इस्लाम हे अशा एखाद्या जीवन पद्धतीचे नाव नव्हे जी प्रेषित मुहम्मद (स) यांनी प्रथम सादर केली. म्हणूनच त्यांना इस्लामचे संस्थापक समजणे योग्य नाही. पवित्र कुरआन या सत्याचे स्पष्टीकरण करीत आहे की, ईश्वराने मानवजातीसाठी नेहमी एकच जीवन पद्धती पाठविली आणि ती म्हणजे इस्लाम! अल्लाहसमोर आज्ञाधारकता स्वीकारुन नतमस्तक होणे म्हणजे इस्लाम. निरनिराळ्या भागात व निरनिराळ्या समाजांमध्ये ईश्वराकडून जे प्रेषित पाठविण्यात आले होते ते वेगवेगळ्या जीवन पद्धतीचे संस्थापक नव्हते आणि म्हणून त्यांनी आणलेल्या जीवनपद्धतीला त्यांच्या नावावरून ओळखले जाऊ शकत नाही. प्रत्येक येणाऱ्या प्रेषिताने त्याच एका जीवन पद्धतीला सादर केले, जिला त्याच्यापूर्वी आलेले प्रेषित सादर करीत आले होते.
अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स) यांच्याद्वारे मानवजातीला खऱ्या व शुद्ध इस्लामची शिकवण दिली.
ईश्वराला त्यांच्यानंतर पुन्हा प्रेषित पाठविणे नव्हते. म्हणून त्यांना जो ग्रंथ देण्यात आला, त्यापासून माणसाला प्रत्येक काळात मार्गदर्शन प्राप्त करता यावे या हेतूने त्या ग्रंथाचा शब्दनशब्द मूळ भाषेत सुरक्षित करण्यात आला. अल्लाहने नेमून दिलेली जीवनपद्धती खरोखरच काय आहे, त्यात कोणते मार्गदर्शन आहे आणि आमच्या पासून ती काय इच्छित आहे हे जाणण्याचे एकमेव विश्वासपात्र साधन झाले आहे.
ईश्वराकडून मानवाला अशा कोणत्या विशेष ज्ञानाची आवश्यकता आहे जे फक्त प्रेषितांच्या द्वारे दिले गेले आहे?
जगामध्ये एक प्रकारच्या अशा वस्तू आहेत ज्यांना आपण आमच्या ज्ञानेंद्रियामार्फत जाणतो अगर शास्त्रीय उपकरणें वापरून त्यांच्याकडून माहिती मिळवू शकतो. अशाप्रकारे मिळणारी माहिती निरीक्षण, प्रयोग, विचार व युक्तीवाद यांच्या साहाय्याने क्रमबद्ध करून नव्या नव्या परिणामापर्यंत पोहोचू शकतो. अशा वस्तूचे ज्ञान ईश्वराकडून यावयाची आवश्यकता नाही. हे आमच्या स्वतःच्या शोध, प्रयत्न व चितन-मननाचे क्षेत्र आहे. तरीपण या बाबतीतही आपल्या निर्मात्याने आपल्या अगदी वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. निरनिराळ्या काळात अगम्य पद्धतीने एका ठराविक क्रमानुसार आपल्या निर्माण केलेल्या जगाशी तो आमचा परिचय घडवीत आला आहे. ज्ञानाचे मार्ग आमच्यासाठी खुले करीत आला आहे. वेळोवेळी प्रेरणेद्वारे कोणत्या न कोणत्या माणसाला अशी एखादी गोष्ट सुचवीत असतो, ज्याद्वारे तो माणूस एखादा नवा शोध अगर एखादा नवा नैसर्गिक नियम प्रस्थापित करतो. असे असले तरी वास्तविक हे मानवी ज्ञानाचेच क्षेत्र आहे. त्याच्यासाठी ईश्वराकडून एखादा प्रेषित अगर ग्रंथ येण्याची आवश्यकता नाही. या क्षेत्रात ज्या माहितीची आवश्यकता आहे ती प्राप्त करण्याची साधने माणसाला दिली गेली आहेत.
दुसऱ्या प्रकारच्या वस्तू त्या आहेत ज्या आमच्या ज्ञानेंद्रियांच्या आणि शास्त्रीय उपकरणांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. ना आम्ही त्या तोलू शकतो ना त्याचे मोजमाप घेऊ शकतो. माहिती प्राप्त करण्याचे कोणतेही साधन वापरून त्यांच्यासंबंधी आम्हाला ती माहिती मिळू शकत नाही जिला ‘ज्ञान’ म्हणता येईल. तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ त्यांच्या बाबतीत जेव्हा एखादे मत कायम करतात तेंव्हा तो त्यांचा तर्क व अंदाज असतो. त्याला ज्ञान म्हणता येणार नाही, ही अंतिम सत्ये आहेत. या बाबतीत जे लोक युक्तिवादावर आधारित असे दृष्टिकोन मांडतात ते स्वतः त्यांच्या खरेपणाबद्दल खात्री देऊ शकत नाहीत. त्यांना त्यांच्या ज्ञानांच्या मर्यादेची जाणीव असेल तर स्वतः ते त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत व इतरांना विश्वास ठेवा असे सांगू शकत नाहीत.
हेच ते क्षेत्र आहे ज्याची वास्तविकता जाणण्यासाठी माणसास सृष्टीच्या निर्मात्याने दिलेल्या ज्ञानाची गरज भासते. निर्मात्याने हे ज्ञान एखाद्या पुस्तकात छापून ते एखाद्या माणसास दिलेले नाही. त्याला हे सांगितले गेले नाही की हे वाचून या सृष्टीची व स्वतः तुझी वास्तविकता काय आहे हे तू जाणून घे. त्या वास्तविकतेच्या आधारावर या जगाच्या जीवनात तुझे आचरण कसे असावयास हवे ते ठरव. हे ज्ञान लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी अल्लाह ने नेहमी प्रेषितांना माध्यम बनविले. आपल्या आदेशाद्वारे (वही) त्यांना वास्तविकतेची जाणीव करून दिली आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यावर त्यांची नियुक्ती केली.
पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुरुवातीपासूनच आपले संबोधन सर्वासाठी खुले ठेविले आहे. लोकांपैकी ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, त्यांना ईमानधारक या नात्याने संबोधिले आहे. पवित्र कुरआनचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास केल्यास आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या भाषणाचे व संभाषणाचे सर्व संग्रह पडताळून पाहिल्यास याचे समर्थन होईल. पवित्र कुरआनने किवा ते आणणाऱ्या प्रेषित मुहम्मद (स) यांनी कधीही व कोठेही एखाद्या विशेष वंश, वर्ण, जात व वर्गाला किवा एखादी विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांना उद्देशून सांगितलेले नाही. प्रत्येक ठिकाणी ‘आदमच्या मुलांनो’ वा ‘लोकहो’ असे संबोधन करून साऱ्या मानवजातीला इस्लामचा स्वीकार करण्याचे आवाहन केले गेले आहे. इस्लामचा स्वीकार केलेल्यांना आदेश व उपदेश देण्यासाठी ईमान आणलेल्या लोकांनो! असे संबोधन केले गेले आहे. यावरून आपोआप ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामचे आवाहन वैश्विक आवाहन आहे आणि जो माणूस या आवाहनाचा स्वीकार करतो तो पूर्ण समान हक्कासह समान दर्जाचा विश्वासधारक-मुस्लिम बनतो.
कुरआन सांगत आहे की, ‘‘विश्वासधारक एक दुसऱ्याचे भाऊ आहेत.’’
प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की, ‘‘जे लोक इस्लामचा स्वीकार करतात आणि इस्लामीजीवनाचरण पद्धती अंगिकारतात, त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या आमच्यासारख्याच आहेत. ’’
याहूनही अधिक स्पष्टपणे प्रेषित मुहम्मद (स) यांनी विशद केले आहे की, ‘‘ऐका! तुमचा पालनकर्ताही एक आहे आणि तुमचा मूळ पुरूष-बाप सुद्धा एक आहे. कोणत्याही अरबेतराला अरबावर प्राधान्य नाही. ना काळ्याला गोऱ्यावर प्राधान्य आहे, ना गोऱ्याला काळ्यावर प्राधान्य आहे तर ते ईशपरायणतेच्या आधारावर तुमच्यापैकी अल्लाहच्या दृष्टिने अधिक प्रतिष्ठित तो आहे, जो सर्वाधिक संयमी, विवेकी व सदाचारी आहे.’’
इस्लामचे आवाहन वैश्विक आहे
संबंधित पोस्ट
0 Comments