मुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ‘ईश्वराची मदत कधी येईल?’ तेव्हा ईश्वराच्या दयासागरात मोठी भरती येते आणि ईश्वरी उत्तर मिळते की,
‘‘बस आता पुरे झाले! ईश्वराची मदत आता खूप जवळ आहे!!!’’
याच नियमानुसार ‘मेराज’च्या डोळे दिपविणार्या उत्सवात ईश्वराकडून आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांना शुभवार्ता आणि मार्गदर्शक बाबी सुचविण्यात आल्या.
‘मेराज’चे वास्तव असे आहे की, आदरणीय प्रेषितांना ईश्वरी सान्निध्याचे अत्युच्च स्थान प्राप्त झाले. परलोकाची सहल करविण्यात आली. परोक्षाचे दर्शन घडविण्यात आले. विशेष आयती आणि संकेतांचे अवलोकन करविण्यात आले व भविष्यकाळात येणार्या परिस्थितींबाबत ईश्वरी मार्गदर्शन करण्यात आले.
‘मेराज’ची घटना एक ईश्वरी चमत्कार आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना बरेच ईश्वरी चमत्कार देण्यात आले. परंतु विरोधकांकडून अशा ईश्वरी चमत्कारांची वारंवार मागणी होत असूनही या चमत्कारांचे दर्शन घडविण्यात आले नाही. कारण दैवी चमत्कार पाहूनसुद्धा विरोधक प्रेषितांच्या प्रेषितत्वावर श्रद्धा ठेवण्यास तयार नव्हते. दैवी चमत्कारास ते ‘जादू’चे नाव देऊन ईश्वरी प्रकोपाचे हक्कदार ठरत होते. प्रेषित मुहम्मद(स) हे पुराव्यांवरच जास्त जोर देत असत. उत्तम प्रकारच्या मानवी भावनांना साद घालून, ईशद्रोह आणि मूर्तीपूजांनी बरबटलेल्या जीवनाचे अनिष्ट परिणाम समोर ठेवून, एकमेव उपास्य असलेल्या ईश्वरावर धारणा घेऊन असलेल्या उत्तम चारित्र्याचे प्रदर्शन करून आणि अन्याय व अत्याचाराचे उत्तर स्नेह आणि दयाभावाने देऊन या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यात आले की, लोकांनी सत्याची पारख करून आणि सत्याला विवेकबुद्धीने स्वीकारून, तसेच असत्याला नाकारून जीवनाची योग्य दिशा निवडावी. शिवाय ईश्वरास जेव्हा आणि ज्या ठिकाणी आपला चमत्कार दाखविणे योग्य व उचित वाटले, त्या ठिकाणी व त्या प्रसंगी त्याने आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने चमत्कार दाखविले. सत्यसमर्थकांनी आणि सत्यविरोधकांनी आपापल्या परीने त्यापासून प्रभाव ग्रहण केले.
‘मेराज’ची घटना २७ ‘रजब’ हिजरी सन पूर्व ३ मध्ये घडली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे माननीय उम्मे हानी(र) यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत होते. ती सोमवारची रात्र होती. ईश्वराचा फरिश्ता ‘जिब्रील’ आला आणि त्याने प्रेषितांना झोपेतून जागे करून आपल्यासोबत ‘काबागृहात’ नेले. मग त्यांना ‘बुराक’ नावाची स्वारी प्रदान केली. ही स्वारी एवढी तीव्र गतिमान होती की, प्रेषित मुहम्मद(स) या स्वारीवर स्वार होताच ‘बैतुल मक्दस’ला पोहोचले. हे ठिकाण पॅलेस्टाईनमध्ये आहे) अर्थात दैवी प्रवासाची ही पहिली मजल होती. हे ठिकाण दाखविण्याचा ईश्वरी हेतु असा होता की, इस्लामच्या ज्या भलाईच्या राष्ट्रीय आंदोलनास जीवित करण्यासाठी अंतिम प्रेषित उठले होते, त्या आंदोलनाचे मोठे आणि जुने केंद्र त्या अंतिम प्रेषितांना दाखविण्यात यावे आणि सत्यधर्माच्या चळवळीतील मागच्या काळात होऊन गेलेले मार्गदर्शक अर्थात प्रेषितांची भेट करून द्यावी.
‘‘बैतुल मक्दस’ येथील ‘अक्सा’ मस्जिदमध्ये मागे होऊन गेलेल्या सर्व प्रेषितांचा जमाव जमलेला होता. या संमेलनातील सर्व प्रेषितांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे हार्दिक स्वागत केले आणि मग सर्वच प्रेषितांनी त्यांच्या नेतृत्वात दोन रकअत नमाज अदा केली.
नमाज झाल्यावर जिब्रील फरिश्त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांना ‘बुराक’वर स्वार करून आकाश मंडळावर घेऊन गेला. शेवटपर्यंत विभिन्न आकाश मंडळांचे द्वार उघडत गेले. या प्रवासात प्रेषितांना विभिन्न पापांच्या पापीजणांच्या शिक्षाप्रद घटनांचे दर्शन घडविण्यात आले.
मग जेव्हा विशेष सान्निध्याचे एक विशेष स्थान आले, तेव्हा कुरआनच्या प्रदानित ज्ञानानुसार प्रेषित मुहम्मद(स) यांना विशेष ईश्वरी बोध देण्यात आला. तो दिव्यबोध कुरआनातील ‘सूरह-ए-बकरा’ आणि ‘सूरह-ए-बनी इस्त्राईल’मध्ये स्पष्ट करण्यात आला आहे.
सूरह-ए-बनी इस्त्राईलमध्ये भविष्याची ही खूशखबर आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे इस्लामी आंदोलन यशस्वी होईल. सत्यधर्म अर्थांत इस्लामचा विजय होईल आणि असत्य पराजित होईल. यामध्ये ही बाबसुद्धा स्पष्ट करण्यात आली आहे की, ‘मक्का’वासी प्रेषित मुहम्मद(स) यांना व त्यांच्या अनुयायांना वतन त्यागण्यावर विवश करतील. म्हणूनच ‘हिजरत’ अर्थात वतनत्यागाची म्हणजेच स्थलांतराची शिकवण देण्यात आली. हिजरतनंतर मग ‘जिहाद’ अर्थात सत्यधर्म प्रस्थापित करण्यासाठी वा मानवकल्याणासाठी ईशमार्गात प्रयत्न करण्याचा काळ येईल.
‘यहूदी’ अर्थात ‘ज्यू’ लोकांना स्पष्टपणे बजावण्यात आले की, ‘‘तुमच्या कुकर्मामुळे जगाच्या आणि मानवांच्या नेतृत्वाची धुरा तुमच्याकडून ईश्वराने हिसकावून घेतली आहे. आता तुमच्याकरिता केवळ एकच संधी आहे, अर्थात तुम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या संदेशाचा स्वीकार करावा. म्हणजेच ईश्वरास उपास्य स्वीकार करावे, मुहम्मद (स) यांना ईश्वराचे प्रेषित स्वीकार करावे आणि इस्लामी व्यवस्थेचा अंगीकार करावा. अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील.’’
मक्का शहरातील विरोधकांनाही तंबी करण्यात आली की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याशी आणि त्यांच्या अनुयायांशी जसे वर्तन तुम्ही कराल, तसेच वर्तन तुमच्याशी करण्यात येईल. इस्लामी आंदोलनात जर तुम्ही बाधा आणली तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आता निर्णयाची वेळ येऊन ठेवली आहे! ’’
या प्रसंगी ईश्वराकडून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना राहणीमान आणि खाणपान व्यवस्थेचे मूळ नियम देण्यात आले. याच नियमांनुसार इस्लामी शासनास कार्य करावे लागेल. हे नियम संक्षिप्तरीत्या मांडण्यात येत आहेत.
- केवळ ईश्वरालाच उपास्य जाणून अनेकेश्वरांचा त्याग करा.
- मातापित्यांचा सन्मान करा व त्यांची आज्ञा पाळा.
- नातलग, गरीब व प्रवाशांचे अधिकार द्या आणि अवैध व अनुचित मार्गांनी पैसा व संपत्ती खर्च करू नका.
- हक्कदारांच्या मदतीचे कार्य एखाद्या कारणासाठी करता न आल्यास नम्रपणे नकार द्या.
- संपत्ती कमाविण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी मध्यममार्गाचा अवलंब करा.
- निर्धन होण्याच्या भीतीने संततीवध अथवा भ्रूणहत्या करू नका.
- व्यभिचार करू नका आणि अश्लीलतेच्या जवळही फटकू नका.
- हकनाक कोणाचाही वध करू नका.
- वयात न आलेल्या अनाथांचे व त्यांच्या संपत्तीचे रक्षण करा.
- आपण केलेल्या करारांची व समझोत्यांची अंमलबजावणी करा.
- देवाणघेवाण, व्यवहार, मोजमाप आणि तराजू चांगले ठेवा.
- जी गोष्ट तुम्हाला ज्ञात नाही, तिच्या मागे पडू नका, कारण मानवास श्रवण, दर्शन, मन व मस्तिष्काचा हिशोब ईश्वरासमोर द्यावा लागणार आहे.
- पृथ्वीवर गर्वाने आणि मटकत चालू नका.
‘मेराज’च्या प्रसंगी देण्यात येणारे हेच ते ईश्वरी नियम होते, ज्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आदर्श इस्लामी राज्याची स्थापना केली. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नंतरसुद्धा धार्मिक नेते आणि न्यायप्रिय मुस्लिम शासकांनी हेच आदर्श समोर ठेवून शासन चालविले. शिवाय यापुढेसुद्धा ज्या ठिकाणी इस्लामी व्यवस्था लागू करण्याची योजना असेल, त्या ठिकाणी याच नियमांच्या आधारावर व्यवस्था लागू करण्यात येईल.
आकाश मंडलांमध्ये ईश्वरी कांतीमय वातावरणात ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या नियमांवर आधारित आदेश प्रदान करण्यात आले असतील तेव्हा त्यांना भविष्याच्या क्षितिजावर ज्योतीपुंज उदयास येत असताना दिसला असेल.
मक्का आणि तायफसारख्या अतिशय प्रतिकुल वातावरणात एखादा भौतिकवादी असता तर कदाचित त्याने कधीचाच निराश होऊन आपल्या आंदोलनकार्यास बंद केले असते. परंतु हा क्रांतिदूत प्रेषित मुहम्मद(स) यांचा प्रेषित्विक विवेक होता, जो ईश्वरी कांती आणि मार्गदर्शक प्रकाशांनी उजळून याची सत्यकल्पना बाळगत होता की, अंधाराचे साम्राज्य संपून आता कांतीमय प्रभात होणार आहे.
ईश्वराकडून प्रेषितांना दुसरा उपहार हा पाच वेळा नमाज अदा करण्याचा मिळाला. याच मंगलप्रसंगी आदरणीय प्रेषितांना ‘तहज्जुद’ (उत्तरार्धिची) नमाज अदा करण्याचा आदेश देण्यात आला आणि शुभ वार्ता कळविण्यात आली की, या ‘नमाज’च्या माध्यमाने प्रेषितांना ‘महमूद’चे स्थान (प्रशंसनीय स्थान) प्रदान करण्यात येणार आहे.
ईश्वरी वाणी आणि कांतीमय तेजांनी संपन्न होऊन प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा परत आले, तेव्हा प्रथम ते बैतुलमक्दस (येरूशलेम) या ठिकाणी उतरले व नंतर ‘बुराक’वर स्वार होऊन मक्केस परतले. सकाळी सकाळी प्रेषितांनी ‘मेराज’च्या प्रसंगाचा कुरैश कबिल्याच्या लोकांसमोर उल्लेख केला, तेव्हा त्यांनी सुरुवातीस आश्चर्य व्यक्त केले आणि मग या दैवी चमत्काराचा उपहास उडविला. टाळ्या वाजविल्या. खिल्ली उडविली. कुरैश कबिल्याच्या ज्या लोकांनी ‘बैतुलमक्दस’ पाहिले होते, त्यांनी प्रेषितांच्या दाव्याची परीक्षा घेण्यासाठी तेथील ठळक खुणा विचारल्या. प्रेषितांनी बैतुलमक्दिसचे पूर्ण स्वरूप वर्णन केले. शिवाय त्यांनी हेदेखील सांगितले की, रस्त्यामध्ये अमक्या ठिकाणी एका व्यापारी काफिल्याचा उंट हरवला होता. हा काफिला ‘सीरिया’कडून ‘मक्केस’ येत होता. हा उंट शोधल्यावर त्यांना सापडला. या काफिल्याचा लाल रंगाचा उंट सर्वात पुढे होता. जवळपास तीन दिवसांत हा काफिला मक्का शहरात पोहोचेल.’ प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणेच घटना घडली. तिसर्या दिवशी तो काफिला खरोखरच मक्का शहरी पोहोचला. खरोखरच लाल रंगाचा उंट सर्वात पुढे होता. काफिल्याच्या लोकांना उंट हरविल्याच्या घटनेबाबत विचारले असता त्यांनीही या घटनेची तीच सविस्तर हकिकत सांगितली, जी प्रेषित मुहम्मद(स) यांनी तीन दिवसांपूर्वी सांगितली होती. आता मात्र विरोधकांना प्रेषितांच्या दैवी चमत्कारिक मेराजच्या घटनेचा पूर्ण विश्वास झाला. परंतु माणसामध्ये अहं नावाची एक दुष्ट वृत्ती असते. याच अहंमुळे माणूस सत्याचा इन्कार करतो. विरोधकांचेदेखील असेच झाले. त्यांनी विरोध कायम राखला.
इकडे ही घटना चर्चेत येत असतानाच दुसरीकडे काही विरोधक माननीय अबू बकर(र) यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘‘तुमचे प्रेषित मुहम्मद(स) तर दावा करायला लागलेत की, त्यांनी एकाच रात्रीत ‘बैतुलमक्दस’चा प्रवास करून सकाळ होण्यापूर्वीच परतही आले. तुम्हाला विश्वास वाटतो का?’ यावर माननीय अबू बकर(र) उत्तरले, ‘‘जर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी दावा केला, तर निश्चितच हे खरे आणि सत्य आहे. कारण मीच काय, तुम्हीसुद्धा आणि संपूर्ण मक्कावासीयांनीसुद्धा प्रेषितांना खोटे बोलताना कधीच ऐकलेले नाही.’’
या ठिकाणी एक बाब विसरता येणार नाही ती अशी की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप लावण्यासाठी विरोधकसुद्धा धजावत नव्हते आणि अनुयायांबरोबरच विरोधकसुद्धा ही बाब निर्विवादपणे स्वीकारत असत की, आजपर्यंत मुहम्मद(स) कधीच खोटे बोलले नाहीत. अनुयायांची तर अशी परिस्थिती होती की, प्रेषितांच्या कोणत्याही गोष्टीवर त्यांच्या मनात साधी शंकादेखील येत नसे. प्रेषितांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीच्या पुराव्याची त्यांना कधीच गरज भासली नाही.
परोक्षापलीकडील सत्य ज्याने पाहिले आणि संपूर्ण विश्वाचा स्वामी एकमेव ईश्वराच्या विशेष आयती (वाणी) आणि देदीप्यमान मार्गदर्शनाचे ज्याने अवलोकन केले आणि पारलौकिक जगाची एक झलक पाहिली असेल, त्याच्यासाठी या ऐहिक जगातील क्षणिक जीवन आणि क्षणभंगूर असणार्या जीवनातील आरिष्टांचे काय महत्त्व असणार? तसे पाहता आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची ईश्वरावरील धारणा सर्व जगातील लोकांच्या धारणांपेक्षा जास्त प्रबळ होती. शिवाय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत ‘फरिश्ते’ हजर होत, दिव्यबोध त्यांना होत. मग एवढे सर्व काही डोळ्यांसमोर असताना विरोधकांचा त्रास आणि शिव्याशापांचे काय मोल असणार? एवढेच नव्हे तर ‘मेराज’च्या दैवी प्रवासाच्या माध्यमाने ईश्वराने त्यांना सर्व प्रकारच्या बाबींचे दर्शन घडविले आणि याच परोक्षाच्या पडद्याआड असलेल्या सत्याचा ते प्रसार व प्रचार मोठ्या जिद्द व चिकाटीने आणि अथक परिश्रम घेऊन करीत होते. म्हणूनच त्यांच्या आंदोलनाच्या मार्गात येणारा प्रचंड पर्वतदेखील त्यांना किरकोळ वाटत असे.
अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर अतिशय उज्वल स्वरुपातील भविष्य दिवसेंदिवस जवळ येत होते.
0 Comments