‘‘हे आमच्या पालनकर्त्या प्रभू! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. हे प्रभू आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव, जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग आणि आमच्या उणिवांकडे दुर्लक्ष कर. निःसंशय तू क्षमावंत आणि दयावंत आहेस.’’ (कुरआन २: १२७-१२८)
पितापुत्राच्या वरील प्रार्थनेवरून हेच सिध्द होते की काबागृह बांधण्याचा जो मूळ हेतु होता तो साध्य करण्यासाठी त्यांच्या वंशामधूनच तो समाज उभा राहिला जो आज्ञाधारक (मुस्लिम) होता.
येथे हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांच्या प्रार्थनेत त्यांनी विनवणी केली होती,
‘‘आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल.’’
येथे मुस्लिम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारक.
काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला आणि पत्नीला इतरत्र स्थलांतरित केले नाही. ते तेथेच स्थायिक झाले, जो वाळवंटी, ओसाड प्रदेश होता व तो निर्मनुष्य प्रदेश होता. काबागृहाजवळ त्यामुळे त्यांची जी वंशावळ जन्माला येणार होती ती सर्व ‘‘त्या एक अल्लाहचेच आज्ञाधारक असतील.’’ इब्राहीम (अ.) यनी स्वतः अल्लाहजवळ त्यावेळी प्रार्थना केली,
‘‘हे पालनकर्त्या प्रभू! मी एका निर्जल व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी.’’ (कुरआन १४: ३७)
‘‘या लोकांनी येथे नमाज कायम करावी’’ याचा अर्थ असा आहे की त्यांनी अल्लाहची सेवा (इबादत-उपासना) करावी. अल्लाहचा धर्म पाळावा आणि त्याचा प्रसार करावा. प्रार्थना श्रध्दाशीलतेचे अनिवार्य अंग आहे. म्हणून ‘‘लोकांनी नमाज कायम करावी’’ याचा अर्थच असा होतो की इस्लाम धर्म (आज्ञाधारकता) पूर्णरूपेन प्रस्थापित केला जावा. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचा (इस्लाम) एक आदर्श त्यांच्या वंशात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रस्थापित झाला याची साक्ष इतिहास देत आहे.
त्यांच्या वंशातून पुढे आज्ञाधारक समाज कसा बनणार होता? अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या पध्दती त्यांना कशा प्रकारे माहीत होणार? यासाठी त्या पितापुत्रांनी अल्लाहजवळ अशी विनवणी केली होती,
‘‘हे पालनकर्त्या प्रभू! या लोकांमध्ये ह्यांच्यातील एक प्रेषित उभा कर. जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन ह्यांचे जीवन पवित्र करील. तूच प्रभूत्वशाली न्याय करणारा आहेस.’’ (कुरआन २: १२९)
मानवी इतिहासातील या दोन प्रार्थना आहेत ज्यांचा स्वीकार अल्लाहने कालांतराने (सुमारे २००० वर्षानंतर) केला. आदरणीय मुहम्मद (स.) यांच्या रूपात ‘प्रेषित’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (सहाबी) रूपात ‘आज्ञाधारक समाज’ उभा केला. (इस्लामी राष्ट्र निर्माण केले.) हा आज्ञाधारक समाज म्हणजेच मुस्लिम समाज आणि मुस्लिम राष्ट्र होय. त्यांचे नाव मुस्लिम (आज्ञाधारक) यासाठी झाले की इब्राहीम (अ.) यांनी त्यांचा उल्लेख आपल्या प्रार्थनेत याच मुस्लिम शब्दाने केलेला होता. अशा प्रकारे इब्राहीम (अ.) यांनी मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुस्लिम हे नाव अगोदरच दिले होते. हे कुरआनच्या ‘हज्ज’ या अध्यायाने सिध्द केले आहे.
वरील विवेचनाने हे सिध्द होते की काबागृहाला इस्लामचे प्रेरणास्रोत आणि केंद्र संबोधने अगदी योग्य आहे.
0 Comments