माननीय सौदा (रजि.) कुरैशच्या (कबिल्यातील) घराण्यातील होत्या. त्यांच्या आईचे नाव समूस बिन्ते कैस होते त्या अन्सार (मदीनावासी) च्या बनू नज्जार या खानदानातील होत्या. माननीय सौदा (रजि.) यांचे पहिले लग्न त्यांचे चुलतभाऊ माननीय सकरान बिन अमरौ (रजि.)यांच्याशी झाले होते.
अल्लाहने सौदा (रजि.) यांना चांगल्या गुणधर्मांनी युक्त केले होते. जेव्हा पैगंबरानी इस्लामचा प्रचार सुरू केला, तेव्हा त्यांनी `लब्बैक’ म्हणून त्याचा स्वीकार केला. त्यांच्या पतीनेही त्याचा स्वीकार केला. हबशाच्या (अबीसीनीया) दुसऱ्या देशांतरात (स्थलांतर) सौदा (रजि.) व त्यांचे पती ही सामील होते. अनेक वर्षे तेथे राहून मक्का येथे परत आले. काही काळानंतर सकरान (रजि.) यांचा मृत्यु झाला. सौदा (रजि.) विधवा झाल्या.
या सुमारासच माननीय खदीजा (रजि.) यांचे निधन झाले होते. मातृविहीन चार मुलींना पाहून पैगंबर (स.) फार दु:खी होत असत. खुला (रजि.) नामक एक सहाबीया यांनी पैगंबरांना विनंती केली, “हे पैगंबर (स.)! खुदीजा (रजि.) च्या निधनानंतर आपण नेहमी दु:खी दिसता.” “होय” पैगंबर म्हणाले, “घराची व्यवस्था आणि मुलींची देखभाल त्या करीत असत.” खुला (रजि.) म्हणाली, “आपल्याला एका पत्नीची गरज आहे. मी यासाठी प्रयत्न करू का?” त्यांची परवानगी घेऊन माननीय सौदा (रजि.) जवळ तिने निकाहचा प्रस्ताव पाठविला. सौदा (रजि.) व त्यांच्या पित्याने तो मान्य केला व ४०० दिरहम (महर) देऊन पित्याने सौदा (रजि.) यांचा विवाह पैगंबरांशी लाऊन दिला. सौदा (रजि.)चा भाऊ जो मुसलमान नव्हता, त्याला हे कळल्यावर त्याने फार शोक केला. काही काळानंतर तो मुस्लिम झाला व आपल्या वागणुकीचा त्याला शेवटपर्यंत पश्चात्ताप होत राहिला. पैगंबरांना पैगंबरी मिळाल्यावर दहा वर्षांनी हा विवाह झाला.
सकरान (रजि.) यांच्या घरी नांदत असताना माननीय सौदा (रजि.) यांना एक स्वप्न पडले की त्या उशी घेऊन पहुडल्या असताना एकाएकी आकाश फाटले व चंद्र त्यांच्या अंगावर कोसळला. त्यांनी हे स्वप्न आपले पती सकरान (रजि.) यांना सांगितले. त्यांनी स्वप्नफल सांगितले, “मला लवकरच मृत्यु येईल व तुम्ही अरबचे चंद्र पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी बनाल.” आणि खरोखरच तसे घडले.
पडदा पद्धतीचे मार्गदर्शन येण्याअगोदर माननीय उमर (रजि.) यांचे म्हणणे होते की पैगंबरांच्या घरातील स्त्रियांनी बाहेर येऊ नये. माननीय सौदा (रजि.) त्या काळात घराबाहेर प्रातर्विधी इ. साठी जात असत. एके दिवशी त्या जंगलाकडे यासाठीच जात असताना रस्त्यात माननीय उमर (रजि.) यांनी त्यांना पाहिले. त्यांच्या मजबूत देहयष्टीमुळे त्यांना ओळखून उमर (रजि.) म्हणाले, “हे सौदा (रजि.) मी तुला ओळखले आहे.” ऐवूâन त्यांना वाईट वाटले. त्यांनी पैगंबरांना जाऊन सांगितले. परंतु ते गप्प राहिले. त्यानंतर पडदासाठी दिव्य आयत अवतरली व स्त्रियांवर पडदा लागू झाला.
सौदा (रजि.) स्वभावाने कडक परंतु हास्यविनोदात रमणाऱ्या होत्या. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांच्यावर अत्यंत खूश होते. त्या अत्यंत दयाळू आणि दानशूर होत्या. गरजूंना त्या नेहमी दानधर्म करीत असत. त्या कलाकुसरीतही प्रविण होत्या. कातडी कमावण्याचे काम करीत व त्यापासून जी प्राप्ती होई ती गरीबांमध्ये वाटून टाकीत. माननीय उमर (रजि.) यांनी दिरहम भरलेली थैली त्यांच्याकडे पाठविली तेव्हा त्यांनी त्या दिरहमाचे गरीबांना दान दिले. त्यांच्यात ते वाटून टाकले. माननीय आएशा (रजि.) म्हणतात, “पैगंबरा (स.) समवेत राहण्याचे वेड असलेली दुसरी स्त्री मी पाहिली नाही. माझा आत्मा जर त्यांच्या शरीरात असता तर किती बरे झाले असते.”
भाग ४
माननीय सौदा (रजि.) १० हिजरीमध्ये पैगंबरासमवेत हजला गेल्या. लठ्ठपणामुळे त्यांना भरभर चालता येत नव्हते. म्हणून पैगंबर (स.) यांनी त्यांना मुज्दल्फाकडे आधीच रवाना केले… `हज्जतुल विदा’ च्या वेळी पैगंबरांनी आपल्या पत्नींना सांगितले, “या हजनंतर तुम्ही घरीच राहा.” त्यांच्या निधनानंतर त्यांची कोणतीही पत्नी घराबाहेर पडली नही. सौदा (रजि.) म्हणत, “मी हज आणि उमरा दोन्हीही केलेले आहेत. आता मी त्यासाठी बाहेर पडणार नाही.” माननीय सौदा (रजि.) यांचे निधन २२ हिजरीमध्ये झाले. माननीय सकरान (रजि.) या पहिल्या पतीपासून त्यांना अब्दुलरहमान (रजि.) नावाचा मुलगा होता; जो माननीय उमर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या काळात जलूला येथील युद्धात मारला गेला. पैगंबरांपासून सौदा (रजि.) यांना मुलबाळ वगैरे झाले नाही.
0 Comments