माननीय इकराम (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, ‘‘दर आठवड्यातून एकदा धर्मोपदेश करीत जा आणि दोन वेळा करू शकता आणि तीन वेळेपेक्षा अधिक धर्मोपदेश करू नका. या कुरआनपासून लोकांना निराश करू नका. तुम्ही लोकांकडे गेला आणि ते आपल्या संभाषणात मग्न असावेत आणि तुम्ही धर्मोपदेश सुरू करावा आणि त्यांचे संभाषण मध्येच थांबवावे, असे घडता कामा नये. जर तुम्ही असे केले तर ते धर्मोपदेश आणि मार्गदर्शनापासून निराश होतील. अशा वेळी नि:शब्द राहा आणि जेव्हा त्यांच्यात उत्सुकता निर्माण होईल आणि ते तुम्हाला धर्मोपदेश करण्यास सांगतील तेव्हाच तुम्ही धर्मोपदेश करा. आणि पाहा! लयबद्ध व अनुप्रासयुक्त अलंकारिक शब्दचित्रण करू नका (म्हणजे समजणार नाहीत असे अवघड शब्द बोलू नका), कारण मी पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या साथीदारांना पाहिले आहे की ते त्रासदायक शब्दोच्चार करीत नव्हते.’’
इमाम सरखसी (रह.) यांनी विस्तारात सांगितलेल्या एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘लोक अल्लाहच्या दासत्वाची घृणा करू लागतील अशा पद्धतीचा अवलंब
करू नका.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : ‘‘जेव्हा ते तुम्हाला धर्मोपदेश करण्यास सांगतील’’चा अर्थ आहे की ते तोंडाने आपली इच्छा व्यक्त करतील. त्यांच्या चेहऱ्यावरून अंदाज येईल की आता ‘दीन’बाबत ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत, तेव्हाच आपण बोलायला सुरूवात करावी.
माननीय अबू यूसुफ (रजि.) यांच्या कथनानुसार, जेव्हा ‘जकात’ (इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक सक्षम मुस्लिमाने आपल्या संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरिबांना दानधर्म म्हणून द्यावयाचा असतो त्यास ‘जकात’ म्हणतात.) अनिवार्य करण्यात आली आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून आदेश देण्यात आला की त्यांनी लोकांकडून ‘जकात’ वसूल करावी तेव्हा पैगंबरांनी ‘जकात’ वसूल करण्यासाठी एका मनुष्याची नियुक्ती केली आणि त्याला म्हणाले, ‘‘पाहा! लोकांच्या हृदयाचा संबंध असलेली उत्तमोत्तम संपत्ती घेऊ नका, तुम्ही वृद्ध सांडणी घ्या, वांझ सांडणी घ्या आणि सदोष सांडणी घ्या.’’ ‘जकात’ वसूल करणारा निघून गेला आणि पैगंबरांच्या मार्गदर्शनानुसार लोकांच्या जनावरांमधून ‘जकात’ वसूल केली. इतकेच काय तो एका अरब खेडुताकडे गेला आणि त्याला म्हणाला, ‘‘अल्लाहने आपल्या पैगंबरांना आदेश दिला आहे की त्यांनी लोकांकडून ‘जकात’ वसूल करावी. ही ‘जकात’ त्यांची वितुष्टी नष्ट करील आणि त्याच्या ईमानमध्ये वाढ होईल.’’ ‘जकात’ वसूल करणाऱ्याला तो खेडूत म्हणाला, ‘‘ही आमची जनावरे आहेत. तुम्ही तेथे जा आणि त्यातून तुम्ही घ्या.’’ त्याने वृद्ध, दोषयुक्त आणि वांझ सांडणी घेतली. तेव्हा तो खेडूत म्हणाला, ‘‘तुमच्यापूर्वी आमच्या उंटांमधून अल्लाहचा हक्क वसूल करण्यासाठी कोणीही आला नाही. अल्लाह शपथ! तुम्हाला चांगले उंट घ्यावे लागतील. (अल्लाहसमोर खराब वस्तू सादर केली जाते काय?)’’ (हदीस : किताबुल खिराज)
स्पष्टीकरण : जर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पहिल्याच दिवसापासून लोकांकडून चांगल्या वस्तू ‘जकात’स्वरूपात वसूल केल्या असत्या तर कदाचित लोकांनी या आदेशाविरूद्ध बंड केले असते, परंतु हळूहळू जेव्हा लोकांमध्ये ‘दीन’ची मुळे घट्ट रोवली गेली आणि त्यांना संस्कार प्राप्त झाले तेव्हा मदीनेपासून दूरवर खेड्यापाड्यांत राहणाऱ्या लोकांची स्थिती अशी झाली की ते ‘जकात’स्वरूपात उत्तम वस्तू घेण्यास सांगू लागले.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा एखादी गोष्ट सांगत तेव्हा तिचा (जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा) तीन वेळा पुनरुच्चार करीत जेणेकरून ती गोष्ट लोकांना चांगल्या प्रकारे समजावी. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : प्रत्येक भाषेत बोलण्याचे आणि भाषण करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या हृदयांत आपली वाणी उतरविणे हाच त्यामागील उद्देश असतो. ऐकणारे कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार भाषा व वक्तव्य अवलंबावे लागेल. अल्पशिक्षित लोकांसमोर तत्त्वज्ञासारखे बोलणे आणि अवघड शब्द व पद्धतींचा उपयोग करणे आवाहनाला परिणामशून्य बनविते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बाबतीत माननीय आएशा (रजि.) सांगतात–
‘‘पैगंबरांचे भाषण स्पष्ट व उघड असे, जो ऐकतो त्याला समजते.’’
0 Comments