ह. अनस (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की मित्र तीन प्रकारचे असतात. एक मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही कबरीपर्यंत पोहचेपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन.’’ दुसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही गरिबांना जे काही दिलं तेवढंच तुमचं आहे आणि जे तुम्ही कुणाला दिलं नाही, स्वतःसाठी राखून ठेवलं तर ते तुमचं नाही, तर ते तुमच्या वारसदारांचं आहे.’’ ह्या मित्राचं नाव ‘माल’ आहे. तिसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही जथे कुठे असाल कबरीमध्येदेखील मी तुमच्या बरोबर राहीन आणि जेव्हा तुम्ही कबरीतून बाहेर याल त्या वेळेस देखील मी तुमच्या बरोबर राहीन.’’ या तिसऱ्या मित्राचं नाव ‘कर्म’ आहे. माणूस हैरान होऊन म्हणेल की अल्लाहची शपथ! मी तर तुला या इतर मित्रांच्या तुलनेत तुच्छ समजत होतो. (तरगीब, इस्तदराक)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही धनसंपत्ती आणि मालमत्ता गोळा करू नका. तुमच्यामध्ये दुनियेची लालसा घर करेल.’’
ह. आयेशा (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणत होते की, ‘‘ज्या कुणाला अल्लाहच्या भेटीची आवड असते, अल्लाहदेखील त्याच्या भेटीस पसंत करतो. आणि जो व्यक्ती अल्लाहच्या भेटीस पसंत करीत नाही, अल्लाहदेखील त्याला भेटण्यास नकार देतो.’’ ह. आयेशा (र.) यांनी यावर विचारले की अल्लाहच्या भेटीस पसंत न करण्याचा अर्थ काय? कुणीही मृत्यू पसंत करत नाही. असे असेल तर आमच्यापैकी सर्वच जण मृत्युला पसंत करत नाहीत.
प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वर्ग, अल्लाहच्या देणग्यांविषयी सांगितले जाते तेव्हा त्याच्या मनात अल्लाहशी भेट व्हावी अशी इच्छा होते. अशा माणसाशी अल्लाह देखील भेटू इच्छितो. आणि दुसरीकडे नाकारणाऱ्या माणसाला जेव्हा अल्लाहचा प्रकोप, त्याच्या नाराजीबाबत कळवले जाते तेव्हा असा माणूस अल्लाहच्या भेटीला पसंत करत नाही.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्या अस्तित्वाची शपथ, ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे, कयामतच्या दिवशी अल्लाह अशा लोकांना यातना देणार नाही ज्यांनी या जगात अनाथांशी दयेचा व्यवहार केला असेल. त्यांच्याशी मायाळूपणे बोलले असतील आणि त्यांच्या अनाथावस्थेची आणि दुर्बलतेची त्यांना कीव वाटली असेल. आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्यांवर दबाव टाकत नसेल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘हे मुहम्मदच्या उम्मतचे लोकहो, मला शपथ आहे त्या अस्तित्वाची ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे. अल्लाह अशा लोकांच्या दानधर्माला स्वीकारणार नाही ज्याचे नातेवाईक त्याच्याकडून वंचित राहिले असतील.’’ (हुरैरा, तिबरानी)
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
0 Comments