मा. अबू हुरैरा (र.) कथन करतात की, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही, अल्लाहची शपथ! तो मोमिन नाही, अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही!’’ लोकांनी आश्चर्याने विचारले, ‘‘कोण? हे पैगंबर (स.)’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तो माणूस कदापि ईमानधारक नव्हे जो शेजाऱ्यांना त्रास देत असेल वा छळत असेल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरूपण
माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची एक ओळख त्याचा शेजाऱ्यांशी व्यवहारसुद्धा आहे. जो शेजाऱ्यांना, मग ते कुठल्याही जातिधर्माचे असोत, त्रस्त करीत असेल, छळत असेल तो मुळीत ईमानधारकच नाही अशी ठाम भूमिका पैगंबर (स.) घेतात. ईमानच नसेल तर चारित्र्य ते कुठले?
पैगंबर मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ‘‘अल्लाहची शपथ! तो मोमिन अर्थात मुस्लिम नाही जो स्वत: तर पोटभर जेवतो मात्र त्याचा शेजारी उपाशी झोपतो.’’ (मिश्कात)
‘ईमान’ खरे तर माणसाच्या मनात वास करतो. त्याचे उदाहरण असे आहे जणू मनात एक बीज रोवावे, ज्याचे एका महान वृक्षात रूपांतर व्हावे, ज्यापासून मानवजातीला गोड फळे लाभावीत, सावलीही लाभावी आणि इतरही लाभ व्हावेत.
शेजाऱ्यापाचाऱ्यांशी सद्व्यवहार करणे, त्यांच्या सुखदु:खात सहकार्य करणे ही ‘ईमान’ची लक्षणे आहेत. या उलट शेजाऱ्यांना त्रास देणे, छळणे ही ‘ईमान’ नसल्याची लक्षणे आहेत. आपल्या देशात जवळपास वीस कोटी मुस्लिम राहातात. उर्वरित ऐंशीनव्वद कोटी मुस्लिमेतर बांधव त्यांचे शेजारी आहेत. पैगंबरांचा शेजारधर्माचा हा एक उपदेश जरी मुस्लिमांनी अंमलात आणला तरी इतर धर्मीयांमध्ये त्यांच्याविषयी द्वेष, घृणा, मत्सर राहील का?
म्हणून कवीने म्हटलंय,
‘‘जुबां से कह भी दिया ला इलाह तो क्या हासिल?
दिलो निगाह जो मुसलमाँ नहीं, तो कुछ भी नहीं।’’
अर्थात- निव्वळ इस्लामचा उच्चार
करण्याला काहीच अर्थ नाही. आचारविचार, चारित्र्यात
इस्लाम नसेल तर सारे व्यर्थ आहे.
0 Comments