माणसांच्या चुकांचे दोन प्रकार आहेत. एक असे कृत्य आणि चुका ज्या अल्लाहच्या अधिकारांविरूद्ध असतात. दुसऱ्या प्रकारच्या चुका म्हणजे ज्या अल्लाहच्या निर्मिती- माणूस असो की पशू-पक्षी, त्यांच्या हक्कांविरूद्ध केल्या जातात. इतर माणसे आणि सजीव निर्मितीच्या हक्कांविरूद्ध जे कृत्य माणसे करतात त्या गुन्ह्यांना अल्लाह क्षमा करत नाही. अशा अपराधांना माफ करण्याचा अधिकार ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार केला गेला असेल त्यांना आहे. माणसाविरूद्ध आणि इतर सजीवांविरूद्ध अत्याचार करणे म्हणजे अल्लाहच्याही अधिकारांचे हनन करणे होय. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की एका माणसाला फक्त या कारणावरून नरकात टाकले जाईल की त्याने एका मांजराला बांधून ठेवले होते. आणि त्याच्या खाण्यापिण्याची सोयदेखील केली नव्हती. एकेठिकाणी प्रेषितांनी असेही सांगितले आहे की जे पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत नाहीत, प्राण्यांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेतात त्यांना भयंकर शिक्षा मिळेल. झाडांना विनाकारण तोडण्यासही प्रेषितांनी मनाई केली आहे. जर माणसाने कुणास त्रास दिला असेल तर त्याची माफी मागण्याने प्रकरण संपून जाते, मात्र जर कुण्या माणसाने इतरांच्या मालमत्तेवर कब्जा केला असेल, त्यांचे अधिकार त्यांना परत देत नसेल तर फक्त क्षमा मागणे पुरेसे नसून त्यांना त्यांची मालमत्ता परत करावी लागेल. एकमेकांवर रागावण्याचीही मनाई आहे. कुरआनात म्हटले आहे की “जे लोक टंचाईत असोत की त्यांना भरभराट लाभलेली असो, दोन्ही अपस्थांमध्ये अल्लाहच्या निर्मितीवर खर्च करतात, आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करतात, असे लोक अल्लाहला आवडतात.” (कुरआन-३:१३४) श्रद्धावंतांना संबोधून अल्लाह म्हणतो की, “अल्लाहच्या बाजूने न्यायाची साक्ष देण्यास उभे राहा. एखाद्या जनसमूहाशी शत्रुत्व तुम्हाला त्याच्यावर अन्याय करण्यास प्रवृत्त करता कामा नये. न्याय करा, हा सदाचार आहे. अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही जे काही करता अल्लाहला ते माहीत असते.” (कुरआन-५:८)
– सय्यद इफ्तिखार अहमद
0 Comments