‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटिका आणि तरीसुध्दा ते गाफीलच आहेत. त्यांच्याजवळ जो उपदेश त्यांच्या पालनकर्त्याकडून येतो, त्याला संकोचाने ऐकतात आणि दुर्लक्ष करतात. त्यांचे मन जगाच्या खेळ-तमाशात दंग आहे. अत्याचारी आपापसात कानगोष्टी करतात की, ‘हा इसम खरे तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे. मग तुम्ही डोळ्यादेखत जादूच्या फंद्यात अडकणार काय?’ प्रेषितांनी उत्तरादाखल सांगितले, माझा पालनकर्ता ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत आहे. तो ऐकणारा व जाणणारा आहे.’’(कुरआन २१:१-४)
ह्या कुरआनच्या सुरह क्र.२१(अंबिया) च्या प्रारंभिक पंक्ती आहेत. यातील पहिलेच वाक्य ‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची वेळ’’ आश्चर्यचकीत करणारे आहे. प्रत्येक मुस्लिमाचा परलोकावर विश्वास असतो. मरणोत्तर जीवनावर विश्वास इस्लामची एक बंधनकारक अट आहे. त्याशिवाय मनुष्य मुस्लिम होऊ शकत नाही. परलोकाचा अर्थ असा आहे की, हे जग एकेदिवशी संपुष्टात येऊन नवीन जग अस्तित्वात येईल. तेथे प्रारंभापासून तर शेवटपर्यंत सर्व मानवजात अल्लाहसमोर हजर होईल. मानवांच्या संपूर्ण आयुष्याचे लेखापरीक्षण होईल. त्यानुसार त्यांना योग्य मोबदला किवा शिक्षा मिळेल. दोन्ही कायमस्वरूपी राहतील. ज्या दिवशी ह्या जगाचा अंत होईल व परलोकाचे जग अस्तित्वात येईल तो दिवस अंतिम निवाड्याचा दिन असेल.
परलोकावरील श्रद्धेचा ईश्वरावरील श्रद्धेशी धनिष्ठ संबंध आहे. ईश्वर आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा नकार तोच करेल जो ईश्वराच्या अस्तित्वाला नकार देतो. कोणी ईश्वरास मान्य करावे व परलोकास अमान्य करावे हे असंभव आहे. बुद्धी याचा स्वीकार करत नाही. ईश्वर असेल तर एक दिवस असा यावयास पाहिजे की, ज्या दिवशी हे पाहिले जाईल की, कोणी ईश्वरास मान्य केले व कोणी अमान्य? ज्याने ईश्वरास मान्य केले त्याने त्याचे आज्ञापालन केले किवा नाही? ज्याने त्यास नकार दिला तर तो का दिला व आयुष्यभर त्याच मार्गावर मार्गक्रमण का केले? यावरच ही गोष्ट समाप्त होऊ नये, तर ही गोष्टही बुद्धीसंगत आहे की, पृथ्वी व आकाशांचा निर्माता व समस्त जगाचा सम्राट याच्या आदेशाचे ज्याने आज्ञापालन केले व त्यासाठी सर्व प्रकारचा त्रास सहन केला, तर त्याला ऐश्वर्य व पुरस्काराने सन्मानित केले जावे. हा पुरस्कार त्याच्याकडून असावा व त्याच्या महान प्रतिमेस साजेसा असावा ज्याच्या आदेशाचे मानवाने पालन केले व ज्याच्या आदेशाच्या उल्लंघनापासून स्वतःस सुरक्षित ठेवले. त्याचप्रकारे ज्याने ईश्वरास नाकारले आणि संपूर्ण आयुष्य त्याच्या आदेशाविरुद्ध कार्य केले, त्याची चौकशी होऊन त्यास त्याच्या गुन्ह्याच्या स्वरुपाने शिक्षा मिळणे बुद्धिसंगत आहे.
परलोकावरील श्रद्धेचा आमच्या जीवनाशी धनिष्ठ संबंध आहे आणि ती जीवनाच्या सर्व अंगांना प्रभावित करते. परलोकावरील श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धेस बळकट करते आणि त्यास एक शाश्वत सत्य बनवते. ती मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा मनुष्याला ईश्वराच्या अधिक निकट करते व ह्यामुळे एकीकडे ईश्वराविषयी मनात प्रेम निर्माण होते, तर दुसरीकडे ईशकोपाविषयी मनात भय निर्माण होते. परलोकध्यास, ईश्वराची शिक्षा, बक्षीस, दया, कृपा व त्याचा कोप याची सतत आठवण करून देतो. ही श्रद्धा त्याला कुकर्माच्या मार्गापासून रोखून धरते व त्यास ईश्वराच्या आज्ञापालनास बाध्य करते. ही परलोक श्रद्धा माणसात अल्लाहच्या बक्षिसांची ओढ निर्माण करते. ही श्रद्धा त्याच्या यातनांपासून निर्भय होऊ देत नाही. ही श्रद्धा आठवणीने मनास सदैव टवटवीत ठेवते.
परलोकावरील श्रद्धा ही काही निर्जीव बाब नाही. ही श्रद्धा अंतःकरणामध्ये अत्यंत शक्तिशाली व क्रांतिकारी बदल घडवत आहे. तसेच ही श्रद्धा हृदय व मस्तिष्क यामध्ये स्थान प्राप्त केल्यानंतर मनुष्याचा संपूर्ण कायापालट करून टाकते. त्याच्या जीवनास व चारित्र्यास पवित्रता तथा सन्मार्ग प्रदान करते आणि मनुष्य चांगल्या गोष्टींचा ध्वजवाहक बनतो, तसेच वाईट गोष्टींविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करतो. परलोकध्यास पुण्य आणि ईशपरायणतेचा आत्मा निर्माण करतो आणि कुकर्म व पाप याविषयी घृणा निर्माण करतो. ही श्रध्दा भोगवादी माणसात संयम, जबाबदारी व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करुन त्याचे लक्ष सतत मृत्युपश्चातच्या जीवनावर केंद्रीत करते. मनुष्यास अल्लाहच्या आदेशाचा अनुपालक त्याच्या मार्गदर्शनावर मार्गक्रमण करणारा व सत्यधर्माचा ध्वजवाहक बनवते. या श्रद्धेमुळे मनुष्य सन्मार्गाचा संरक्षक व त्याचा निमंत्रक बनतो. ही श्रद्धा मनुष्यामध्ये सत्याचा आदर व त्याची सेवा करण्याची भावना निर्माण करते व त्यासाठी आपले सर्वस्व पणास लावण्याची भावना निर्माण करते. यामुळे असा मनुष्य अस्तित्वात येतो ज्याचे चित्र कुरआनमध्ये अशा प्रकारे रेखाटले आहे की,
‘‘वास्तविकता जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या आयतीवर(ईशग्रंथ) श्रद्धा ठेवतात. जे आपल्या पालनकर्त्याबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात, जे काही देतात आणि त्यांच्या हृदयाचा या विचाराने थरकांप होत असतो की, आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे, तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि सरशी करून त्यांना प्राप्त करणारे आहेत. आम्ही कोणत्याही इसमावर त्याच्या आवाक्यापेक्षा जास्त ओझे लादत नसतो आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे जो(प्रत्येकाची स्थिती) यथायोग्य दाखविणारा आहे.’’(कुरआन २३ : ५७-६२)
