Home A आधारस्तंभ A इस्लामचे तिसरे स्तंभ जकात

इस्लामचे तिसरे स्तंभ जकात

जकातचे महत्त्व: इस्लाममध्ये प्रार्थनेपेक्षा म्हणजेच नमाजपेक्षा इतर कोणतेही कृत्य जास्त महत्त्वाचे नाही याबद्दल सविस्तर उल्लेख मागील प्रकरणात झाला आहे. म्हणून जकात आणि नमाजचे महत्त्व एकसारखेच आहे असे म्हणणे तर्कशुध्द होणार नाही. परंतु आपण कुरआनची याविषयीची संकेतवचने आणि हदीसचा विचार करता चटकन लक्षात येते की नमाजनंतर जकातचे स्थान आहे. दिव्य कुरआन श्रध्देचा उल्लेख करताना अनेकदा दोन धर्माचरणांचा उल्लेख लगेच सोबत देतो. ते म्हणजे नमाज आणि जकात. निष्ठावंत मुस्लिमांची प्रतिमा दिव्य कुरआन खालीलप्रमाणे स्पष्ट करीत आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
वरील संकेतवचन विशेष महत्त्वाचे आहे कारण सच्चा मुस्लिम होण्यासाठी अनेक धर्माचरण आत्मसात करणेसुध्दा आवश्यक आहेत. सच्चा मुस्लिमचे वैशिष्ट्ये सांगताना कुरआन सर्वप्रथम श्रध्देचा उल्लेख करतो. श्रध्देनंतर कुरआन इस्लामच्या इतर आधारस्तंभांचा उल्लेख न करता लगेचच नमाज आणि जकातचा उल्लेख का करीत आहे? इतर चांगल्या गोष्टींचा उल्लेख त्याऐवजी का करीत नाही? असे करण्याला साहजिकच काही महत्त्व आहे. आपण विचारपूर्वक लक्ष दिल्यास हेतु लक्षात येईल. अल्लाह नमाज आणि जकात (गरीबांसाठी द्यावयाचा निधी) या दोघांना श्रध्देच्या व्यावहारिकतेच्या पायाचे दोन दगड समजून अतिमहत्त्व देतो. मनुष्याने ही दोन्ही कृत्ये व्यवस्थित पार पाडली तर धर्म पूर्णपणे पाळण्यासाठीचा व्यावहारिक पुरावाच असा मनुष्य देत असतो. अशा माणसाकडून इतर धर्माचरण श्रध्देच्या मूलतत्त्वानुसार पाळणे सहज शक्य होते. तो येथे हलगर्जीपणा दाखवूच शकत नाही. असे का बरे घडावे? या प्रश्नाचे उत्तर श्रध्देच्या अर्थामध्ये आणि श्रध्देच्या वैशिष्ट्यांमध्ये लपलेले आहे जे नमाज आणि जकातसाठी सारखेच आहेत. आपण जर श्रध्देच्या मूलतत्त्वाचे तर्कशुध्द विभाजन केले तर ते दोन विभागांत होईल.
१) ईशआदेश जे अल्लाहचे मनुष्यावरील हक्कासंबंधी आहेत.
२) ईशआदेश जे मानवतेचे मनुष्यावरील हक्कासंबंधी आहेत.
श्रध्देचे व्यावहारिक रूप म्हणजे मनुष्याने अल्लाहचे हक्क जाणून घेऊन तसेच मानवतेचे हक्क जाणून घेऊन त्यानुसार जीवन कंठत राहाणे होय. आपण हे पाहिलेच आहे की नमाज अल्लाहच्या हक्कासंबंधी अनिवार्य असे मूलतत्त्व आहे तर जकात मानवतेच्या हक्कासाठीची अनिवार्यता आहे. जेव्हा मनुष्य मशिदीत नमाज अदा करतो, तेव्हा तो अल्लाहच्या हक्कासंबंधी जागृत असतो आणि मशिदीबाहेरसुध्दा अल्लाहच्या हक्कासंबंधी सचेत राहतो. अशा परिस्थितीत तो मनुष्य अल्लाहचे हक्क सातत्याने अदा करीत जातो. तसेच मनुष्य जकात आपल्या समाजबांधवांसाठी, शेजाऱ्यांसाठी स्वखुशीने खर्च करतो. असे करताना उपकार न करता फक्त ईशप्रसन्नतेसाठीच इतरांवर खर्च करतो. असाच मनुष्य मानवतेच्या कल्याणासाठी सतत झटत असतो.
