माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.
एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उंटाच्या पाठीवरील जुन्या लाकडी हौद्यावर फाटलेल्या चादरीसह हजयात्रा केली होती. त्या जुन्या लाकडी हौद्याची किंमत चार दिरहम किंवा त्यापेक्षा कमी होती.
स्पष्टीकरण
ज्या प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना साधी राहणीची शिकवण दिली त्याचप्रमाणे पैगंबरांनी स्वत:सुद्धा साध्या रहाणीचा अंगीकार केला होता. त्यांनी भौतिक थाटमाटाकडे दुर्लक्ष केले होते. पैगंबरांची ही साधी राहणी त्या वेळची आहे जेव्हा पूर्ण अरब इस्लामच्या अधिनस्त झाला होता. ही घटना हिजरी सन १० ची आहे. पैगंबरांनी इच्छिले असते तर स्वत:साठी फार काही सुखसुविधा आणि थाटमाटाला हस्तगत केले असते.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) एका चटईवर झोपले आणि जेव्हा ते झोपेतून जागे होऊन उठून बसले तेव्हा त्यांच्या शरीरावर चटईचे वण पडलेले होते. यावर आम्ही पैगंबरांना विनंती केली की त्यांच्यासाठी एक बिछाना बनवून देऊ का?
त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘मला या जगाशी काहीही देणे घेणे नाही. मी या जगात तर त्या प्रवाशासमान आहे जो एखाद्या झाडाच्या सावलीत अल्पकाळ विसावतो. नंतर त्यास सोडून आपल्या गंतव्याकडे प्रस्थान करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत:च्या व्यवहारनीतीद्वारा सिद्ध केले की हे जग यासाठी नाही की कोणी एखाद्याने जगाच्या मोहात पडून जगावे आणि मरून पडावे. हे जग तर एक मार्ग व साधन आहे आणि त्यासच गंतव्य व साध्य समजण्याची घोडचूक कधीही करू नये.
येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की चटई (गोणपाट) वर झोपण्याची ही घटना त्या काळातील आहे जेव्हा इस्लाम सत्तेत होता.
ही एक वस्तुस्थिती आहे की या जगाशी जो कोणी प्रेम करील तेव्हा पारलौकिक जीवनाचे महत्त्व व त्याचे मूल्य त्याच्या नजरेत शिल्लक राहू शकत नाही. म्हणून मनुष्याची नजर सतत पारलौकिक जीवनाकडे असली पाहिजे. या जगात स्वत:चे दायित्व निर्वाहण करण्याचीच चिंता लागून असली पाहिजे.
0 Comments