जरा विचार करा! जर कोणास या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे व हा विश्वास त्याच्या अंतरंगामध्ये भिनला असेल की, मरणोपरांत एकेदिवशी त्याची विचारपूस होईल. एक-दोन दिवस किवा महिने दोन महिने नव्हे तर जेव्हापासून तो सज्ञान झाला तेव्हापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनाच्या एक एक क्षणाचा हिशोब होईल. तर मग तो अंतिम दिवसासारख्या भयावह दिवसास कसा विसरेल? त्यास विसरुन कसे आयुष्य व्यतीत करेल? एखाद्या व्यापार्यास जर थोडीशी पूर्वसूचना मिळाली की, आयकर अधिकारी येणार आहे, तर तो घाबरून आपले लेखाविवरण अद्ययावत करून घेतो. यावरुन आपण विचार करू शकतो की, ज्या व्यक्तीला याचा पूर्ण विश्वास आहे की, त्याचे कोणतेही कृत्य अल्लाहपासून लपलेले नाही. तो त्याच्या प्रत्येक कृत्यावर नजर ठेऊन आहे. त्याच्या व अल्लाहच्या दरम्यान अंतरपाट नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यावर सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. तो सर्व जाणणारा आणि प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणारा आहे. अंतिम दिवशी तो क्षणा-क्षणाचा हिशोब घेईल आणि मनुष्याच्या लहान-मोठ्या कृत्याचा त्यास मोबदला देईल, तर सांगा की, त्याचे आयुष्य बेफिकीर व बेसावध कसे व्यतीत होईल? त्यावर बेसावधगिरी व बेफिकिरी तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा तो अंतिम दिवसावर विश्वास ठेवणार नाही. ह्याची संभावना आहे की, अंतिम दिवसावर विश्वास असल्याचे तोंडी अभिवचन दिले जावे, मात्र त्याचे मन या विश्वासापासून रिक्त असावे, तर मग तो अंतिम दिवसाचा दावेदार असूनही अल्लाहपासून भयभीत होणार नाही. खर्या अर्थाने अंतिम दिवसाचे भय ज्याच्या मनी असेल त्याच्याबाबतीत असा विचार केला जाऊ शकत नाही की, तो अल्लाह व अंतिम दिवस विसरला असेल आणि त्याचे जीवन पाप व वाईट कृत्यामुळे कलंकित झाले असेल. तो या जगाच्या सर्व अडचणी, व्यस्तता यामध्येसुद्धा त्या दिवसाच्या भयाने भयभीत होईल. कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘(अल्लाहच्या या घरांत) असे लोक आहेत, ज्यांना व्यापार आणि खरेदी-विक्री अल्लाहच्या स्मरणापासून, नमाज प्रस्थापित करण्यापासून व जकात देण्यापासून बेसावध ठेवीत नाही. ते त्या दिवसाची भीती बाळगतात ज्या दिवशी हृदयात खळबळ माजण्याची व डोळे स्थिरावण्याची पाळी येईल.’’(कुरआन २४:३७)
अंतिम दिवसाची वेळ निश्चित आहे त्यास टाळले जाऊ शकत नाही. पृथ्वी, आकाश व संपूर्ण सृष्टी त्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. जो दिवस व्यतीत होत आहे तो प्रलयाच्या घटकेला जवळ जवळ करीत आहे. प्रत्येक दिवसाचा उगवता सूर्य स्पष्ट करत आहे की, त्याच्या कालावधीतून एक दिवसाची कपात झाली आहे, परंतु आश्चर्य आहे की, मनुष्य तरीसुद्धा बेसावध, निश्चिंत आहे. जेव्हा त्याला याची आठवण करून दिली जाते तेव्हा तो त्यास अत्यंत निष्काळजीपणाने ऐकतो जसे त्याचे काही महत्त्वच नाही. याकडे जर त्याचे लक्ष असते व आपल्या अवस्थेची त्यास चिता असती तर तो बेसावध राहिला नसता. तो जागरूक राहिला असता व आपला एक एक पाय फुंकून ठेवला असता. अल्लाहच्या कोपाची त्यास भीती वाटली असती व अल्लाहच्या कृपेच्या शोधात तो राहिला असता. परंतु या जगाने त्यास आपल्या कवेत घेतले आहे व अंतिम दिवसाचा विचार त्याच्या नजरेपासून दूर गेला आहे. परंतु ती वेळ तीव्र गतीने येत आहे व त्यास जास्त वेळ नाही जेव्हा या बेसावधपणाचे परिणाम त्याच्या समोर असतील व त्यास भोगण्यासाठी तो विवश असेल. जर त्यास माहीत असते की, त्यावेळी तो किती तोट्यात असेल आणि किती अपयश त्याच्या पदरी येईल, तर खचितच तो असा बेसावध राहिला नसता.
‘‘निःशंक ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे ऐहिक जीवनावर संतुष्ट व समाधानी बनले आहेत व जे लोक आमच्या आयतींपासून बेसावध आहेत, त्यांचे अंतिम ठिकाण नरकाग्नी असेल त्या दुष्कृत्यांपायी जे ते करीत राहिले.’’(कुरआन १०: ७-८)
याचविषयी आणखी एक कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘वस्तुस्थिती अशी आहे की, जे लोक मरणोत्तर जीवन मानीत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनविले आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी भयानक शिक्षा आहे आणि मरणोत्तर जीवनात हेच सर्वांत जास्त तोट्यात राहणारे आहेत.’’(कुरआन २७ : ४-५)
पवित्र कुरआन या वास्तविकतेला विविध रूपाने व शैलीने समजावून सांगतो की, अंतिम दिवस येणारच आहे व मनुष्य आपल्या कार्याचे फळ प्राप्त करील. हा अल्लाहचा निर्णय आहे. कोणातही ही शक्ती नाही की, तो त्याच्या निर्णयास बदलू शकेल किवा त्यास लागू होण्यापासून रोखू शकेल. परंतु दुःखद बाब! मनुष्य त्यास अशक्य बाब समजून नाकारून देतो आणि त्याकडे अशा दृष्टीने पाहतो की, जसे ही बाब त्यास शक्य नाही तशीच ईश्वरासाठी शक्य नाही. जर त्यास हे उमगले असते की, ईश्वरास कोणतीही बाब अशक्य नाही! तो अगाध शक्तिशाली आहे. तो जेव्हा व जे इच्छितो ते होते. ज्या ईश्वराने हे विशाल जग निर्माण केले, त्याची एक व्यवस्था निश्चित केली. ही व्यवस्था भंग करून एक दुसरी व्यवस्था नवीन सिद्धांत व नियमांच्या अंतर्गत निर्माण करणे त्यास कसे अशक्य आहे?
‘‘आणि काय या लोकांना हे उमगत नाही की, ज्या अल्लाहने ही पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केले व त्यांना निर्माण करतांना तो थकला नाही, तो खचितच याला समर्थ आहे की, मृतांना जिवंत करील? का नाही. निश्चितच तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे.’’(कुरआन ४६ : ३३)
ह्याची एक बाजू अशी आहे की, या सत्यतेस दर्शविणारा, समजावून सांगणारा कोणी सामान्य व्यक्ती नसून स्वतः ईश्वराचा प्रेषित आहे. ते व्यक्तिमत्त्व आहे ज्याचे सद्आचरण सत्य आणि श्रद्धावंत मित्रच नव्हे तर शत्रुही स्वीकारतात, जो स्वतःच्या जातीसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व्याकूळ राहत असे. जो रात्रंदिवस तडफडत असे की, ही मानवजात ईश्वराच्या कोपाची बळी ठरू नये. तो आपल्या मनाने, संकल्पनेने किवा परंपरेने नव्हे तर ईश्वराकडून सांगत होता की, अंतिम दिवस येईलच. याला खेळ किवा तमाशा समजू नका. ही एखाद्या स्पर्धेच्या निर्णयाची बातमी किवा व्यापारातील उतार-चढावाची सूचना नव्हती, तर ती अशा दिवसाची बातमी होती ज्या दिवशी मनुष्याच्या भविष्याचा निर्णय होईल व तो कायमस्वरुपी असेल. त्यानंतर एक तर स्वर्ग असेल किवा नरकाग्नी. कुरआन दुःखाने सांगतो की, नेहमी सत्य बोलणार्या प्रेषित मुहम्मद(स) यांची इतकी महत्त्वपूर्ण बातमी ऐकल्यानंतरही हे अत्याचारी यास सहजतेने घेत आहेत. आपसात कानगोष्टी करत आहेत की, ही सुद्धा आमच्यासारखीच व्यक्ती आहे. याच्यात असे कोणते वैशिष्ट्य आहे की, आम्ही यास प्रेषित मानून याच्यावर विश्वास करावा? याच्याकडे कोणते धन, ऐश्वर्य, पद किवा अधिकार आहेत? कोणती बाब आहे जी त्यास सरदार किवा नेतृत्वयोग्य बनवते? शेवटी हा कसा ईशदूत बनला व अल्लाहकडून बोलू लागला? हा ईशदूत आणि त्यांच्या सत्यतेविरुद्ध काही तर्क नव्हता. यामुळे त्याच्या सत्यतेचे खंडण होत नव्हते. ही अंधश्रद्धा, अनुचित पक्षपात, परंपरा याचे अंधानुकरण होते, जे एका सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक ठेवीदाराच्या विरोधास प्रोत्साहित करत होते आणि त्याच्या लौकिक आणि परलौकिक दुष्परिणामास पाहू देत नव्हते. हे सर्वकाही होत होते. याव्यतिरिक्त प्रेषित मुहम्मद(स) यांच्या गोष्टी लोकमनावर परिणाम करत होत्या आणि शत्रूपक्षातील जीवनाच्या प्रती गंभीर आणि पुण्यवान लोक सत्य व वास्तविकता याचा मनोभावे स्वीकार करत होते. विरोधक हे पाहून आश्चर्यचकित होत होते. ते म्हणायचे ‘‘हा तर जादूगार आहे, जादू करत आहे. याच्यापासून दूर राहण्यामध्येच आपला फायदा आहे. ही काही बुद्धिमत्ता नाही की आम्ही जाणूनबुजून एखाद्या जादूगारचे अनुकरण करावे.’’ कुरआनने त्यांच्या या अशिक्षित व अप्रगल्भतेचे काहीही उत्तर दिले नाही. त्याने सांगितले की, तुमच्या गोष्टी, तुमच्या कानगोष्टी आणि तुमच्या योजना, त्या मग जग किवा आकाशाच्या कोणत्याही कोपर्यात असू दे, अल्लाह त्यांच्याशी चांगला परिचित आहे. तोच त्यांचा हिशोब घेईल.
‘‘तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतावयाचे आहे आणि तो सर्वकाही करू शकतो. पहा, हे लोक आपली छाती वळवितात की जेणेकरून त्याच्यापासून लपावे. खबरदार, जेव्हा हे वस्त्रांनी स्वतःला झाकतात. अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो व प्रकट गोष्टींनादेखील. त्याला तर रहस्याचेदेखील ज्ञान आहे जे मनात आहे.’’(कुरआन ११ : ४-५)
पुन्हा एके ठिकाणी ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यात आली की,
‘‘ते म्हणतात की, हे वचन केव्हा साकार होईल तर तुम्ही खरे असाल? सांगा, यात काय नवल की, ज्या कोपासाठी तुम्ही घाई करीत आहात त्याचा एक भाग तुमच्याजवळ येऊन ठेपला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, तुझा पालनकर्ता तर लोकांवर फार मेहेरबानी करणारा आहे. परंतु बहुतेक लोक कृतज्ञता दर्शवीत नाहीत. निःसंशय तुझा पालनकर्ता चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या मनामध्ये दडलेले आहे आणि जे काही ते व्यक्त करतात. आकाश व पृथ्वीची कोणतीही गोष्ट अशी नाही, जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नाही.’’(कुरआन २७:७१-७५)
अंतिम दिवस अवश्य येईल. जेव्हा येईल तेव्हा या जगाची उलथापालथ होऊन त्याच्या जागी जे नवीन जग अस्तित्वात येईल त्याची अवस्था कुरआनमध्ये विविध ठिकाणी आलेली आहे.
याविषयी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल आणि जेव्हा तारे निखळून पडतील आणि जेव्हा पर्वत चालविले जातील आणि जेव्हा दहा महिन्यांच्या गर्भिली उंटिणी आपल्या दशेत सोडून दिल्या जातील आणि जेव्हा वन्य पशु समेटून एकत्र केले जातील आणि जेव्हा समुद्र भडकविले जातील आणि जेव्हा प्राण(शरीरांशी) जोडले जातील आणि जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की, ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली? आणि जेव्हा कर्मनोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरक भडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल, त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे.’’(कुरआन ८१ : १-१४)
कुरआनमध्ये दुसर्या एका ठिकाणी आहे की,
‘‘जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि समुद्र फाडून टाकले जातील आणि कबरी उघडल्या जातील, त्यावेळी प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल.’’(कुरआन ८२ : १-५)
किती भीतीदायक दृश्य आहे. काय अवस्था असेल जेव्हा ही सर्व जगाची व्यवस्था अस्ताव्यस्त असेल. धरती आणि आकाश टूट-फूटमुळे प्रभावित असतील. सूर्य, चंद्र आणि तारे प्रकाशहीन होतील. ग्रह आणि तारे स्वतःची आकर्षण शक्ती गमावून आपसांत धडकतील. समुद्रांमध्ये अग्नी भडकेल. पर्वत भुगा होऊन पडू लागतील. जंगलातील हिसक प्राणी आपली हिसा आणि पशुता विसरतील. मौल्यवान पाळीव प्राणी, दुभती जनावरे यांना कोणी विचारणार नाही. थडगी उकरून फेकली जातील आणि मनुष्याच्या समोर स्वर्ग आणि नरक असतील. एकीकडे सर्व सुविधायुक्त स्वर्ग तर दुसरीकडे आपल्या रौद्ररूपात नरक असेल.
त्यावेळी आमच्या धरणीची काय अवस्था असेल त्याविषयी कुरआनोक्ती आहे,
‘‘जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे? त्यादिवशी ती आपले अहवाल निवेदन करील, कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला आज्ञा दिलेली असेल, त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील.’’(कुरआन ९९ : १-८)
याचाच अर्थ असा की, या संपूर्ण सृष्टीला एक प्रलय अस्ताव्यस्त करून टाकील. पृथ्वी आपल्यातील संपत्ती, खनिज पदार्थ बाहेर टाकून देईल. पृथ्वीवर दुष्कर्मी आणि सुकर्मी गमन करीत आहेत. सर्वांसाठी ती प्रशस्त आहे. इतकेच नव्हे तर अनेक दुष्कर्म तिने झाकून ठेवली आहेत. त्या दिवशी ती ह्या सर्व गुपित गोष्टी स्पष्ट करील आणि आपल्यावरील कर्माची गोष्ट स्पष्ट करील. मनुष्याचे पाऊल ज्या भूभागावर पडले असेल तो भूभाग स्पष्ट करील हे पाऊल सतकृत्यासाठी की वाईट कृत्यासाठी पडले होते. समस्त मानवजात इकडून तिकडे फिरत राहील. समविचारी लोकांचे समुह बनतील. प्रत्येकाच्या समोर त्याच्याकडून घडलेले छोटेसे पाप किवा पुण्य परिणामासह येतील.
अंतिम दिवशी मनुष्याच्या अवस्थेविषयी कुरआनोक्ती आहे,
‘‘लोकहो, आपल्या पालनकर्त्याच्या कोपापासून स्वतःला वाचवा, वस्तुस्थिती अशी आहे की, पुनरुत्थानाचा हादरा महा(भयंकर) गोष्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही पहाल, की प्रत्येक दूध पाजणारीला आपल्या दूध पिणार्या बाळाचा विसर पडेल. प्रत्येक गर्भवतीचा गर्भपात होईल आणि लोक तुम्हाला नशेत दिसतील. वास्तविक पाहता त्यांनी नशा केली नसेल तर तो अल्लाहचा भयंकर कोपच असेल.’’(कुरआन २२ : १-२)
समस्त मानवजातीस आव्हान करण्यात आले आहे की, अल्लाहची भीती बाळगा, कारण अंतिम दिवस येणार आहे. त्याची उलथापालथ भयानक असेल, त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आत्ताच गुजरातमध्ये भूकंप आला. हे सर्व जगामध्ये किवा संपूर्ण भारतात नव्हे तर भारतातील एका भागात आला. यामुळे जो भय, आतंक निर्माण झाला होता, लोक आपले घर व्यापार सोडून पळाले होते. हे सर्व आमच्या ताज्या आठवणी आहेत. भूकंपानंतरही लोकांच्या मनात एवढी दहशत होती की, लोक आपल्या मोडक्या तोडक्या घरात जाऊन त्यास पुन्हा पुनर्जीवित करण्यास तयार नव्हते. त्यांच्या मनात भीती होती की, न जाणो केव्हा काय होईल? अंतिम दिवसाच्या अस्ताव्यस्ततेसमोर तर याची काहीच तुलना नाही. जसे कणासमोर पर्वत आहे. अंतिम दिवसाची अवस्था अशी असेल की, अंगावर दूध पाजणारी आई आपल्या मुलाला विसरून जाईल. भीती व आतंक याची ही अवस्था असेल की, मूल आईच्या कुशीत असतांना तिला त्याचे भान नसेल. तिला याचेसुद्धा भान नसेल की, तो दूध पीत आहे किवा नाही. असे आवाज व स्फोट होतील की, लोक आपली मती गमावून बसतील. ही अवस्था काही गुंगी आणणार्या पदार्थांपासून नव्हे तर ती ईश्वराच्या यातनांमुळे होईल.
ही बाब कुरआनात एके ठिकाणी स्पष्ट केली आहे,
‘‘सरतेशेवटी जेव्हा तो कान बधीर करणारा आवाज दुमदुमेल त्या दिवशी माणूस आपला भाऊ आणि आपली आई आणि आपले वडील आणि आपली पत्नी व आपल्या संततीपासून दूर पळेल. त्यांच्यापैकी प्रत्येक माणसावर त्या दिवशी अशी वेळ येऊन ठेपेल की, त्याला आपल्या खेरीज कुणाचेही भान राहणार नाही. काही चेहरे त्या दिवशी चमकत असतील आणि काही चेहर्यांवर त्या दिवशी धूळ उडत असेल आणि काळिमा पसरलेला असेल. हेच अश्रध्दावंत व दुराचारी लोक असतील.’’(कुरआन ८० : ३३-४२)
हीच बाब अन्य ठिकाणी स्पष्ट केली आहे,
‘‘हे लोक त्याला दूर समजतात आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदीसमान होईल आणि पर्वत रंगीबेरंगी पिजलेल्या लोकरीसमान होतील आणि कोणी जिवलग दोस्त आपल्या जिवलग दोस्ताला विचारणार नाही. वस्तुतः ते एकमेकाला दाखविले जातील. अपराधी इच्छिल की, त्या दिवसाच्या कोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला, आपल्या पत्नीला आपल्या भावाला आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते आणि पृथ्वीतलावरील सर्व लोकांना, मोबदला म्हणून तो देईल आणि या व्यक्तीमुळे त्याला मुक्ती मिळेल. कदापि नाही, ती तर भडकत्या अग्नीची ज्वाला असेल, जी मांस व कातडीला चाटून टाकील. हाका मारून-मारून आपल्याकडे बोलाविल त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्याने पाठ फिरविली आणि संपत्ती संचित केली आणि जपून जपून ठेवली.’’(कुरआन ७० : ६ – १८)
त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्याचे कार्यविवरण पत्र असेल. त्यामध्ये त्याच्या प्रत्येक सुकर्म व कुकर्म तसेच प्रत्येक लहान-मोठ्या पाप व पुण्यांची नोंद असेल. दुष्कर्मी व दुराचारी लोकांचे कार्यविवरण पत्र त्यांच्या डाव्या हातात दिले जाईल. ते लोक किती भाग्यशाली असतील, ज्यांच्या उजव्या हातात त्यांचे विवरणपत्र असेल; तर दुर्भागी असतील ते ज्यांच्या डाव्या हातात त्यांचे कार्यविवरण पत्र असतील. कुरआनच्या आरशात त्यांची प्रतिमा पाहा,
‘‘तो दिवस असेल जेव्हा तुम्ही हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही. त्यावेळी ज्याच्या कर्मांची नोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, ‘‘घ्या, पाहा वाचा माझी कर्मनोंद. मला वाटत होते की, जरूर माझा हिशोब मला मिळणार आहे.’’ तर तो मनपसंत ऐश्वर्यात असेल. उच्चस्थानी स्वर्गात ज्याच्या फळांचे घड झुकले जात असतील. अशा लोकांना सांगितले जाईल, मजेत खा आणि आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही गत दिवसांत केली आहेत आणि ज्यांची कर्मनोंद त्यांच्या डाव्या हातात दिली जाईल तो म्हणेल. ‘‘हाय हाय माझी कर्मनोंद मला दिली गेली नसती आणि मी जाणले नसते की माझा हिशेब काय आहे, माझा तोच मृत्यू(जो जगात आला होता) निर्णायक ठरला असता. आज माझी संपत्ती माझ्या काहीच उपयोगी पडली नाही. माझी सर्व सत्ता संपुष्टात आली.’’(आज्ञा होईल) धरा याला आणि याच्या मानेत जोखड घाला, मग याला नरकामध्ये झोकून द्या. मग याला सत्तर हात लांब साखळीत जखडा. हा श्रेष्ठ व उच्चतर अल्लाहवर श्रध्दाही ठेवीत नव्हता व गरिबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता. म्हणून आज येथे याचा ना कोणी दुःखाचा वाटेकरी मित्र आहे ना जखमांच्या पूशिवाय त्याच्यासाठी कोणते जेवण, ज्यास अपराध्याशिवाय कोणीही खात नाही.’’(कुरआन ६९ : १८-३७)
अंतिम दिवसाच्या बक्षीस व दंडाचे वर्णन कुरआनमध्ये अन्य अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. याचे चित्र सुरह – ८८(गाशिया) मध्ये असे रेखाटलेले आहे,
‘‘काय तुम्हाला त्या व्यापून टाकणार्या आपत्ती(म्हणजे पुनरुत्थानाची) बातमी पोहचली आहे? काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील. कठोर परिश्रम करीत असतील. थकून जात असतील. तीव्र आगीत होरपळून निघत असतील. उकळत्या झर्याचे पाणी त्यांना पिण्यास दिले जाईल. काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतेही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही जे ना पुष्ट करील, जे ना भूक शमवील. काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लीत असतील. आपल्या कामगिरीवर आनंदीत असतील. उच्चकोटीच्या स्वर्गामध्ये असतील. तेथे कोणतीही व्यर्थ गोष्ट ते ऐकणार नाहीत, त्यात झरे प्रवाहीत असतील. त्याच्यात उच्च आसने असतील, लोडांच्या रांगा लावलेल्या असतील आणि उत्कृष्ट बिछाने अंथरलेले असतील.’’(कुरआन ८८ : १-१६)
‘‘लोकांनो! हिशोबाची वेळ जवळ आली आहे.’’
संबंधित पोस्ट
0 Comments