या विषयाची आणखी एक बाजू आहे. कुरआन वारंवार जोर देऊन सांगत आहे की श्रध्दा तेव्हाच जिवंत शक्ती म्हणून अस्तित्व धारण करते जेव्हा अल्लाहवरील प्रेम हे इतर सर्वांपेक्षा प्रभुत्वशाली असते. आणि ऐहिक जीवनात मनुष्य आपल्या पारलौकिक जीवनास प्राधान्य देतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी नमाज आणि जकात अत्यंत प्रभावी साधन आहे. नमाज मनुष्याला अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करून देते तर जकात मनुष्याला त्याच्या देशबांधवांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील ठेवते. जर अल्लाहची प्रसन्नताप्राप्ती आणि पारलौकिक जीवनसाफल्य हे एखादा कठीण चढ चढून जाण्यासारखे आहेत, तर त्या रेल्वेचे दोन इंजीन म्हणजे नमाज आणि जकात आहेत. चढ चढताना एक इंजीन (नमाज) ट्रेनला पुढे ओढते तर दुसरे इंजीन (जकात) हे त्या ट्रेनला मागून ढकलत राहते. अशा प्रकारे जीवनाची ही ट्रेन आपल्या ध्येयापर्यंत पोहचते. म्हणून या दोन्ही मूलतत्त्वांना इस्लामचा खरा आधार म्हणतात. कारण इस्लामी व्यावहारिकतेत त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मक्केतील श्रध्दाहीनांविरुध्द जिहाद पुकारण्यासाठी अंतिम आदेश देताना कुरआन स्पष्टोक्ती आहे की आपल्या तलवारी म्यानात ठेवू नका जोपर्यंत तुम्ही शत्रुंचा नाश करीत नाही अथवा ते इस्लाम कबूल करीत नाहीत. दोन दशके त्यांना इस्लामची शिकवण देण्यात आली होती आणि त्यांना श्रध्दावंत बनण्यासाठी सर्व काही प्रयत्न झाले होते. याप्रसंगी कुरआन काही अटी त्यांच्यासाठी स्पष्ट करीत आहे, ज्यानुसार त्यांनी श्रध्दावंत बनून राहावे आणि त्यांच्याविरुध्द जिहाद समाप्त केला जावा.
कुरआनोक्ती आहे, ‘‘मग जेव्हा निषिध्द महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे. आणि जर अनेकेश्वरवादींपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल जेणेकरून अल्लाहची वाणी ऐकावी तर त्याला आश्रय द्या येथपावेतो की त्याने अल्लाहची वाणी ऐकावी. मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवा. हे अशासाठी करावयास पाहिजे की हे असे लोक आहेत ज्यांना ज्ञान नाही.’’ (कुरआन ९: ५-६)
पुढे याच अध्यायात कुरआन स्पष्टोक्ती पुन्हा आहे,
‘‘पण जर त्यांनी पश्चाताप केला व नमाज कायम केली व जकात दिली तर हे तुमचे धर्मबंधु आहेत आणि जाणणाऱ्यां लोकांसाठी आम्ही आमचे आदेश स्पष्ट करीत आहोत.’’ (कुरआन ९: ११)
यावरून हे अगदी स्पष्ट होते की श्रध्देचा (ईमान) स्वीकार जरी झाला असेल तरी इस्लामचा स्वीकार मात्र नमाज कायम करणे आणि जकात देणे या दोन्ही कृत्यांना आत्मसात करण्यावर अवलंबून आहे. मनुष्य जर या दोन्ही कर्तव्यांना पार पाडत नसेल तर त्याची श्रध्दा अस्वीकार्य आहे, निरर्थक आहे. जकात देणे हे कृत्य श्रध्देची पूर्वअट आणि अंगभूत गुण आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘मला आदेश देण्यात आला आहे त्या लोकांविरुध्द लढाई करण्याचा जो पर्यंत ते हे मान्य करतील की ईश्वर कोणी दुसरा नाही. परंतु अल्लाह आणि ते नमाज कायम करतील व जकात देतील. त्यांनी असे केले तर त्यांचे जीव आणि वित्तरक्षणाची जबाबदारी माझी आहे. त्यांची सर्व कार्ये अल्लाहसाठी आहेत.’’ (मुस्लिम)
नवमुस्लिमांसाठी कुरआन जकात देण्याची अट घालत नाही तर हे सर्वांसाठी आहे, यासाठी अपवाद नाही. एखादा मुस्लिम जकात देण्याचे बंद करतो तर त्याच्याविरुध्द इस्लामी शासन त्याला शिक्षा करते. अबु बकर (र.) यांच्या शासनकाळात काही टोळ्यांनी जकात देण्यास नकार दिला होता तेव्हा त्यांनी त्यांच्याविरुध्द युध्द घोषित केले. जेव्हा उमर (र.) यांनी हा आदेश अंमलात आणण्यासाठी दिरंगाई दाखविली तेव्हा अबु बकर (र.) यांनी घोषित केले,
‘‘मी, अल्लाह शपथ त्याच्या विरोधात लढेन ज्यांनी नमाज आणि जकात या दोहोत फरक केला.’’ (कारण दोन्ही कृत्ये कुरआनने एकत्रित करून सांगितली आहेत) (मुस्लिम)
हा वादाचा मुद्दा आदरणीय उमर (र.) यांनीच स्वीकारला नाही तर सर्व सहाबांनी (र.) यांनीसुध्दा स्वीकारला. यावरून आपण या निष्कर्षाप्रत येतो की मुस्लिमांचे जीवित आणि वित्तिय संरक्षण हे त्याच्या नमाज अदा करणे आणि जकात देण्यावर अवलंबून आहे. नमाज अदा करणारा आणि जकात देणारा आदरणीय ठरतो. नमाज अदा तर केली जाते परंतु त्याच्याकडून जकात मात्र दिली जात नाही तर अशा मुस्लिमासाठीसुध्दा सारखीच शिक्षा आहे जी नमाज सोडणाऱ्यासाठी आहे. त्याच्याविरुध्द युध्द पुकारले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘हे पैगम्बर (स.) यांना सांगा,’’ मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा मला दिव्यबोधाद्वारे सांगण्यात येते की तुमचा उपास्य तर केवळ एकच उपास्य आहे, म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा, आणि त्याच्याकडे क्षमायाचना करा. विनाश आहे त्या अनेकेश्वरवादींसाठी जे जकात देत नाहीत आणि परलोकांचा इन्कार करणारे आहेत. उरले ते लोक ज्यानी मान्य केले आणि सत्कृत्ये केली, त्यांच्यासाठी निश्चितपणे असा मोबदला आहे ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही.’’ (कुरआन ४१: ६-८)
‘‘शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो. पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांसाठी लिहीन जे अवज्ञापासून दूर राहतील, जकात देतील व माझ्या संकेतांवर श्रध्दा ठेवतील.’’ (कुरआन ७ : १५६)
हे निदर्शनात येते की पहिल्या आयतमध्ये जकात न देणे म्हणजे श्रध्दाहीनतेचे कृत्य आणि परलोकाला अस्वीकार करण्यासारखे कृत्य आहे तर दुसऱ्या आयतनुसार जकात देणे हे श्रध्दाशीलतेचे प्रभावी लक्षण आहे आणि सदाचार आहे असे म्हटले आहे. या दोन्ही आयतींनुसार जकात देणे ही श्रध्दाशीलतेची अनिवार्यता आहे. जो श्रध्दावंत आहे तो जकात न चुकता देतो.
कुरआनची वरील संकेतवचन आणि हदीस कथनांनुसार जकातचे इस्लाममध्ये असलेले स्थान सिध्द होते. इस्लामची ही इमारत जकातला पूर्ण न्याय दिल्याशिवाय उभीच राहू शकत नाही. आणि म्हणूनच जकातला इस्लाममध्ये श्रध्देचे महत्त्वाचा आधारस्तंभ ठरविले आहे.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *