धर्मशास्त्रीय व विधिवत इस्लाममध्ये माणसाच्या अंत:करणाची स्थिती पाहिली जात नाही व पाहिली जाऊ शकत नाही, तर केवळ त्याच्या तोंडी स्वीकृती व या गोष्टीस पाहिले जाते की तो ती आवश्यक चिन्हे प्रकट करतो किंवा नाही की ज्या तोंडी स्वीकृतीच्या पुष्टीसाठी आवश्यक आहेत.
जर एखाद्या माणसाने तोंडाने अल्लाह, प्रेषित (महम्मद स.), पवित्र करआन, परलोक व अन्य ईमानच्या (विश्वासाच्या) गोष्टी मान्य असल्याचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्या आवश्यक अटीसुद्धा पूर्ण केल्या ज्यांच्यामुळे त्या मान्य केल्याचा पुरावा मिळतो, तर त्याला इस्लामच्या वर्तुळात घेतले जाईल आणि सर्व बाबतीत त्याच्याशी मुस्लिम समजून व्यवहार केला जाईल. परंतु ही गोष्ट केवळ या जगापुरती आहे आणि ऐहिकदृष्ट्या ती कायदेशीर व सांस्कृतिक आधार उपलब्ध करून देते की ज्यावर मुस्लिम समाजाची रचना केली गेली आहे. याचा उद्देश याशिवाय अन्य काही नाही की अशा स्वीकृतीने जितके लोक मुस्लिम समाजात दाखल होतील त्या सर्वांना मुस्लिम मानले जाते. त्यांच्यापैकी कोणालाही अनेकेश्वरवादी ठरविले जात नाही. त्यांना एकमेकांवर धार्मिक, कायदेशीर, नैतिक व सामाजिक अधिकार प्राप्त असतात. त्यांच्या दरम्यान वैवाहिक संबंध प्रस्थापित होतात, वारसा संपत्तीची विभागणी होते आणि इतर सांस्कृतिक संबंध अस्तित्वात येतात.
वास्तविक इस्लाम
परंतु पारलौकिक जीवनात मानवाची मुक्ती आणि त्याला मुस्लिम व मोमिन ठरविला जाणे आणि अल्लाहच्या प्रिय दासांमध्ये त्याची गणना होणे या विधिवत मान्यतेवर अवलंबून नाही तर तेथे अस्सल गोष्ट माणसाची अंत:करणाची स्वीकृती, त्याच्या हदयाचा कल व त्याचे आनंदाने व आवडीने आपल्या स्वत:ला पूर्णपणे अल्लाहच्या हवाली करणे होय.
या जगात जे तोंडाने मान्य केले जाते ते केवळ इस्लामी न्यायाधीश, सामान्यजन व मुस्लिमांसाठी आहे, कारण ते केवळ प्रकट वस्तूच पाहू शकतात. परंतु अल्लाह माणसाच्या हृदयाला व त्यातील बाबींना पाहतो आणि त्याच्या ईमानचे मापन करतो.
त्याच्यापाशी ज्याप्रकारे माणसाचे परीक्षण केले जाते ते असे आहे की त्याचे जिणे व मरणे, त्याची प्रामाणिकता, त्याची आज्ञाधारकता व दासता आणि त्याचे संपूर्ण जीवनकार्य अल्लाहसाठी होत आहे की अन्य कोणासाठी? जर अल्लाहसाठी होत असेल तर तो मुस्लिम व मोमिन ठरेल आणि जर अन्य कोणासाठी होत असेल तर तो मुस्लिमही ठरणार नाही आणि मोमिनसुद्धा नाही. या दृष्टीने जो जितका निकृष्ट निघेल तितकाच त्याचा ईमान व इस्लाम निकृष्ट असेल. मग या जगात त्याची गणना कितीही श्रेष्ठ मस्लिमात झाली असेल आणि त्याला कितीही मोठ्या हुद्दयाने विभूषित केले गेले असेल.
अल्लाहजवळ केवळ या गोष्टीची किंमत आहे की जे काही त्याने तुम्हाला दिले आहे ते सर्वकाही तुम्ही त्याच्या मार्गात लावले किंवा नाही? जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तोच हक्क दिला जाईल जो प्रामाणिक लोकांना व उपासनेचा हक्क अदा करणाऱ्यांना दिला जातो. तुम्ही जर एखादी गोष्ट अल्लाहच्या उपासनेपासून वेगळी ठेवली तर तुमची ही मान्यता की तुम्ही मुस्लिम झाला म्हणजे स्वत:ला अल्लाहच्या हवाली केले, ही केवळ एक खोटी स्वीकृती ठरते. यामुळे जगातील लोक फसतील, या फसवणुकीमुळे तुम्हाला मुस्लिम समाजात स्थान मिळू शकेल, यामुळे जगात तुम्हाला मुस्लिमासारखे सर्व हक्क मिळू शकतील, परंतु अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला प्रामाणिक लोकांत स्थान देऊ शकत नाही.
जर तुम्ही मी दर्शविलेल्या या विधिवत व वास्तविक इस्लाममधील फरकाचा विचार केला तर तुम्हाला कळेल की याचे परिणाम केवळ पारलौकिक जीवनातच वेगळे होतील असे नव्हे तर या जगातसुद्धा एका मोठ्या प्रमाणावर वेगळी परिणती होईल. जगात जे मुस्लिम आज आढळतात ते सर्व दोन प्रकारांत विभाजित केले जाऊ शकतात.
0 Comments