Home A blog A समाजसेवा हेच इस्लामचे मुलभूत तत्व

समाजसेवा हेच इस्लामचे मुलभूत तत्व

सदाचार हा नव्हे कि तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे की जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान धारण करतात तसेच सर्व (ईश)दूतांवर, सर्व (ईश) ग्रंथ आणि सर्व प्रेषितांवर ईमान ठेवतात. ईश्वरी प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती, आपले नातेवाईक, अनाथ, गरजवंत, प्रवासी व याचक तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी, संकटे आणि युद्धप्रसंगी देखील संयम राखतात हेच लोक सत्यशील आणि अल्लाहचे भय बाळगणारे आहेत.”(संदर्भ : कुरआन सुरह अलबकरा आयत नं. 177)
मित्रांनों! इस्लाममध्ये सर्वात अधिक महत्व समाजसेवेला देण्यात आलेले आहे. वर नमूद आयतींमधील अधोरेखित केलेला मजकूर आपण काळजीपूर्वक वाचला तर आपल्या मनामध्ये नक्कीच एक जाणीव निर्माण होईल की, अत्यंत कष्टाने कमावलेली आणि आपल्याला सर्वात प्रिय असलेली संपत्ती आपले गरीब नातेवाईक, अनाथ लोक, गरजवंत प्रवासी, गुलामांवर तसेच जकात देण्यामध्ये खर्च करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. मूळात इस्लामचा उद्देशच माणसामध्ये ही जाणीव निर्माण करणे आहे की, आपल्या सारख्याच इतर गरजवंत माणसांची आपण सेवा करावी, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्याला संपत्तीपेक्षा माणुसकी महत्त्वाची वाटेल. 
समाज सेवेला उर्दूमध्ये खिदमत-ए-खल्क असे म्हणतात. साधारणपणे लोक खिदमत-ए-खल्क म्हणजे लोकसेवा असे समजतात. मात्र इस्लाममध्ये खिदमत-ए-खल्कचा अर्थ एवढा मर्यादित नाही. खिदमत म्हणजे सेवा आणि खल्क याचा अर्थ फक्त जनता एवढाच मर्यादित नसून त्यात सर्वप्रकारचे जीव, जंतू, वनस्पती ह्या सुद्धा येतात. या अर्थाने खिदमत-ए-खल्क म्हणजे या सर्वांची सेवा. यात समाजसेवा, प्राणिमात्रांवर दया, पर्यावरणाचे रक्षण इत्यादी गोष्टी येतात. इस्लाममध्ये एवढ्या व्यापक अर्थाने खिदमत-ए-खल्क हा शब्द वापरला जातो. मात्र सध्याच्या चंगळवादी जीवन व्यवस्थेच्या नादी लागून मुस्लिमांना खिदमत-ए-खल्कचा विसर पडलेला आहे. हा फक्त अकीदा (श्रद्धा) नाही तर प्रत्यक्षात करण्याचे काम आहे. आजकाल मुस्लिम समाजामध्ये इबादतींवर भरपूर जोर दिला जातो. प्रत्यक्षातही मोठ्या प्रमाणात इबादती केल्या जातात. (उर्वरित पान 7 वर )
मात्र तेवढ्याच मोठ्या प्रमाणात खिदमत-ए-खल्क करण्याचा विचारही आपल्या मनात येत नाही. खिदमत-ए-खल्क बद्दल जे गांभीर्य असायला हवे तेच मुळात मुस्लिम समाजामध्ये दिसून येत नाही. 
आपण इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनावर आणि मक्कामध्ये अवतरित झालेल्या आयतींवर काळजीपूर्वक लक्ष दिले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, इस्लाममध्ये सुरूवातीला इमान (श्रद्धे) च्या तीन महत्वपूर्ण संकल्पना मांडण्यात आल्या. पहिली – वहेदत (एका ईश्वराला माणने), दूसरी – रिसालत (प्रेषित मुहम्मद सल्ल.) यांना ईश्वराचा दूत माणने. तीसरी – मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवणे व शिर्क (ईश्वरामध्ये दुसऱ्याला सामील करणे) पासून दूर राहण्याची ताकीद करण्यात आली. आणि त्यानंतर खिदमत-ए-खल्क. या ठिकाणी नमाज, रोजा, हज या आदेशांना लागू करण्या अगोदर खिदमत-ए-खल्कचा आदेश लागू करण्यात आला आहे. कुरआनच्या शेवटच्या अध्यायाकडे आपण लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, या सर्व आयातींमध्ये खिदमत-ए-खल्कवरच जोर देण्यात आलेला आहे. यावरून एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल की, नमाज, रोजा, हज इत्यादी इबादतीच्या अगोदर खिदमत-ए-खल्कचा दर्जा आहे. यावरून समाजसेवा किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज येतो. इस्लाममध्ये समाजसेवेला असलेल्या महत्वाबद्दल मी यासाठी पुन्हा-पुन्हा जोर देत आहे की, हीच ती इस्लामची मुलभूत शिकवण आहे, जिचा विसर आम्हा मुस्लिमांना पडलेला आहे. समाजसेवा करण्याची जाणीव जोपर्यंत मुस्लिम आपल्यामध्ये मुद्दामहून निर्माण करणार नाहीत तोपर्यंत ते समाजसेवेसाठी उद्युक्त होणार नाहीत. म्हणजेच इस्लामला अपेक्षित असलेले जनसेवेचे काम होणार नाही. इस्लाममध्ये जेवढ्याही इबादती आहेत, त्या सर्व समाजसेवेशी जोडलेल्या आहेत. फितरा, खैरात, जकात,  अतियात, सदका या माध्यमातून समाजाच्या दीनदुबळया लोकांची सेवा करण्याची वारंवार ताकीद कुरआनमध्ये करण्यात आलेली आहे. जिचा की मी पुन्हा सांगतो आपल्या सर्वांना विसर पडलेला आहे. 
कुरआनमध्ये जेव्हा आणि जेथे ज्या नियमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तेव्हा वेगवेगळा करण्यात आलेला आहे. पुरूषांसाठी वेगळे नियम, महिलांसाठी वेगळे नियम आणि बाकीचे सर्वसाधारण नियम. खिदमत-ए-खल्कचीही व्याख्या कुरआनमध्ये अतिशय बारकाईने स्पष्ट करण्यात आलेली आहे. अमल-ए-खैर हा शब्द शुद्ध समाजसेवेसाठी कुरआनमध्ये अनेक ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर हदीसमध्ये सुद्धा समाजसेवेचे महत्व नमूद करताना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ”तुमच्या पैकी सर्वोत्कृष्ट लोक ते आहेत जे दुसऱ्यांसाठी उपयोगी आहेत.” दुसऱ्या एका हदीसमध्ये प्रेषित सल्ल. म्हणतात, ’अद्दीनू नसिहा’ इस्लाम म्हणजेच सेवाभाव होय. कुरआनमध्ये फक्त समाजसेवा करा असे मोघमपणे म्हटलेले नाही तर स्पष्ट म्हटलेले आहे की, गरीब, गरजवंत, विधवा, दिव्यांग, आजारी, कैदी, गुलाम इत्यादींची मदत करा, सेवा करा. 
प्रेषित सल्ल. यांच्या 40 वर्षाचे सुरूवातीचे आयुष्य केवळ आणि केवळ जनसेवेमध्येच गेले आहे. त्यानंतर राहिलेल्या 23 वर्षात ही त्यांनी समाजसेवा केलीच. मात्र सुरूवातीचा काळ हा फक्त जनसेवेसाठीच राखीव होता, असा भास व्हावा इथपर्यंत त्यांनी समाजसेवा केेलेली आहे. त्यांच्या जीवन चरित्रावर एक नजर टाकली तरी ठळकपणे आपल्या लक्षात येईल की, प्रेषित सल्ल. हे मक्कामध्ये राहत असलेल्या आजारी, गरीब आणि वृद्धांची सेवा करताना आपणास दिसतात. मक्केमध्ये बाहेरून येणाऱ्या काफिल्यांच्या लोकांना पाणी पुरविण्यापासून तर त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्यामध्ये आपण त्यांना सदैव व्यस्त पाहतो. एक योजनाबद्ध पद्धतीने प्रेषित सल्ल. यांनी समाजसेवेचे कार्य केलेले आहे. मक्कामध्ये जेव्हा प्रेषित सल्ल. राहत होते तेव्हा समाजसेवा करणाऱ्या दोन संस्था, एक – हलफुल फजूल, दोन – सिकाया. यांचे ते सक्रीय सदस्य होते. (संदर्भ : अर्रायकतुल मकतूम).
