माननीय हुजैफा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा रात्री झोपण्यासाठी पहुडतात तेव्हा आपला हात गालाच्या खाली ठेवत आणि म्हणत, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या नामाबरोबर मरतो आणि जिवंत होतो.’’ आणि जेव्हा जागे होतात तेव्हा म्हणतात, ‘‘अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करतो की त्याने आम्हाला जिवंत केले मृत्यू दिल्यानंतर आणि आम्हाला पुन्हा जीवन व्यतीत करून त्याच्यापाशी जायचे आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : जेव्हा मनुष्याच्या मनात पारलौकिक जीवनाची ‘चिंता’ घर करते तेव्हा झोपताना त्याची स्थिती अशी होते की तो अल्लाहचे नामस्मरण करतो आणि म्हणतो की अल्लाहचे नाव माझ्याबरोबर निरंतर राहावे, मरतानादेखील आणि जीवनातदेखील, झोपतानाही आणि झोपून उठल्यानंतरही. जेव्हा झोपून उठतो तेव्हा अल्लाहचे आभार व्यक्त करतो की त्याने जीवन व्यतीत करण्यासाठी आणखी मुदत दिली, जर काल माझ्या हातून एखादी चूक घडली असेल तर तशी आज माझ्या हातून चूक घडता कामा नये आणि या एक दिवसाच्या मिळालेल्या कालखंडाचा लाभ उठविला पाहिजे.
अशी अवस्था त्याची प्रत्येक दिवशी होत असते. जेव्हा झोपून उठतो तेव्हा त्याला परलोक आणि त्याचा हिशोब आठवतो की मला एक दिवस मरण येणार आहे आणि मग जिवंत होऊन हिशोबासाठी पालनकत्र्यापाशी जावे लागणार आहे. जर ही जीवनाची मुदत वाया जाऊ दिली तर कोणत्या तोंडाने त्याच्यासमोर जाईन आणि कोणते उत्तर देईन.
माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय मुआविया (रजि.) यांनी सांगितले की एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) घरातून बाहेर पडले तेव्हा पाहिले की काही लोक घोळका करून बसले आहेत. पैगंबरांनी विचारले, ‘‘साथीदारांनो! तुम्ही येथे का बसला आहात आणि काय करीत आहात?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘आम्ही येथे बसून अल्लाहचे नामस्मरण करीत आहोत, त्याने आमच्यावर केलेले उपकार स्मरण करीत आहोत, अल्लाहने आमच्याकडे आपला ‘दीन’ पाठविला आणि आमच्यावर ‘ईमान’ बाळगण्याची ईशकृपा केली आणि आम्हाला सरळमार्ग दाखविला, या उपकाराचे स्मरण करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जेव्हा एखाद्या भक्ताच्या एखाद्या अपत्याचा मृत्यू होतो तेव्हा अल्लाह आपल्या देवदूतांना विचारतो, ‘‘तुम्ही माझ्या भक्ताच्या अपत्याचे प्राण हरण केले?’’ ते म्हणतात, ‘‘होय.’’ मग तो त्यांना विचारतो, ‘‘तुम्ही त्याच्या काळजाच्या तुकड्याचे प्राण हरण केले?’’ ते म्हणतात, ‘‘होय.’’ मग तो त्यांना विचारतो, ‘‘माझ्या भक्ताने काय म्हटले?’’ ते म्हणतात, ‘‘या संकटसमयी त्याने तुझी प्रशंसा केली आणि ‘इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन’ म्हटले.’’ तेव्हा अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या या भक्ताकरिता स्वर्गात (जन्नतमध्ये) एक घर बनवा आणि त्याचे नाव ‘बैतुल-हम्द’ (कृतज्ञता व्यक्त करण्याचे घर) ठेवा. (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या धर्मनिष्ठ भक्ताने तुझी स्तुती केली म्हणजे म्हटले, ‘‘हे अल्लाह! मी तुझे आभार मानतो. माझे अपत्य हिरावल्यामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी कसलाही गैरसमज निर्माण झालेला नाही. तू जे काही करतो तो अत्याचार व अन्याय नसतो. आपली वस्तू जर कोणी घेतली तर त्याच्यावर नाराजी कसली?’’
‘‘इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन.’’ हा संयमाचा मंत्र आहे आणि मनुष्याला संयमाचे शिक्षण देतो कारण त्याचा अर्थ असा आहे की ‘‘आम्ही अल्लाहचे दास आणि भक्त आहोत. त्याच्या इच्छेनुसार जगात जीवन व्यतीत करणे आमचे काम आहे आणि आम्ही त्याच्याचकडे परतून जाणार आहोत. जर आम्ही संकटप्रसंगी संयम बाळगला तर चांगला बदला मिळेल अन्यथा वाईट बदला मिळेल. ‘जगातील प्रत्येक वस्तू नष्ट होणार आहे’ अशा विचारामुळे संकटाला सहज वाव मिळतो.
माननीय सुहैब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मोमिनची स्थितीदेखील विचित्र असते, तो ज्या स्थितीत असतो त्यातून चांगुलपणा व भलाईच प्राप्त करतो आणि हे नशीबवान मोमिनव्यतिरिक्त कोणालाही लाभत नाही. जर तो दारिद्र्य, आजारपण आणि दु:खाच्या स्थितीत असतो तेव्हा संयम बाळगतो आणि जेव्हा तो आनंदाच्या स्थितीत असतो तेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या दोन्ही स्थिती त्याच्याकरिता भलाईची सबब बनतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जे लोक तुमच्या तुलनेत धनसंपत्ती, भौतिक प्रतिष्ठेत कमी दर्जाचे आहेत त्यांच्याकडे पाहा (तेव्हा तुमच्यात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल) आणि त्याच्याकडे पाहू नका जे लोक तुमच्या तुलनेत धनसंपत्ती, भौतिक प्रतिष्ठेत उच्च दर्जाचे आहेत, जेणेकरून ज्या ईशदेणग्या तुम्हाला या वेळी लाभल्या आहेत त्या तुमच्या दृष्टीने कमी दर्जाच्या ठरू नयेत (अन्यथा अल्लाहच्या कृतघ्नतेची भावना तुमच्या मनात निर्माण होईल).’’ (हदीस : मुस्लिम)
कृतज्ञता
संबंधित पोस्ट
0 Comments