कुरआन आणि हदीस (प्रेषितवचने) यात अनेकदा श्रध्दाहीनांच्या या मध्यस्थीच्या चुकीच्या कल्पनेला विरोध केला गेला आहे. परंतु शिफारस आणि मध्यस्थीबद्दल त्यांनी अगदी स्पष्ट पुरावा दिलेला आहे. हे तत्त्व (शिफारस) अशा वेळीच ईमान-श्रध्देच्या मूलतत्त्वांचा एक भाग बनते, कारण निर्णयाच्या दिवशी काही सत्कर्मी लोक इतरांसाठी शिफारस करतील. कोणत्या प्रकारची ती शिफारस अथवा मध्यस्थी असेल? निश्चितच वर चर्चेत आलेल्या मध्यस्थीसारखी ती मुळीच नसणार. दोघामध्ये मूळ फरक आहे. ही दुसऱ्या प्रकारची शिफारस अल्लाहच्या गुणवैशिष्ट्यांना अजिबात नाकारीत नाही. ते या प्रस्थापित सत्याविरुध्द मुळीच नाही की अल्लाह समस्त सृष्टीचा मालक आणि शासक आहे. तोच सर्वज्ञ, सर्वसमावेशक, न्यायप्रिय असा प्रभुत्वशाली आहे. अल्लाहचे हे गुण पूर्णपणे लक्षात ठेवले तर शिफारस करणे ही साधी बाब आणि साधारण गोष्ट राहात नाही. ते कृत्य (शिफारस करणे) हे वैशिष्ट्यपूर्ण, मर्यादित असे नियमांकित असलेले सिध्द होते. दिव्य कुरआन फक्त वर नमूद केलेल्या सिध्दान्ताचा उल्लेख करून थांबत नाही तर त्याविषयीच्या नियमावलीची सविस्तर चर्चा करतो. या नियमांच्या आधीन राहूनच शिफारस तथा मध्यस्थी केली जाऊ शकते, ते नियम खालीलप्रमाणे आहेत.
१) शिफारस करण्याची परवानगी देणे हे अल्लाहच्या हातात आहे आणि त्यावेळी त्याच्या इच्छे विरुध्द काही एकमात्र होणार नाही. कुरआनोक्ती आहे,
‘‘सांगा, संपूर्ण शिफारस अल्लाहच्या अखत्यारीत आहे. आकाशांचा व पृथ्वीच्या साम्राज्यांचा तोच स्वामी आहे, मग त्याच्या कडेच तुम्ही रुजू केले जाणार आहात.’’ (कुरआन ३९: ४४)
२) ज्याला अल्लाह परवानगी देईल तोच दुसऱ्यांसाठी काही शब्द देऊ शकेल. तोच शिफारस करु शकेल. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘अल्लाह तो चिरंतनजीवी आहे ज्याने तमाम सृष्टीचा भार सांभाळलेला आहे, त्याच्या शिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तो झोपतही नाही आणि त्याला झोपेची गुंगी ही येत नाही, पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे त्याचेच आहे. असा कोण आहे जो त्याच्या पुढे त्याच्या पगवानगी शिवाय शिफारस करू शकेल ? जे काही दासांच्या समक्ष आहे. त्यालाही तो जाणतो आणि जे काही त्यांच्यापासून अदृश्य आहे त्यालाही तो जाणतो आणि त्याच्या माहिती पैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या बुध्दीकक्षेत येऊ शकत नाही याव्यतिरिक्त की एखाद्या गोष्टीचे ज्ञान तो स्वतःच त्यांना देऊ इच्छित असेल, त्याचे राज्य आकाश आणि पृथ्वीवर पसरले आहे, आणि त्यांचे संरक्षण काही त्याला थकवून सोडणारे काम नव्हे, फक्त तोच एकटा महान व श्रेष्ठ आहे.’’ (कुरआन २: २५५)
३) शिफारस करणारा फक्त त्याचीच शिफारस करील ज्याची शिफारस करण्यास अल्लाहने त्याला परवानगी दिली असेल. कुरआनोक्ती आहे,
‘‘ते कुणाचीही शिफारस करीत नाहीत, त्याव्यतिरिक्त की ज्याच्याबाबत शिफारस ऐकण्यास अल्लाह प्रसन्न होतो, आणि ते त्याच्या भयाने लटपटतात, आणि जर त्यांच्यापैकी कुणी सांगितले की अल्लाहशिवाय मीदेखील एक उपास्य आहे तर आम्ही त्याला नरकाची शिक्षा देऊ, आमच्या येथे अत्याचाऱ्यांचा हाच बदला आहे.’’ (कुरआन २१: २८-२९)
४) त्याची शिफारस करण्याच्यासाठी तो फक्त त्या बाबींचाच उल्लेख करील जे सर्व दृष्टीने न्याय संगत असतील. कुरआनोक्ती आहे,
‘‘ज्या दिवशी आत्मा आणि दूत रांगेत उभे राहतील, कुणीही बोलणार नाही या खेरीज की ज्यास कृपावंत परवानगी देईल आणि जो योग्य गोष्ट बोलेल, तो दिवस सत्याधिष्ठित आहे. आता ज्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या पालनकर्त्याकडे परतण्याचा मार्ग स्वीकारावा.’’ (कुरआन ७८ : ३८-३९)
आता हे अगदी स्पष्ट आहे की वर नमुद केलेल्या मर्यादेतच शिफारस केली जाईल. ही शिफारस नम्र निवेदन, प्रार्थना, विनवणी आणि पश्चात्ताप याव्यतिरिक्त दुसरे काही नसणार आहे. शिफारस करणारा काही अल्लाहच्या ज्ञानात भर टाकणार नाही की सदरच्या इसमाची श्रध्दा आणि आचरण असे आहे किवा शिफारस करणारा आपले मत मांडणार नाही की सदरची व्यक्ती माफ करण्यास कशी लायक आहे. तसेच तो शिफारशी मनुष्य अल्लाहच्या निर्णयांवर दबावसुध्दा आणू शकणार नाही. अल्लाहच्या परवानगीने तो शिफारस करणारा मनुष्य अल्लाहच्या आज्ञांकित बनेल आणि याचना करील,
‘‘माझ्या पालनकर्ता प्रभुस्वामी, मी याचना करतो की त्या दासाचे पाप क्षमा कर त्याच्या चुकांसाठी त्याला माफ कर आणि त्याला तुझ्या कृपा छत्राखाली दयेखाली आश्रय दे.’’
खरे पाहता अल्लाहच शिफारस करणारा आहे, कारण शिफारस करण्याची परवानगी सगळे काही माहीत असतानासुध्दा तोच देतो. दिव्य कुरआनने हे सत्य अनेक ठिकाणी उघड केलेले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘आणि हे पैगम्बर (स) तुम्ही या (दिव्य प्रकटनाच्या ज्ञाना) व्दारे त्या लोकांना उपदेश करा जे लोक याचे भय बाळगतात की, आपण आपल्या पालनकर्त्यांसमोर कधीतरी अशा अवस्थेत हजर केले जाऊ जेथे त्याच्याशिवाय कोणीही (असा सत्ताधीश) नसेल जो त्यांचा समर्थक व सहायक असेल किवा त्यांची शिफारस करील, कदाचित (या उपदेशाने सावध होऊन) त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगिकारावे.’’ (कुरआन ६ : ५१-५३)
हे शिफारस करणारे लोक कोण असतील? आणि कोणासाठी ते अल्लाहच्या परवानगीने अल्लाहसमोर शिफारस करतील? हदीसमध्ये सत्कर्मी लोक अशी शिफारस करतील असे नमूद केले आहे. असेच लोक अल्लाहसाठी प्रिय असतील. ज्यांची शिफारस ते करतील. ती मंडळी अशी असेल ज्यांचे सदाचार आणि श्रध्देचे पारडे बरोबर असतील. हिशेब करताना फक्त काही कमी भासेल. सामान्यतः असे लोक कृपा आणि माफ करण्यासारखे असतील. माफीसाठी त्यांच्याकडे कमतरता आहे. शिफारस याच कमतरतेला दूर करण्यासाठी त्या वेळी होईल. येथे हा प्रश्न निर्माण होतो की शिफारस करण्याची काय वैशिष्ट्ये आणि मोजमाप आहे? शिफारशीचा उद्देश काय आहे? वर नमूद केलेल्या कुरआन वचनांनुसार शिफारस करणारा हासुध्दा लाचार आहे, तर अल्लाहने माफ करण्याचे त्या लोकांसाठी पूर्वीच ठरविलेले असणार की ज्यांना अल्लाह शिफारस केल्यानंतर सार्वजनिक माफी देईल? या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे. अल्लाह शिफारस करण्याऱ्या व्यक्तीला शिफारस करण्याची परवानगी देऊन त्याला अनुग्रहित करील की त्याने सर्वांसमोर अल्लाहशी बोलावे आणि विनंती करावी. निर्णयाच्या दिवशी सर्वजण हे स्तब्ध असतील, भयभीत आणि तळपळत असतील. त्यांच्या नजरासुध्दा ते वर करू शकणार नाहीत की कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. अशा वेळी अल्लाहचा तो एक सन्मान आणि विशेष अनुग्रह असेल त्या लोकांसाठी ज्यांना अल्लाह त्या वेळी शिफारस करण्याची परवानगी देईल. (अल्लाहु अकबर!) याव्यतिरिक्त इतरांविषयी की ज्यांचे सदाचाराचे पारडे कमी भरत आहे त्यांच्या माफीची अल्लाहजवळ अशा वेळी अल्लाहसमोर याचना, प्रार्थना करणे हे त्या सत्कर्मींचे भाग्य आहे. सृष्टीचा पालनकर्ता, प्रभुस्वामी, अल्लाह त्यांच्या त्या प्रार्थनेला मान्य करील आणि त्या लोकांसाठी माफीची घोषणा करील ज्यांच्यासाठी शिफारस केली गेली.
हे अगदी स्पष्ट आहे की शिफारस करणे हे एक माफ करणे या अल्लाहच्या गुणवैशिष्ट्याचा भाग आहे. परंतु अल्लाह सामान्यतः माफी देतो त्या तत्त्वाशी किचित वेगळा आहे. आपण याला असे म्हणू या की हे सवलत (कनशेशन) देण्याचे तत्त्व आहे, जे अल्लाहच्या गुणवैशिष्टांशी सुसंगत असे आहे. हे सवलतीचे तत्त्व (शिफारस करणे) कोणत्याही परिस्थितीत अल्लाहच्या उफत करण्याच्या आणि शिक्षा देण्याच्या तत्त्वाशी किचितही विसंगत नाही.
कुरआन आणि हदीसमध्ये या मुद्याला अगदी स्पष्ट करण्यात आले आहे की पारलौकिक जीवनात लोकांना माफ करण्याची कृती ही अल्लाहच्या कृपेशिवाय आणि दयेविना अगदी अशक्य गोष्ट आहे. प्रेषित (स) यांचे कथन आहे,
‘‘कोणीही आपल्या कतृत्वाच्या सामर्थ्यावरच फक्त मुक्ती प्राप्त करु शकणार नाही.’’ (मुस्लिम)
मुक्तीचा हा दृष्टिकोन निर्विवादित आहे. परंतु हेसुध्दा खरे आहे की अल्लाहची कृपा आणि दया ही विशिष्ट अशा न्यायाच्या तत्त्वांवर अवलंबून आहे. अल्लाहच्या दया आणि कृपेसाठी त्याच लोकांचा समावेश होईल जे त्यास पात्र आहेत. अल्लाहचा अनुग्रह त्या त्या व्यक्तींच्या सत्कृत्यांच्या दर्जानुसार असणार आहे. ज्यांचे सत्कृत्य उत्तम दर्ज्याचे आहे अशांना अल्लाहची कृपा आणि दया प्राप्त होण्याची शक्यता जास्त असणार आहे. कमी दर्ज्याच्या सदाचारींना हा योग (संधी) कमी उपलब्ध होणार आहे. म्हणून फार मोठी संख्या यापासून वंचित राहणार की अल्लाहच्या अनुग्रहासाठी त्यांची योग्यता कधी सिध्द होणार! हा मोठा कळीचा प्रश्न आहे. थोडक्यात, मुक्ती ही व्यक्तीच्या श्रध्दाशीलतेवर (ईमान) आणि सत्कर्मांवर अवलंबून आहे. परंतु पारलौकिक जीवनात मुक्तीबद्दलचे सर्व निर्णय घेणे हे सर्वथा अल्लाहच्याच हातात आहे.
इस्लाम धर्मात शिफारस तथा मध्यस्थीबद्दलची ही खरी संकल्पना आहे. पारलौकिक जीवनावर श्रध्दा- ईमान ठेवणे हे तोपर्यंत कुचकामी आणि निरर्थक ठरते जोपर्यंत व्यक्ती इस्लामच्या या शिफारशीच्या खऱ्या संकल्पनेला जाणून उमजून घेत नाही आणि आपल्या मनातून सर्व खोट्या कल्पना शिफारशीबद्दलच्या मुळासकट उपटून फेकत नाही. जोपर्यंत व्यक्तीच्या मनात या खोट्या शिफारशीच्या कल्पना घर करून आहेत तोपर्यंत अशी व्यक्ती एकेश्वरत्वाचा खोटा दावा करते हे सिध्द होते. अशी व्यक्ती एकेश्वरत्वाला आपल्या कृत्याने निरर्थक ठरविते. अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवणे म्हणजे सत्याचा शोध घेणे होय. व्यक्तीला सत्यज्ञान प्राप्त झाल्यनंतरच ती जीवनव्यवहारात सरळ मार्ग प्राप्त करील आणि अल्लाहचा सच्चा आणि आज्ञाधारक दास स्वतःला आचरणाने सिध्द करून दाखवील. श्रध्दाहीनांच्या शिफारशीबद्दलची खोटी कल्पना त्यांना सत्यापासून दूर नेऊन सोडते आणि त्यांचा सर्वनाश करते. त्या व्यक्तीला ही खोटी श्रध्दा (ईमान) कल्पनाविलासात ठेवते की पारलौकिक जीवनातील मुक्ती श्रध्दाशीलतेवर आणि सत्कर्मांवर अवलंबून नसून कुण्या साधु-संताच्या, पीर, फकीर बाबा यांच्या शिफारशीवरच अवलंबून आहे. अशा दलालांना खूश करण्यासाठी आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी लोक त्यांचे शिष्य बनतात आणि नजराणे देतात. ही संकल्पना व्यक्तीला अल्लाहच्या आज्ञाधारकतेपासून अतिदूर नेते आणि त्या व्यक्तीच्या मनातून पारलौकिक जीवनाबद्दलची भीती नाहीशी होते. हे एक निष्क्रीय तत्त्वज्ञान आहे आणि काल्पनिकता आहे. या काल्पनिकतेमुळे अशा व्यक्तीची श्रध्दा निष्क्रीय बनून राहते. हे अत्यावश्यक आहे की व्यक्तीचे मन आणि विचार शिफारस (वशीला) बद्दल स्पष्ट असले पाहिजे. इस्लामच्या परलोकत्वाला पूर्णपणे योग्यरीतीने समजून उमजून घ्यावयाचे असेल तर हे आवश्यक आहे.
0 Comments