1. सहनशिलता :
कुरआनमध्ये सहनशिलतेचे विस्ताराने वर्णन करण्यात आलेले आहे, ते केवळ वाचनासाठी नसून अनुकरणासाठी आहेत. सहनशीलता माणसाला आज ना उद्या नक्कीच यशस्वी करते. सहनशिल माणूस कधीच पराजित होवू शकत नाही. असहनशिलता ही भौतिक आकर्षण तसेच चंगळवादामुळे माणसांमध्ये निर्माण होते. आपल्या आजूबाजूला असणारे आपलेच लोक जेव्हा चंगळवादी जीवन जगत असतात तेव्हा आपल्या सीमित संसाधनामध्ये समाधानाने जगण्यासाठी सहनशिलतेचाच आधार असतो, नसता अनेक माणसे इतरांसारखे चंगळवादी जीवन जगण्याच्या इच्छेपोटी आपली ऐपत नसतांना अधिक खर्च करतात व त्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी सुरूवातीला अनैतिक आणि नंतर अपराधिक कृत्यामध्ये सुद्धा लिप्त होवून जातात. सहनशिलते संदर्भात कुरआनमध्ये खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
अ) ’’जो मनुष्य संयमाने वागेल आणि क्षमा करेल तर हे मोठे साहसी कर्मा पैकी एक कर्म आहे.’’ (सुरह : अश्शुरा, आयत क्र. 43). संयमाने वागणे हे सर्वांनाच जमण्यासारखे काम नाही, त्याला साहसाची गरज असते. असाहसी माणसे सहनशील असू शकत नाहीत. जी माणसं स्वतःच्या इच्छेचे गुलाम असतात त्यांच्यात सहनशीलता नसते. माणसात सहनशीलता निर्माण होण्यासाठी एक ईश्वरावर विश्वास ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. वर नमूद आयतने मला सहनशील बनण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. म्हणून मी कुरआनकडे आकर्षित झालो.
ब) ’’मग हे पैगंबर (सल्ल.) संयम राखा ज्याप्रमाणे दृढनिश्चयी प्रेषितांनी संयम राखलेले आहेत.’’ (सुरह : अलकहफ आयत क्र. 35). जे वाचक प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाशी परिचित आहेत, त्यांना माहिती आहे की, प्रेषितांनी किती कठीण परिस्थितीत जीवन व्यतीत करून मानवतेच्या कल्याणाचे मिशन पूर्ण केलेले आहे. विशेषतः त्यांच्या मक्काकालीन जवळ-जवळ 13 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना व त्यांच्या साथीदारांना ज्या अत्याचाराला सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांनी ज्या सामुहिक संयमाचा परिचय दिला, तो केवळ अद्वितीय आहे आणि हा संयम कुरआनच्या शिकवणीमधूनच येवू शकतो. म्हणूनच कुरआनच्या या शिकवणीकडे मी आकर्षित झालो.
2. परोपकार :
परोपकारासंबंधी कुरआनमध्ये एक ड झनापेक्षा जास्त आयतींमध्ये अशी ताकीद करण्यात आलेली आहे की, ज्यांचा कुरआनवर विश्वास आहे त्यांनी जीवनात परोपकार करावेत. प्रेषितांना यासंबंधी ताकीद करतांना ईश्वराने परोपकारासंबंधी इतक्या विस्ताराने सूचना दिल्या की, त्यानंतर प्रेषितांनी श्रद्धावंतांना परोपकाराची ताकीद करतांना आपल्या शब्दांवर एवढा जोर दिला की त्यांच्या साथीदारांना अशी शंका निर्माण झाली की, प्रेषित आता शेजाऱ्याला आमच्या संपत्तीमध्ये वारसाहक्क सुद्धा देतात की काय? या ठिकाणी शेजारी हा कोणत्याही जाती, धर्माचा असो परोपकार करतांना त्याचा पहिला अधिकार कुरआनने मान्य केलेला आहे. म्हणून मी कुरआनकडे आकर्षित झालो. परोपकारासंबंधात कुरआनमध्ये जे अनेक आदेश दिलेले आहेत त्यापैकी दोन निवडक आदेश खालीलप्रमाणे –
1. ’’ईश्वराच्या मार्गात खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका आणि सद्वर्तन करा ईश्वराला सद्वर्तन करणारेच आवडतात.’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं. 195).
यात ईश्वराच्या मार्गात खर्च करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. स्पष्ट आहे ईश्वराच्या मार्गात खर्च करणे म्हणजे पुण्यकामात खर्च करणे होय. याचाच अर्थ असा की, माणसाने कष्टाने कमाविलेली संपत्ती ही वाईट किंवा वाममार्गात खर्च करता येत नाही किंवा वाजवीपेक्षा जास्त संचितही करूनही ठेवता येत नाही. कारण ईश्राच्या मार्गात खर्च करण्याची नुसती सुभाषितवजा सूचनाच करण्यात आलेली नसून, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही तर स्वतः आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखे आहे, असे म्हटलेले आहे. या शब्दांवर गांभीर्याने विचार करताच प्रत्येक बुद्धीमान माणूस ईश्वराच्या मार्गात खर्च करण्यासाठी प्रेरित झाल्याशिवाय राहत नाही. या आयातीमुळे सुद्धा मी कुरआनकडे आकर्षित झालो.
2. ’’ जे लोक आपली संपत्ती ईश्वराच्या मार्गात खर्च करतात आणि खर्च केल्यानंतर त्यावर उपकार दर्शवित नाहीत आणि दुःख देत नाहीत त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि त्यांच्याकरिता कोणताही दुःख आणि भयाचा प्रसंग नाही.’’ (सुरह बकरा आयत नं. 262) .
या आयातीमध्ये जे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे त्याच्या उलट लोकांचा व्यवहार असल्याचा आपण याची देही याची डोळा पाहत असतो. कोणाची मदत केली तर लगेच त्याच्यावर आपण उपकार केले अशा पद्धतीने लोक वागू लागतात. विशेषतःसावकारीमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गरीब, शेतकरी किंवा मजूर जेव्हा सावकाराकडून अडल्यावेळी व्याजी ऋण घेतात त्यावेळेस ऋण दिल्यानंतर सावकाराचे त्यांच्याशी वागणे कसे असते हे कोणापासून लपलेले नाही. वास्तविक या ठिकाणी सावकारांनी कर्जदाराची मदत केलेली नसते तर व्याजी पैसे दिलेले असतात. तरी परंतु, त्याचा व्यवहार कर्जदारावर उपकार केल्यासारखा असतो. म्हणून श्रद्धावंतांना ही सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की, कोणाचीही मदत जर करत असाल, ईश्वराच्या मार्गात खर्च जर करत असाल, तर ज्याच्यावर खर्च केला त्याच्यावर चुकूनही उपकार केल्याची भावना उत्पन्न होवू देऊ नका. या आयातीमध्ये मानवाच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या उपकाराच्या भावनेची इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे की, तिच्याकडे कोणताही सद्सद्विवेकबुद्धी असलेला माणूस आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनसुद्धा मी कुरआनकडे आकर्षित झालो. या संदर्भात एक ऐतिहासिक घटना माझ्या वाचनात आली की, एकदा हजरत अबु हनिफा हे भर दुपारी उन्हात कोणाचीतरी वाट पाहत उभे होते. रस्त्याने जाणाऱ्या माणसाने त्यांना हटकले व म्हटले की, ’’इमामसाहेब उन्हात का उभे आहेत बाजूलाच भींतीची सावली आहे तिथे उभे रहा.’’ तेव्हा ते उत्तरले की, ’’मित्रा, मी ज्याची भींत आहे त्याला कर्जाऊ रक्कम दिलेली आहे. त्याच्या भींतीची सावली घेणे म्हणजे त्या रकमेवर व्याज घेतल्यासारखे वाटते. म्हणून मी उन्हात उभा आहे.’’
आदर्शवादाची एक अत्युच्च पातळी असनेतून दिसून येते.
3. बंधुभाव
’’ हे श्रद्धावंतांनों ! आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देउन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो आणि ईश्वरावर आणि परलोकावर श्रद्धा ठेवत नाही. त्याच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जणू एक खडक होता, त्याच्यावर मातीचा थर जमलेला होता, त्यावर जेव्हा जोराची वृष्टी झाली तेव्हा सर्व माती वाहून गेली आणि स्वच्छ खडक ते खडकच उरले. असे लोक आपल्यासाठी दान देउन जे पुण्य कमवितात त्यापासून त्यांच्या हाती काहीच लागत नाही आणि श्रद्धावंतांना सरळ मार्ग दाखविणे हा ईश्वराचा शिरस्ता आहे.’’ (सुरह बकरा आयत नं. 264.) आयत क्रमांक 262 मध्ये नमूद केलेल्या मानवी भावनेचा अधिक विस्ताराने आणि प्रभावशाली शब्दांचा वापर करून ईश्वराने ही ताकीद केलेली आहे की दुसऱ्यावर केलेल्या उपकारासंबंधी कधीच गर्व बाळगू नका आणि त्याच्याशी वर्तन करताना त्याच्यावर आपण उपकार केल्याची जाणीव त्याला होवू देऊ नका, असे करणे म्हणजे टणक खडकावर जमलेला मातीचा थर एका हलक्याशा पावसाच्या सरीने जसा वाहून जातो तसे होण्यासारखे आहे. कुरआनच्या या मोहित करणाऱ्या शब्दरचनेमुळे मी त्याकडे आकर्षित झालो आहे.
(क्रमशः)
– किशन जयवंतराव पाटील
मुखेड जि.नांदेड
मो.9175793247
(लेखक हे कुरआनचे अभ्यासक आणि उपासक आहेत.)
0 Comments