प्रेषित सल्ल. यांनी खिदमत-ए-खल्कचे कार्य हे कुठल्यातरी तात्कालिक भावनेच्या आहारी जावून केले नाही तर अल्लाहच्या आदेशाप्रमाणे अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आयुष्यभर केले. त्यांच्या जीवनकार्याचा गौरव प्रसिद्ध उर्दू शायर अल्ताफ हुसेन हाली यांनी खालील शब्दात केलेला आहे. 
वो नबियों में रहेमत लकब पानेवाला
मुरादें गरीबों की बर लानेवाला
मुसिबत में गैरों के काम आनेवाला
वो अपने पराये का गम खानेवाला
फकीरों का मलजा, जईफों का मावा
यतीमों का माली गुलामों का मौला
एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली सुविद्य पत्नी ह. खतीजा (रजि.) यांच्यासमोर खंत व्यक्त केली मी आत्ताच एका आशा कबिल्याला पाहिले आहे, ज्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी सुद्धा आवश्यक तो पैसा त्यांच्याकडे नाही. त्यावर ह. खतिजा यांनी, ज्या स्वत: श्रीमंत होत्या त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचा अधिकार प्रेषित सल्ल. यांना देऊन शहरातल्या मोठ्या लोकांसमोर घोषणा केली की, ”मी माझ्या या संपत्तीच्या खर्चाचा सर्वाअधिकार प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना देते. त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे वाट्टेल तसा खर्च करावा. यावरून खिदमत-ए-खल्कचे महत्व आपल्या लक्षात येईल. समाजसेवेशिवाय, इस्लामचा संदेश लोकांपर्यंत परिणामकारक पद्धतीने पोहोचविणे शक्यच नाही. खदमत-ए- खल्क म्हणून काहीतरी छोट्या-छोट्या कृती करून भागणार नाही तर लोकांनी दखल घेण्यास विविश व्हावे, इतक्या मोठ्या प्रमाणात व एकाग्रचित्ताने समाजसेवा करावी लागेल. हेच इस्लामला अपेक्षित आहे. लोकांच्या मनावर राज्य करायचे असेल तर त्याला एकच मार्ग आहे त्यांच्या गरजा पूर्ण करणे. प्रेषित मुहम्मद सल्ल., पहिले खलीफा ह. अबुबकर (रजि.), द्वितीय खलीफा हजरत उमर (रजि.) यांच्या काळातील अशा अनेक घटनांची नोंद इस्लामच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात नोंदविलेल्या आहेत की, त्या वाचल्या तर अंगावर शहारे येतील.  उपभोगशुन्य स्वामी जर पहावयाचा असेल तर या महान व्यक्तींकडे पाहावे.
इस्लाममध्ये आजारी माणसाला भेटून विचारपूस करणे आणि त्यास आवश्यक ती सेवा पुरविणे याचीही फार मोठी महती हदीसमध्ये आलेली आहे. प्रेषितांनी सांगितले आहे की, ”70 हजार फरिश्ते (ईशदूत) त्या माणसाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात जो एखाद्या आजारी माणसाच्या सेवेसाठी वेळात वेळ काढून जातो”. (मसनद अहेमद).
