Home A blog A वेळेचे व्यवस्थापन

वेळेचे व्यवस्थापन

वेळेचे व्यवस्थापन म्हणजे जीवनाचे व्यवस्थापन. ज्याला हे जमले तो यशस्वी आणि ज्याला हे जमले नाही तो अयशस्वी! प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकवेळेस मार्गदर्शन केलेले आहे.
    प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टींपूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा. (तिर्मिजी)
    या पाचही निर्देशांमध्ये वेळेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. साधारणपणे तारूण्य हे मनोरंजनासारख्या निरूपयोगी गोष्टींमध्ये तरूण वाया घालवतात. वास्तविकपणे तारूण्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग वेळेवर केल्यास अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ज्या की, प्रयत्न करूनही वृद्ध झाल्यानंतर करता येत नाहीत. व्यस्त होण्यापूर्वी जो रिकामा वेळ माणसाकडे असतो त्या वेळेच्या एकेका क्षणाचा उपयोग करण्याकडे माणसाचा कल असायला हवा. याची जाणीव ज्यांना असते तेच मोठमोठे कार्य करू शकतात. ज्यांना याची जाणीव नसते ते लोक आयुष्यात फार काही करू शकत नाहीत.
    एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे -1.जीवन कुठे व्यतीत केले? 2. तारूण्य कुठे खर्चि घातले? 3. संपत्ती कोठून मिळविली? 4. संपत्ती कोठे खर्च केली? 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला?
    यात पहिले दोन प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनासंबंधीचेच आहेत. जीवन कुठे व्यतीत केले? त्यातही तारूण कुठे खर्ची घातले? हे दोन प्रश्न असे आहेत की, वेळेचे कुशल व्यवस्थापन करू शकणाऱ्या इसमालाच या प्रश्नाची नीट उत्तरे देता येतील. अन्यथा या प्रश्नाची उत्तरे देणेच शक्य नाही. खरे तर ही हदीस आय ओपनिंग (डोळे उघडणारी) हदीस आहे. या हदीसला नीट समजून घेतल्यानंतर कोणताही सश्रद्ध मुस्लिम वेळेचा अपव्यय करण्याचे धाडस करणार नाही.
    प्रेषित सल्ल. यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचे प्रेषित्वाच्या आधीचे जीवन असो का प्रेषित्व मिळाल्यानंतरचे जीवन असो. दोन्हीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना मिळालेल्या वेळेच्या एकेका क्षणाचा सदुपयोग केलेला आहे. म्हणूनच कमी अवधीमध्ये इस्लामची सत्यता ते लाखो लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले.
    आजच्या आधुनिक जगामध्ये वेळेला प्रोडक्टीव्ह (उत्पादक) करण्याकडे सर्वांचा कल असतो. मुस्लिमांनी तर जगातच नव्हे तर मृत्यूनंतरचे जीवन सुद्धा सुखमय व्हावे, याचा विचार करायला हवा. त्यांच्या लेखी तर वेळेचे दुहेरी महत्व आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचे उत्पादक मुल्य कसे वाढविता येईल, याकडे लक्ष देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक मुस्लिमावर आहे.
    अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर पाच वेळेसची नमाज त्या-त्या नमाजच्या वेळेच्या बंधनात अदा करण्याची सक्ती केलेली आहे. जरा डोळसपणे पाहिल्यास, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी नमाजच्या माध्यमातून उत्कृष्ट असे वेळेचे व्यवस्थापन करण्याची संधी अल्लाहने आपल्याला दिलेली आहे. रमजानच्या रोजांची अनिवार्यता सहर आणि इफ्तारीच्या वेळेसह प्रत्येक मुस्लिमांवर अनिवार्य करण्यात आलेली आहे. यातूनसुद्धा आपल्याला वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. अनेक मुस्लिम स्वत:ला स्वतंत्र समजतात. कुठलेही वेळेचे बंधन पाळणे त्यांना जमत नाही. मनात आले तर नमाज अदा करतात, नाही आले तर करत नाहीत. मात्र त्यांना कळत नाही की, आखिरतच्या दिवशी प्रत्येक व्यक्तिला त्याला प्रदान करण्यात आलेल्या वेळेचा कसा उपयोग केला, याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यातून कोणालाच सूट नाही. म्हणून आपल्याला वेळेचे महत्व ओळखायला हवे.
    सैतान माणसांच्या पाठिमागे लागलेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनावर ताबा मिळवून त्याला अल्लाहच्या निर्देशाविरूद्ध चालण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. जो व्यक्ती सैतानाच्या कचाट्यात सापडून अनुशासनहीन जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो, हे आपण सर्व जाणून आहोत. माणसांनी वेळेवर दिलेले काम पूर्ण केले तर त्याच्यावर तणाव येत नाही. नमाजी माणसाला वेळेत दिलेले काम पूर्ण करण्याची सवय जडते. त्याच्यामुळे त्याचे जीवन तणावविरहित होते.
    आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा दिलेले काम (टार्गेट) वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नमाजचेच उदाहरण घ्या. अजान झाल्याबरोबर माणूस जर नमाजच्या तयारीला लागला तर वेळेवर नमाज अदा करू शकतो. तेच अजान झाल्यावरसुद्धा तो इकडे-तिकडे रमत राहिला आणि शेवटच्या दोन मिनिटात नमाज अदा करण्याचा प्रयत्न करू लागला तर ती अदा करण्यासाठी त्याला किती धावपळ करावी लागते व त्यातून कसा स्ट्रेस निर्माण होतो, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आलेलाच असावा. वेळेत काम करण्याची सवय नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे माणसाचे आरोग्यसुद्धा प्रभावित होते.
    रिकाम्या वेळाची कुठलीच संकल्पना इस्लाममध्ये नाही. उदा. फन (एन्जॉयमेंट), रिकामटेकडेपणा याला इस्लाममध्ये थारा नाही. सुरे अलमनशराहमध्ये प्रेषित सल्ल. यांना निर्देश देण्यात आले आहे की, ’फ-इजा फरगता-फअनसब व-इला रब्बिका फऱगब’ (जेव्हा तुमच्याकडे फारीग म्हणजे मोकळा वेळ असेल तेव्हा अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यस्त होवून जा.) प्रेषित सल्ल. यांना जेव्हा एवढी सक्त ताकीद देण्यात आली तेव्हा आपली काय बिशात? म्हणून फावल्या वेळी फालताड मालिका, क्रिकेट वगैरे पाहण्याचा व वेळ वाया घालवण्याचा एक श्रद्धावंत मुस्लिम विचार सुद्धा करू शकत नाही. माणसाकडे जस-जसे नवीन उपकरण येत आहेत तसा-तसा तो अधिक व्यस्त होत आहे. म्हणून प्रत्येक श्रद्धावंत माणसाला आपल्या वेळेची समिक्षा करावी लागेल. त्याला विचार करावा लागेल की आपला वेळ कुठे जास्त चाललाय? झोपेत जास्त चाललाये? की टी.व्ही. पाहण्यामध्ये जास्त चाललाय? की सोशल मीडियावर जास्त चाललाय?
    एखाद्या माणसाचे पंचाहत्तर वर्षे आयुष्य गृहित धरले आणि तो सरासरी दररोज सात तास झोपत असेल असे गृहित धरले तर 22 वर्षे नुसती झोपण्यात जातात. जर कोणी सात तासापेक्षा जास्त झोपेत असेल तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर त्या अतिरिक्त झोपेचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूसरा बहुमुल्य वेळ झोपण्यामध्ये जातो. कामाचे दहा तास जरी गृहित धरले तर तो 32 वर्षे सतत काम करत राहतो. तयार होण्यासाठी रोज 45 मिनिट जरी गृहित धरली तरी यात सव्वा दोन वर्षे निघून जातात. दैनंदिन जेवण वगैरे करण्यासाठी दीड तास गृहित धरला तरी तो साडे चार वर्षे व परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर 75 वर्षात तीन वर्षे तो वेळ खर्ची घालतो. मित्र परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर त्यातही तीन वर्षे निघून जातात.
    याशिवाय, उरलेला अन डिफाईन्ड जो वेळ असतो तो साधारणत: रोज तीन ते चार तास असतो. तर ह्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन केले व त्याला उत्पादक मुल्य कसे मिळवून देता येईल याचा विचार केला तर वेळेचे व्यवस्थापन केले असे म्हणता येईल. जर हे व्यवस्थापन करता आले नाही तर त्या वेळेचा सदुपयोग करता येणार नाही व त्या काळात माणसाची उत्पादकता कमी होईल, हाच वेळ वाचवून जर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला तर तो माणूस समाजासाठी हिताचा होवून जाईल, त्याच्या हातून मोठ-मोठी चांगली कामे होतील.
    अल्लाहने आपल्यावर फर्ज (अनिवार्य)  काय-काय केले आहे, याला केंद्रस्थानी ठेवून आपण वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. याउलट आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या इतर कामांना केंद्रस्थानी ठेवून वेळ मिळाल्यास फर्ज गोष्टींकडे लक्ष देत असतात. हेच ते लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या आदेशांची व वेळेच्या व्यवस्थापनाची पर्वा नाही.
    वेळेच्या बाबतीत चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट वेळ वाया घालविणे. दूसरी वेळ खर्ची घालणे, तीसरी वेळ वाचविणे, चौथी वेळेची गुंतवणूक करणे.         वेळ वाया घालविण्याचे सगळयात मोठे मार्ग टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहेत. आज अनेक व्यक्ति रिमोट हातात घेवून सारखे चैनल बदलत असतात. त्यांना कोणत्याच चॅनलवर समाधान मिळत नाही. अनेक लोक मोबाईल फोनवर अनावश्यक सामुग्री खात्री न करता इकडची तिकडे पाठवित असतात. त्यांची बोटं सारखी स्क्रीनवर चालत असतात. त्यांनाही कोणत्याच समाज माध्यमांवर समाधान मिळत नाही. अशा लोकांचा वेळ वाया जातो, मोठी कामे तर सोडा कधी-कधी स्वत:च्या घरगुती गरजांसुद्धा पूर्ण करण्यासाठी अशी माणसे कमी पडतात.
    दूसरी गोष्ट वेळ खर्ची घालणे, म्हणजे प्रत्येक माणसाला दरदिवशी चोवीस तास मिळत असतात. ते तास प्रत्येक माणूस कसा खर्ची घालतो, यावर प्रत्येक माणसाचे भविष्य अवलंबून असते. कोणतीही गोष्ट खर्च केल्याने संपून जाते. वेळ अमूल्य आहे. त्याला खर्च करतांना कोणत्या कारणासाठी आपण खर्च करीत आहोत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाला होणार नाही, तोपर्यंत रूपया जसा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो तसाच वेळ सुद्धा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो. वेळेला भांडवल समजून त्याची जर गुंतवणूक केली तर भविष्यात त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा आपल्याला मिळू शकतो. याची जाणीव प्रत्येक श्रद्धावंत मुस्लिमांने ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर कोणी कुरआन समजून वाचण्यात वेळ खर्च करीत असेल तर नक्कीच त्याचा परतावा त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या रूपाने मिळेल. या उलट जर कोणी आपला वेळ हॉटेलमध्ये बेकारच्या गप्पा मारण्यात खर्च करत असेल तर त्याचा परतावा त्याला नकारात्मक रूपात मिळेल. रूपयांच्या गुंतवणुकीतून कधी-कधी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वेळेच्या गुंतवणुकीतून कधीच नुकसान होत नाही.
    शेवटची गोष्ट म्हणजे वेळ कसा वाचविता येईल, याचाही विचार करणे. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. याचे उदाहरण असे की, समजा आपल्याला कोणाला भेटणे आवश्यक आहे, तर अगोदर दूरध्वनी करून त्यांची वेळ मागून घेणे व नंतर वेळेवर त्यांना जाऊन भेटणे म्हणजे वेळ वाचविणे. या उलट भेटीची वेळ न मागता, ते आहेत का नाहीत याचीसुद्धा  खात्री न करता गेल्यास इच्छित व्यक्ति हजर नसल्यास अगर इतर कामात व्यस्त असल्यास आपला जो वेळ वाट पाहण्यात जातो तो व्यर्थ जातो. तसेच रात्री तासन्तास गप्पा मारण्यात काही लोकांना मोठा आनंद होतो. वास्तविक पाहता इशाच्या नमाजनंतर अत्यावश्यक असल्याशिवाय जागरण करण्याची परवानगी नाही. दहाच्या आसपास झोपल्यास फजरच्या नमाजला बरोबर जाग येते. परंतु, आपण पाहतो की अनेक लोक विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागत असतात. विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की, लवकर झोपणारे आणि लवकर उठणारे लोकच स्वस्थ असतात. आजकाल रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. रात्रीतून जागरण केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सुरूवातीच्या काही तासाची झोप शरिरासाठी अत्यंत पोषक असते. प्रेषित सल्ल. लवकर झोपून तिसऱ्या प्रहरी उठत होते. 
    अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये तासनतास रमतात. आपण कसे होतो आणि कसे झालो. याचा विचार करीत राहतात. त्यात किती वेळ खर्ची जातो याचा त्यांना अंदाजच येत नाही. म्हणून आपण भूतकाळात जास्त रमू नये याची जाणीव निर्माण होणे व त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापनच होय.
    शेवटी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक सुस्ती आणि निष्काळजीपणामुळे माणसाचा वेळ वाया जातो. याशिवाय, वेळेचे व्यवस्थापन करण्यामध्ये योजनेचे फार महत्त्व आहे. कोणत्याही कामाची अगोदर योजना तयार करून नंतर ते काम करणे गरजेचे असते. कुठलीही योजना नसतांना काम सुरू केल्यास वेळ अनावश्यकरित्या खर्ची होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक माणसाने भौतिक तसेच आखिरतचे जीवन सफल व्हावे,  असे वाटत असेल तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.
अबरार मोहसीन
शहराध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *