आध्यात्मिक विकास कसा होतो आणि ईश्वर कोठे सापडतो? मुळात ईश्वर हा जंगलात, पर्वतांवर वा एकांतात मानवास सापडत नसतो. संसार त्यागून वैराग्य अथवा संन्यास घेऊन जंगलात ईश्वराला हुडकण्याची गरज नाहीच मुळी, तर ईश्वर हा मानवांदरम्यानच व व्यावहारिक जीवनातच विराजमान असतो. हा संसार त्यागून त्याला इतरत्र शोधण्याची गरज नाही. याच व्यावहारिक आणि सांसारिक जीवनात तो तुमच्या इतक्या जवळ आहे की, जणू आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहोत. ज्या माणसासमोर अवैध आणि निषिद्ध कर्मांचे भौतिक फायदे आणि व्यभिचाराच्या संधी प्रत्येक पावलावर लोटांगण घालूनसुद्धा, तसेच अन्याय व अत्याचाराचे मार्ग खुले असूनसुद्धा तो माणूस ईश्वरासमोर जाब देण्याच्या प्रखर जाणिवेमुळे अशा दुष्ट बाबींपासून स्वतःचा बचाव करतो, त्याला निश्चितच ईश्वर सापडला. प्रत्येक पावलावर त्यास ईश्वर मिळाला, एवढेच नव्हे तर त्यास ईश्वराचे दर्शनसुद्धा घडले.
जर ईश्वर त्यास सापडला नसता आणि साक्षात दर्शन घडले नसते, तर अशा खडतर आणि संकटमय मार्गातून तो सुरक्षितपणे निघालाच नसता. ज्या माणसाने आपल्या घरादारात, मुलाबाळांत, बाजारात, मनोरंजनसमयी आणि व्यवसायातील व्यस्ततांमध्ये प्रत्येक कृती, कार्य व कर्म तसेच अगदी साधीशी हालचालदेखील ही जाणीव ठेवून केली की, ईश्वर माझ्या अत्यंत जवळ आहे, त्याला नक्कीच ईश्वर पावला. ज्या माणसाने राज्यकारभार व शासन आणि युद्ध व तह तसेच वित्त आणि उद्योग-व्यवसाय यासारख्या इमानदारी व ईश्वरावरील श्रद्धेच्या कसोटीवर उतरण्यास अवघड असलेले कार्य इमानेइतबारे पार पाडले. त्याचप्रमाणे येथील यश संपादनाच्या असुरी कर्मांपासून अर्थात अपराधांपासून स्वतःचा बचाव करून ईश्वराने नेमून दिलेल्या नियमांचा काटेकोरपणे अवलंब केला असेल, त्याच्यापेक्षा जास्त श्रद्धावान आणि ईश्वराचा सच्चा भक्त इतर दुसरा कोण बरे असू शकतो! त्याच्यापेक्षा जास्त ईश्वराला ओळखणारा आणि जाणणारा दुसरा कोण बरे असू शकतो!! अर्थात त्याच्यापेक्षाही मोठा तपस्वी आणि साधू-संत दुसरा कोण असू शकतो!!
इस्लामच्या दृष्टिकोनानुसार मानवाच्या आध्यात्मिक विकासाचा मार्ग नेमका हाच आहे. एखाद्या पहिलवानाप्रमाणे नियमित व्यायाम करून आपली इच्छाशक्ती (Will power) वाढविणे म्हणजे आध्यात्मिक शक्तीचा विकास आणि या विकासाच्या बळावर साक्षात्कार व चमत्कारांचे दर्शन घडविणे मुळीच नव्हे, तर या उलट आध्यात्मिक विकास म्हणजे आपण आपल्या जीवाच्या चोचल्यांवर आणि भौतिक सुखाच्या अमर्याद अभिलाषांवर ताबा मिळविणे, आपल्या शरीर आणि विचार-बुद्धीच्या समस्त पात्रता व शक्तींचा योग्य आणि वैध कार्यांसाठी वापर करूण घेणे, आपली मर्जी आणि नैतिकता ईश्वरीय मर्जी आणि नैतिकतांशी एकरूप करण्याचा प्रयत्न करणे, ऐहिक जीवनात की जेथे प्रत्येक पावलावर आरिष्टतेच्या संधी येतात व आपण राक्षसी व असुरी आणि पशूतुल्य पद्धतींपासून स्वतःचा बचाव आणि संरक्षण करीत मार्गक्रमण करणे. तसेच पूर्ण विवेकशक्तीचा वापर करून खऱ्या-खोट्यात फरक करीत मानवजातीस शोभेल अशा तऱ्हेने सत्यावर ठाम राहणे होय. असे असेल तरच आपली मानवता सतत विकास पावेल आणि आपण दिवसेंदिवस व क्षणोक्षणी ईश्वराच्या आध्यात्मिक विकासाची व्याख्या होय. १
इस्लाममध्ये उपासनेचा दर्जा
अर्थातच इस्लाम हा माणसाचे संपूर्ण जीवन उपासनेत बदलू इच्छितो किवा समस्त जीवनाचे परिवर्तन उपासनेत करू इच्छितो. त्याची मागणी अशी आहे की, माणसाच्या जीवनाचा एकही क्षण ईश्वरोपासनेशिवाय व्यतीत होता कामा नये. एकेश्वरवादाचा स्वीकार केल्यानंतर लागलीच ही गोष्ट अनिवार्य होते की, ज्या ईश्वराला माणसाने आपला उपास्य स्वीकार केला, तो त्याचा उपास्य अर्थात कायमस्वरुपी दास बनून जगावे आणि याचेच नाव उपासना आहे. म्हणायला ही बाब खूप छोटीशी वाटते, परंतु वस्तुतः माणसाचे संपूर्ण जीवन उपासनेत परिवर्तीत होणे खूप अवघड आहे. याच्यासाठी खूप जबरदस्त प्रशिक्षणाची (Training) आवश्यकता आहे. विशेषतः वैचारिक प्रशिक्षणाची गरज आहे. त्याचबरोबर उच्चवर्तन निर्माण करण्याची आणि सवयी व गुणधर्मात विशेष सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे हे प्रशिक्षण आणि सुधारणा केवळ वैयक्तिक पातळीवर करून चालणार नसून यासाठी अशी सामूहिक व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे की, जी मोठ्या प्रमाणावर लोकांना उपासनेसाठी पात्र वा तयार करणारी असावी. यामध्ये समूहाची पूर्ण शक्ती व्यक्तीच्या पाठीशी असावी आणि त्याच्यातील कमतरतेत सुधारणा घडवून आणणारी असावी. हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी इस्लाममध्ये ‘नमाज’, ‘रोजा’, ‘जकात’ आणि ‘हज’ या उपासना अनिवार्य ठरविण्यात आल्या आहेत. केवळ याच चार उपासनांना उपासना म्हणण्याचा अर्थ असा मुळीच नाही की, केवळ हेच चार भक्तियोग आहेत. परंतु असे मुळीच नाही. या चार उपासना माणसाला वास्तविक आणि आजीवन उपासक बनविण्याचे प्रशिक्षण आहे. याच उपासना माणसाला एका विशिष्ट हेतूपूर्तीसाठी प्रशिक्षित करतात. यामुळेच रचनाबद्ध व सुनियोजित चालीरीती आणि सुशील वर्तनाचा प्रमाणबद्ध साचा तयार होतो, तसेच या सामूहिक व्यवस्थेचा भक्कम पाया उभा राहतो. याशिवाय मानवीय जीवनाचे उपासनेत परिवर्तन होणे मुळीच शक्य नाही. या चार उपायांशिवाय इतर कोणताच उपाय असा नाही की, ज्यामुळे हा मूळ उद्देश पूर्ण करता येणे शक्य होईल. म्हणूनच या चार उपासना इस्लामचे मूळ स्तंभ ठरविण्यात आले आहेत. अर्थात याच चार प्रमुख स्तभांवर इस्लामची पूर्ण इमारत उभी व कायम आहे.
या वैयक्तिक आणि सामुदायिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपलेला नाही. यासाठी इस्लामध्ये ‘नमाज’, ‘रोजा’, ‘जकात’ आणि ‘हज’ हे स्तंभ बाकी आहेत. यावर आपण नंतर चर्चा करु या.
१) लोकांना खरे पाहता हेच माहीत नाही की, ‘अध्यात्म’ म्हणजे नेमके काय? म्हणूनच ते संपूर्ण जीवन अध्यात्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी खर्ची घालतात आणि शेवटी पदरात काहीच पडत नाही. जर ‘अध्यात्म’ या शब्दावर विचार केला तर ही बाब अगदी स्पष्ट होईल की, याचा अर्थ हा इतर दुसरा आत्मा नसून माणसाचा स्वतःचा आत्मा आहे. म्हणून आध्यात्मिकता म्हणजेच मानवता होय. मानव जेव्हा आपल्यातील पशूतुल्य अथवा असुरी इच्छा व अभिलाषांच्या जोखडातून मुक्त होऊन मानवतेच्या उच्च शिखराकडे जेवढा जास्त येत जाईल आणि नैतिकता व मानवीय गुणधर्माच्या अलंकारांनी विभूषित होऊन ईशप्रसन्नतेचे अत्युच्च लक्ष्य गाठण्याचे जेवढे यशस्वी प्रयत्न करील तेवढाच जास्त आध्यात्मिक विकास होईल.
0 Comments