Home A प्रेषित A प्रेषित्वाची (प्रेषिताची) समाप्ती

प्रेषित्वाची (प्रेषिताची) समाप्ती

वर्तमानकाळात इस्लामचा सत्यनिष्ठ व सरळ मार्ग जाणून घेण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण व पवित्र ‘कुरआन’ या दोहोंखेरीज अन्य कुठलेही साधन नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे अखिल मानवजातीसाठी ईश्वराचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर प्रेषित धाडण्याची परंपरा व क्रम याची सांगता झाली. (१) मानवाला ज्या प्रमाणात आदेश देण्याचा व मार्गदर्शन करण्याचा ईश्वराचा मानस होता ते सर्वच्या सर्व त्याने आपल्या शेवटच्या प्रेषिताकरवी पूर्ण केले. आता ज्या कोणाला सत्याची आवड असेल व ईश्वराचा आज्ञाधारक दास (मुस्लिम) होण्याची त्याच्या मनाची इच्छा असेल त्याला ईश्वराच्या या शेवटच्या प्रेषिताशी ईमान व दृढश्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या शिकवणुकीचा स्वीकार करून त्यांनी दाखवून दिलेल्या पद्धतीनुसार त्यावर आचरण करणे अनिवार्य आहे.
प्रेषित्व समाप्तीचा युक्तिवाद –
प्रेषित्वासंबंधी सविस्तर हकीकत यापूर्वी सांगितली गेली आहेच. ती नीटपणे समजून घेतल्यास व तिच्यावर विचार-चिंतन केल्यास स्वतःची खात्री होईल की, प्रेषित प्रतिदिनी जन्माला येत नसतात. तसेच प्रत्येक जाती-वंशासाठी प्रत्येक काळी एक प्रेषित असणे हेही आवश्यक नाही. प्रेषिताचे जीवन खरेतर त्याने दिलेल्या शिकवणुकीच्या व मार्गदर्शनाच्या जिवंत अस्तित्वाचाच काळ आहे. जोपर्यंत त्याची शिकवण व उपदेश जिवंत आहेत तोवर जणू प्रेषित स्वतःच जिवंत आहेत. मागील प्रेषित या दृष्टीने जिवंत नाहीत कारण त्यांनी दिलेल्या शिकवणुकीत लोकांनी नंतर फेरबदल करून टाकले आहेत. त्यांनी आणलेल्या ग्रंथांपैकी एकसुद्धा त्याच्या मूळरूपात आज उपलब्ध नाही. प्रेषितांनी दिलेल्या ग्रंथाची मूळप्रत आमचेकडे आहे असा दावा खुद्द त्यांचे अनुयायीसुद्धा करू शकत नाही. त्यांना त्यांच्या प्रेषिताच्या जीवनचरित्राचासुद्धा विसर पडला आहे. या अगोदरच्या प्रेषितांपैकी एकाचेही खरेखुरे व विश्वसनीय असे जीवनचरित्र आज कोठेही उपलब्ध नाही.
त्यांचा जन्म कोणत्या काळात झाला, कोठे झाला, त्यांनी कोणकोणती कर्तृत्वे केली, त्यांनी कशा प्रकारचे जीवन व्यतीत केले, कोणती शिकवण दिली व लोकांना कोणत्या गोष्टीपासून परावृत्त केले, हेही निश्चितपणे व विश्वसनीयरीतीने सांगितले जाऊ शकत नाही. हाच त्यांचा मृत्यू आहे. या दृष्टिकोनातून ते आज जिवंत नाहीत. परंतु प्रेषित मुहम्मद (स.) जिवंत आहेत कारण त्यांची शिकवण व मार्गदर्शन जिवंत आहे. जे कुरआन त्यांच्याकरवी अवतरले ते आपल्या मूळ शब्दांनिशी आजसुद्धा उपलब्ध आहे व त्यात एक अक्षराचा व कानामात्राचाही फेरबदल झालेला नाही. त्यांच्या जीवनातील घटना, त्यांची उक्ती, त्यांच्या कृती, हे सर्वच्या सर्व सुरक्षित आहेत. चौदाशे वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला असतानाही इतिहासात त्यांचे प्रतिबिंब इतके स्वच्छ व स्पष्ट दिसते की जणू आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनीच खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांना पाहात आहोत. जगातील कोणाही व्यक्तीचे जीवनचरित्र इतके सुरक्षित नाही जितके ते प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आहे. जीवनातील प्रत्येक बाबतीत आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रापासून प्रत्येक प्रसंगी बोध घेऊ शकतो. हे याचे प्रमाण आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या नंतर अन्य प्रेषिताची आवश्यकता उरली नाही.
एका प्रेषितानंतर पुन्हा दुसरा प्रेषित येण्यासाठी केवळ खाली दिलेली तीन कारणेच असू शकतात.
  • पूर्वीच्या प्रेषिताने दिलेली शिकवण पूर्णपणे नष्ट झालेली असणे व ती शिकवण पुन्हा मानवांत प्रस्तुत करण्याची गरज निर्माण होणे.
  • पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांनी दिलेली शिकवण ही परिपूर्ण नसणे व तिच्यात सुधारणा व वृद्धी करण्याची गरज असणे.
  • पूर्वीच्या प्रेषितांनी दिलेली शिकवण एका विशिष्ट देशापुरतीच मर्यादित असणे व शेष जगासाठी प्रेषिताची गरज असणे. (२)

वर सांगितलेली तिन्हीही कारणे आता उरलेली नाहीत. त्याबद्दल स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मानवजातीला दिलेली शिकवण जिवंत आहे. त्यांनी पुरस्कारलेला धर्म कोणता होता, त्यांनी कशाचे मार्गदर्शन व उपदेश दिले, कोणती जीवनपद्धत रूढ केली, कोणती जीवनपद्धत संपविण्याचे व तिच्यापासून जनसमूहाला परावृत्त करण्याचे प्रयत्न केले, हे सर्व जाणून घेण्यासाठी सुरक्षित व आवश्यक असणारी सर्व ऐतिहासिक साधने आज उपलब्ध आहेत. म्हणून जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेली शिकवण जर नष्ट झालेलीच नाही तर त्या शिकवणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणाही प्रेषिताच्या आगमनाची आवश्यकता उरलेली नाही.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या करवी संपूर्ण जगाला इस्लामची परिपूर्ण शिकवण दिली गेली असून त्यात काहीही कमी-अधिक करण्याची गरज उरलेली नाही.
तिच्यात कसलीही उणीव राहिलेली नाही की जी दूर करण्यासाठी कोणा दुसऱ्या प्रेषिताच्या आगमनाची गरज भासावी. असे दुसरे कारणही उरले नाही.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित्व देऊन पाठविले गेले, ते कोणत्या एका विशिष्ठ जातीवंशापुरतेच व एखाद्या देशापुरतेच मर्यादित नसून जगातील सर्व मानवजातीसाठी आहे. त्यांनी दिलेली शिकवण सर्व मानवजातीसाठी पुरेशी आहे. म्हणूनच कोणाही विशिष्ट जातीवंशासाठी आता वेगळा प्रेषित येण्याचीही गरज उरली नाही. अशा रीतीने तिसरे कारणही दूर झाले.
याच आधारावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ‘खातिमुन नबीय्यीन’ (अंतिम प्रेषित) म्हणजेच दुसऱ्या शब्दांत प्रेषित्वाच्या क्रमाची सांगता करणारा असे संबोधले गेले आहे. आज जगात अन्य कोणत्याही प्रेषिताच्या आगमनाची गरज उरलेली नसून केवळ स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुकरण करणाऱ्या आणि इतरांना तसे करण्यास उद्युक्त करणाऱ्या लोकांचीच आता आवश्यकता आहे. त्यांची शिकवण नीट समजून घ्यावी आणि त्यानुसार आचरण करावे. जे नियम घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले होते ते नियम संबंध जगात रूढ होऊन त्या नियमावर अधिष्ठित शासन व सत्ता या भूमंडलावर प्रस्थापित व्हावी केवळ याचीच आता गरज आहे.(३)
१) पाहा, दिव्य कुरआन सूरह ३३ आयत ४०.
२) चौथे कारण असेही असू शकते की यात असलेल्या एका प्रेषिताला सहाय्य करण्यासाठी दुसरा प्रेषित पाठविण्यात यावा, परंतु याचा उल्लेख आम्ही केवळ याच कारणासाठी केला नाही की पवित्र कुरआनमध्ये अशी दोनच उदाहरणे दिलेली आहेत. अशा या अपवादात्मक उदाहरणांवरून सहाय्यक प्रेषित पाठविण्याचा अल्लाहचा सर्वसाधारण नियम आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
३) काही लोकांच्या मनात शंका येते की इस्लामने मानवी जीवनासाठी जे कायदेकानू व नियम दिले आहेत ते परिस्थितीनुरूप व काळानुरुप मनुष्याची साथ कशी देतील. काळानुरूप व परिस्थितीनुरुप नियम बदलत असणे उचित आहे. अशा प्रकारच्या गोष्टी चिंतन-मनन न करताच सांगितल्या जातात. या संदर्भात काही मूलभूत गोष्टी डोळ्यांसमोर असल्यास मनात अशा प्रकारची शंका येत नाही.
  • इस्लाम ईश्वराने अवतरित धर्म आहे. ईश्वराचे ज्ञान पूर्ण आहे. ईश्वराला काळाची सुरवात व अंत माहीत आहे. त्याला माहीत आहे की मनुष्याला कोणकोणत्या परिस्थितींना तोंड द्यावे लागेल.
  • इस्लामचे सिद्धान्त व नियम खरेतर मानवी प्रकृतीनुसार आहेत. समयपरिवर्तनाने मानवी प्रकृतीत परिवर्तन होत नाही.
  • हे समजून घेणे आहे की जीवनाचे मूलभूत सिद्धान्त व मूलभूत मान्यतांमध्ये फरक पडत नाही. समयाच्या प्रगती व परिवर्तनामुळे समाज व जीवनाचे केवळ बाह्यरूपातच परिवर्तन घडते. जीवनाच्या मौलिक व स्थायिक तत्त्वांमध्ये कोणतेच परिवर्तन येत नाही. इस्लामने मानवी जीवनासाठी जे सिद्धान्त व नियम दिले आहेत ते असे आहेत जे सदैव काम येणारे आहेत. ते नियम व सिद्धान्त शाश्वत आहेत. मनुष्याने ‘इज्तेहाद’ द्वारा म्हणजे आपल्या विवेकबुद्धीने काम घेऊन त्यांना एखाद्या काळात अथवा विकसित किंवा अविकसित समाजात लागू करू शकतो. इस्लामने दिलेले मौलिक सिद्धान्त आणि त्याने निश्चित केलेल्या जीवनाच्या मान्यता मनुष्याला नेहमी सरळ व सत्य मार्गावर मार्गस्थ करतील. इस्लाम मनुष्याच्या बुद्धीविवेकाचा आदर करतो. मनुष्याच्या मानसिक विकासासाठी हे आवश्यक होते की मनुष्याला त्याच्या बुद्धीविवेकाने काम करण्याची संधी प्राप्त होत जावी. मनुष्य आपल्या बुद्धीविवेकाने काम घेऊन ईश्वराने अवतरित प्रकाशात प्रत्येक युगात व समाजात स्वतःसाठी मार्ग काढू शकतो.
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *