Home A blog A मृत्यू : एक सापेक्ष अनुभव

मृत्यू : एक सापेक्ष अनुभव

– एम.आय.शेख
आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामां है सौ बरसका पल की खबर नहीं
प्रथम मी आपले अभिनंदन करतो की आपण हा लेख वाचण्याचा निर्णय केला. मला खात्री होती की, या लेखाचे शिर्षक वाचूनच अनेक वाचक हा लेख वाचणार नाहीत. मृत्यू अटळ आहे मात्र आपण सर्वजण अशा अभिनिवेशात जगत आहोत जणू कधी आपण मरणारच नाही. अनेक लोक तर ’मृत्यू’ संबंधी बोलणे टाळतात. त्यासंबंधी बोलणे अशुभ समजतात. इस्लामने मात्र मृत्यूला नजरेसमोर ठेवून आचरण करण्याची ताकीद केलेली आहे. 
गम्मत पहा जगातील बहुतेक व्यवस्था मृत्यूवर बोलने टाळतात तर इस्लाम मृत्यूला नेहमी डोळ्यांसमोर ठेवण्याची ताकीद करतो. अशा वेळी इस्लाममध्ये मृत्यू संबंधी नेमकी काय संकल्पना आहे? हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. तर चला या संबंधी पाहूया. मृत्यूची भीती यासाठी वाटते की, तो माणसाचा जीव घेतो, पत्नीला विधवा करतो, मुलांना अनाथ करतो, अवलंबिताना निराधार करतो, आप्तांना रडवितो, वस्त्यांना उध्वस्त करतो, संस्थांचा नाश करतो, चविला नष्ट करतो, आशेला निराशेमध्ये बदलतो. गरीबांनाही मृत्यू येतो, श्रीमंतांना ही मृत्यू येतो, आस्तिकही मरतात, नास्तिकही मरतात. 
मृत्यू म्हणजे काय?
शरिरापासून आत्मा विलग होणे म्हणजे मृत्यू. मग प्र्रश्न उरतो की आत्मा काय आहे? कुरआन त्याचे उत्तर देतो की, आत्मा अल्लाहचा, शरिराला जिवंत राहण्याचा आदेश आहे. तो एका ठरावीक मुदतीसाठी दिलेला आहे. ती मुदत संपताच आदेश परत घेतला जातो आणि शरीर निपचित पडते. आत्मा ’आलमे बरजक’(मृत्यूलोक) मध्ये रवाना होतो. तो तेथे ’डे ऑफ जजमेंट’ (प्रलयाचा दिवस) पर्यंत वास्तव्यास राहतो. तद्नंतर त्याला पुन्हा शरीर प्राप्त करून दिल्या जाईल व त्याच्या जीवनाचा हिशोब घेण्यात येईल. ही आहे इस्लाममध्ये मृत्यूसंबंधीची संकल्पना.
न्यायासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता
जगाच्या रचनेकडे डोळसपणे पाहिले असता एक गोष्ट चटकन लक्षात येते ही की, हे जग अपूर्ण आहे. याला पूर्णत्व प्रदान करण्यासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता आहे. उदा. कल्पना करा की एका सुनेला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मारून टाकले. तेंव्हा प्रश्न हा निर्माण होतो की, ऐन तारूण्यात तीला जीव द्यावा लागला त्याची भरपाई कोण करणार? कुणी म्हणेल सासरच्यांना ’लॉ ऑफ द लँण्ड’ ने शिक्षा दिली आहे. ठीक आहे! पण त्यामुळे तिचे अकाली संपलेले जीवन तिला परत थोडेच मिळणार? तीला सर्वंकश न्याय मिळण्यासाठी ’आखिरत’ची दुनिया असणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने ज्या शक्तीशाली लोकांनी दुर्बलांवर अत्याचार केले, दंगे केले, लोकांची घरे जाळली, निरपराध लोकांच्या हत्या केल्या, अबलांवर बलात्कार केले, त्यांना न्याय तेंव्हाच मिळेल जेंव्हा शक्तीशाली व दुर्बल पुन्हा आमने-सामने उभे केले जातील व दुर्बलांना सर्व शक्तीमान अल्लाहकडून न्याय दिला जाईल. तेव्हाच हे जग पूर्णत्वाला आले असे म्हणता येईल. 
जगात बलवानांनी दुर्बलांवर केलेल्या अत्याचाराचा बदला देण्यासाठी एक सर्वशक्तीमान अशी शक्ती आणि ’द डे ऑफ जजमेंट’ची आवश्यकता यासाठीच आहे. म्हणून आखिरत आवश्यक आहे. याची कल्पना जगाला स्पष्ट शब्दात कुरआनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. या गोष्टीची जाणीव सतत डोळ्यापुढे राहिली व मृत्यूनंतर येणार्या अनिवार्य अकांउन्टीब्लिटी (जबाबदारी)ची सतत आठवण राहिली तर माणसं जगामध्ये जबाबदारीने वागतील. म्हणून इस्लाममध्ये मृत्यूची सतत आठवण ठेवण्याची वारंवार ताकीद दिली गेली आहे. या संबंधी कुरआन स्पष्ट निर्देष देतो की, ’प्रत्येक जीवीतास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रूजू व्हायचे आहे.’ (सुरे अंबिया आ.नं.35).
मृत्यूची वैशिष्ट्ये 
मृत्यूचे एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला, कुठे आणि केव्हा येईल हे कुणालाच माहित नाही. याच्यात तर खरी मजा आहे. कल्पना करा मृत्यूची जर का माणसाला पूर्व कल्पना असती तर किती गजहब झाला असता? एक-एक दिवस जड गेला असता. जीवन निरस झाले असते. ही अल्लाहची एक प्रकारची कृपाच आहे की त्या असीम दयावंताने आपल्याला मृत्यूची तिथी कळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे. खरे पाहता ही एक सवलत आहे. मात्र या सवलतीचा दुरूपयोग करण्याकडेच आपल्या सर्वांचा कल असतो. आपण असे वागतो जणू कधी मरणारच नाही. म्हणून कुरआन आपल्याला सावधानतेचा इशारा देतो की, ”त्या घटकेचे ज्ञान अल्लाहपाशीच आहे, तोच पर्जन्यवृष्टी करतो, तोच जाणतो की आईच्या उदरात काय वाढत आहे, कोणतीही व्यक्ती जाणत नाही की उद्या तो काय कमाई करणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहीत नाही की उद्या त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे, अल्लाहच सर्वकाही जाणणारा व माहितगार आहे.”(सुरे लुकमान, आयत नं. 34).
मृत्यूचे आणखीन एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला ? कोणत्या वयात? येईल हे कोणालाच सांगता येत नाही. अगदी तज्ञ डॉक्टर सुद्धा याबाबतीत ठामपणे काही सांगू शकत नाहीत. या तरतुदीचा सुद्धा आपण गैरफायदा घेत असतो. प्रत्येकाला वाटत असते की ”अजून आपले वय तर काय?” आपल्याला भरपूर जगायचे आहे. रोज रस्त्यावर होणारे अनेक अपघात व त्यात मरणारी अनेक माणसे आपल्याला रोज खोटं सिद्ध करत असतात. तरी माणूस आपल्या धुंदीत जगत असतो. त्याचा विचार असतो की आपण खूप जगणार आहोत. त्याचा हाच विचार त्याला दुसर्यावर अन्याय करून स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी प्रेरित करीत असतो. म्हणून इस्लामची ताकीद आहे की, जगाच्या झगमगाटात मृत्यूला विसरू नका. 
आपल्याला कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. अपघातच नव्हे तर जगात अनेक कारणांनी, अनेक लोक मरत असतात, काही ना आईच्या गर्भातच मृत्यू येतो तर काही बाल्यावस्थेत मृत्यू पावतात. काहीना ऐन तारूण्यात मृत्यू येतो तर काही दरम्यानी वयात मरतात. साधारणपणे वृद्ध झाल्यातर मृत्यू येतो हा समज सतत खोटा सिद्ध होत असतो. तरी प्रत्येक माणूस स्वतःला पूर्ण आयुष्य मिळणार याच विश्वासाने जगत असतो. हाच विश्वास माणसाला बेजबाबदार जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. म्हणून इस्लाम ताकीद करतो की लक्षात ठेवा तुम्हाला कधीही मृत्यू येऊ शकतो. म्हणून जबाबदारीने वागा, अल्लाहचे भय बाळगा.
अनेक जणांना आपल्या आरोग्यावर मोठा विश्वास असतो. पण अनेक ’सुपर फिट’ अंतरराष्ट्रीय खेळाडूंना सुद्धा अचानक मृत्यू येतो. तर अनेक व्यक्ति आपले रोगट शरीर घेऊन वर्षोनवर्ष जगत असतात. म्हणून चांगले आरोग्य जीवंत राहण्याची हमी होऊ शकत नाही. म्हणून सतत मृत्यूची आठवण डोळ्यासमोर ठेऊन जगण्यातच शहाणपण आहे. याचे कारण असे की, समजा कोणाला पूर्ण आयुष्य जरी लाभले तरी ते साधारणपणे 60-70 वर्षाचे असते. त्यातही 15-20 वर्ष बालपण व शेवटची 15-20 वर्षे वृद्धत्वात व्यतीत होतात. मग उरलेल्या तारूण्याच्या 30-40 वर्षात कुणावर अन्याय करून नेहमीसाठीच्या मृत्यूनंतरचे जीवन धोक्यात घालणे किती धोक्याचे आहे, याची चेतावणी कुरआन खालील शब्दात देतो.” लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी-अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. (सुरे आलेइम्रान, आयत नं. 14).
आखिरत संबंधी एक सुंदर तर्क असा देता येईल की, आज आपले अस्तित्व आहे. म्हणून यापूर्वीही (म्हणजे जन्मापूर्वी) ते होते व या नंतरही (म्हणजे मृत्यूनंतरही) ते राहील एवढे निश्चित. ज्याअर्थी आपल्या जन्मापूर्वीच्या जीवनावर आपला काही अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावर ही काही अधिकार नसणार आहे तर मग या दोहोंमधील 60-70 वर्षांच्या आयुष्यातच आपल्याला अमर्यादित अधिकार कसा काय मिळू शकतो की आपण मनाला वाटेल तसे जगू, मनाला वाटेल तसे वागू?
वास्तविक पाहता जग हे एक परीक्षा केंद्र आहे. उदा. विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करण्यासाठी कोणतेही पुस्तक / गाईड वापरण्यासाठी स्वतंत्र असतो पण परीक्षा केंद्रात प्रवेश करताच त्याचे सर्व स्वातंत्र्य संपते व वर्षभर त्याने केलेल्या अभ्यासावर त्याचे पुढील भविष्य अवलंबून असते. ठीक असेच या 60-70 वर्षाच्या जीवन काळात माणसं कसेही वागण्यासाठी स्वतंत्र आहेत. मात्र मृत्यू येता क्षणी आपले स्वातंत्र्य संपते. 60-70 वर्षात जगतांना केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांवरच आपले पुढील भविष्य अवलंबून असते. या संबंधी एक सुंदर हदीस आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छीतो ती अशी की – प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टी पूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा.
एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नाची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे. 
1.जीवन कुठे व्यतीत केले 2. तारूण्य कुठे खर्चि घातले 3. संपत्ती कोठून मिळविली. 4. कोठे खर्च केली. 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला.
मृत्यूची सतत आठवण कशी ठेवता येईल?
आधून-मधून कब्रस्तान मध्ये जावे. त्यावेळी आपल्याला जाणीव होईल की या ठिकाणी अशी अनेक माणसं शांतपणे पडलेली आहेत ज्यांना जीवंतपणी वाटत होतं की त्यांच्या शिवाय त्यांचे घर, व्यापार, देश चालूच शकत नाहीत. मृत व्यक्तीच्या गुस्लच्या वेळी हजर राहणे आणि पाहणे तो स्वतः अंघोळ करण्याच्या सुद्धा लायक नाही. तेव्हा त्याची असाह्यता लक्षात येते व आपली औकात आपल्याला कळते. अशा प्रकारे मृत्यूची सतत आठवण ठेवता येईल.
मृत्यू आणि नमाज
माणूस दर दिवशी जीवनापासून दूर तर मृत्यूच्या जवळ जात असतो, मग शहाणा माणूस जवळ येणार्या अडचणीवर मात करण्याच्या तयारीला लागतो. मूर्ख मात्र दर वाढदिवसाला नवीन केक कापत कशाचीच पर्वा न करता जगत राहतो. जरा गंभीरपणे विचार केला तर लक्षात येईल की, मृत्यू आणि नमाज दोन्हीमध्ये एक समानता अशी आहे की, दोन्हीमध्ये माणसाला अल्लाहशी भेटण्याची समान संधी आहे. नमाज मध्येही माणूस अल्लाहची भेट घेतो. मृत्यूनंतरही माणूस अल्लाहची भेट घेतो. नमाज पढतांना ज्याला जेवढा आनंद येत असेल तेवढाच मृत्यू येताना त्याला आनंद येईल. नमाजला जाण्यासाठी ज्याला भिती वाटते त्याला मृत्यूचीही भिती वाटणार, एवढे नक्की. म्हणून मन लावून नमाज अदा करणे अत्यंत आवश्यक आहे. 
जगात मोठ्या प्रमाणात अनैतिकता बोकाळलेली आहे. त्यामुळे नातेसंबंध उध्वस्त होत आहेत. कोणावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, अशा परिस्थितीत मुस्लिमांसमोर नैतिक जीवन जगण्याचे एक मोठे आव्हान आहे. यातून मुस्लिमांवरील इतर समाजाचा विश्वास वृद्धींगत होत जाईल, अन्यथा गैरविश्वासाचे जे वातावरण सध्या जगात सर्वत्र व्याप्त आहे त्यात आणखीन भर पडेल. शेवटी कोणीतरी असायलाच हवा ना! ज्याच्यावर विश्वास ठेवून लोक आपले व्यवहार करू शकतील. तर मित्रांनों! सज्ज व्हा, नमाजच्या माध्यमातून नीतिमत्ता हस्तगत करा. कुरआनच्या आदेशांना समजून घ्या म्हणजे त्यांच्यावर अंमलबजावणी करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होईल. त्यासाठी कायम मृत्यूला डोळ्यासमोर ठेवा. नैतिकतेवर चलण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. अल्लाह आपल्या सर्वांचे रक्षण करो. आमीन.
संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *