Home A blog A रमजान

रमजान

जरी दिनदर्शिकेतील नववा महिना हा रमजान महिना होय. रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिन्यांत अग्रस्थानी असलेला व वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा  असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत  मुहम्मद (स.) यांचा सर्वांत प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
इस्लाम धर्मातील हिजरी महिने हे चांद्रिक कालगणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवातदेखील चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते  याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत (स्वर्ग) चे दार उघडले जाते व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे, त्यांनी पुढे व्हावे व जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत, त्यांनी त्यापासून दूर रहावे.
या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
१. रोजा
२. नमाज व तरावीहची विशेष नमाज
३. शबे कद्रची रात्र
४. कुरआन
५. जकात उल फित्र

१. रोजा (उपवास) –
रोजा म्हणजे पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी करून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्नपाण्याचा एक कणसुध्दा खाणेपिणे वर्ज्य असते, असे पूर्ण  महिनाभर – अर्थात २९ ते ३० दिवस चालते. रोजा, या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्षे चालणाऱ्या यंत्राला, गाडीला वर्षातून एकदा का होईना  सर्व्हिसिंग करून घेतो – जेणेकरून गाडीचे, यंत्राचे कार्य सुरळीत होवो व त्याचे आयुष्य वाढो. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्नप्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीररूपी यंत्र  सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे, म्हणून रोजा केला जातो. यामुळे शरीराची अन्नप्रक्रिया आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
रोजा असलेल्या रोजादाराच्या पोटात सामान्यापेक्षा दीर्घ काळासाठी अन्नपाणी नसल्याने पोटात एक प्रकारची ऊर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिकरित्या कमी होते. म्हणजेच  रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंतांना भूक व तहान याची प्रचिती करून देतो, ज्यामुळे यांना गरिबीची जाणीव होते. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे पोटभर जेवण न  करता एक वेळ जेवून उपाशी राहून ज्या वेदना/त्रास सहन करतो, त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजांमुळे होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात. श्रीमंत लोकांच्या मनात गरिबांबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजांमुळे निर्माण होते. याचा  परिणाम अन्नधान्य, वस्त्र, धन, इत्यादी दान करण्याची इच्छा प्रबळ होऊन – ते दान वास्तवात गरजू असलेल्या गरिबांच्या पदरात पडून बऱ्याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग  मोकळा होतो, तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवयही रोजादारांना या रमजानच्या रोजांमुळे होते.
रोजा हा गर्भवती महिला, प्राणघातक आजार असलेली व्यक्ती (उदाहरणार्थ : कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवनमरणाचा प्रश्न उदभवू शकतो अशा व्यक्ती, लांब  पल्ल्याचे प्रवासी, कमीतकमी सात वर्षे ते अकरा वर्षे वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांना माफ करण्यात आला आहे.

२. तरावीह (रात्रीची विशेष नमाज) :
मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, दुपारी असरची नमाज (सूर्यास्ताच्या आधी), सायंकाळी मगरीबची नमाज  आणि रात्री इशाची नमाज अशी एकूण पाच वेळेची नमाज आहेत. नमाज हा ही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. नमाजची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द ‘अल्लाहू अकबर’ याचा अर्थ  होतो की, ‘तो सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे’ आणि त्याच्या प्रार्थनेची अर्थात नमाजची वेळ झालेली आहे – मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरिब सर्व जण त्या पवित्र  ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरिक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तरावीहची विशेष अशी नमाज पूर्ण  महिनाभर होते. विविध मस्जिदीत या तरावीहच्या विशेष नमाजमध्ये रोज कुरआनचे पठण केले जाते.

३. शब-ए-क़द्र (पवित्र रात्र) :
सर्वांत पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ‘आम्ही याला (कुरआनला) क़द्रच्या रात्री अवतरले आहे.’ (दिव्य कुरआन ९७:१)
या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो, इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या १०००  महिन्यांच्या तुलनेतदेखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
‘कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’ (दिव्य कुरआन ९७:३)
या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्त्व आहे. कोणीही खऱ्या भक्तिभावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्चात्ताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली  तर नक्कीच गुन्ह्यांची माफी मिळते, परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.

४. कुरआन :
इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांच्यावर अल्लाहकडून अवतरलेला आसमानी संदेश – कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानवजातीकरिता मार्गदर्शन  आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले – मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’ (दिव्य कुरआन २:१८५) 
जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे, तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी ३० खंड, ११४ अध्यायांमध्ये करण्यात आली आहे. यात ६००० पेक्षाही जास्त  आयत आणि विशेष म्हणजे १००० पेक्षा जास्त आयत या आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत. कुरआन हा पवित्र ग्रंथ असून कयामतपर्यंत (अंतिम निवाड्याचा दिवस) हयात आणि  कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: अल्लाहने स्वीकारलेली  आहे व याच प्रमुख कारणामुळे आज साडे चौदाशे वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या कानामात्रात कोणताही बदल झालेला नाही आणि इन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.
‘उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन १५:९)

५. जकात उल फित्र (दानधर्म) –
हा रमजान महिन्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. ‘जकात उल फित्र’ म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत, सधन आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक  व्यक्तीमागे २.५ किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते, जेणेकरून त्या गरीब  कुटुंबालादेखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे. थोडक्यात जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न (सोन्याचांदीचे स्रfगने, भूखंड, बँक बॅलन्स, शेतीतून मिळणारे उत्पन्न) हे एकूण २०  लाख होत असल्यास, त्यास २.५ टक्के प्रमाणे रुपये ५०,००० हे जकात देणे बंधनकारक आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटुंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकात उल फित्रचे महत्त्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात उल  फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाच्या वर्षभराची खाण्यापिण्याची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
वरील माहितीवरून आपल्या असे लक्षात येते की, रोजा (उपवास) म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तरावीहची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत  झालेली रात्र), कुरआन, जकात व फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे.
जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खऱ्या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, जुगार या अनैतिक गोष्टींपासून  दूर नसेल तर प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजादाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
महिनाभराच्या उपवासानंतर चंद्रदर्शन होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष हे सुवासिक तेल, अत्तर (इत्र) लावून, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष  नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिदमध्ये जातात. या विशेष नमाजला ‘ईद-ऊल-फित्र’ची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर एकामेकांना आलिंगण (गळाभेट)  देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार व विविध खाद्यपदार्थांची मेजवानी होते.

– इक्बाल काझी
मो.: ९९२३०४१२३४

संबंधित पोस्ट
May 2024 Shawaal 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 Zul Qa'dah 1
10 2
11 3
12 4
13 5
14 6
15 7
16 8
17 9
18 10
19 11
20 12
21 13
22 14
23 15
24 16
25 17
26 18
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *