Home A प्रेषित A ‘मदीना’ इस्लामी आंदोलनाचे केंद्र

‘मदीना’ इस्लामी आंदोलनाचे केंद्र

‘मेराज’च्या दिव्य प्रवासात प्रेषित मुहम्मद(स) यांना परोक्षातील ज्या गोष्टींचे दर्शन घडविण्यात आले, त्यामुळे प्रेषित आणि त्यांच्यावर जीव ओवाळणार्या सर्वच अनुयायांत नवीन साहस आणि संकल्प निर्माण झाले. या प्रसंगी प्रेषितांना जी ईश्वरी वाणी ऐकविण्यात आली. त्यामुळे भविष्यातील वाटचालीचे मार्गदर्शन घडले. चांगुलपणा आणि सत्याच्या आंदोलनात नवीन प्रेरणा व गती निर्माण झाली.
मक्का शहरात श्रद्धा आणि नैतिकता जोपासण्याच्या संभावना संपल्याचे पाहून प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या प्रचाराची दिशा ‘तायफ’कडे वळविली. परंतु तेथे तर मक्कापेक्षाही जास्त प्रतिकूल परिस्थिती त्यांनी अनुभवली. या दोन्ही ठिकाणी नकारार्थी उत्तर मिळाल्यावर मात्र ‘यसरब’कडून अतिशय धीमा होकार प्रेषितांच्या कानी पडला की, हा प्रदेश प्रेषितांचे शहर आणि सत्यधर्माचे केंद्र बनू शकतो. येथूनच सत्य प्रकाशाची मशाल पेटून संपूर्ण विश्वातील अज्ञान, अन्याय आणि अत्याचाराचा काळाकुट्ट अंधार नष्ट होईल. येथूनच सत्यधर्माची व मानवतेची स्थापना होण्यास सुरुवात होईल आणि एका नवीन इतिहासाचा प्रारंभ होईल.
मक्का अणि तायफ जवळच होते, परंतु ते खूप दूर गेले आणि यसरब (मदीना) दूर असूनही जवळ झाले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना स्वप्नावस्थेत एका अशा ठिकाणाकडे स्थलांतर करण्याचे दिव्य संकेत मिळाले होते की, ज्या ठिकाणी हिरव्यागार खजुरींच्या बागा, पाणी आणि थंड सावली होती. परंतु हे ठिकाण अद्याप सांकेतिक होते.
मदीना शहरास हे सौभाग्य प्राप्त होण्याचे नेमके कारण असे होते की, तेथील ‘औस’ आणि ‘खजरज’ परिवाराच्या काही सज्जनांनी अगदी आनंदाने इस्लामचा स्वीकार केला होता. जणू प्रखर उष्णतेने तळपत्या वाळवंटातील तहानलेला वाटसरू दयेच्या वर्षेची वाटच पाहत होता. खरोखर ते वाटच पाहत होते. मदीना शहरात ‘ज्यू’ लोकांचा विशेष प्रभाव होता. त्यांचे वीस कबिले तेथे वास्तव्यास होते. व्याजखोरीचा धंदा असल्याने अमाप संपत्ती त्यांच्याकडे असल्याने त्यांना खूप अहंकार वाढला होता. ‘औस’ आणि ‘खजरज’ परिवारांचे ‘ज्यू’ लोकांशी तंटेबखडे होते. त्यांच्यात गृहयुद्ध सुरुच होते. विशेषतः ‘बुआस’च्या युद्धात दोन्हीकडील प्रमुख सरदार ठार झाले होते.
‘ज्यू’ लोकांमध्ये एक अत्यंत व्यभिचारी भांडवलदार होता. त्याने सर्व ‘ज्यू’ लोकांवर फरमान जारी केला की, त्याच्या प्रभावक्षेत्रात जी मुलगी विवाह करील, तिने प्रथम या भांडवलदार असलेल्या ‘फतयून’ची लैंगिक तृष्णा भागवावी आणि मगच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करावी. संपूर्ण ‘ज्यू’ जणांनी गुपचूपपणे त्याच्या आदेशाचे पालन केले. परंतु ज्या दिवशी एका अत्याचारपीडित ‘ज्यू’ स्त्रीच्या पित्याने एका ‘मालिक बिन अजलान’ नावाच्या अरब युवकासमोर याचना केली की, ‘‘माझ्या मुलीस ‘फतयून’च्या विळख्यातून मुक्त करावे, तेव्हा ‘मालिक बिन अजलान’ला त्याच्या अश्रूंवर दया आली आणि त्याने तलवार उपसून मस्तावलेल्या ‘फतयून’कडे अगदी धावतच जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि ‘ज्यू’ लोकांना एका मस्तावलेल्या ‘ज्यू’ च्याच तावडीतून मुक्त केले. परंतु प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. ‘फतयून’च्या काही गुंडांनी ‘मतयून’चा बदला घेण्यासाठी ‘मालिक बिन अजलान’वर हल्ला केला. ‘मालिक बिन अजलान’च्या समर्थनात ‘औस’ आणि ‘खजरज’ कबिल्याचे तरूण सरसावले. दोन्हीकडून तलवारी भिडल्या. या युद्धामध्ये ‘औस’ आणि ‘खजरज’च्या अरबांनी ‘ज्यू’ लोकांना चांगलेच पछाडले. ‘ज्यू’ जमातीचे मोठमोठे सरदार यामध्ये ठार झाले. ‘ज्यू’ लोकांची शक्ती संपली.
