Home A ramazan A माझी पहिली रमजान ईद

माझी पहिली रमजान ईद

– सीमा देशपांडे
7798981535

रमजानच्या एक आठवड्यापूर्वी मी खूप बेचैन झाले होते. माझे मन अशांत होते. तितक्यात बाबांचा फोन आला व ते म्हणाले बेटा,रमजान जवळ आला आहे, बाजारात खूप छान खजूर आलेली आहेत, घेवुन ये! अचानकपणे माझे बेचैन मन ’रमजान’ या शब्दाकडे वळले व डोक्यात असंख्य प्रश्‍न उत्पन्न झाले. खरंच! काय असतील रमजान? मुस्लिम लोक एवढे कडक उपवास कसे करत असतील?  माझी कुतुहुलता त्या उपवासाकडे जास्त होती, कारण मी जे उपवास पाहिले होते ते तर भरपूर खावुन-पिऊन होते. ज्यावर माझे आईसोबत नेहमी वाद व्हायचे.  माझ्या मते उपवास म्हणजे स्वईच्छांवर नियंत्रण ठेवणे व त्या भुकेची जाणीव होणे जे लोक पैशाअभावी कित्येक दिवस उपाशी राहतात. ह्या विचाराने मी रमजान महिन्यातील उपवासाची माहिती इंटरनेटद्वारे गोळा केली व माझे अशांत मन प्रफुल्लित झाले; हे वाचून कि उपवासाची व्याख्या तीच होती जी माझ्या मनात रचलेली होती. त्याशिवाय माझी नजर कुरआनच्या एका आयातवर पडली. ज्यात अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो, ”रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. आणि जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. तेव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा व माझ्यावर श्रद्धा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.”(कुरआन ः सुरे अल बकरा, आयत क्र. 185-186)
    हे वाचुन माझे मन खुप आनंदी झाले. ह्या विचाराने की जर मी उपवास केले तर आपणास ईश्‍वर भेटेल. खरच तो कसा असेल या कुतुहलतेने मी मनाशी निश्‍चय केला की मी उपवास करेन. पण त्यासोबत द्विधा मनःस्थिती झाली होती की मी पूर्ण 30 दिवस उपवास करु शकेन की नाही. कारण असंख्य अडचणींचे जाळे समोर उभे होते. जसे सासरचे उपवास करु देतील की नाही?, कॉलेजचे कलीग काय म्हणतील? पण माझे मन या अडचणीना दुय्यम स्थान देत होते व एका आध्यात्मिक प्रेरणेकडे ओढावत होते. मग मी ठरविले की, जे होईल ते होईल मी उपवास करेनच. रमजानच्या दोन दिवस आधी मी खजूर आणले व एका रॅकमध्ये लपवून ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येवू नये. मला वेळा माहिती नसल्यामुळे मी जवळच्या मस्जिद बाहेर लावलेल्या वेळेचा फोटो काढून आणला व रमजानची सुरुवात केली. माझा पहिला दिवस पहाटे उठून मी आंघोळ केली व दोन खजूर व एक लोटा पाणि पीऊन मी सैरी केली व फज्र च्या नमाजासाठी रूजू झाले.  मी नमाज माझ्या भाषेत पढली. कारण मला एवढीच माहिती होती की, ईश्‍वर हे पाहत नाही की तुम्ही कुठल्या भाषेत प्रार्थना करता, उलट तो हे पाहतो की तुम्ही त्याला किती मनापासून हाक मारता. नंतर कुरआन वाचायला सुरुवात केली. खरंतर याआधी मी कुरआनचे थोडे अध्याय वाचले होते परंतु रमजानचा पहिला दिवस मला कुरआनची नवीन ओळख करुन देत होता. मी कुरआन वाचत असताना अचानक माझ्या पोटात गोळा आला जेव्हा मी काफिर व मुनाफिकची आयात वाचली. मला याची जाणिव झाली की मी ज्या मूर्तीला पूजत होते तो ईश्‍वर नाही,  मी लहान मुलीसारखी हुंदके देवून रडत होते आणि माथा टेकवून ईश्‍वराला विणवणी करत होते, हे ईश्‍वरा!  मी तुला आत्तापर्यत ओळखू शकले नाही. माझे विचार तुला सतत टाळत गेले, माझे कृत्य तुझे आज्ञाभंग करत गेले परंतु, तू एक क्षणभर मला विसरला नाही.  खरंच तू किती दयाळू आहेस. हे अल्लाह! माझे मन बदलून टाक व मला तुझा मार्ग दाखव.”
    संध्याकाळी उपवास सोडला व मगरिब व ईशाची नमाज लपुन पढली. अशाप्रकारे पहिला रोजा तर पुर्ण झाला पण त्याचबरोबर त्या पहिल्या रोजाने सीमा देशपांडे चा नविन जन्म झाला. दूसरा रोजाला मी अजून धीट झाली व माझे मन, शरीर आत्मा भुकेपेक्षा ईश्‍वराच्या जवळ जाण्याच्या शोधात होते. मला एकीकडे खुप दुःख वाटत होते की मी आत्तापर्यंत किती गुन्हे केले आहेत व त्यासोबत आनंद ही झाला की मी ईश्‍वराला जाणले. मी ईश्‍वराची खुप माफी मागितली व मनाशी ठरविले मी आता ह्या मार्गापासुन मागे हटणार नाही, ज्या सत्याच्या शोधात मी कित्येक दिवसापासून होते. कुरआन ने माझ्या जीवनाला कलाटणी दिली व मला अनुभूती झाली की मी हे तीस दिवस उपवास करणारच. कुरआन मधे ईश्‍वर म्हणतो, ”हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.(कुरआन – सुरे अल्कसस आयत क्र. 56)
    पहिले तीन दिवस सुरळीतपणे गेले मात्र नंतर हळूहळू प्रत्येकाचे डोळे माझ्याकडे संशयरूपी नजरेने पाहत होते. सासूचा चेहरा प्रश्‍न करत होता परंतु विचारण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते. कारण घरच्यांना हे उपवास अमान्य होते. असेच एकदा सासू व नवर्‍याने मुद्दामहून माझे आवडते पदार्थ खायला घेवुन येवून मला जबरदस्ती ने उपवास तोडायला सांगितले, पण मी  ठामपणे नाकारत होते व मनात ईश्‍वराला विणवनी करत होते, ’हे अल्लाह माझे उपवास तोडू नकोस अणि एकच स्मरण करत होते, ला ईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्रसुलुल्लाह!’ घरची वेळ टळली नाही तोच कॉलेजमधे संकटाचे जाळे सुरु झाले. माझे कलिग मला सतत प्रश्‍न करत होते की, तू रोजे का करत आहेस? मी ठामपणे उत्तर दिले ईश्‍वरासाठी! त्यावर ते म्हणाले मुस्लिमांचा ईश्‍वर आपला नाही त्यावर मी हसत म्हणाली त्यांचा आपला सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, जो आपल्याला जन्म देतो व मृत्यु पण. मला माझी आध्यात्मिक प्रेरणा ईतकी मजबूत करत होती की त्यांच्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे मी सडेतोडपणे देत होती व ते निरुत्तर होत होते. जणूकाही मला वाटत होते की ईश्‍वर मला प्रेमाने हात धरून घेवून जात आहे व म्हणतोय, ’मी तुला निवडलेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.’ जसे-जसे मी कुरआन वाचत गेली तसेतसे माझे मन,आशा व बुद्धी आकांक्षा लावून होती ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी.
    संकटे तर येत होती पण अगदी सहजपणे टळतही होती. जणूकाही वार्‍याची थंड झुळुक आली अन् क्षणात निघून गेली. असेच एकदा सुट्टीचा दिवस होता. माझ्या पतीने मुद्दामहून सत्यनारायणाची पूजा आयोजित केली व तिकडे सासूने पाहुण्याना जेवायला बोलाविले व पतीने अट्टाहास केला की, मी पूजेला बसावे. माझ्यासाठी हा सर्वात अवघड क्षण होता. माझे ते सुकलेले ओठ पाणी मागत नव्हते तर ते ईश्‍वराला हाक मारत होते व  मनाशी एकच ध्यास घेवून होते, ”हे ईश्‍वरा माझे उपवास तोडू नकोस, मला तुझ्या मार्गापासुन दूर करु नकोस.” पाहणार्‍याला ही परिस्थिती अत्यंत अवघड दिसत होती परंतु माझ्यासाठी ते दुय्यम होते. कारण प्रत्येक जण माझ्या  विरोधात असूनही काहीच प्रहार करत नव्हते. हे पाहून मला असे वाटत होते की ईश्‍वराचे फरिश्ते मला सुरक्षा देत आहेत. उपवासासोबत माझी नमाजची कसरत होत होती. मला प्रत्येक नमाज लपून पढावी लागत होती. असेच एकदा कॉलेजमध्ये जुम्माची नमाज पडायला हातात एक स्कार्फ घेवून लेडिज रुममध्ये गेले. तेव्हा माझ्या एका कलिगने माझा पाठलाग केला व तिने मला नमाज पडताना पाहिले व काही क्षणात तिने पूर्ण कॉलेजमध्ये बातमी पसरवली की सिमा देशपांडे  रोझा करत आहे परिणामतः प्रत्येकजण माझ्याकडे संशयरुपी नजरेने पाहत होते. मात्र मी त्यांच्या नजरेला नजर लावून संभाषण करत होते. म्हणतात ना, जेव्हा ईश्‍वर तुमच्या पाठीशी असतो तेव्हा कुणीही काहीच करु शकत नाही आणि जेव्हा ईश्‍वर तुम्हाला सोडून देतो तेव्हा कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. माझे हे अनुभव मला ईश्‍वराच्या चमत्काराची जाणीव करुन देत होते, ज्याने माझे ईश्‍वराशी नाते घट्ट होत होते. मला प्रत्येक क्षण मोलाचा वाटत होता, मी काय-काय करावे जेणेकरून मी ईश्‍वराचे मन जिंकू शकेन? एकदा अशी वेळ आली की असरची अजान होत होती पण कुठेही जागा नव्हती जिथे मी नमाज पढू शकेन.कुणाच्या समोर पढू शकत नव्हती. ह्याच भीतीने की ते मला पुर्ण उपवास करु देणार नाहीत. कानात एकच कुरआनचे शब्द गुंजत होते नमाज कायम करा! नाईलाजाने मी बाथरूम मध्ये नमाज पढली. म्हणतात ना कडक उन्हानंतर गारवा पण येतो अगदी तसेच. ईश्‍वराने पंधराव्या रोजी माझे पूर्ण स्टेज बदलून टाकले. त्या माझ्या पालनकर्त्याने प्रत्येकाचे मन बदलून टाकले जी सासू उपवास तोडण्याचे कट रचत होती तीच माझ्या इफ्तार साठी जेवण बनवून ठेवायची. तिने मला नमाज पढताना पाहिली पण ती अबोल झाली. जणुकाही ईश्‍वराने तिच्या डोळ्यांवर पडदा पाडला होता. तिकडे कॉलेजमध्ये माझे कलिग राग न करता माझ्या कामात मदत करत गेले. खरंच ईश्‍वर कुरआनमध्ये म्हणतो,
”जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला आणि (हे पैगंबर सल्ल.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत. तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्‍चात्ताप स्वीकारणारा आहे.” (कुरआन : सुरे अन्नस्र – आयत नं.1-3).
    खरंच कुरान हा एका मित्रासारखा आहे जेवढा वेळ तुम्ही त्याच्यसोबत घालवाल तेवढा तो त्याच्या गुप्तगोष्टींचा उलगडा करतो. असेच पंधरावा रोजा होता. त्यादिवशी कॉलेजमधे एक मावशी स्वतःच्या मुलीची फीस भरण्यासाठी मंगळसूत्र विकायला निघाली होती. त्याच क्षणी मला अनुभूती झाली की ईश्‍वराने कुरआनमधे आज्ञा दिली आहे की, गरूजूंना जकात द्या. मी काहीच विचार न करता तिला 5000/- रुपये काढून दिले. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरच्या आनंदापेक्षा कित्येकपट आनंद माझ्या मनाला झाला. याच भावनेने की मी हे दान ईश्‍वरासाठी केले आहे व हे पाहून माझा अल्लाह माझ्यावर किती खुष झाला असेल. त्याचबरोबर मी अनेक अनाथालयाला दान केले, मोलकरीणी ला नवीन कपडे दिले, गरिबांना जेवण दिले. मी प्रत्येक काम हे ईश्‍वरासाठी करत होते आणि त्यात मला इतके समाधान वाटत होते ज्याची मी भुकेली होती. अखेरीस ईश्‍वराच्या कृपेने मी पूर्ण तीस रोजे पूर्ण केले आणि ईदच्या दिवशी अल्लाहला वचन दिले, की, मी मरेपर्यंत मूर्तिपूजा करणार नाही! माझ्यासाठी हा पहिला रमजान एका दुर्मिळ फुलाप्रमाणे वाटला. ज्यात फुल एकदाच उमलते परंतु त्याचा सुगंध पूर्ण वर्षभर दरवळत राहतो. माझी ईश्‍वराकडे एवढीच प्रार्थना आहे की, त्याने माझे संपूर्ण आयुष्य त्याच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा द्यावी व एक चांगली मोमीना बनण्याची माझ्यात क्षमता प्रदान करावी. आमीन!

संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *