Home A blog A सामाजिक सौहार्दाचे सुवर्णपर्व रमजान!

सामाजिक सौहार्दाचे सुवर्णपर्व रमजान!

दिवाळी हा भारतीय उपखंडात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण. अगदी दिवाळी एवढेच महत्त्व मुस्लिम बांधव रमजानला देतात. पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वीपासूनच  सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. रमजान हे हिजरी कालगणनेतील नवव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे स्थान अगदी तसेच  रमजानला हिजरी कालगणनेत महत्त्व दिले गेले आहे. हिजरी कालगणना संपूर्णत: चांद्रभ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून हिजरीतील महिना हा चंद्रदर्शनावर बदलत असतो. चंद्रदर्शनानेच  रमजानची सुरवात होते. ‘चांद नजर आ गया…’ असं म्हणत प्रत्येक जण एकमेकाला शुभेच्छा देतो. इस्लामचे कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे पाच प्रमुख घटक (अरकान)  आहेत. कलमा हा महामंत्र जपाप्रमाणे सदोदित म्हणत राहिले पाहिजे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली पाहिजे, तर वर्षातून एक महिना उपवास (रोजा) ठेवायला हवे. आर्थिक  सक्षम व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा हज करावा तर ज्याची आर्थिक संपत्ती चांगली आहे त्याने गरजवंताला वेळोवेळी दान देत राहिलं पाहिजे. असे या अरकानांचे महत्त्व सांगितले  आहे.
दररोज पाचवेळा नमाज अदा करण्याचा इस्लाममध्ये आदेश आहे. रात्रीची  नमाज ‘इशा’ म्हणून ओळखली जाते. या इशाच्या नमाजसोबत रमजान महिन्यात जास्तीची २० रकात नमाज  अदा करावी लागते. तिला तरावीह असे म्हणतात. या नमाजमध्ये इमाम (नमाजचे नेतृत्व करणारा) कुरआनच्या श्लोकांचे (सूरहचे) सलग पठण करतात. अशा प्रकारे प्रत्येक  मुस्लिमाच्या कानावर वर्षातून किमान एक वेळा कुरआनचा पवित्र संदेश पडत असतो. प्रत्येक मस्जिदीमध्ये तरावीहच्या नमाजची विशेष व्यवस्था केली जाते.
‘रोजा’ हा रमजानचा आत्मा होय. रोजा म्हणजे उपवास असा ठळक अर्थ आपल्याला घेता यईल. पण उपवास एवढा मर्यादित अर्थ रोजाचा नाही. जो कोणी रोजा म्हणजे फक्त उपवास  असा मोघम अर्थ घेऊन रोजा ठेवत असेल त्याला अल्लाह फक्त ‘फाका’ (उपाशी राहणे) मानेल. रोजा ही एक जीवनपध्दती आहे. ती एक आचारसंहिता आहे. रमजान एक प्रशिक्षण  आहे. जगावे कसे? वागावे कसे? सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे असावे? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे रमजान. माणूस जीवन जगत असताना बराच वेळा बिनधास्त  होऊन जगत असतो. या बिनधास्त जगण्याला वेसण घालणे म्हणजे रमजान होय. देशाचा सैनिक जसा अतिशय कठीण प्रशिक्षणातून स्वत:ला सिध्द करीत असतो अगदी तसेच  इस्लामचे आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती या वार्षिक प्रशिक्षणातून तावून सुखावून निघावा आणि एक चांगला माणूस म्हणून त्याने जीवन जगावे अशी यामागे धारणा आहे.
रोजा धारण करणे म्हणजे त्या दिवसापुरती एक आचारसंहिता स्वीकारणे होय. त्यासाठी भल्या पहाटे उठून न्याहरी करावी लागते. त्याला सेहरी म्हणतात. सेहरीचा थेट संबंध सूर्योदयाशी  असतो. सुर्योदयापूर्वी काही काळ आधी सेहरी समाप्त करावी लागते. सेहरी संपली की सूर्यास्तापर्यंत खाणेपिणे बंद असते. दिवसभर रोजा ठेवणाऱ्यांना केवळ खाणेपिणे थांबविणे एवढेच  नव्हे तर आपल्या आचरणात मूलभूत बदल करावे लागतात. जसे वाईट पाहू नये, वाईट बोलू नये, वाईट करु नये. शिव्या देऊ नये. भांडण करु नये. एकमेकांची चुगली करु नये. चुकीचे, फसवणुकीचे व्यवहार करु नये. सत्कृत्य मात्र जरुर करावे असे सांगणारी आचारसंहिता म्हणजे रोजा होय. रोजाच्या शेवट ‘इफ्तार’ने होतो. इफ्तार सूर्यास्तानंतर लगेचच करावा  लागतो. या वेळी खजूर खाऊन उपवासाचे पारणे करतात. सायंकाळची म्हणजेच मगरिबची नमाज अदा करुन अन्न सेवन करता येते.
या वर्षीचे रोजे हे परीक्षा पाहणारेच आहेत. सर्वाधिक काळ अन्न व पाण्याविना या वेळी रोजेदारांना राहावे लागणार आहे. यावर्षी तब्बल पावणे पंधरा तास उपवासात राहावे लागले. दर  वेळी १३ ते १४ तास उपवासाचा काळ असतो. या वर्षी रमाजान महिना मे आणि जून महिन्यात वाटला गेला आहे. २१ जून या वर्षातल्या सर्वात मोठ्या दिवसाच्या पूर्वी रमजान महिना  आल्याने रोजे तब्बल १४ तास ४५ मिनिट एवढ्या दीर्घकाळ चालत आहेत. त्यातल्या त्यात या वर्षीचा कमी पाऊस, वाढलेली गर्मी, तापते ऊन यामुळे या वर्षीचा रमजान खऱ्या अर्थाने  परीक्षा घेणाराच ठरला आहे. १४ तास ४५ मिनिटे हा उपवासाचा कालावधी ही एक दोन दिवस नव्हे तर तब्बल १९ दिवसपर्यंत कायम असणार आहे. ७ मे ते ५ जूनपर्यत दीर्घ रोजे सुरु  राहतील. यापूर्वी १९७९ साली असे दीर्घ रोजे आले होते. ४० वर्षांपूर्वी आलेले जून महिन्याचे रोजे पुढील वर्षीही एप्रिल आणि मे महिन्यात येतील. दरवर्षी रमजान गेल्या वर्षीच्या १०   दिवस आधी येतो. अशा प्रकारे १० दिवसाने रमजान मास दरवर्षी मागे सरकतो. त्यामुळे कुण्या एका विशिष्ट ऋतुपुरता मर्यादित न राहता रमजान वर्षाच्या प्रत्येक महिन्यात, प्रत्येक  ऋतुत अनुभवता येतो. जसा तो सध्या उन्हाळ्यात येतो आहे तसा तो पुढे काही वर्षांनी थंडीतसुध्दा असेल आणि त्याही पुढे काही वर्षांनी तो पावसाळ्यात पण यईल. ३५ ते ४०  वर्षांनी  रमजानचे हे चक्र पूर्ण होते. प्रत्येक महिन्यात आणि प्रत्येक ऋतुत रमजानचे असे फिरणे हे त्याचे अद्वितीय असे वैशिष्ट्य होय.
रमजानमधील सर्वांत महत्त्वाची आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण शिकविणारी गोष्ट म्हणजे जकात होय. जकात म्हणजे ‘टॅक्स’. तुम्हाला समाजात जगायचे असेल तर  समाजातील बऱ्यावाईट प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल अशी शिकवण रमजान देतो. समाजातील प्रत्येक लहानमोठा घटक समजासाठी महत्त्वाचा असून समाजातील  लहानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी समाजातील मोठ्यांची असते असा स्पष्ट आदेश कुरआनात आहे. येथे लहान, मोठे हे शब्द आर्थिक स्थिती दर्शविणारे आहेत. म्हणजेच समाजातील गरीबांचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी अल्लाहने श्रीमंतावर टाकली आहे. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २.५ टक्के जकात काढण्याचा  स्पष्ट आदेश कुरआनात आहे. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करुन शिल्लक असलेल्या सोने, चांदी, रुपये वा इतर मालमत्तेवर अडीच टक्के जकात लावली जाते. ही जकात कपडे,  अन्नधान्य, रुपये वा खाण्यापिण्याच्या वस्तू या रुपात वाटता येते. किंबहुना ती वाटावीच लागते. आपल्यापेक्षा गरीब नातेवाईक, शेजारी वा गरजवंताला अशी जकात वाटप केली जाते.  जकात ज्याला दिली जाते त्याचा धर्म, लिंग, जात असा कोणताही भेद न मानता गरजवंताला ती दिली जाते.
अशा प्रकारे खऱ्या अर्थाने सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचे कार्य पवित्र रमजान करीत असतो. रमजान ईदने या पवित्र पर्वाचा शेवट होतो. हा गोड शेवटच परत पुढील रमजानसाठी  लोकांना तयार करीत असतो. शिरखुर्मा हा विशेष पदार्थ या वेळी बनविला जातो. तसेच रमजान महिन्यात इफ्तार तसेच सेहरीचे आयोजन अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या केले जाते.  चला, आपणही अशाच इफ्तार किंवा सेहरीत सहभागी होवू या. त्या निमित्ताने आपल्या मुस्लिम मित्राकडून रमजान व इस्लाम समजून घेऊ या…!

– आमीन चौहान
यवतमाळ, ९४२३४०९६०६

संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *