हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या कन्या ह. फातिमा (र.) यांच्या घरी गेले, पण त्यांची भेट न घेताच दरवाजातूनच परतले. कारण त्यांनी (ह. फातिमा र. यांनी) आपल्या घराच्या दरवाजावर रंगीत पडदे लावलेले होते. जेव्हा कधी प्रेषित कुठल्या प्रवासावरून परत यायचे तेव्हा ते प्रथम आपल्या कन्येची भेट घेत असत. पण त्या दिवशी प्रेषित त्यांना भेटल्याविनाच परतले होते. जेव्हा ह. अली (र.) (ह. फातिमा र. यांचे पती) घरी आले. त्यांनी फातिमा (र.) यांना दुःखद अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे कारण विचारले. ह. फातिमा यांनी प्रेषितांविषयी सांगितले की ते आपल्या घरी आले होते, पण दारातूनच परतले. हे ऐकून ह. अली (र.) प्रेषितांच्या सेवेत उपस्थित झाले आणि म्हणाले की हे प्रेषित! आपण आमच्या दारातूनच परतलात. यामुळे फातिमा (र.) फार दुःखी आहेत.
यावर प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला या दुनियेच्या वैभवाशी काय देणंघेणं. मला रंगीत पडद्यांचा काय मोह?’’
ह. अली (र.) फातिमा (र.) यांच्याकडे जाऊन प्रेषितांनी जे सांगितले ते कळवले. ह. फातिमा (र.) यांनी ह. अली (र.) यांना सांगितले की तुम्ही जा आणि प्रेषितांना विचारा, त्या पडद्यांचे मी काय करावे?
प्रेषित मुहम्मद (स.) ह. अली (र.) यांना म्हणाले, ‘‘फातिमांना सांगा ते पडदे कुणाला तरी देऊन टाका जेणेकरून ते त्यांचे वस्त्र शिवून परिधान करतील.’’ (मुसनद अहमद बिन हंबल)
ह. शफा बिन्त अब्दुल्लाह (र.) म्हणतात, ‘मी एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले त्यांनी माझी काही मदत करावी म्हणून. पण प्रेषितांनी क्षमा मागितली. मला काही दिलं नाही. नंतर मी माझ्या मुलीच्या घरी गेले. नमाजची वेळ झाली असताना देखील तिचे पती शरजील (र.) घरीच बसून होते. मी त्यांच्यावर रागावले.’ त्यावर शरजील (र.) म्हणाले. ‘मावशी तुम्ही उगाच माझ्यावर रागावत आहात. माझ्याकडे एकच वस्त्र होतं. ते प्रेषितांनी माझ्याकडून मागून घेतलं. मला परिधान करायला आता दुसरे कपडे नाहीत, म्हणून मी मशिदीत गेलो नाही.’ त्यावर ह. शफा (र.) म्हणाल्या, ‘माझे मातापिता प्रेषितांवर कुरबान. मी नाहक त्यांच्यावर रागावले. मला त्यांच्या बाबतीत माहिती नव्हती.’ शरजील (र.) म्हणतात, ‘माझ्याकडे एकच फाटलेले वस्त्र होते ज्यावर मी ठिगळ लावले होते.’ (तिर्मिजी, बहैकी)
मुस्लिमांच्या माता ह. आयेशा (र.) म्हणतात की ह. सफिया (र.) (प्रेषित मुहम्मद स. यांच्या पत्नी) ज्या अगोदर ज्यू धर्मिय होत्या. त्यांचा उंट आजारी पडला. ह. जैनब (र.) यांच्याकडे दोन उंट होते.
त्यांना प्रेषित म्हणाले, ‘‘तुम्ही आपला एक उंट सफिया यांना द्या.’’ ह. जैनब (र.) म्लणाल्या, ‘मी त्या ज्यू धर्मियास माझा उंट का देऊ?’
त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) ह. जैनब (र.) यांच्याशी तीन दिवस काहीच बोलले नाहीत. (अबू दाऊद)
0 Comments