Home A प्रेषित A सर्व प्रेषित हे मानव होते

सर्व प्रेषित हे मानव होते

अल्लाहने नेहमीच मानवाच्या मार्गदर्शनासाठी मानवाचीच नियुक्ती केलेली आहे. हे प्रेषित दूत नव्हते की जिन्न (पवित्रयोनि) नव्हते. असेही कधी घडले नाही की या कार्यासाठी अल्लाहने मानवी रूप धारण केले अथवा इतर रूप धारण केले. जेव्हा जेव्हा या भूतलावर प्रेषित पाठविले गेले ते सर्व मानव होते. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे,
‘‘हे पैगम्बर (स) तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठविले होते, ते सर्व देखील माणसेच होते, आणि जे याच वस्त्यांच्या निर्वासितांपैकी होते आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य-प्रकटन पाठवित राहिलो होतो.’’ (कुरआन १२: १०९)
कुरआन धर्मांच्या आणि राष्ट्रांच्या घटनांचा उल्लेख करून स्पष्ट करतो की अल्लाहच्या प्रेषितांवर त्यांच्या विरोधकांनी अविश्वास ठेवला होता तो यामुळे की ते (प्रेषित) त्यांच्यासारखे होते. ते प्रश्न विचारीत की आमच्यासारखा मनुष्य प्रेषित कसा बरे बनू शकेल? कुरआनोक्ती आहे,
‘‘त्यांच्या पैगम्बरांनी त्यांना सांगितले, ‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्या सारखे मानव.’’ परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला उफत करतो, आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादे प्रमाण आणून द्यावे.’’ (कुरआन १४: ११-१२)
म्हणून हे खरे आहे की प्रेषित मानवातूनच अल्लाहने वेळोवेळी नियुक्त केले आहेत. आपल्यासारखे त्यांना शरीर होते, मने होती, इच्छा आकांक्षा होत्या. त्यांना बायका आणि मुले होती. त्यांचा जन्म आपणासारखाच झाला आणि संगोपण नैसर्गिकरित्या झाले. ते खात आणि पित होते. झोपत आणि जागे होत असत. हसत आणि रडत असत. आपल्यासारखेच सुखी आणि दुःखी बनत असत. त्यांना मृत्यू आपल्यासारखाच येत असे. थोडक्यात ते सर्व प्रेषित मानव होते आणि त्यांच्यात मानवाची ती सर्व गुणवैशिष्ट्ये होती. या सत्यतेला कुरआन स्पष्ट करीत आहे,
‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्या सारखे’’ (कुरआन १४ :११)
इतर अनेक ठिकाणी कुरआन या सत्यतेला स्पष्ट करीत आहे,
‘‘हे पैगम्बर (स) तुमच्यापूर्वीजे कोणतेही पैगम्बर आम्ही पाठविले होते, ते सर्व ही अन्न खाणारे आणि बाजारात हिडणारे, फिरणारे लोकच होते.’’ (कुरआन २५: २०)
एके ठिकाणी कुरआन या सत्यतेला आणखी स्पष्ट करून देत आहे,
‘‘तुमच्या पूर्वीदेखील आम्ही अनेक पैगंबर पाठविले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी व मुलेबाळे असलेलेच बनविले होते. आणि कोणत्याही पैगंबराचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादा संकेत त्याने स्वतःच आणून दाखविला असता.’’ (कुरआन १३: ३८)
