Home A मूलतत्वे A मानवी जीवनावर एकेश्वरत्वाचा (तौहिद) प्रभाव

मानवी जीवनावर एकेश्वरत्वाचा (तौहिद) प्रभाव

ला इलाहा इल्लल्लाह’ चा स्वीकार केल्याने मानवी जीवनावर त्याचे कोणते परिणाम घडून येतात. तसेच त्याचा स्वीकार करण्यास नकार देणारे या जगात व पारलौकिक जीवनात कसे असफल होतात व त्यांचे मनोरथ कसे धुळीला मिळतात.
  1. या वचनावर ईमान (गाढ श्रद्धा) बाळगणारा मनुष्य संकुचित दृष्टीचा कधीही असू शकत नाही. तो अशा ईश्वरावर दृढ श्रद्धा बाळगतो जो सर्व चराचरसृष्टीचा निर्माता व नियंता आहे. तो सर्वसत्ताधीश आहे. तो सर्व सृष्टीचा पालनकर्ता व मालक आहे. ही श्रद्धा धारण केल्यावर संपूर्ण विश्वात त्याला कोणतीही वस्तू परकी वाटत नाही. स्वतःप्रमाणे तो सर्वांना एकाच स्वामीची मालमत्ता व एकाच सम्राटाची प्रजा मानतो. त्याची सहानुभूती, प्रेम व सेवाभाव हे कसल्याही मर्यादेपुरते सीमित नसतात. ज्याप्रमाणे अल्लाहची अधिसत्ता असीम व अमर्यादित आहे त्याचप्रमाणे त्याची दृष्टीही असीम व विशाल बनते. जो कोणी अनेकविध लहानसहान देवदेवतांना मानतो अथवा मुळातच ईश्वराचे अस्तित्व न मानणारा आहे तर अशा माणसांत अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये निर्माण होऊ शकत नाहीत.
  2. हे इष्टवचन माणसात पराकोटीचा स्वाभिमान तसेच आत्म-गौरव निर्माण करते. त्यावर श्रद्धा बाळगणारा जाणून असतो की, केवळ एकच ईश्वर सर्व शक्ती बाळगतो. त्याच्याखेरीज कोणीही हानि-लाभ देणारा नाही. कोणीही मृत्यू देणारा अगर जीवन देणारा नाही. त्याचप्रमाणे कोणीही परिणामकारक अधिकारांचा स्वामी नाही. अशी ज्ञानधारणा व गाढ श्रद्धा त्याला ईश्वराखेरीज अन्य शक्तीपासून निडर, निरिच्छ व निरपेक्ष बनवते. त्याचे मस्तक ईश्वराखेरीज कोणाही पुढे झुकत नाही, तो ईश्वराखेरीज कोणाचीही याचना व करूणा भाकित नाही. अन्य कोणाचेही श्रेष्ठत्व त्याच्या मनावर बिंबत नाही. ही सर्व गुणवैशिष्ट्यें एकेश्वरत्वावरील दृढ श्रद्धेविना अन्य कसल्याही श्रद्धेमुळे निर्माण होऊ शकत नाहीत. अनेकेश्वरत्व, कुफ्र तसेच नास्तिकता यांची अनिवार्य वैशिष्ट्ये अशी आहेत की, मानवाने चराचर सृष्टीतील अन्य प्राणीमात्रापुढे व वस्तुमात्रापुढे नतमस्तक होऊन त्यांनाच हितकर्ता व हानि देणारा मानावे, त्यांचेच भय बाळगावे व त्यांच्याकडून इच्छापूर्तीची लालसा बाळगावी.
  3. स्वाभिमानाबरोबरच हे इष्टवचन माणसात विनम्रता व विनय हे गुणही निर्माण करते. इष्टवचन मानणारा कधीही गर्विष्ठ अहंकारी, स्वतःलाच इतरापेक्षा श्रेष्ठ समजणारा असू शकत नाही. निजशक्तीचा, धनाचा व योग्यतेबद्दलचा अहंकार त्याच्या मनात शिरकाव करू शकत नाही कारण तो हे जाणत असतो की जे काही त्याला प्राप्त आहे ते सर्व ईश्वरानेच दिलेले आहे आणि ईश्वर ज्याप्रमाणे प्रदान करण्याची शक्ती बाळगतो त्याचप्रमाणे तो हिरावून घेण्याचीही कुवत बाळगतो. याउलट एखाद्या नास्तिक माणसाला जेव्हा टोकाची यशप्राप्ती होते तेव्हा तो गर्विष्ठ व अहंकारी बनतो कारण तो असे साफल्य आपल्या स्वतःच्या योग्यतेमुळे प्राप्त झाले असे मानत असतो. अगदी त्याचप्रमाणे अनेकेश्वरत्व व कुफ्र (द्रोह) बाळगल्याने गर्व निर्माण होणे अनिवार्य आहे कारण अनेकेश्वरवादी (मुश्रिक) व श्रद्धाहीन (काफिर) असे समजून असतो की, देवदेवतांशी त्याचे विशिष्ट संबंध असून इतरांना तसे भाग्य लाभलेले नाही.
  4. या इष्टवचनावर दृढ श्रद्धा बाळगणारा मनुष्य हे चांगले जाणून असतो की, आत्मशुद्धी व सदाचरणाखेरीज त्याला मुक्ती प्राप्त करण्याचे व सफल होण्याचे अन्य कसलेही साधन नाही. त्याची श्रद्धा अशा ईश्वरावर असते जो स्वयंनिरपेक्ष व परम स्वतंत्र आहे. कोणाशीही त्याचे नाते नाही, तो अत्यंत न्यायी आहे व त्याच्या अधिसत्तेत कोणाचाही हस्तक्षेप व कोणाचाही प्रभाव नाही. याउलट, अनेकेश्वरवादी (मुश्रिक) व श्रद्धाहीन (काफिर) सतत एका असत्य आशेवर जीवन व्यतीत करीत असतात. त्यापैकी काहींची अशी समजूत झालेली असते की ईश्वराच्या पुत्राने स्वतः यातना भोगून आमची सुटका केलेली आहे. काहींना असे वाटते की आम्ही ईश्वरास अतिप्रिय असलेले निवडक लोक असून आम्हास कसल्याही प्रकारची शिक्षा होऊच शकत नाही. काहींची अशी धारणा आहे की आम्ही सत्पुरूषांच्या शिफारशीने ईशन्यायालयात सुटका करून घेऊ. देवदेवतांना नैवेद्य तसेच विविध वस्तूंची भेट अर्पण करून काही लोक अशी समजूत करून घेतात की आता त्याला जगात काय वाटेल ते करण्याचा परवानाच मिळाला आहे. अशा असत्य श्रद्धा अशा माणसांना सतत पापांच्या व दुराचाराच्या दुष्टचक्रातच गुरफटतात. अशा श्रद्धांवर विसंबून माणसे आपली आत्मशुद्धी व सदाचार यापासून गाफील असतात. उरले नास्तिकवादी लोक तर कसल्याही कृतीचा जाब विचारणारी एखादी परमोच्च शक्ती अस्तित्वात आहे हे ते मुळातच मानत नाहीत. म्हणून ते जगात स्वतःला स्वैर व अनिर्बंध समजतात. त्यांची इच्छा-वासना हाच त्यांचा ईश्वर असतो व ते त्यांचेच दास असतात.
  5. हे इष्टवचन निष्ठेपूर्वक मानणारा मनुष्य कधीही वैफल्यग्रस्त होत नाही आणि त्याचे मनोधैर्य कधीही खचत नाही. तो पृथ्वी व आकाशातील सर्व धनसंपत्तीचा धनी असणाऱ्या अशा ईश्वरावर श्रद्धा बाळगतो ज्याची दयाकृपा अमर्याद तसेच शक्तीसामर्थ्य अनंत आहे. ही श्रद्धा त्याच्या मनात असाधारण संतोष निर्माण करते आणि त्याला सतत समाधानी व आशावादी ठेवते.
  6. त्याला जगात दारोदारी जरी धुडकावण्यात आले, सर्वाशी जरी त्याचे संबंध नष्ट झाले व सर्व साधनसामग्री जरी एका पाठोपाठ त्याच्या हातून निसटून गेली तरीदेखील ईश्वराचे सहाय्य त्याची साथ सोडीत नाही. याच आधारावर तो नव्या आशाआकांक्षा बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. अशा प्रकारचा आत्मसंतोष व आत्मदृढता एकेश्वरत्वावर दृढ श्रद्धा असल्याखेरीज अन्य कोणत्याही श्रद्धेद्वारा प्राप्त होऊच शकत नाही. अनेकेश्वरवादी, विद्रोही (श्रद्धाहीन) व नास्तिक संकुचित मनाचे असतात. मर्यादित व सीमित सामर्थ्यावर ते विसंबून असतात. म्हणून संकटकाळात ते फार लवकर वैफल्यग्रस्त व निराश होतात व बहुधा अशा अवस्थेत ते आत्महत्याही करण्यास उद्युक्त होतात.
  7. या वचनावरील श्रद्धा माणसात धैर्य व साहस, सहनशीलता व खंबीरपणा निर्माण करते. तसेच ईशसहाय्यावर अवलंबून असण्याची विचारधारणा याचे मोठे बळ, निर्माण करते. ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जेव्हा तो महान कृत्ये करण्यासाठी तयार होतो तेव्हा आपल्या पाठीशी जगन्नियंत्याचे पाठबळ आहे असा त्याचा दृढ विश्वास असतो. अशी धारणा त्याच्यात डोंगरासारखा भक्कमपणा निर्माण करते. जगातील सर्व संकटे व हालअपेष्टांना तोंड देण्यास तो समर्थ बनतो. विरोधी शक्ती एकत्रपणेही त्याचे मनोधैर्य व साहस नष्ट करू शकत नाहीत. अनेकेश्वरवादी (मुशरीक), अधर्मी (काफिर) व नास्तिक लोकांमध्ये हे सामर्थ्य कोठे असणार?
  8. हे वचन माणसाला शूर बनवते. लक्षात ठेवा माणसाला भ्याड व भित्रा करणाऱ्या दोन गोष्टी असतात. एक म्हणजे प्राण, वित्त तसेच अपत्यप्रेम व दुसरी म्हणजे ईश्वराखेरीज अन्यही कोणी मृत्यूदाता आहे, तसेच मनुष्य स्वप्रयत्नाने मृत्यू टाळू शकतो अशी श्रद्धा बाळगणे आहे. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ वरील दृढ श्रद्धा या दोन्हीही गोष्टीं मनातून काढून टाकते.
  9. या वचनावर श्रद्धा बाळगणारा, ईश्वरासच आपल्या प्राणाचा, धनसंपत्तीचा व प्रत्येक गोष्टीचा स्वामी मानत असतो. त्याच्या प्रसन्नतेसाठी सर्व काही बळी देण्यास तो तयार असतो. म्हणून पहिले कारण नष्ट होते. दुसरेही कारण यासाठी शिल्लक उरत नाही की या इष्टवचनांवर श्रद्धा बाळगणारा मनुष्य कोणत्याही मानवास अगर पशूस, तसेच तोफ अगर तलवार किंवा लाठीकाठीस व दगडधोंड्यास प्राण घेण्याचे सामर्थ्य असल्याचे मानत नाही. तो अधिकार केवळ ईश्वरालाच प्राप्त आहे. त्याने मृत्यूची जी वेळ निश्चित केलेली आहे तत्पूर्वी जगातील सर्व शक्ती एकत्रितपणेही एखाद्याचा प्राण घेऊ शकत नाही. म्हणूनच अल्लाहवर ईमान धारण करणाऱ्यापेक्षा अधिक शूर जगात कोणीही नसतो. असंख्य तलवारी, तोफगोळ्यांचा वर्षाव, सैनिकांचे प्रखर हल्ले या सर्व गोष्टी त्याच्यासमोर कुचकामी ठरतात. अशा प्रकारे त्याच्या विरोधात असत्याचे सर्व शक्ती सामर्थ्य विफल ठरते. ईशमार्गात युद्ध करताना तो जेव्हा पुढे सरसावतो तेव्हा आपल्यापेक्षा दसपट शक्ती असलेल्या सैन्याचीही दाणादाण करून टाकतो. अनेकेश्वरवादी (मुशरीक) श्रद्धाहीन (काफिर) व नास्तिक, असे बळ कोठून प्राप्त करतील? त्यांना तर प्राणच सर्वांहून प्रिय असतो. शत्रूच्या कृतीने मृत्यू येतो व निसटून जाण्याने तो टळू शकतो असा त्यांचा समज असतो.
  10. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ वरील दृढ विश्वास माणसामध्ये संतोष व समाधान तसेच निरपेक्षपणा निर्माण करतो. लोभ व मोह, संशयीपणा व मत्सर यासारख्या हीन भावना माणसाच्या मनातून घालवून देतो. यशप्राप्तीसाठी अनुचित मार्ग अवलंबण्याच्या व अनुचित साधनांचा वापर करण्याचा विचारही त्याच्या मनात येत नाही. तो असे मानत असतो की उपजीविका अल्लाहच्या हाती आहे. तो जसे इच्छितो तसे कोणास कमी तर कोणास अधिक प्रमाणात देतो. प्रतिष्ठा, सामर्थ्य, नावलौकिक तसेच शासन व अधिकार हे सर्व काही ईश्वराच्या स्वाधीन आहेत. तो ज्याला जितके देऊ इच्छितो तितकेच देत असतो. आपले कर्तव्य इतकेच आहे की, उचित मार्गाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहावे. यश व अपयश हे सर्व ईश्वराच्या उपकारावर आधारित असते. त्याची देण्याची इच्छा झाल्यास जगातील कोणतीही शक्ती आड येऊ शकत नाही. तसेच त्याची इच्छा नसल्यास जगातील कोणतीही शक्ती ते मिळवून देऊ शकत नाही. याउलट अनेकेश्वरवादी, श्रद्धाहीन व नास्तिक लोक आपले यशापयश सफलता-असफलता हे आपल्या प्रयत्नांवर तसेच जगातील अन्य शक्तींच्या सहाय्यावर अगर विरोधावर अवलंबून असल्याचे मानत असतात. म्हणूनच त्यांच्यावर लोभ, मोह तसेच ईर्षा, लालसा यांचा पगडा असतो. साफल्यप्राप्तीसाठी लाचलुचपत, लांगुलचालन व खुशामत, कारस्थाने व सर्व प्रकारचे अनुचित मार्ग अनुसरण्यात त्यांना कसलीही खंत वाटत नाही. इतरांच्या यशाचा व सफलतेचा ते अत्यंत तिरस्कार व मत्सर करत असतात. म्हणून दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी ते कोणत्याही कुमार्गाचा वापर करण्यास मागेपुढे पाहात नाहीत.
  11. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ वरील दृढ विश्वास माणसाला ईशनियमांच्या बंधनात व मर्यादेत ठेवतो. त्यानुसार जीवन व्यतीत करण्यास शिकवितो. या इष्टवचनावर दृढ विश्वास बाळगणाऱ्या माणसाची अशी खात्री असते की, सर्व प्रकट तसेच अप्रकट ईश्वराला चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत. तो आपल्या मानेतील शिरेपेक्षाही अधिक जवळ आहे. रात्रीच्या काळोखात किंवा एकांतातही एखादे पापकृत्य केले तर सर्वज्ञ ईश्वरास ते कळते. आमच्या मनात खोलवर पापकृत्याचा विचार जरी डोकावला तरी ते ईश्वरास ज्ञात होते. आम्ही अन्य सर्वांशी लपवाछपवी करू शकतो, परंतु ईश्वरापासून काहीही लपवू शकत नाही. सगळ्यांपासून निसटू शकतो, परंतु ईश्वराच्या अधिसत्तेपासून निसटू शकत नाही. सर्वांपासून वाचू शकतो, परंतु ईश्वरपकडीतून वाचणे अशक्यप्राय आहे. हा विश्वास जसजसा दृढ होत जाईल तसतसाच मनुष्य ईश्वराचा अधिकाधिक आज्ञाधारक बनतो. ईश्वराने जे अवैध (हराम) ठरविले आहे त्याच्या जवळपासही तो फिरकणार नाही. तसेच जे कर्तव्य करण्याची त्याने आज्ञा केली आहे ते एकांतात व काळोखातही तो पार पाडतो. कारण त्याच्या समवेत सतत वार्ताहर-दूत सलग्न असतात आणि त्याला अशा एका न्यायालयाचा सतत मनात धसका वाटत असतो ज्याचे वॉरंट तो टाळू शकत नाही. मुस्लिम (आज्ञाधारक) होण्यासाठी सर्वांत पहिली अट ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ वर ‘ईमान’ (दृढ श्रद्धा) धारण करणे ही आहे. मुस्लिम शब्दाचा अर्थ, ‘‘ईश्वराचा आज्ञाधारक दास’’ (सेवक) असा आहे. ईश्वराचा आज्ञाधारक दास (मुस्लिम) होणे शक्य नाही जोपर्यंत अल्लाहखेरीज अन्य कोणीही उपासनेत पात्र नाही याची त्याच्या मनात खात्री होत नाही.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणीत अल्लाहवरील दृढ विश्वास व दृढश्रद्धा सर्वात जास्त महत्त्वाची व मूलभूत बाब होय. हाच इस्लामचा केंद्रबिंदू आहे, त्याचा गाभा व मूळ आहे, तसेच इस्लामच्या शक्तीचा झरा आहे. इस्लामच्या अन्य जितक्या श्रद्धा, कर्तव्ये व नियम आहेत ती सर्व याच केंद्राभोवती फिरत असतात. त्या सर्वांना याच केंद्रबिंदूपासून बलप्राप्ती होते. हे इष्टवचन उणे केल्यास इस्लामचा अर्थ शून्य होतो.
संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *