मग सत्याचा इन्कार का?
ही अतिशय दुर्दैवाची व शरमेची बाब आहे की, ज्या जनसमूहाला अल्लाहने इतका परिपूर्ण व सर्वंकष जीवनमार्ग दिला होता आणि समता व सामाजिक एकता स्थापित करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती, तसेच इस्लामचा प्रसार करून संपूर्ण मानव समाजास एकत्रित आणण्याचे कार्य दिले होते, तोच जनसमूह त्याला सोपविलेल्या कर्तव्यांची पायमल्ली करून आपल्या एकतेला छिन्न-विच्छिन्न करण्याचे दुष्कर्म करीत आहे. जगातून उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यता, परस्पर द्वेष व तिरस्काराची तुच्छ भावना नष्ट करून पृथ्वीवरील अन्याय व अत्याचाराचे वातावरण संपुष्टात आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात आली होती. अल्लाहाच्या एकत्वाच्या सत्य मार्गाचा अवलंब करून लोकांत विश्वबंधुत्वाची भावना जागृत करावी, असे कार्य त्यांना सोपविण्यात आले होते, जेणेकरून जुलुमाऐवजी न्याय, युध्दाऐवजी शांती, द्वेष व शत्रुत्वाऐवजी हितचिंतन व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे व त्यांनीही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासारखे दयावान व कृपाळू-करुणामय सिध्द व्हावे असे अपेक्षित आहे.
‘एकेश्वरत्व’ परिपूर्ण जीवन व्यवस्थेचा पाया आहे
उपरोक्त संक्षिप्त वर्णनाने हे सिद्ध होते की, एकेश्वरत्व, प्रेषितत्व, पवित्र ग्रंथ कुरआन व मरणोत्तर जीवन या ईशदत्त तत्त्वांच्या आधारे, जगातील लोकांना देश, समाज, वंश, वर्ण, भाषा इत्यादी बाबींनी निर्माण होणारे भेदभाव विसरून, एक जागतिक समाज निर्माण करता येतो. इस्लामने ईशआराधनेच्या ज्या पध्दती प्रदान केल्या आहेत, त्यांचा स्वीकार केल्यास समाजात निश्चितच एकतेचे वातावरण निर्माण होते. अल्लाहने अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) व अंतिम ग्रंथ कुरआनद्वारे सर्व मानव समाजाला अशी परिपूर्ण जीवन व्यवस्था प्रदान केली आहे की, मानवाला कोणत्याही काळात व कोणत्याही स्थळी आपल्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी इतरत्र कोणतेच मार्गदर्शन प्राप्त करण्याची निश्चितच गरज भासणार नाही.
संबंधित पोस्ट
0 Comments