Home A प्रवचने A अल्लाहच्या आज्ञाधारकतेची काही उदाहरणे

अल्लाहच्या आज्ञाधारकतेची काही उदाहरणे

मद्याचा त्याग
तुम्ही ऐकले असेल की अरबस्थानात मद्यपानाचा किती जोर होता. स्त्री व पुरुष, तरुण व म्हातारे सर्वांनाच दारूचे वेड होते. वास्तविकतः मदिरेवर त्यांचे प्रेम होते. तिच्या प्रशंसेचे ते गीत गात असत आणि तिच्यावर प्राण देत होते. हेदेखील तुम्हाला ज्ञात असेल की दारूची सवय लागल्यावर ती सुटणे किती दुष्कर आहे. मनुष्य प्राण द्यावयास तयार होतो पण दारू सोडण्याची त्याची तयारी नसते. जर दारूड्याला दारू मिळाली नाही तर त्याची स्थिती आजारी माणसापेक्षा अधिक वाईट होते. परंतु तुम्ही कधी ऐकले आहे का की जेव्हा पवित्र कुरआनमध्ये ती निषिद्ध केल्याची आज्ञा आली तेव्हा काय घडले? तेच अरब लोक जे दारूवर प्राण देत होते. ही आज्ञा ऐकताच त्यांनी स्वत:च्या हाताने दारूचे माठ फोडून टाकले. मदीना शहराच्या गल्ल्यांमधून दारू अशी वाहत होती जणू पावसाचे पाणी वाहत आहे. एका मैफिलीत काही लोक बसून दारू पीत होते, जेव्हा प्रेषित (मुहम्मद स.) यांच्याकडून दिली गेलेली दवंडी ऐकली की दारू निषिद्ध ठरविली गेली आहे, तेव्हा ज्याचा हात जेथे होता तेथेच राहिला. ज्याने तोंडाला पेला लावला होता त्याने लगेच तो दूर केला आणि त्यानंतर एक घोटसुद्धा घशात जाऊ दिला नाही. असा आहे वैभवशाली ईमान! यालाच म्हणतात अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या आज्ञेचे पालन!

अपराधाची कबुली

काय तुम्हाला कल्पना आहे की व्यभिचाराची शिक्षा किती कठोर ठेवली गेली आहे? उघड्या पाठीवर शंभर कोडे, ज्यांची कल्पना केल्यास माणसाच्या अंगावर शहारे यावेत आणि जर व्यभिचारी विवाहित असेल तर दगडांचा वर्षाव करून ठार करण्याची शिक्षा आहे. अशा कठोर शिक्षेचे नाव ऐकूनच माणसाचा थरकाप होईल. परंतु तुम्हालाही कल्पना तरी आहे का की ज्यांच्या हृदयात ईमान होते त्यांची स्थिती कशी होती? एका माणसाकडून व्यभिचाराचे कृत्य घडले. कोणीही न्यायालयापर्यंत पकडून नेणारा नव्हता. पोलिसांना बातमी देण्यास कोणीही नव्हता. केवळ हृदयात ईमान (विश्वास) होते की ज्याने त्या माणसाला सांगितले, “जर तू अल्लाहच्या कायद्याविरूद्ध स्वत:च्या मनाची वासना पूर्ण केली आहेस तर आता जी शिक्षा अल्लाहने त्यासाठी ठरविली आहे ती भोगण्यास तयार हो.” नंतर तो मनुष्य स्वतः प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या सेवेत हजर झाला आणि म्हणाला, “हे प्रेषित (मुहम्मद स.)! मी व्यभिचार केला आहे. मला शिक्षा द्या.” प्रेषितांनी तोंड फिरवून घेतले तेव्हा दुसऱ्या बाजूला येऊन त्याने तीच गोष्ट सांगितली. प्रेषितांनी पुन्हा तोंड फिरवले तेव्हा त्याने पुन्हा समोर येऊन शिक्षेची याचना केली, “जे पाप मी केले आहे त्याची मला शिक्षा द्या.” याला म्हणतात ईमान! ज्याच्या हृदयात ईमान आहे त्याच्यासाठी उघड्या पाठीवर शंभर कोरडे सहन करणेच नव्हे तर दगडांच्या वर्षावात मृत्यु स्वीकारणेसुद्धा सोपी गोष्ट आहे परंतु अवज्ञाकारी म्हणून अल्लाहसमोर हजर होणे कठीण आहे.
तुम्हाला माहीत आहे की माणसाला आपल्या नातेवाईकांपेक्षा कोणीही अधिक प्रिय नसतो. विशेषत: वडील, भाऊ, मुले तर इतके प्रिय असतात की त्यांच्यावरून सर्वकाही ओवाळून टाकण्यात मनुष्य धन्यता मानतो. परंतु आपण बद्र व उहुदच्या युद्धांचा थोडा विचार करा की त्यात कोण कोणाच्या विरूद्ध लढला होता. बाप मुस्लिमांच्या सेनेत आहे तर मुलगा अनेकेश्वरवाद्यांच्या सैन्यात. किंवा मुलगा इकडे आहे तर बाप दुसरीकडे. एक भाऊ इकडे आहे तर दुसरा भाऊ तिकडे. अगदी जवळचे आप्तेष्ट एकमेकांविरूद्ध युद्धात आले आणि अशा प्रकारे लढले की जणू हे एकमेकाला ओळखतसुद्धा नाहीत. त्यांच्यातील हा जोश काही रुपये-पैसे अथवा जमिनीसाठी भडकलेला नव्हता, काही वैयक्तिक शत्रुत्वसुद्धा नव्हते, तर केवळ या कारणासाठी ते स्वत:च्या रक्त-मांसाविरूद्ध लढले की ते अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्यासाठी बाप, मुलगा, भाऊ व संपूर्ण कुटुंबाला त्यागण्याचे अथवा बळी देण्याचे सामर्थ्य बाळगत होते.

जुनाट रुढी-परंपरांना मूठमाती

आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की अरबस्थानात जितक्या जुनाट रुढी-परंपरा होत्या, इस्लामने जवळजवळ त्या सर्वांचाच बीमोड केला. सर्वांत मोठी प्रथा म्हणजे मूर्तीपूजा होती. ही प्रथा शेकडो वर्षांपासून होती. इस्लामने सांगितले की या मूर्तीना सोडून द्या. दारू, व्यभिचार, जुगार, चोरी आणि वाटमारीची अरबस्थानात सर्रास प्रथा होती. इस्लामने या सर्वांचा त्याग करण्यास सांगितले. स्त्रिया उघड्या फिरत असत. इस्लामने आज्ञा दिली की पडदा पद्धतीचा अवलंब करा. स्त्रियांना वारसाहक्क दिला जात नसे. इस्लामने सांगितले की वारसा संपत्तीत त्यांचादेखील हिस्सा आहे. दत्तकपुत्राला तोच दर्जा दिला जात असे जो औरस पुत्राला असतो. इस्लामने सांगितले की तो सख्ख्या पुत्राप्रमाणे नाही तर जर दत्तक पुत्राने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला तर तिच्याशी विवाह केला जाऊ शकतो. थोडक्यात कोणतीही अशी जुनी पद्धत नव्हती की जी मोडण्याची आज्ञा इस्लामने दिली नसेल.
परंतु तुम्हाला कल्पना आहे की ज्यांनी अल्लाह व प्रेषितांवर ईमान धारण केले होते त्यांची कार्यपद्धती कशी होती? शेकडो वर्षांपासून ज्या मूर्तीची ते आणि त्यांचे वाडवडील पूजा-अर्चना व नवस करीत असत त्यांना या ईमानधारकांनी आपल्या हाताने फोडले. शेकडो वर्षांपासून घराण्याच्या ज्या प्रथा चालत आल्या होत्या त्या सर्वांना त्यांनी पूर्णत: नष्ट केले. ज्या वस्तूंना ते पवित्र मानीत असत त्यांना अल्लाहची आज्ञा आल्यावर पायाखाली तुडवून टाकले. ज्या गोष्टींना ते घाणेरड्या मानीत असत अल्लाहची आज्ञा येताच त्यांना धर्मानुकूल समजू लागले. ज्या वस्तु शेकडो वर्षांपासून शुद्ध समजल्या जात असत त्या अकस्मात अशुद्ध ठरल्या आणि ज्या अशुद्ध समजल्या जात असत त्या एकाएकी शुद्ध झाल्या. अनेकेश्वरत्वाच्या ज्या पद्धतीत आमोद-प्रमोद व लाभाची सामुग्री होती अल्लाहची आज्ञा येताच तिचा त्याग केला आणि इस्लामच्या ज्या आज्ञांचे पालन माणसाला दुष्कर वाटते त्या सर्वांचा आनंदाने स्वीकार केला. याचे नाव आहे ईमान व याला म्हणतात इस्लाम. त्या वेळी जर अरब लोकांनी असे सांगितले असते की अमुक गोष्ट आम्ही मान्य करीत नाही, कारण त्यात आमचे नुकसान आहे आणि अमुक गोष्ट आम्ही अशासाठी सोडत नाही की त्यात आमचा फायदा आहे; अमुक काम आम्ही अवश्य करू कारण वाडवडिलांपासून हेच होत राहिले आहे, रोमन लोकांच्या अमुक गोष्टी आम्हाला पसंत आहेत आणि इराणी लोकांच्या अमुक गोष्टी आवडतात. अरबस्तानातील लोकांनी अशाच प्रकारे इस्लामची एक-एक गोष्ट रद्द केली असती तर आपण कल्पना करू शकता की आज एकसुद्धा मुस्लिम जगात आढळला नसता. 
अल्लाहच्या प्रसन्नतेचा मार्ग
बंधुनो, पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे, __”तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.
संबंधित पोस्ट
November 2024 Rabi'al Thani 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *