरआन यांना मानणे देखील त्याला नास्तिकतेपासून वाचवू शकत नाहीत. ‘आखिरत’ वरील ईमान खालील सहा घटकांवर आधारलेले आहे. जगामध्ये माणसाला बेजबाबदार बनवून सोडून देण्यात आलेले नाही. महत्व हे आहे की याचा इन्कार करणारा नास्तिक बनतो आणि ईश्वर, प्रेषित आणि पवित्र कुरआन यांना मानणे देखील त्याला नास्तिकतेपासून वाचवू शकत नाहीत. ‘परलोक’ वरील ईमान खालील सहा घटकांवर आधारलेले आहे.
- जगामध्ये माणसाला बेजबाबदार बनवून सोडून देण्यात आलेले नाही. माणसाला त्याच्या निर्मात्यासमोर जाब द्यावयाचा आहे. जगातील हे जीवन त्याची परीक्षा व चाचणी घेण्यासाठी आहे. या जगाच्या समाप्तीनंतर माणसाला आपल्या जीवनकृत्यांचा हिशेब आपल्या निर्मात्या अल्लाह समोर द्यावयाचा आहे.
- या हिशेबासाठी ईश्वराने एक वेळ निश्चित केलेली आहे. ईश्वराने मानवजातीसाठी या जगात कार्य करण्यासाठी जी कालमर्यादा ठरविली आहे ती समाप्त होताच कियामत (जगाचा शेवट) होईल. जगाची प्रचलित व्यवस्था विस्कटली जाईल आणि एक दुसरी जागतिक व्यवस्था नवीन पद्धतीने अस्तित्वात येईल. त्या नव्या जगात या जगातील सुरूवातीपासून शेवटपर्यंत जन्मास आलेल्या सर्व माणसांना पुन्हा जिवंत केले जाईल.
- त्यावेळी त्या सर्वांना अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल आणि प्रत्येकाला आपापल्या वैयक्तिक कृत्याबद्दल जाब द्यावा लागेल.
- तेथे अल्लाह निव्वळ आपल्या ज्ञानाच्या आधारावर निर्णय देणार नाही तर न्यायाच्या सर्व अटी पुऱ्या केल्या जातील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनकृत्यांचा पुरा अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल आणि माणसाने उघडपणे व गुप्तपणे काय काय केले आणि कोणत्या हेतूने केले या संबंधीचा निरनिराळ्या प्रकारचा साक्षीपुरावा न्यायासनासमोर सादर केला जाईल.
- अल्लाहच्या न्यायालयात कोणत्याही प्रकारची लाचलुचपत, कोणतीही अनुचित शिफारस व सत्याविरोधी वकिली चालणार नाही. एकाचा भार दुसऱ्यावर घातला जाणार नाही. अत्यंत निकटचा नातलग अगर दोस्त पुढारी वा धार्मिक नेता वा कपोलकल्पित दैवतं कोणाच्याही मदतीसाठी पुढे सरसावणार नाहीत. माणूस तेथे एकटा, निराधार असेल व त्याला आपला जाब द्यावा लागेल आणि निर्णय फक्त अल्लाहच्या अधिकारात असेल.
- माणसाने जगामध्ये प्रेषितांनी दाखवून दिलेल्या सत्याचा स्वीकार करून आणि आखिरतच्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून योग्य प्रकारे अल्लाहचे आज्ञापालन केले किवा नाही, या गोष्टीवर निर्णय अवलंबून असेल. त्याने तसे आज्ञापालन केले असल्यास त्याला निरंतरचे सुख व समाधान (जन्नत) लाभेल आणि त्याने तसे केले नसल्यास त्याला निरंतरचे दुःख व यातना (दोजख) भोगाव्या लागतील.
पहिल्या प्रकारचे लोक – आखिरतवरील (परलोकावरील) ही श्रद्धा तीन प्रकारच्या लोकांच्या जीवन पद्धतीना एक-दुसऱ्यापासून अगदी अलग करते. लोकांमधील एक प्रकार असा आहे की, जे आखिरतवर (परलोक) विश्वास ठेवीत नाहीत व या जगातील जीवनालाच जीवन समजतात आणि म्हणून चांगल्या व वाईट आचरणाच्या फक्त त्या परिणामांनाच ते जाणू शकतात जे या जगामध्ये प्रकट होतात. त्यांच्या दृष्टीने ज्या आचरणाचा परिणाम या जगात चांगला व फायदेशीर ठरेल ते आचरण चांगले आहे. ज्याचा परिणाम वाईट व नुकसानकारक होतो ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे. इतकेच नव्हे तर परिणामाच्या दृष्टीने एखादी गोष्ट एखाद्या वेळेस चांगली ठरते तर तीच गोष्ट दुसऱ्या वेळी वाईट ठरते.
दुसऱ्या प्रकारचे लोक – आखिरतवर (परलोक) विश्वास तर ठेवतात. परंतु त्यांना असा भरवसा असतो की कोणान कोणाची शिफारस त्याना अल्लाहच्या न्यायालयात वाचवू शकेल, कोणीन कोणी त्यांच्या अपराधाबद्दल प्रायश्चित घेतलेले असेल वा मोबदला दिलेला असेल. ते अल्लाहचे आवडते असल्यामुळे त्यांना मोठ्यात मोठ्या अपराधाची शिक्षा मिळाली तरी ती नावापुरती असेल. ही गोष्ट आखिरतवरील (परलोक) श्रद्धेच्या सर्व फायद्यांना नाहीशी करते आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांना पहिल्या प्रकारच्या लोकांच्या पंक्तीत नेऊन बसविते.
तिसऱ्या प्रकारचे लोक – आखिरतच्या (परलोक) तत्वाला अगदी त्या स्वरूपात मानतात ज्या स्वरूपात त्याला इस्लामने सादर केलेले आहे. ते प्रायश्चित्त, अनुचित शिफारस किवा अल्लाहबरोबरचे विशिष्ट संबंध वगैरे भ्रामक समजुतींच्या आहारी गेलेले नसतात. त्यांच्यासाठी ही श्रद्धा म्हणजे एक मोठे नैतिक सामर्थ्य आहे. ज्या माणसाच्या मनात आखिरत (परलोक) बद्दलची खात्री योग्य स्वरूपात रुजलेली असते त्याची स्थिती अशी असते की त्याच्या बरोबर नेहमी एक संरक्षक असतो, जो वाईटाच्या प्रत्येक इच्छेच्या वेळी त्याला सावध करीत असतो. प्रत्येक कृतीच्या वेळी त्याला प्रतिबंध करीत असतो आणि वाईट आचरणाबद्दल त्याची निर्भर्त्सना करीत असतो. बाहेर पकड करणारे पोलिस, साक्ष देणारा साक्षीदार, शिक्षा देणारे न्यायालय, निर्भर्त्सना करणारे लोकमत असो वा नसो, त्याच्यासाठी त्याला सदैव सावध ठेवणारा संरक्षक असतो. त्याच्या भयाने माणूस जंगलात असो वा अंधारात, ओसाड जागेत असो वा एकान्तात, तो अल्लाहने त्याच्यावर टाकलेल्या जबाबदार्यांपासून विन्मुख होण्याचे आणि अल्लाहने हराम ठरविलेल्या गोष्टींना करण्याचे धाडस करीत नाही. यदाकदाचित चुकून त्याच्या हातून असे घडते तर त्याला त्याबद्दल लाज वाटेल व तो पश्चात्ताप करील. याहून अधिक चांगले, माणसाची नैतिक सुधारणा करणारे व त्याला चारित्र्यावान बनविणारे दुसरे साधन नाही. ईश्वराचा श्रेष्ठ कायदा जी चिरंतन मूल्ये माणसाला देतो, त्याबरहुकूम निर्धाराने आचरण करीत राहणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यापासून परावृत्त न होणे या गोष्टी आखिरतच्या (परलोक) श्रद्धेवर अवलंबून आहेत आणि म्हणून इस्लाममध्ये याला इतके महत्व दिले गेले आहे की ही श्रद्धा नसेल तर ईश्वरावरील व प्रेषितावरील श्रद्धा सुद्धा निरर्थक ठरते.
वर स्पष्ट केल्याप्रमाणे, इस्लाम एक संपूर्ण संस्कृती, एक परिपूर्ण सभ्यता आणि एक सर्वव्यापी जीवन पद्धती आहे आणि तो मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक मार्गदर्शन करतो. इस्लामची नीती संसारत्यागी, वैरागी, संन्यासी लोकांच्यासाठी नाही तर, ती अशा लोकांसाठी आहे, जे जीवनाची निरनिराळी क्षेत्रे चालवितात. व प्रत्यक्ष त्यामध्ये कार्य करतात. लोक नैतिकतेची उच्चता, आश्रम, मठ, विहार व खानकाहमध्ये शोधीत होते. इस्लाम त्यांना जीवनाच्या ऐन प्रवाहात आणू इच्छितो. त्याचा उद्देश हा आहे की राज्याचे शासक, प्रदेशांचे राज्यपाल, न्यायालयांचे न्यायाधीश, पोलीस व सैन्याचे अधिकारी, पार्लमेंटचे सभासद, उद्योगपती व निरनिराळे व्यवसाय चालक, अध्यापक व विद्यार्थी, आई-बाप, मुले-मुली, पती-पत्नी, शेजारी वगैरे सर्वजण या नीतिमत्तेने अलंकृत असावेत. इस्लामची इच्छा आहे की प्रत्येक घरात ही नीतिमत्ता जोपासली जावी आणि प्रत्येक मोहल्ल्यात, पेठेत व बाजारात सुद्धा तिचेच चलन असावे. प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात आणि शासनाच्या साऱ्या विभागात तिचेच पालन केले जावे आणि राजकारण सत्य व न्यायावर आधारित असावे. निरनिराळ्या समाजांनी परस्परांबद्दल आदर बाळगून व सत्याचा अंगिकार करून व्यवहार करावा. युद्ध झाले तरी त्यामध्ये सौजन्य व सभ्यता पाळली जावी. पशूतुल्य आचरण नसावे. माणसाच्या ठायी जेव्हा ईश्वराचे भय निर्माण होईल. ईश्वराच्या कायद्याला जेव्हा तो सर्वश्रेष्ठ कायदा मानेल, ईश्वरासमोर आपल्याला जाब द्यायचा आहे याची जाणीव ठेवून जेव्हा तो चिरकालीन मूल्यांचे पालन करील तेव्हा त्याचे हे आचरण प्रार्थना गृह अथवा उपासना स्थळा पर्यंतच मर्यादित राहात नाही. जीवनाच्या ज्या क्षेत्रात तो काम करीत असेल त्या सर्व क्षेत्रात त्याने अल्लाहच्या प्रामाणिक व एकनिष्ठ दासाप्रमाणे काम करावे.
0 Comments