बंधुंनो, मी आज सांगतो ते ऐका. कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी मी पुन्हा तुमच्यात दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणे सर्वांचे जीवन मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याचि वेळ येईपर्यंत असे प्रेमाने बंधुभावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करू. एके दिवशी ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहे, हे कधी विसरू नका. त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा. तेथे सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल. मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेही पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने सहानुभूतीने वागवा. कठोर नका होऊ. दयाळू रहा. तुम्ही ईश्वराच्या जामीनकीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. खरे ना? परमेश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.
“तसेच तुमच्यावर कोणीही विश्वास टाकला तर विश्वासघात करू नका. दिला शब्द पाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वर्ज्य आहे, हे ध्यानात धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊ नये. मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळीपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील.”
आणी तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेच त्यांनाही खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षात ठेवा की, कसेहि झाले तरी तेही खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने नाही वागवता कामा. मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका. तुमचे सर्वांचे एक जणू भ्रातृमंडळ, एक तुमचा महान भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर रहा, सावध रहा.
0 Comments