दिलेले वचन पूर्ण करणे हे स्वतः अल्लाहचे वैशिष्ट्य आहे. पवित्र कुरआनात अल्लाह स्वतःविषयी असे म्हणतो की, निश्चितच अल्लाह कधीही वचनभंग करत नाही. अल्लाहने केलेले हे वचन आहे आणि तो कधीच आपल्या वचनाच्या विरोधात जात नाही. अल्लाह कधीही आपला शब्द टाळत नसतो. अल्लाहपेक्षा आपल्या वचनाशी बांधिल इतर कोण असू शकतो? (पवित्र कुरआन, विविध अध्यायांतील आयती) साधारणपणे दोन माणसांनी आपसात केलेल्या करारास वचन म्हटले जाते. पण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात वचनपूर्ती करावी लागत असते. मग ते सामाजिक असो की आर्थिक, संस्कृती-सभ्यतेशी निगडीत असो की राज्यव्यवस्थेशी संबंधित असो; प्रत्येक क्षेत्रात माणसाने वचनबद्धता पाळली पाहिजे. मुस्लिमांच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की जर ते आपले वचन पाळत नसतील तर त्यांची श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. जे वचन पाळतात अशा श्रद्धावंतांसाठी कुरआनात म्हटले आहे की, “असे लोक त्यांच्याकडील अमानती परत करतात. वचनभंग करत नसतात. आपल्या नमाजांविषयी (उपासना) ते दक्ष असतात. तेच लोक स्वर्गाचे वारस असतील. अशाच लोकांना उच्च दर्जाच्या स्वर्गांचा वारसा लाभेल, कारण ते लोक आपल्या विधात्याच्या आयतींवर श्रद्धा ठेवतात, त्यास भागीदार जोडत नाहीत. त्यांना जे काही जमेल ते इतरांना देतात. अशाच लोकांच्या हृदयांना आपल्या विधात्याकडे परतण्याची सतत भीती असते.” (पवित्र कुरआन-२३)
लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)
सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)
0 Comments