‘ज्यू’ लोकांचा प्रभाव संपला असला तरी त्यांना त्यांच्या धर्म आणि वंशाचा अजूनही खूप फाजील अभिमान होता. त्यांच्याकडे ‘तौरात’ हा ईश्वरी ग्रंथ होता. इतर दिव्य ग्रंथांप्रमाणेच ‘तौरात’मध्येसुद्धा अंतिम प्रेषित येण्याची भविष्यवाणी होती. ‘ज्यू’ जणांना वाटत होते की, अंतिम प्रेषित ‘ज्यू’ वंशात येतील. म्हणून ते अरबवासीयांना चेतावणी देत असत की, आमच्या वंशामध्ये शेवटचे प्रेषित येणार आहेत. ते आल्यावर आम्ही तुमचा समाचार घेऊ. त्यांच्या गोष्टी ऐकून अरबांनादेखील वाटायचे की, जर अंतिम प्रेषित आलेच, तर आम्हीसुद्धा त्यांचा स्वीकार करु. अशा प्रकारे अंतिम प्रेषितांच्या येण्याची वाट सर्वचजण पाहत होते.
मदीना शहरातील पहिला युवक की, ज्याने इस्लामची मशाल हाती घेतली तो ‘सुवैद बिन सामित’ होता. तो एक महान कवी आणि महान योद्धा होता. अशाच प्रकारचे कवीमनाचे आणि शूरवीर युवक क्रांतिकारी आंदोलनाचे लढवय्ये सेवक सिद्ध होत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘तायफ’वरून परत येताना या सज्जन युवकाने त्यांची भेट येतली. आदरणीय प्रेषितांनी ‘सुवैद’ला इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. ‘सुवैद’ पूर्वी ‘लुकमान’ या प्राचीन तत्त्वज्ञानीच्या ग्रंथाने प्रभावित होता. त्याने या ग्रंथाविषयी प्रेषितांशी चर्चा केली. प्रेषितांनी त्यास सांगितले की, माझ्याजवळ तर अथांग तत्त्वज्ञानाने भरलेला कुरआन हा ग्रंथ आहे. मग कुरआनातील काही आयती प्रेषितांनी त्याच्यासमोर सादर केल्या. कुरआनाच्या आयती ऐकून तो खूप प्रभावित झाला. त्याने तत्काळ इस्लामचा स्वीकार केला. हा युवक मदीना शहरी पोहोचताच त्यास कोणीतरी ठार केले. प्राण जाताना त्याच्या मुखावर ‘अल्लाहु अकबर’ हेच शब्द होते.
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शिकवणीने प्रभावित होणारा मदीना शहराचा दुसरा युवक हा ‘इयास बिन मुआज’ होता. हा एका प्रतिनिधी मंडळासह होता. प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन सत्य धर्माची शिकवण दिली. कुरआनाच्या आयती सादर केल्या. ‘इयास’ याने प्रतिनिधी मंडळाच्या लोकांना सांगितले की, ‘‘तुम्ही ज्या कारणास्तव येथे आला आहात त्यापेक्षाही प्रेषितांची वाणी उत्तम व श्रेयस्कर आहे. मुळात हे प्रतिनिधी मंडळ ‘कुरैश’ कबिल्याच्या लोकांशी वाटाघाटी करण्यासाठी आले होते. तसेच प्रेषितांशी बोलणे अथवा भेटणे म्हणजे वाटाघाटीचे मार्ग बंद करणेच होते. मंडळप्रमुख ‘अबुल हैसर’ यांनी ‘इयास’च्या चेहर्यावर संतापाच्या भरात माती फेकून मारली व म्हणाला, ‘‘आम्ही या हेतूने येथे आलो नाही.’’ प्रमुखासमोर ‘इयास’ गप्प बसला. परंतु मनोमन त्याने इस्लामचा स्वीकार केला. परंतु ‘बुआस’च्या लढाईत हा युवकदेखील ठार झाला.
मदीना शहरात प्रेषितांच्या सत्यधर्माची चर्चा होत गेली. प्रेषितत्वाच्या अकराव्या वर्षी ‘हज’ यात्रेवर मदीना शहरातून आलेले प्रतिनिधी मंडळ ‘अकबा’ या ठिकाणी थांबले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) रात्रीच्या वेळी तेथे पोहोचले. या प्रतिनिधी मंडळासमोर प्रेषितांनी इस्लामचा उपदेश केला. दिव्य कुरआनची शिकवण दिली. वाईट कर्माची मनाई केली आणि सत्कर्माचा उपदेश दिला. प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी प्रेषितांना अगदी पहिल्याच नजरेत ओळखले आणि आपसात कुजबुजू लागले की, ‘‘आपण ज्या प्रेषितांची वाट पाहात होतो, ते हेच प्रेषित होय.’’ हे सहाजणांचे प्रतिनिधी मंडळ होते. ईश्वराने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सद्बुद्धी दिली. त्यांच्यात या गोष्टीची आशा निर्माण झाली की, हे प्रेषित आपल्या विभिन्न कबिल्यांना संघटित करतील. या प्रतिनिधी मंडळाने प्रेषित मुहम्मद(स) यांना आश्वासन दिले की, आम्ही आपल्या धर्माचा प्रसार आमच्या समाजात करू जर ईश्वराने त्यांना संघटित केले तर त्यांची संपूर्ण शक्ती आपल्याच पाठीशी राहील आणि आपल्यापेक्षा कोणतीच व्यक्ती शक्तिशाली असणार नाही.
हे छोटेसे प्रतिनिधी मंडळ मदीना शहरी परतले आणि त्याने मदीना शहरात इस्लामचा जोरदार प्रचार केला. मदीनावासीयांच्या प्रत्येक घरात इस्लामचा संदेश त्यांनी पोहोचविला. पुढच्या वर्षी म्हणजेच प्रेषितत्वाच्या बाराव्या वर्षी बारा व्यक्तींचे प्रतिनिधी मंडळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे आले आणि प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेतली. या प्रसंगी प्रेषितांनी त्यांच्याकडून वचन घेतले की, ईश्वराबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, कोणाच्याही शीलतेवर आळ घेऊ नये, कोणासही बदनाम करू नये, कोणत्याही प्रकरणात प्रेषितांची आज्ञा मोडू नये. ही ‘अकबा’ची पहिली रीतसर दीक्षा होय.
या प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय मुसअब बिन उमैर(र) यांना इस्लामच्या प्रचारासाठी प्रचारक म्हणून नियुक्त केले. माननीय मुसअब बिन उमैर-(र) यांनी प्रेषितांच्या आदेशाप्रमाणे मदीना शहरात इस्लामचा भरपूर प्रचार केला. तसेच लोकांना नमाज पढविली.
माननीय मुसअब बिन उमैर(र) यांनी अत्यंत कौशल्यपुर्णरीत्या ‘उसैद बिन हुजैर’ आणि ‘साद बिन मुआज’ या दोन सरदारांना सत्य धर्माचे निमंत्रण दिले आणि या दोन्ही सरदारांसमवेत त्यांच्या ‘अब्दुल अशहल’ या संपूर्ण कबिल्याने इस्लामचा स्वीकार करून इस्लामच्या मानवहित आंदोलनासाठी कंबर कसली. कबिल्यातील पुरुष आणि स्त्रियांपैकी केवळ ‘उसैरम’ नावाचा एकच माणूस विभक्त राहिला. त्यानेही नंतर ‘उहुद’च्या युद्धप्रसंगी इस्लाम स्वीकारला आणि मुस्लिमांसोबत लढताना हुतात्मा झाला. आदरणीय प्रेषितांनी त्यांस स्वर्गीय होण्याची शुभवार्ता दिली.
परत ‘हज’चा मोसम आला. या वेळेस एकूण बाहत्तर पुरुष आणि स्त्रियां प्रतिनिधी मंडळात होत्या. हा काफिलासुद्धा ‘अकबा’ या ठिकाणीच थांबला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपले काका माननीय अब्बास(र) यांना सोबत घेऊन या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. प्रतिनिधी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी प्रेषितांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना ‘मदीना’ येण्याचे निमंत्रण दिले. तसेच सर्वोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. माननीय अब्बास(र) म्हणाले की, ‘‘संपूर्ण मक्कावासी प्रेषितांच्या जीवावर उठलेले आहेत. तुम्ही प्रेषितांना पाठिबा दिला तर होणार्या परिणामांची जाणीव ठेवूनच पुढचे पाऊल उचला. कारण प्रेषित मुहम्मद(स) यांना पाठिबा देणे म्हणजेच मक्कावासीयांचा क्रोध आणि वैर ओढवून घेणे होय.’’
काही वेळापुरती वातावरणात निरव शांतता पसरली. मग प्रेषितांनी दिव्य कुरआनचा काही भाग त्यांच्यासमोर वाचला आणि क्षणार्धात वातावरण निवळले. प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी प्रेषितांना विनंती केली की, ‘हे प्रेषिता! तुम्ही मदीना शहरी वास्तव्य करावे, जेणेकरून आम्ही प्रत्यक्षात आपल्या शिकवणीचा लाभ घ्यावा.’ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही सत्यधर्मासाठी मला पूर्ण सहकार्य करण्यास आणि माझ्या सोबत्यांचे आपल्या परिवार सदस्यांप्रमाणे समर्थन करण्यास तयार आहात काय?’’
प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी विचारले, ‘‘यात आमचा काय लाभ?’’
‘‘ईश्वराची प्रसन्नता, परलोकातील यश आणि स्वर्गाची प्राप्ती!’’ प्रेषित उत्तरले.
‘‘हे प्रेषिता! आपण आम्हास कधीच सोडू नये!’’
‘‘मी तुम्हास कधीच सोडणार नाही. माझे जीवन आणि मरण तुमच्याच सोबत असेल!’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वाक्य ऐकून सर्वांनी अगदी मनापासून त्यांना वचन दिले. दीक्षाकार्य संपल्यावर प्रेषितांनी सत्य-स्थापनेच्या इस्लामी आंदोलनास्तव ‘खजरज’ कबिल्यात नऊ आणि ‘औस’ परिवारात तीन ‘नकीब’ (इस्लामी प्रतिनिधी किवा प्रमुख) नियुक्त केले. या नियुक्तीमुळे सुसंघटित समाज निर्माणकार्याची सुरुवात झाली.
आता हे मोठे प्रतिनिधी मंडळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडून इस्लामची नवीन प्रेरणा घेऊन ‘मदीना’ पोहोचले. इस्लामचा तीव्र गतीने प्रचार होऊ लागला. विशेषतः तरुणांना इस्लामने आकर्षित कले आणि इस्लामी आंदोलनाची शक्ती अफाट वाढत गेली.
गेल्या काही वर्षांपासून प्रेषित मुहम्मद(स) यांना मनापासून वाटत होते की, कुठेतरी स्थलांतर करून शक्ती निर्माण करावी आणि न्यायपूर्ण व्यवस्थेचा पाया रचावा. प्रेषितांनी याकरिता अॅबीसीनियाचा विचार केला. परंतु त्या ठिकाणी इस्लामी व्यवस्था लागू होणे शक्य नव्हते. ‘मदीना’ शहरातील बर्याच लोकांनी मनापासून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे प्रेषितांनी याकरिता ‘मदीना’ शहर निवडले. शिवाय मुसअब बिन उमैर(र) यांच्यामार्फत मिळालेल्या मदीनाच्या सविस्तर वृत्तान्तामुळे प्रेषितांना तेथील वातावरण अनुकूल वाटू लागले. ‘अॅबीसीनिया’हून परत आलेल्यांना प्रेषित सरळ ‘मदीना’ शहरात पाठवित असत. ‘अकबा’ येथील दुसर्या इस्लामदीक्षेनंतर प्रेषितांनी बर्याच जणांना मदीना शहरी वास्तव्यास पाठविले.
‘मक्का’ येथील इस्लामद्रोही सरदारांना चांगलीच जाणीव होती की, जर ‘मदीना’ शहर इस्लामी आंदोलनाचे शक्तीकेंद्र बनले तर ते त्यांच्यासाठी अत्यंत अवघड सिद्ध होईल. कारण मक्कामधील व्यापार्यांना माल घेऊन ‘सीरिया’ला जाताना मदीनावरुनच जावे लागत असे. मदीना शहर इस्लामी आंदोलनाचे केंद्र बनल्यास मक्कावासीयांना व्यापार करणे अशक्य होईल. यासाठी मक्कावासीय मदीनास स्थलांतर करणार्यांचा छळ करीत, त्यांची संपत्ती हिसकावून घेत असत. यामुळे कित्येक वस्त्या उजाड झाल्या.
संबंधित पोस्ट
June 2024 Zul Qa'dah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 30
8 Zul Hijjah 1
9 2
10 3
11 4
12 5
13 6
14 7
15 8
16 9
17 10
18 11
19 12
20 13
21 14
22 15
23 16
24 17
25 18
26 19
27 20
28 21
29 22
30 23

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *