स्पष्टीकरण
या हदीसद्वारे स्पष्ट होते की पुण्याचे कार्य वैध पद्धतीने करण्यात आले तर ते पुण्यकर्म समजले जाईल, उद्देशदेखील पवित्र असला पाहिजे आणि त्याचे माध्यमदेखील पवित्र असले पाहिजे.
माननीय सईद बिन अबुलहसन (ताबई) यांच्या कथनानुसार, मी माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांच्याजवळ बसलो होतो. इतक्यात एक मनुष्य आला आणि म्हणाला, ‘‘हे इब्ने अब्बास (रजि.)! मी एक हस्तकलाकार मनुष्य आहे, हस्तकला माझ्या कमाईचे माध्यम आहे. मी जीवधारी प्राण्यांची चित्र बनवितो आणि त्यांची विक्री करतो. (याबाबतीत आपले काय मत आहे, माझा हा व्यवसाय निषिद्ध आहे काय?)’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, याबाबतीत माझे स्वत:चे काहीही मत नाही, मात्र मी तुम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून ऐकलेली हदीस ऐकवितो. मी पैगंबरांना असे म्हणताना ऐकले आहे, ‘‘चित्र बनविणाऱ्या माणसास अल्लाह शिक्षा देईल, इतकेच काय तो माणूस त्या चित्रात आत्मा फुंकण्याचा प्रयत्न करील, परंतु तो तसे करू शकणार नाही.’’ हे ऐकून त्या मनुष्याचा चेहरा उतरला आणि जोराचा श्वास घेतला. इब्ने अब्बास (रजि.) त्या मनुष्यास म्हणाले, ‘‘जर तुम्हाला हेच काम करायचे असेल तर तुम्ही झाडे आणि अशा वस्तूंची चित्रे काढा ज्यात प्राण नसेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
चित्र काढणाऱ्याला आपल्या कामाच्या बाबतीत शंका आली म्हणून त्याने येऊन माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांना विचारले. हीच त्याच्या ईमानधारक असण्याची निशाणी आहे. जर त्याच्या मनात अल्लाहचे भयन नसते, जर त्याला पवित्र व वैध कमाईची चिंता नसती तर त्यांच्याकडे गेलाच नसता. ज्यांना पारलौकिक जीवनातील उत्तरस्रfयत्वाची भीती नसते ते वैध व निषिद्धची पर्वा करतात काय?
व्यापार
माननीय राफेअ बिन खदीज (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! सर्वांत अधिक चांगली कमाई कोणती आहे?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘मनुष्याचे स्वत:च्या हाताने काम करणे आणि तो व्यापार ज्यात व्यापारी अप्रामाणिकपणा आणि खोटारडेपणाचा आधार घेत नाही.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरेदी करताना, विक्री करताना आणि आपले कर्ज मागताना मृदुपणा व सद्वर्तन करणाऱ्या मनुष्यावर अल्लाहची कृपा असो.’’ (हदीस : बुखारी)
माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यासह व्यवहार करणारा प्रामाणिक व्यापारी अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर, सत्यनिष्ठ आणि हुतात्म्यांबरोबर असेल.’’ (हदीस : तिर्मिजी)
0 Comments