एकदा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, तुमच्या  उत्पन्नात वृद्धी तुमच्यावर अवलंबून असलेल्या नादार लोकांच्या सेवेच्या मोबदल्यात होत असते, हे लक्षात ठेवा. प्रेषित मुहम्मद सल्ल. यानी शेवटचा उपदेश करताना फक्त तीन गोष्टी सांगितल्या की, ”आपल्या हाताखालील लोकांशी संवेदनशीलतेने वागा आणि गरजवंतांशी सहानुभूतीने वागा आणि नमाज कायम करा.” म्हणजे शेवटच्या उपदेशामध्येही प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी समाजसेवेचेच महत्व अधोरेखित केलेले आहे. म्हणजे समाजसेवेचे जे काम आयुष्यभर केले तेच काम करण्याची ताकीद आपल्या अंतिम संदेशातही केली. यावरून इस्लाममध्ये समाजसेवेचे किती महत्त्व आहे, याचा अंदाज येतो. हा आपल्या प्रेषित सल्ल. यांचा आदर्श आहे, ज्याचा आम्हाला विसर पडलेला आहे. समाजसेवेच्या नावाखाली आपण सर्व मिळून जे काम करतो ते  फारसे परिणामकारक होत नाही. यासाठी एक कारण दिले जाते की, भारतातील मुस्लिम समाज हा स्वत: गरीब समाज आहे. त्यालाच समाजसेवेची गरज आहे. तो कुठून समाजसेवा करणार? त्यासाठी जो खर्च लागतो तो कुठून आणणार? हे पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. जरी बहुसंख्य मुस्लिम समाज गरीब असला तरी श्रीमंतांचीही संख्या कमी नाही. लग्न आणि वलीमा यावरील खर्चावरून याचा सहज अंदाज येऊ शकतो. फक्त योग्य दृष्टीकोणाचा अभाव आहे.  
याउलट अनेक हिंदू बांधव अतिशय नियोजित पद्धतीने अन्नदान आणि गरीबांना इतर मदत करण्याचे काम करीत आहेत. मागच्याच वर्षी एक बातमी आली होती, एका जैन व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात शंभर गरीबांना घरे बांधून दिली. मागच्याच आठवड्यात एक बातमी आली होती की एका हिंदू बांधवांने तीन हजार अनाथ मुलींचे विवाह लावून दिले होते. अनेक समाजसेवी संस्था हिंदू बांधवांनी सुरू केलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यात हासेगाव येथे एचआयव्ही पीडित मुलांसाठी तर बुधोड्यामध्ये अंधांच्या सेवेसाठी अतिशय परिणामकारक अशा संस्था सुरू आहेत. याशिवाय, पुण्याचे राहणारे संजय नहार हे सरहद नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कश्मीरमधील शहीदांच्या मुलींची जबाबदारी घेऊन त्यांना सुशिक्षित करून आत्मनिर्भर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या कामासाठी या लोकांनी आपले आयुष्य वाहून घेतलेले आहे. अनेक हिंदू बांधव असे आहेत जे सर्पमित्र, प्राणीमित्र. अंधश्रद्धा निर्मुलन करणारे, वृद्धाश्रम चालविणारे आणि पर्यावरणमित्र आहेत. आपल्याकडे महेबूबचाचा व मुस्तफा सय्यद सारखे मुठभर लोक वगळता बाकी लोकांनी या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छाच होत नाही. जणू या कामाशी इस्लामचा संबंधच नाही अशा पद्धतीने आपण वागतो. पर्यावरण संबंधात तर एक अतिशय सुंदर अशी हदीस, ह. अबु हुरैराह रजि. यांच्या मार्फतीने सांगितली गेलेली आहे की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ”कयामत येत असल्याची चाहूल लागली असेल तरी वृक्षारोपण करण्यास विसरू नका.” दुसऱ्या एका ठिकाणी प्रेषित सल्ल. यांनी फर्माविले होते की, ”हिरव्या झाडाखाली शौचाला बसू नका.” एकदा एका माणसाने प्रेषितांना प्रश्न विचारला की, इस्लाममध्ये सर्वात सुंदर गोष्ट कोणती आहे? त्यावर प्रेषित सल्ल. यांनी उत्तर दिले की, ” गरीबांना जेऊ घालणे आणि ओळख असो नसो लोकांना सलाम करणे.” सुफी संताचे कधी काळी लंगर चालत. ज्यात गरीब लोक पोटभरून जेवण करत. हे काम तर आपण विसरूनच गेलेलो आहोत. एकंदरित खिदमत-ए-खल्ककडे पुन्हा एकदा नव्याने पाहण्याचा आणि आपल्या  उपलब्ध संसाधनामधून अधिकाधिक समाजसेवा करण्याचा वसा घेण्याची नित्तांत आवश्यकता आहे.
– युनूस पटेल
जेआयएच सदस्य, लातूर. 
9823460113
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *