सर्वश्रेष्ठ अल्लाहचे (ईश्वराचे) मानवावर इतके उपकार आहेत की, त्यांचा सुमार करता येणार नाही. त्याने आम्हास एकमेव ईश्वराचीच भक्ती करण्याची बुद्धी व केवळ एकाच सर्वश्रेष्ठ शक्तीची उपासना करण्याची समज दिली, याबद्दल आपण त्याचे उपकार मानायला हवे. ईश्वरीय गुण, त्याचे अधिकार, त्याचे हक्क ईश्वराशिवाय इतर कोणासही प्राप्त नाहीत व त्याच्याशिवाय इतर कोणीही आराध्य नाही अशी श्रद्धा बाळगणे म्हणजे विवेक बुद्धीस मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान होय. याच विषयावर पुढे खुलासेवार चर्चा करण्यात आली आहे.
‘शिर्क’ म्हणजे अनेकेश्वरवाद. यामुळे मानव समाज विभक्त होऊन माणसे एकमेकांपासून दुरावली जातात. अनेकेश्वरवादी एक-दोन श्रद्धाशक्तीने संतुष्ट होत नाहीत. जगाच्या छोट्या छोट्या टापूत राहणारे अनेकेश्वरवादी दोन-चार आराध्य शक्तींवर सहमती न दर्शविता प्रत्येक मानवी गट वेगळ्या श्रद्धाशक्तींची निवड करतो व त्याही कालानुरुप बदलत जातात. सारांश, अनेकेश्वरवाद मानवांना एकत्र येऊ देत नाही. मानवी समूह निरनिराळ्या जाति, जमाती, वंश, भाषा, वर्ण व देशांत विभागले जातात. त्यांच्या आपसातला विरोध, द्वेष व शत्रुत्वाचे रूप धारण करतो. एक समूह दुसऱ्या समूहास त्याच्या मानवी हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न करू लागतो. सर्वत्र अन्याय व अत्याचाराचे वातावरण निर्माण होऊ लागते. जगात सर्वत्र रक्तपात व हिसेच्या घटना घडू लागतात. युध्दाग्नी पेट घेतो व रक्ताचे पाट वाहू लागतात. जागतिक शांतता नष्टप्राय होते. बारकाईने अभ्यास केल्यास जगातील सर्वच युद्धांस अनेकेश्वरवाद या ना त्या स्वरुपात कारणीभूत ठरले आहे, असे दिसून येते. अनेकेश्वरवादाच्या विवादामुळेच अनेकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, या सत्यास इतिहास साक्षी आहे.
एकेश्वरत्वाने संघटित समाजाची निर्मिती होते
एकेश्वरत्वाने मानव समाज संघटित होतो. लोकांमध्ये एकता व जवळीक निर्माण होते. ते सर्व एकाच पालनकर्त्या ईश्वराची कृतज्ञतापूर्ण आराधना करण्यास एकत्र येतात. जेव्हा लोक अनेकेश्वरवादापासून अलिप्त होऊन शुद्ध भावनेने एकाच सृजनकर्त्याला आराध्य मानून एकमेकांजवळ येतात, तेंव्हा निश्चितच एक सशक्त समाज निर्माण होतो. लोकांमध्ये एकतेची भावना जागृत होते. ते एकमेकांचे मित्र बनतात व त्यांच्यात बंधुभाव निर्माण होतो. इतिहास साक्ष आहे की, एकेश्वरावरील श्रद्धेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही भावनेने लोकांना एकत्रित करता आलेले नाही. ईश्वर विश्वव्यापी आहे व त्याच्याशिवाय इतर कोणीही आराध्य होऊ शकत नाही, हीच दृढ श्रद्धा सर्व मानवांना एकत्र आणू शकते. एकेश्वरत्व एका सशक्त समाजाची निर्मिती करू शकतो, हे एक निर्विवाद सत्य आहे. कधी कधी असेही निदर्शनास येते की, लोक एकेश्वराचे तत्त्व मान्य करतात, मात्र त्यांच्यात आपसात एकतेचा अभाव असतो, ते एकमेकांशी शत्रुत्वाने वागतात. याचे कारण असे की, त्यांच्यातील अनेकेश्वरवादावरील श्रद्धा सुप्तावस्थेत अस्तित्वात असते.
सर्व मानवजातीस सर्व काळांत सदासर्वदा संघटित जीवन जगण्यासाठी एकेश्वरवादाचा पाया मजबूत करून त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोषक समाजव्यवस्था कायम करायला हवी.
सर्व मानवजातीस सर्व काळांत सदासर्वदा संघटित जीवन जगण्यासाठी एकेश्वरवादाचा पाया मजबूत करून त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोषक समाजव्यवस्था कायम करायला हवी.
मानवासाठी ईश्वरीय मार्गदर्शन
ईश्वराने प्रेषित मुहम्मद (स.) व कुरआनद्वारे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांबाबत इतके परिपूर्ण मार्गदर्शन केले आहे की, मनुष्याला इतरत्र मार्गदर्शन शोधण्याची गरजच उरलेली नाही. ज्या लोकांना समाधानकारक मार्गदर्शन प्राप्त होत नाही, ते परिपूर्ण समाजव्यवस्था उभारू शकत नाहीत. ते परिस्थितीने विवश होऊन काही काळानंतर विखुरले जातात व त्यांची एकेश्वरावरील श्रद्धा खिळखिळी होऊन ते बहकले जातात. त्यांच्यात आपसात ताटातूट निर्माण होते. प्रेषित मुहम्मद (स.) व कुरआन यांच्याकडून त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन प्राप्त होत राहिले तर कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही काळात त्यांच्यात विभाजन होण्याची शक्यता राहत नाही. मात्र लोकच जर अज्ञानी असतील किवा मानसिक विकृतीमुळे ते स्वतःच उपलब्ध ज्ञानात आपल्या बुद्धिनुसार/इच्छेनुसार कमी जास्त फेरबदल घडवून आणत असतील व त्यालाच योग्य मानण्याचा दुराग्रह करीत असतील, तर ते निश्चित बहकले जातील व मार्गभ्रष्ट होतील.
मनुष्य केवळ पालनकर्त्या ईश्वरास उत्तरदायी आहे
एकेश्वरावर लोकांची अढळ श्रद्धा कायम राहावी, त्यांचे मनोबल स्थिर राहावे व त्यांनी सरळ मार्गाचा अवलंब करावा यासाठी त्यांच्या ठायी विश्वास निर्माण करायला हवा की, मरणोपरांत त्यांच्या कर्मांची पडताळणी व हिशोब केवळ ईश्वरच करणार आहे. ईश्वरच मनुष्याचा भाग्यविधाता आहे व तोच मरणोपरांत जगाच्या अंतानंतर मानवास त्याच्या कर्मानुसार मोबदला देणार आहे, अर्थात स्वर्ग वा नरकात प्रवेशाचा आदेश देणार आहे. ईश्वराशिवाय दुसरा कोणीही त्याच्या पुण्य व पाफत्यांचा मरणोपरांत हिशोब घेणार नाही व मरणोपरांत मिळणारे सुखद वा दुःखदायी अनंतकालीन जीवन ईश्वरच प्रदान करणार आहे. या तत्त्वांवर दृढ विश्वास निर्माण झाल्यास मनुष्य सदाचाराचा मार्ग स्वीकारेल व समाज संघटितपणे जीवन व्यतीत करील. मात्र जे लोक ईश्वराव्यतिरिक्त इतर शक्तीसुद्धा या त्यांच्या ऐहिक गरजा व मनोकामना पूर्णत्वास नेऊ शकतात व जगाच्या अंतानंतर न्याय – निवाड्याच्या दिवशीही ते साहाय्यक सिद्ध होऊ शकतील, असा विश्वास बाळगतात, ते निश्चितच मार्गभ्रष्ट आहेत असे मानायला हवे.
एकेश्वरत्वाची उच्चतम प्राप्ती
सामाजिक एकता सबळ व दीर्घकालापर्यंत अस्तित्वात राहावी म्हणून ईश्वराने काही कर्तव्ये माणसाकरिता अनिवार्य केली आहेत. पहिले (अनिवार्य) कर्तव्य म्हणजे नमाज. जगातील सर्व मुस्लिमांनी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायला हवी. जगाच्या पाठीवर कुठेही निवास करणाऱ्या मुस्लिमाने पश्चिमाभिमुख (किबलाकडे तोंड करून) होऊन नमाज अदा करावी, असा आदेश आहे. काबा हे केंद्र आहे व जगातील सर्व मुस्लिम त्याच दिशेकडे तोंड करून उभे राहतात. कंबरेपर्यंत वाकतात (रुकू करतात), नतमस्तक होतात (सजदा करतात) व गुडघ्यावर बसतात (कायद्यात बसतात). संपूर्ण जगातील बहुतांश मुस्लिम दिवसातून पाच वेळा नियमितपणे नमाज अदा करतात. एकतेचे हे मनोहारी दृश्य इस्लामशिवाय इतर कोणत्याही धर्मात वा पंथात पाहायला मिळत नाही. पाचही वेळा मुस्लिमांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका पंक्तीत उभे राहून एकत्रितपणे नमाज अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तो जर एकटा असेल तर त्यास एकटे नमाज पढण्याची मुभा आहे. मात्र एकत्रितपणे एका इमामाच्या पाठीमागे शिस्तबद्धपणे उभे राहून नमाज पढण्यास अधिक प्राधान्य देण्यात येते. म्हणून दोन मुस्लिमांना नमाज अदा करावयाची असल्यास, तिला एकतेचे स्वरुप देण्याकरिता एकाने नमाजाचे नेतृत्व करावे (इमामत करावी) व दुसऱ्याने मागे उभे राहून त्याचे अनुकरण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
0 Comments