Home A इस्लामी व्यवस्था A शरीअतमध्ये गुन्हेगारीवरील उपायाची स्वरुपे

शरीअतमध्ये गुन्हेगारीवरील उपायाची स्वरुपे

शरीअत अर्थात इस्लामी कायद्याने गुन्हेगारीवरील उपायाची तीन स्वरुपे दाखविली आहेत. पहिले स्वरुप हे अपराधाची ‘हद‘ लागू करणे होय. अर्थातच गुन्हेगाराने पूर्ण शर्तीने गुन्हा केलेला असेल तर स्वतः ईश्वराने ही शिक्षा निश्चित केलेली आहे. यात मुळीच बदल करता येत नाही. म्हणूनच या प्रकारच्या शिक्षा-उपायास शरीअतच्या परिभाषेत ‘हद‘ जारी करणे असे म्हणतात. दुसर्या उपायाचे स्वरुप म्हणजे ‘कसास‘ होय. कसास म्हणजे बदल्याची शिक्षा होय. अर्थात गुन्हेगाराने कोणास शारीरिक हानी पोचविली असेल तर जेवढी हानी पोचविली तेवढाच बदला घेण्याची शिक्षा देणे होय. उदाहरणार्थ, हात कापला असेल तर गुन्हेगाराचा हात कापण्यात येईल, डोळा फोडला असेल तर डोळा फोडण्यात येईल, हत्या केली असेल तर गुन्हेगारास मृत्यूदंड देण्यात येईल. या शिक्षेतही मुळीच बदल करता येणार नाही. तिसरा प्रकार हा ‘ताजीर‘चा होय. म्हणजेच ज्या अपराधांवर शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत, मात्र आवश्यक शतर्चिी पूर्तता होत नसेल, तर अशा परिस्थितीत गुन्हेगारास गरजेनुसार ‘ताजीर‘(म्हणजे निश्चित केलेल्या शिक्षेपेक्षा थोडी कमी शिक्षा) करण्यात येईल. या तिन्ही स्वरुपांच्या शिक्षांवर आपण वेगवेगळी चर्चा करु या.
‘हद‘ स्वरुपाची शिक्षा
ही शिक्षा
 1. व्यभिचार,
 2. व्यभिचाराचा आरोप लावणे,
 3. चोरी करणे,
 4. दारू पिणे,
 5. इस्लामचा त्याग करणे,
 6. डकाईती करणे आणि
 7. बंडखोरी करणे या अपराधांवर लागू करण्यात आली आहे.
 
1. व्यभिचार आणि त्याची व्याख्या
व्यभिचार म्हणजे काय? याविषयी इस्लामने अशी व्याख्या केली आहे की, पत्नीव्यतिरिक्त अगर पतीव्यतिरिक्त अनुक्रमे इतर कोणाही स्त्री अगर पुरुषाशी संभोग करणे म्हणजे व्यभिचार होय. हा संभोग करताना वीर्यस्खलन होवो अथवा न होवो, या संभोगाला व्यभिचार असे म्हणतात.
व्यभिचारसिद्धीच्या अटी व शर्ती
‘शरीअत‘ म्हणजेच इस्लामी कायद्याने कोणताही गुन्हा सिद्ध करण्याच्या शर्ती आणि अटी निश्चित केल्या आहेत. याप्रमाणेच व्यभिचाराचा अपराध सिद्ध करण्याच्या वा होण्याच्यासुद्धा अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत. याकरिता तीन पद्धती ठरविण्यात आल्या आहेत. प्रथम अशी की, व्यभिचार केलेल्या गुन्हेगाराने स्वतःहून इस्लामी न्यायालयात गुन्हा केल्याची कबुली द्यावी. दुसरे असे की, व्यभिचारी व्यक्तीस व्यभिचार करताना पाहिल्याचे साक्षीदार असावेत आणि तिसरे असे की, संकेत आणि परिणामावरुन व्यभिचार केल्याचे सिद्ध व्हावे. याबाबतीत आपण थोडक्यात चर्चा करु या.
पहिली पद्धत
शरीअतमध्ये व्यभिचार केलेल्या गुन्हेगाराकडून गुन्हा केल्याची कबुली विश्वसनीय समजण्यात आली आहे. मात्र यासाठी गुन्हेगाराची मानसिक आणि बौद्धिक परिस्थिती चांगली व ठणठणीत असावी. अर्थातच मानसिक वा बौद्धिक स्वास्थ्य ठणठणीत असावे, शिवाय त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली न्याय-परिषदेत द्यावी. गुन्हेगार प्रौढ असावा.
दुसरी पद्धत
व्यभिचारानंतर संकेत आणि परिणाम स्पष्ट व्हावेत. उदाहरणार्थ, स्त्रीला गर्भधारणा व्हावी, अथवा वैद्यकीय तपासणीतून संभोग झाल्याचे निष्पन्न व्हावे.
तिसरी पद्धत
साक्षीदार असावेत. शरीअतमध्ये सामान्य प्रकरणात दोन साक्षीदार पुरेसे असतात, मात्र व्यभिचार सिद्ध करण्यासाठी कमीतकमी चार साक्षीदारांची आवश्यकता असते. हे साक्षीदारसुद्धा परिपूर्ण आणि प्रौढ व सबळ असावे लागतात. त्यांना व्यभिचाराचा वृत्तान्त सांगण्याचे सामर्थ्य असावे लागते. अर्थात ते मुके आणि बहिरेही नसावेत, मद्यपानाचे व्यसन जडलेलेही नसावेत. ते न्यायप्रिय, सदाचारी व ईशपरायण मुस्लिम असावेत. व्यभिचार करणार्या गुन्हेगारांशी कोणत्याही प्रकारचा तंटा-बखेडा अगर प्रकरण नसावे. कोणत्याही कारणावरून गुन्हेगाराशी वैर नसावे. त्याचप्रमाणे स्त्रीची साक्ष स्वीकारण्यात येणार नाही. हे चारही साक्षीदार एकाच प्रसंगी न्यायपरिषदेत, हजर करण्यात येऊन त्यांच्या साक्षी तपासण्यात येतील.
व्यभिचाराची शिक्षा
शरीअतमध्ये व्यभिचार करण्याच्या तीन प्रकारच्या शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत.
 1. कोरडे ओढणे
 2. शहारतून तडीपार करणे
 3. दगडाने ठेचून वध करणे
यापैकी व्यभिचारी गुन्हेगार अविवाहित असेल तर शंभर कोरडे मारण्याची आणि शहराबाहेर तडीपार करण्याची शिक्षा देण्यात येईल आणि गुन्हेगार विवाहित असेल तर दगडाने ठेचून वध करण्याची शिक्षा देण्यात येईल. कुरआनात म्हटले आहे,
‘‘अविवाहित व्यभिचारी स्त्री आणि अविवाहित व्यभिचारी पुरुषाला प्रत्येकी शंभर कोरडे मारावेत आणि त्यांच्यावर दया करता कामा नये, जर तुम्ही ईश्वर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास ठेवीत असाल तर त्याचप्रमाणे त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रद्धावंतांचा(अर्थात मुस्लिमांचा) एक समूह तेथे हजर असावा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नूर – २)
त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘कोणत्याही मुस्लिमाची, जो एकेश्वरवाद आणि परलोकावर विश्वास ठेवतो, हत्या करणे वैध नाही, केवळ ते लोक सोडून की जे विवाहित असून व्यभिचार करतात, ज्याने इतराचा वध केला असेल आणि जो मुस्लिम समुदायाबरोबर पडला(अर्थात धर्मभ्रष्ट झाला) असेल. या तीन प्रकारच्या गुन्हेगारांशिवाय इतर कोणाचाही वध करता कामा नये.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या शासनकाळात विवाहित लोकांनी व्यभिचार केल्यास त्यांना ‘रजम‘ म्हणजेच दगडाने ठेचून वध करण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की,
‘‘अविवाहित तरूण-तरुणींनी व्यभिचार केल्यास त्यांना प्रत्येकी शंभर कोरडे ओढावेत आणि एका वर्षासाठी पुरुषाला शहरातून तडीपार करावे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – मुस्लिम)
व्यभिचाराचा खोटा आरोप लावणे
व्यभिचाराचा खोटा आरोप लावणे हे महापाप असून याची शिक्षा लागू करण्याच्या निम्नलिखित अटी व शर्ती ठरविण्यात आल्या आहेत.
 1. खोटा आरोप लावणारा वेडा, वयात न आलेला मद्याच्या नशेत नसलेला असावा.
 2. खोटा आरोप लावणारा हा मुखत्यार असावा म्हणजेच स्वतःच्या मर्जीने व कोणाच्या दबाव अगर आमिषाला बळी पडून खोटा आरोप करणारा नसावा.
 3. खोटा आरोप लावणारा हा पिता नसावा. अर्थात एखाद्या पुरुषाने म्हटले की, तू माझी संतती नाही तर त्या आरोप लावणार्याला शिक्षा देण्यात येणार नाही.
 4. खोटा आरोप लावणार्या आणि ज्यावर आरोप लावण्यात येत आहे त्याच्यात पती-पत्नीचे नाते नसावे. कारण पती-पत्नीसाठी आरोपाचा वेगळा कायदा आहे. त्या कायद्यास शरीअतच्या परिभाषेत ‘लआन‘ चा कायदा असे म्हणतात.
 5. ज्याच्यावर खोटा आरोप लावण्यात येत आहे, तो स्वावलंबी आणि मुखत्यार असावा.
 6. तो मुस्लिम असावा.(अपराधी मुस्लिमेतर नसावा)
 7. खोटा आरोप लावणारा अपराधी स्वतंत्र असावा. अर्थात कोणाचा गुलाम अथवा दास नसावा.
 8. तो सज्जन आणि सुशील असावा. कारण आरोप लावणार्याचा आरोप सिद्ध झाल्यास प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळेल.
 9. ज्यावर आरोप करण्यात आला, त्याच्याविरुद्ध प्रकरण दाखल करणारा असावा. अन्यथा शिक्षा होणार नाही.
 10. खोटा आरोप लावणार्याने स्पष्ट शब्दांत आरोप लावलेला असावा. सांकेतिक पद्धती अगर इशार्याने आरोप लावल्यास दखल घेतली जाणार नाही.
 11. खोटा आरोप लावणार्यास आरोप सिद्ध करण्याकरिता चार साक्षीदार हजर करणे शक्य नसावे.
या अटींवर खोटा आरोप लावणार्या गुन्हेगारास शरीअतनुसार शिक्षा देण्यात येईल.
व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याची शिक्षा
शरीअतमध्ये व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याच्या दोन शिक्षा ठरविण्यात आल्या आहेत. प्रथम मूळ शिक्षा आणि दुसरी अतिरिक्त वाढीव शिक्षा. त्या अशा प्रकारे होय.
 1. एशी कोरडे मारणे आणि
 2. नेहमीसाठी त्याची साक्ष स्वीकार न करणे होय. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘जे लोक चारित्र्यवान आणि सुशील स्त्रियांवर व्यभिचाराचा खोटा आरोप लावतात, मग चार साक्षीदारांसमक्ष आरोप सिद्ध करू शकत नाहीत, त्यांना एशी कोरडे मारावेत आणि त्यांचा साक्ष देण्याचा अधिकार नेहमीसाठी हिरावून घेण्यात यावा कारण ते स्वतः गुन्हेगार आणि दुराचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-नूर – ४)
2. इस्लामी कायद्यामध्ये चोरी आणि चोरीचा अपराधसिद्ध होण्याच्या अटी
शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये चोरी करण्याच्या अपराधालासुद्धा ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात आली आहे. चोरीचा अपराध सिद्ध होण्याच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
 1. चोर हा वयात आलेला असावा. वयात न आलेल्या, मानसिक संतुलन ठिकाणावर नसलेल्या चोरावर ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही.
 2. चोर हा विवश नसावा. परिस्थितीने विवश होऊन चोरी करणार्यास ‘हद‘ ची शिक्षा देता येणार नाही.
 3. भुकेने आणि तहानेने तसेच रोगाने व्याकूळ होऊन गरजपूर्तीसाठी चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही.
 4. मुलाच्या संपत्तीमधून चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही.
 5. ‘बैतुल माल‘ अर्थात सरकारी जनकल्याणनिधीमधून चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही. कारण या संपत्तीमध्ये त्याचासुद्धा वाटा आहे.
 6. चोरी करणारा धर्मयुद्धाच्या परिस्थितीत नसावा.
 7. चोरी ही किंमती वस्तु उदाहरणार्थ, सोने, चांदी, पैसा, द्रव्य वगैरेंची असेल तरच ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येईल. दगड-माती व यासारख्या क्षुल्लक वस्तुंची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही.
 8. हराम मालाची अर्थात डुक्कर, दारू, गांजा व यासारख्या मालाची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करता येणार नाही.
 9. लवकर खराब होणार्या व सडणार्या वस्तुंची अर्थात पाले-भाज्या, फळे वगैरेंची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करता येणार नाही.
 10. चोरी करण्यात आलेला माल दुसर्याची मिळकत असावी. स्वतःच्या संपत्तीतून चोरीची शिक्षा नाही.
 11. सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेल्या संपत्तीतून झालेल्या चोरीवरच ‘हद‘ची शिक्षा लागू करण्यात येईल. रस्त्यावर अथवा इतरस्त्र पडलेल्या वस्तुंची चोरी ही चोरीच्या परिभाषेत बसत नाही.
चोरीची शिक्षा अर्थात ‘हद‘ जारी करणे
शरीअतमध्ये चोरीची शिक्षा अर्थात ‘हद‘ जारी करणे म्हणजे चोराचे हात कापणे होय. वरील अटी आणि शर्ती पूर्ण झाल्याशिवाय ही शिक्षा देता येणार नाही. कुरआनात म्हटले आहे,
‘‘चोरी करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो, त्या व्यक्तीस हात कापण्याची शिक्षा द्यावी, हा त्यांच्या कमाईचा बदला आहे आणि ईश्वराकडून बोध घेण्यासारखी शिक्षा आहे. ईश्वराचे प्रभुत्व सर्वांवर आहे आणि तो जाणणारा आणि पाहणारा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा – ३८)
इस्लामी कायद्यानुसार पहिल्यांदा चोरी केल्यास चोराचा उजवा हात कोपरापर्यंत कापण्यात येईल आणि दुसर्यांदा केल्यास चोराचा डावा पाय घोट्यापर्यंत कापण्यात येईल.
3. इस्लामी कायद्यामध्ये डकाईती अगर दरोडा
चोरी म्हणजे इतरांच्या नजरेआड लपून छपून करण्यात येणारे कर्म असते. मात्र डकाईती अगर दरोडा हा बळाचा वापर करून संपत्ती हिसकावणे वा त्यावर ताबा मिळविणे होय. चोरीचा माल चोराच्या ताब्यात आल्याशिवाय चोराला शिक्षा देता येणार नाही, मात्र दरोडा टाकल्यावर दरोडेखोराच्या ताब्यात संपत्ती आली नसली तरी, त्याला शिक्षा देण्यात येईल असा इस्लामी कायद्याचा नियम आहे. दरोड्याचे प्रामुख्याने चार स्वरुप आहेत.
 1. डकाईत हा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघाला मात्र त्याला संपत्तीही मिळाली नाही आणि त्याच्याकडून कोणाचा खूनही झाला नाही.
 2. दरोडा टाकून संपत्ती लुटली मात्र कोणाचा खून झाला नाही.
 3. दरोडा टाकण्यासाठी निघाला मात्र माल हाती लागला नाही आणि त्याच्या हातून खून झाला.
 4. दरोडा टाकून संपत्ती लुटली आणि खूनही केला.
दरोडेखोरीचा गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी
दरोडा एकट्याने टाको अगर सामूहिकरित्या टाकण्यात येवो, तो दरोड्याच्याच परिभाषेत मोडतो. दरोडेखोर स्त्री असो वा पुरुष, दोघेही समान अपराधी आहेत.
दरोडा टाकण्याची शिक्षा
शरीअतमध्ये दरोड्याच्या चार प्रकारच्या शिक्षा तजवीज करण्यात आल्या आहेत.
 1. दरोडेखोराची हत्या करणे,
 2. फाशी देणे,
 3. हात कापणे आणि
 4. देशाबाहेर काढणे. ईश्वराने म्हटले आहे,
‘‘जे लोक ईश्वर आणि त्यांच्या प्रेषितांशी युद्ध करतात आणि धरतीवर उपद्रव माजवितात, त्यांची शिक्षा ही आहे की त्यांना ठार मारावे, सुळावर चढवावे अथवा परपस्पर विरुद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापावेत अथवा देशाबाहेर काढावे. हा अपमान तर या जगात आहेच, शिवाय मरणोत्तर जीवनात यापेक्षाही भयानक शिक्षा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा – ३३)
या बाबतीत इस्लामी कायदा असा आहे की या चार स्वरुपाच्या शिक्षा अपराधाच्या गांभीर्याच्या प्रमाणानुसार आहेत. उदाहरणार्थ, ज्याने केवळ दहशथ निर्माण केली, त्यास देशाबाहेर काढण्यात येईल, ज्याने केवळ संपत्ती लुटली, त्याचे हात-पाय विरुद्ध प्रमाणात कापण्यात येतील, ज्याने संपत्ती न लुटता खून केला असेल, त्याची हत्या करण्यात येईल आणि ज्याने संपत्तीही लुटली आणि खूनही केला, त्यास फाशी देण्यात येईल. याशिवाय इस्लामी शासकाला या गोष्टीचा अधिकार आहे की, त्याने या चारपैकी कोणती शिक्षा द्यावी.
4. चोरी-डकाईतीपासून बचावाचा इस्लामी उपाय
अपूर्ण अर्थार्जन, जीवनावश्यक गरजा सहसा पूर्ण न होण्यासारखे कामाचे मानधन देणे, आर्थिक शोषण करणे आणि आपल्या संपत्तीचे व वैभवाचे प्रदर्शन करणे, हेसुद्धा चोरी आणि डकाईतींची मुख्य कारणे होय. म्हणूनच इस्लामने इतरांना त्यांच्या कामाचा पुरेपूर, समाधानकारक व तत्काळ मोबदला देण्याची जबरदस्त ताकीद केली आहे. याशिवाय आपल्या वैभव आणि संपत्तीचेही प्रदर्शन करण्याची सक्तीने मनाई केली आहे. कारण संपत्तीचा व्यर्थ आणि फाजील अभिमान हे सर्व माणसाला करण्यास भाग पडतो. यामुळे इतरांच्या मनात ईर्ष्या आणि वैफल्याच्या भावना निर्माण होतात. यासाठी आपल्या संपत्ती आणि वैभवाचे प्रदर्शन इतर सामान्यजनांसमोर करण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मनाई केली आहे.
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे, ‘‘ईश्वर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याच्याकडे मुळीच कृपादृष्टी टाकणार नाही, जो गर्व आणि अहंकाराच्या झिंगेत आपली वस्त्रे लोळवित चालत असतो.”(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
शिवाय माणूस स्वतःच्या छोट्याशा इच्छेपायी अगर व्यर्थ कामनेपायी पैशांची स्वैर उधळपट्टी करतो, मात्र गोर-गरीब, गरजवंत आणि दीन-दलितांसाठी पाच पैसे खर्च करण्याची माणुसकी दाखवित नाहीत. या कृत्यामुळेसुद्धा सामान्यजन द्वेषाच्या भावनेने पिसाळून चोरी-डकाईतीसारखे अपराध करतात. म्हणूनच इस्लामने कंजुसी आणि संकूचितपणाचा तीप धिक्कार केला. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘कंजूसपणा आणि संकुचितवृत्तीपासून दूर राहा. कारण यामुळेच तुमच्या पूर्वीचे जनसमुदाय नष्ट झालेत. या कारणामुळेच त्यांनी आपसात रक्तपात केला आणि रक्तसंबंध नष्ट केलेत आणि अन्याय व अत्याचार हे अंतिम निवाड्याच्या दिवशी तिमिर काळोख आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *