Home A प्रेषित A मुहम्मद (स.) यांचे आगमन सर्वांसाठी

मुहम्मद (स.) यांचे आगमन सर्वांसाठी

Muhammad
मुहम्मद (स.) यांचे आगमन केवळ अरबस्तानापुरते नव्हते, ते सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात सर्वत्रच धार्मिक अवनती झाली होती. झरतुष्ट्र, मोझेस, खिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणात श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे माजली होती. सत्य धर्म लोपला होता. खिश्चन धर्म आपापसातील मतभेदांनी कत्तली करीत होता. शांती देणारा धर्म रक्तस्नात होत होता! हिंदुस्तानाकडेही निराशाच होती. बुद्धांनी दिलेला नीतिधर्म पुन्हा नष्ट झाला. पुन्हा हिंदूधर्माने उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांची पुराणे रचिली जाऊ लागली. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसात झगडत होते. शाक्तमते पुढे येत होती. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! स्पृश्य-अस्पृश्य, श्रेष्ठनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकार ब्रह्म शून्य झाले. कर्मकांड वाढले. सतराशे देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला. आणि बौद्धधर्म हिंदुस्तानाबाहेर सर्वत्र होता. त्याचे शुद्ध स्वरूप राहिले नाही. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपले रंग बौद्धधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बौद्धधर्म कोणास पटणार?बुद्धालाच त्यांनी देव केले!
स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दु:ख होते. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळात मुहम्मद (स.) आले. त्यांचे येणे आकस्मिक नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहम्मद (स.) यांचे आगमन जगाच्या इतिहासाशी संबद्ध होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून नवश्रद्धेचा जन्म होणे अपरिहार्य होते. अशा चिखलातून नवीन सहस्रदल सुंदर कमळ मुहम्मद (स.) यांच्या रूपाने फुलले. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यातील अनंत मकरंद मिळाला.
कोठे जन्मला हा महापुरुष? अरबस्तानात जन्मणाऱ्या पैगंबर मुहम्मद (स.) यांस दोन अनुकूलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्री, परंपरागत स्थानी जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळात तो जन्मलेला असावा. मुहम्मद (स.) यांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केत जन्मले. काबागृहाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश, त्यांच्या घराण्यात जन्मले.
मक्का शहर अरबस्तानचे वेंâद्र होते. धर्माचे व व्यापाराचे उत्तर-दक्षिण दरीत ते वसले होते. पश्चिमेकडे उंच टेकड्या. पूर्वेकडेही उंच दगड. मक्केच्या मध्यभागी काबागृहाचे पवित्र प्रार्थनागृह, प्रार्थनागृहाजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरे तटबंदी केलेली. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असे हे भरभराटलेले, समृद्ध व बळवंत शहर होते.
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यातून एक शांततापूर्ण व्यक्ती हिंडताना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती व्यक्ती दिसे. डोक्यावरील पागोट्यावरून एक रूमाल टाकलेला असे. त्याचे एक टोक उजवीकडून गळ्याखालून डाव्या खांद्यावर टाकलेले असे. कोण ती व्यक्ती? कोण तो पुरुष? मध्यम उंचीचा, रुंद खांद्याचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत आणि डोके कसे आहे पाहा. भव्य विशाल डोके! आदरणीय डोके! तोंड जरा लांबट, पिंगट रंगाचे, तांबुस छटेचे आणि भुवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत! आणि दोन भुवयांच्या मध्ये ती पाहा एक ठसठशीत शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे आणि डोळेही काळेभोर, मोठे. ते डोळे काहीतरी शोधीत आहेत. कोठेतरी पाहत आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकही बाकदार व मोठे आहे आणि दात पहा किती स्वच्छ शुभ्र! दातांची फारच काळजी घेतो वाटते हा?आणि ती साऱ्या बाजूने असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नाव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे आणि हात पाहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. पोशाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ. जणू वरून खाली येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर मुखावरही रस्त्यात मुले भेटताच हास्य फुलते आहे पाहा. वाटेत मुले भेटली तर त्यांच्याजवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष राहत नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचे राज्य असते. अद्याप स्वर्गाच्या जवळ ती असतात. मुलांचेही त्याच्यावर प्रेम होते. ती त्यांच्याभोवती गोळा होत. आपल्या विचारात मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदी हीनदीनाचा का असेना.
कोण होता तो? लोक त्याला ‘अल्-अमीन’ म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचे जीवन इतके आदर्शरूप, सचोटीचे, कष्टाचे, सन्माननीय असे होते की सर्वांना त्याच्याविषयी आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे का पाहत आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेने का पाहत आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगू लागला होता. लोक त्याला वेडा म्हणू लागले. समाजाची जुनी बंधने तो नष्ट करू पाहत होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतीरिवाज सोडा असे सांगत होता. हा हट्टी, माथेफिरू क्रांतिकारक आहे, असे आता लोक म्हणत व तो जाऊ लागला म्हणजे संशयाने बघत.
कोण होता तो? ते का पैगंबर मुहम्मद (स.)? होय. होय, तेच ते शांतपणे रस्त्यातून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहम्मद (स.) होते. कुरैशांच्या कुळात, काबागृहाच्या उपाध्यायांच्या कुळात जन्मले होते.
संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *