अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या या प्रवचनाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अंतिम पैगंबरांचे कथन असून त्याचा मराठीत अनुवाद देत आहोत…
“महिमा आणि कृतज्ञता अल्लाहसाठीच आहे. आम्ही त्याचे आभार मानतो. त्याच्यासमोर मदतीची याचना करतो, (झालेल्या चुका आणि अपराधांची त्याच्या दरबारी) क्षमा मागतो आणि आपल्या इच्छा अभिलाषांच्या तसेच वाईट कर्मांच्या वाईट परिणामापासून रक्षण होण्यासाठी त्याच्या अभयछत्राखाली येतो. तो ज्याला मार्ग दाखवील त्याला कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि तो ज्याला मार्ग दाखविणार नाही, त्यास कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूजा अगर उपासनेस पात्र नाही आणि मुहम्मद (स.) त्याचे दास आणि पैगंबर आहेत.”
यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयतींचे पठण केले, त्याचा अनुवाद अशा प्रकारे आहे.
“लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.” (दिव्य कुरआन , ४ :१)
“हे श्रद्धावंतांनो! अल्लाहचे भय बाळगा जसे भय बाळगले पाहिजे आणि तुम्हाला अशा अवस्थेत मृत्यू यावा की तुम्ही अल्लाहचे आज्ञाधारक असावे.” (दिव्य कुरआन , ३:१०२)
“हे श्रद्धावंतांनो! अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि सत्य व रास्त गोष्टकरीत जा. अल्लाह तुमचे आचरण सुधारील आणि तुमचे अपराध क्षमा करील. जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या (स.) आज्ञांचे पालन करील, त्याला महान यश मिळेल.” (दिव्य कुरआन , ३३:७०- ७१)
0 Comments