लोकांनी त्यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘बहाण्याचा अर्थ काय? आणि कोणकोणत्या बाबी बहाणा बनू शकतात?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘भय आणि आजारपण.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
प्राण जाण्याचे ‘भय’. एखाद्या शत्रूमुळे अथवा एखादे श्वापद आणि सापामुळे आणि मस्जिदपर्यंत जाता येणे शक्य नाही असे ‘आजारपण’. वादळी वारा, पाऊस आणि नेहमीपेक्षा अधिक थंडीदेखील बहाणा बनू शकते. परंतु थंड हवेच्या ठिकाणी थंडीचा बहाणा केला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे उष्ण विभागांत कधी कधी अधिक थंडी पडते आणि ती त्यांच्या जीवावर उठण्याची शक्यता असते, अशी थंडी बहाणा बनू शकते. अशाप्रकारे त्या वेळी मनुष्याला कमी-अधिक प्रमाणातील शौच अथवा लघुशंकेची आवश्यकता भासल्यास तेदेखील बहाणा ठरू शकते.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात) आमची स्थिती अशी होती की आजारी व्यक्ती आणि धर्मद्रोही व्यक्तीव्यतिरिक्त आमच्यापैकी कोणी सामूहिक नमाज चुकवित नव्हता आणि त्या धर्मद्रोही व्यक्तीचे वैमनस्य माहीत होते. तसेच (त्या काळात लोकांची स्थिती अशी होती की) आजारी असूनही काहीजण दोन माणसांचा आधार घेऊन मस्जिदमध्ये पोहचत होते आणि सामुस्रfयक नमाज अदा करीत होते. अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांनी याबाबतीत सांगितले की, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला ‘सुन्नतुल-हुदा’ शिकविल्या. (‘सुन्नतुलहुदा’ म्हणजे मुस्लिम जनसमुदायाला अनुसरण्यास सांगण्यात आलेल्या आणि कायद्यात्मक दर्जा प्राप्त असलेल्या पैगंबराचरण पद्धती. या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे ज्या मस्जिदीतून अजान दिली जाते त्या मस्जिदीत नमाज अदा करणे होय.) अशीही एक ‘रिवायत’ (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून ऐकलेली गोष्ट त्यांच्याच शब्दांत इतरांना सांगणे) आहे की त्यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला ही गोष्ट पसंत असेल की त्याची आज्ञापालन करणाऱ्या भक्ताच्या स्वरूपात भविष्यात अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहशी भेट होईल तेव्हा त्याने त्या पाच नमाजींची देखरेख केली पाहिजे आणि त्या नमाजी मस्जिदमध्ये सामूहिकरीत्या अदा केल्या पाहिजेत कारण अल्लाहने तुमच्या पैगंबरांना (मुहम्मद (स.) यांना) ‘सुन्नते हुदा’चे प्रशिक्षण दिले आहे आणि या नमाजी ‘सुन्नते हुदा’पैकी आहेत आणि जर तुम्ही तुमच्या घरात नमाज अदा कराल, जसे- हे धर्मद्रोही लोक आपल्या घरांमध्ये नमाज अदा करतात, तर तुम्ही आपल्या पैगंबरांच्या (मुहम्मद (स.) यांच्या) आचरण पद्धती सोडून द्याल आणि जर तुम्ही आपल्या पैगंबरांच्या आचरण पद्धती सोडल्या तर सरळमार्ग विसरून जाल.’’ (हदीस : मुस्लिम)
0 Comments