अल्लाहने मानवालाच प्रेषित म्हणून का नियुक्त केले, याचे सविस्तर कारण आणि खुलासा कुरआन देत आहे. जे लोक आदरणीय मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वास विरोध करीत होते ते लोक आपल्या विरोधाच्या समर्थनार्थ सांगत की अल्लाहला जर प्रेषित आमच्यासाठी पाठवायचा होता तर त्याने दूत पाठविला असता, आमच्यासारखा मनुष्य पाठविला नसता. या लोकांच्या विरोधाला खोडून काढताना कुरआन स्पष्ट करतो,
‘‘यांना सांगा, जर पृथ्वीवर ईशदूत समाधानाने वावरू लागले असते, तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या ईशदूतालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठविले असते.’’ (कुरआन १७: ९५)
वरील संकेतवचन प्रेषित्वाच्या दैवी आदेशित नियमांना प्रदर्शित करीत आहे. म्हणजे प्रेषित हा ज्यांच्यासाठी पाठविला गेला तो त्यांच्यापैकीच (सजातीय) असतो. हे अगदी साधे वाक्य आहे, परंतु विद्वतापूर्ण आहे. ही विद्वता सत्यता पटवून देत आहे. प्रेषितांची नियुक्ती मनुष्यातून केली गेली नसती तर प्रेषित्वाच्या उद्देशालाच तडा गेला असता. हे निर्विवादित सत्य आहे की समस्त मानवांसाठी प्रेषित हे अल्लाहचे संदेशवाहक होते. परंतु याचा असा मुळीच अर्थ नाही की ते पोस्टमनसारखे होते ज्याचे काम फक्त संदेश पोहचविणे आहे. प्रेषित संदेशवाहक होते परंतु ते प्रचारक, शिक्षक, मार्गदर्शक आणि समजविणारे होते, सावध करणारे होते. त्यांनी समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न, काबाडकष्ट केले. त्यांनी ईशसंदेश आपल्या जीवनव्यवहारात आत्मसात करून लोकांपुढे आदर्श ठेवला आहे. प्रेषित हा प्रथम मानव आहे, ज्याने दिव्य प्रकटनाद्वारे मिळालेले आदेश आणि मार्गदर्शनानुसार आपले जीवन कंठीले जे अनुकरणीय आहे. प्रेषिताच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे की, त्याने सर्वांसाठी आदर्श बनावे. जोपर्यंत तो आपले सर्व जीवनकार्य तडीस नेत नाही तोपर्यत प्रेषितांची ही शृंखला परिपूर्ण होतच नाही. प्रेषिताव्यतिरिक्त इतरांना हे मदतकार्य पार पाडणे शक्य आहे का? निश्चितच उत्तर नकारार्थीच आहे. एखाद्याला अंशतः हे महतकार्य पार पाडणे शक्य होईल, परंतु प्रेषितकार्य पूर्णपणे कोणी इतर पार पाडूच शकत नाही. आपण दूतांचे उदाहरण घेऊ या. ते सर्वप्रथम या कामासाठी आपण अपेक्षित धरू या. दूतांना मानवांमध्ये प्रेषित म्हणून पाठविले असते तर स्थिती काय असती? दूतांनी अल्लाहचे संदेश (दिव्य प्रकटन) मनुष्यापर्यंत जरूर पोहचवले असते. परंतु दूत म्हणून त्यांनी इच्छा-आकांक्षा, भावना इ.बद्दलचे ईशादेश कसे पाळले असते? माणसाच्या विशिष्ट प्रश्नाबद्दलचे आदेश दूतांनी कसे व्यवहारात आणले असते? दूत दिव्य प्रकटनाचा बहुतांश भाग जर अंगिकारात नसेल तर त्यांच्याकरवी अनुकरणीय असे आदर्श स्थापित होऊच शकत नाही. दूतांना मनुष्याच्या इच्छा आणि भावनांबद्दल अज्ञान असल्याने ते मानवांना मार्गदर्शन करुच शकत नाहीत. मानवांच्या समस्या सोडविणे दूतांच्या कक्षेबाहेरील कार्य आहे. दूत मनुष्यापुढे आदर्श दैवी जीवनप्रणाली ठेवू शकतच नाही. मनुषत्वाबद्दलचे अज्ञान त्यांना त्यांच्या प्रेषितकार्यात मोठा अडथळा असल्याने मनुष्याचे चारित्र्य घडणकार्य अशक्य आहे.
दिव्य कुरआननुसार प्रत्येक प्रेषित हा त्या त्या लोक समुदायांमधून नियुक्त केला गेला होता. त्याचप्रमाणे दिव्य प्रकटनसुध्दा त्याच स्थानिक भाषेत अवतरित होत होते.
कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आम्ही आपला संदेश देण्यासाठी जेव्हा कधी एखादा प्रेषित पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे. मग अल्लाह ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो, तो प्रभुत्वसंपन्न व बुध्दिमान आहे.’’ (कुरआन १४: ४)
दिव्य प्रकटन अशा प्रकारे स्थानिक भाषेत अवतरित करून त्यांना (लोकांना) स्पष्ट करून सांगण्याची गरज मनुष्यच भागवू शकतो, दूत नाही.
‘‘त्याने (प्रेषिताने) त्यांना (लोकांना) चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे (दिव्यप्रकटन) मांडावेत.’’ (कुरआन १४: ४)
वरील कुरआन संकेत स्पष्ट आहे की प्रेषितकार्यासाठी मानवातूनच एक मनुष्य नियुक्त करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे ईशसंदेश अगदी स्पष्टपणे त्यांच्याच भाषेत मांडला जाण्यासाठी अल्लाहने परिपूर्ण अशी व्यवस्था केली होती. ईशसंदेश समजण्यासाठीचे जे अडथळे होते त्यांना दूर करण्यासाठी अतिमहत्त्व देण्यात आले होते. म्हणून प्रेषित ज्या ठिकाणी नियुक्त केला अल्लाहने त्या लोकातूनच नियुक्त केला. म्हणूनच प्रेषित हे मनुष्यच असणे अत्यावश्यक होते हे वरील विवेचनावरून अगदी स्पष्ट होते.
प्रेषित्वाचे स्वरूप: प्रेषित्व हे काही असे काम नव्हे की ते मेहनतीने प्राप्त केले जावे. प्रेषितांची नियुक्ती अल्लाह करत असे आणि प्रेषित्व ही अल्लाहची खास कृपा आहे. अल्लाह प्रेषित त्यांनाच नियुक्त करीत ज्यांना तो या कार्यासाठी निवडत असे. मनुष्याची इच्छा अथवा त्याचे परिश्रम या कामी म्हणजे प्रेषित्व प्राप्तीसाठी कुचकामी आहेत. अल्लाह स्वतः या महान कार्यासाठी एखाद्याची नियुक्ती करीत असे. कुरआनच्या पारिभाषिक शब्दावलीत यास ‘‘इस्तफा’’ असे संबोधले गेले आहे. म्हणजे अनेकातून एक उत्तम माणसाची निवड करणे होय. या शब्दाने अभिप्रेत अशी व्यक्ती ज्यास प्रेषित म्हणून निवडले गेले ती व्यक्ती या दिव्य कामासाठी अतियोग्य आहे. प्रेषित नियुक्त करण्याची ही पध्दत तार्किकदृष्ट्यासुध्दा योग्य आहे आणि महत्त्वाची आहे. कुरआन यास अनेक वेळा स्पष्ट करून सांगत आहे. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वावर आक्षेप घेण्यात आले आणि इतरांनीसुध्दा तसा दावा केला तेव्हा अल्लाहने स्पष्ट केले,
‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणून आहे की दिव्य प्रकटन कोणावर अवतरित करावे.’’ (कुरआन ६: १२५)
प्रेषित्व हे शिकून आणि कष्ट करून आत्मसात करता येणे अशक्य आहे किबहुना त्याचे खरे महत्त्व आपल्या दृष्टीपलीकडील गोष्ट आहे.
कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात सांगा, ‘‘हा आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना अल्पज्ञान मिळाले आहे.’’ आणि हे पैगंबर (स) आम्ही इच्छिले तर ते सर्वकाही तुमच्याकडून हिरावून घेऊ जे आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनाद्वारे प्रदान केले आहे. मग आमच्याविरुध्द तुम्हाला कोणी समर्थक मिळणार नाही, जे ते परत मिळवून देऊ शकेल. हे तर जे काही तुम्हाला प्राप्त झाले आहे तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने मिळाले आहे, वस्तुस्थिती अशी आहे की त्याची कृपा तुम्हावर फार मोठी आहे. सांगून टाका की मानव आणि जिन्न (अदृश्य निर्मिती) सर्वच्या सर्वजनांनी मिळून जरी या कुरआनसारखी एखादी वस्तू आणण्याचा प्रयत्न केला तरी आणू शकणार नाही, मग ते सर्व एकदुसऱ्याचे सहायक का असेनात.’’ (कुरआन १७: ८५-८८)
मनुष्याची बुध्दी आणि आकलनशक्ती अगदी मर्यादित आहे. मनुष्य आत्मा आणि त्याचे स्वरुप जाणून घेण्यास असमर्थ आहे. आत्मा जाणून घेण्याची असमर्थता हीच खरी प्रेषित्वाला जाणून घेण्याची असमर्थता आहे. खरे तर प्रेषित्वाचा हा गाभा आहे ज्याला ते प्राप्त झाले तोच प्रेषित होतो.
प्रेषित्वाचे वैश्विक स्वरूप
प्रेषित प्रत्येक लोकसमूहात पाठविले गेले आहेत. याविषयी कुरआन सविस्तरपणे माहिती करून देत आहे,
‘‘परंतु (हे पैगंबर (स)), तुम्ही लोकांना ऐकवू शकत नाही जे कबरीत दफन आहेत. तुम्ही तर केवळ एक सावध करणारे आहात. आम्ही तुम्हाला सत्यानिशी पाठविले आहे. शुभवार्ता देणारा व सावधान करणारा बनवून. आणि कोणताही लोकसमुदाय असा होऊन गेला नाही ज्यात सावध करणारा आला नाही. आता जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवित असतील, तर यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीदेखील खोटे लेखले आहे. त्यांच्या पाशी त्यांचे पैगंबर, स्पष्ट प्रमाण, संदेश आणि उज्वल आदेश करणारा ग्रंथ घेऊन आले होते. मग ज्या लोकांनी मान्य केले नाही. त्यांना मी पकडले आणि पाहून घ्या माझी शिक्षा किती कठोर होती.’’ (कुरआन ३५: २३-२६)
कोणताही लोक समुदाय (राष्ट्र) या पृथ्वीवर असा नाही जिथे लोकांना सावध करणारा आला नाही. याचे एकमेव कारण हे आहे की पृथ्वीवरील सगळी माणसे एकसारखी आहेत. ते सर्व एका हेतुपोटी निर्माण केले गेले. अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे हा प्रत्येकाचा उद्देश आहे. परलोकात याविषयी प्रत्येकाला विचारणा होणारच आहे. अशी जर परिस्थिती आहे, तर मग अल्लाहने काहींना जबाबदाऱ्यांचे स्मरण करून द्यावे आणि इतरांना दुर्लक्षित करावे हे कसे शक्य आहे? काहींना अल्लाहने आपले मार्गदर्शन द्यावे आणि इतरांना त्यापासून वंचित ठेवावे हे कसे शक्य आहे? हे अशक्य आहे. कारण अल्लाह सर्वांचा आणि या सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आणि शासक आहे. त्याची दया सर्वांसाठी सारखी आहे आणि त्याचा न्याय खरा न्याय आहे.
येथे हे स्पष्ट लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित प्रत्येक लोक समुहात-राष्ट्रात पाठविले गेले आहेत, याचा अर्थ ते (प्रेषित) राष्ट्राच्या एका विशिष्ट पिढीदरम्यान पाठविले गेले होते.
संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *