अहमदनगर
रोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, ’ हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्या लोकांवर ही अनिवार्य होते. यासाठी की तुमच्यात ’तक्वा’ निर्माण व्हावा” (2-182).
’तक्वा’ हाच रोजांचा उद्देश आहे. म्हणूनच तक्व्याचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे रोजासंबंधीचे काही उपदेश यासाठी पुरेसे आहेत. ते एकदा म्हटले, ’जो रोजा ठेवूनही खोटे बोलने व खोटे वागणे सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही.’ अर्थातच माणसाच्या वागण्यात, बोलण्यात परिवर्तन होऊन त्याने सत्य बोलावे व सत्य वागावे हाच रोजांचा खरा उद्देश आहे. पैगंबर (सल्ल.) एकदा म्हटले, ’रोजा म्हणजे फक्त पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे! रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे!” या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत असेल, अन्याय-अत्याचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. आदरणीय उमर (र.) यांंनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी मा. उबई बिन कअब (र.) यांनी ’तक्वा’ विषयी विचारणा केली असता ते म्हटले, हे उमर (र.)! कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला? उमर (र.) म्हटले, ’हो! एकदा असे घडले!’ ’मग काय केलं?’ उमर (र.) म्हटले, एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून , की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हटले, ” उमर (र.)! हाच तक्वा आहे!” अर्थात माणसाने संपूर्ण जीवन अशा सावधानतेने जगावे की त्यांच्याकडून ईश-अवज्ञा अर्थात अन्याय-अत्याचार घडू नये हाच तक्वा आहे. हाच रोजांचा खरा हेतू आहे. थोर इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी ’ रोजा आणि वासनांवर नियंत्रण’ या पुस्तकात तक्वाचे स्पष्टीकरण करतांना दोन घोडेस्वारांचे सुंदर उदाहरण दिले आहे. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे तर दूसर्याच्या हातातून तो सुटलेला आहे. लगाम हाती असल्याने पहिल्याचे घोड्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मात्र लगाम हाती नसल्याने दुसर्या घोडेस्वाराचे घोड्यावर नियंत्रण नाही. उलट तो घोड्याच्या नियंत्रणात आहे. हे उदाहरण देऊन मौलाना लिहितात की, घोडे म्हणजे वासना (ख्वाहिशाते नफ्स) आहेत आणि जगातील प्रत्येक माणूस वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशासमान आहे. रोजाचा उद्देश अर्थातच तक्वा हा आहे की वासनांरूपी घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा व त्याला वासनांवर नियंत्रण प्राप्त व्हावे. वासनांची गुलाम बनलेली माणसं अल्लाहची अर्थात सत्याची गुलामी कदापि करू शकत नाहीत. रोजानंतर रमजानचे दूसरे वैशिष्ट्ये कुरआन आहे. कुरआनची ओळख स्वतः कुरआननेच अशी करून दिली आहे, ” रमजान तो पवित्रा महिना आहे, ज्यात कुरआनचे अवतरण झाले. कुरआन समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे, सुस्पष्ट असे मार्गदर्शन, कुरआन सत्य-असत्याची कसोटी (अलफुर्कान) आहे.” जीवनाविषयी जे मार्गदर्शन माणसासाठी कुरआन ने सांगितले ते संक्षिप्तपणे असे आहे.
1) दुनिया अंधेर नगरी नव्हे आणि मोकळे रान (चरण्याची) ही नाही. सफल चराचर सृष्टिचा व तुझा निर्माता अल्लाह तुला सदा सर्वदा पाहात आहे. तू सार्या जगाला फसवशील मात्र त्याच्या नजरेतून वाचू शकत नाहीस, ही दुनिया तुझ्यासाठी परीक्षा गृह (एक्झाम हॉल) आहे. त्यासाठीच तुला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र मृत्यू येताच तुला या परीक्षा गृहामधून बाहेर पडावे लागेल. आणि मग एक दिवस तो उजाडलेला असेल जेव्हा या परीक्षेचा रिझल्ट लागेल. जो सर्वस्वी तुझ्या कर्मावर (कृत्यावर) अवलंबून असेल. आज तू सत्याच्या न्यायाच्या नीतिच्या मार्गाने जगलास तर जीवनरूपी या परीक्षेत उत्तीर्ण होशील. मात्र जर असत्य, अन्याय, अनीतिच्या मार्गाने जगलास तर घोर निराशा तुझ्या पदरी येईल! मग पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो! सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे! चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस! ही संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग! कुणाचे स्वातंत्र्य हिराऊन घेऊ नकोस. कुणाला स्वतःपेक्षा हीन लेखू नकोस कोणाचा द्वेष-मत्सर करू नकोस.
3) हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेही सत्कर्म अल्लाह स्विकारत नाही. म्हणून अर्थार्जन कर पण कष्टाने, न्यायाने, नीतिने, भ्रष्टाचार करू नकोस, बेईमानी धोकेबाजी करू नकोस.
4) माता-पिता, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले व इतर आप्तेष्टांचे तुझ्यावर हक्क आहेत. त्यांना पायदळी तुडवू नकोस, माय-बापाशी अत्यंत आदराने, सन्मानाने वाग. त्यांच्याशी कृतघ्नता करणे, अल्लाहशी कृतघ्नता करण्यासमान आहे. याची जाणीव ठेव. पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले, आईच्या चरणाखाली (स्वर्ग) जन्नत आहे. माता-पिता प्रसन्न तरच अल्लाह प्रसन्न! माता-पिता नाराज तर अल्लाह नाराज. हे सारं जग अल्लाहच कुटुंब आहे असे जाणून जो सार्या जगाच भलं इच्छितो तोच खरा सज्जन आहे.
5) मृत्यू अटळ आहे! तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस. मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर! ते तुला खर्या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्येयात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ठ तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधीपश्चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच ’चांगभलं’ होईल! याची जाणीव ठेव!
0 Comments