Home A प्रेषित A प्रेषितांची वास्तवता आणि ओळख

प्रेषितांची वास्तवता आणि ओळख

प्रेषितांना ओळखण्याचे पुरावे कोणते आहेत व प्रेषिताची वास्तवता काय आहे.? तुम्ही हे पाहता की जगात माणसाला ज्या ज्या वस्तूंची गरज असते. अल्लाहने त्या सर्वांची व्यवस्था स्वतःच केलेली आहे. मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला किती साधनसामग्री देऊन जगात धाडण्यात येते. बघण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, वास घेण्यासाठी तसेच श्वासोच्छवासासाठी नाक, स्पर्शज्ञानासाठी शरीराच्या त्वचेतील स्पर्शाची संवेदना, चालण्यासाठी पाय, काम करण्यासाठी हात, विचारचिंतन करण्यासाठी मेंदू आणि अशाच प्रकारच्या इतर अगणित बाबी, पूर्वयोजनेनुसार त्याच्या सर्व गरजांचा साकल्याने विचार करून त्या चिमुकल्या देहात समाविष्ट केलेल्या असतात. नंतर जेव्हा तो जगात येतो तेव्हा त्याच्या जीवनास आवश्यक असलेल्या गोष्टी इतक्या विपुल प्रमाणात त्याला उपलब्ध होतात ज्यांची मोजदादही तुम्ही करू शकत नाही. हवा, पाणी, प्रकाश, उष्णता, जमीन व मातेचे वक्षस्थळात आधीच निर्माण झालेले दूध, माता पित्यांच्या नातेवाईकांच्या व इतरांच्या अंतःकरणातही त्याच्याबद्दल उत्पन्न होणारी माया व प्रेम, निर्माण केले जाते, ज्यांच्याद्वारा त्याचे पालनपोषण व संगोपन केले जाते. मग जसजसा तो वाढत जातो तसतसे त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी हरप्रकारच्या वस्तू त्याला प्राप्त होत जातात. असे वाटते की, जणू काय पृथ्वीवरच्या व आकाशातील सर्व शक्ती त्याच्या संगोपनासाठी व सेवेसाठी कार्यरत आहेत.
यानंतर आणखी पुढे चला. जगात कार्य करण्यासाठी ज्या क्षमता आवश्यक असतात त्या सर्व माणसाला दिल्या आहेत. शारीरिक शक्ती, बुद्धी व आकलनशक्ती, वाक्शक्ती व अशाच प्रकारच्या इतर अनेक क्षमता प्रत्येक माणसात कमीजास्त प्रमाणात असतात. परंतु या बाबतीत ईश्वराची व्यवस्था एक अजब प्रकारची आढळते. त्याने सर्व प्रकारच्या क्षमता सर्व माणसांना सारख्या प्रमाणात दिलेल्या नाहीत. जर असे झाले असते तर कोणीही कोणाचा गरजू राहिला नसता व कोणीही कोणाची पर्वा केली नसती. म्हणून अल्लाहने सर्व माणसांच्या एकूण गरजांसाठी सर्व क्षमता माणसामध्येच निर्माण केल्या असल्या तरी अशा रीतीने एका माणसाला एक विशिष्ट क्षमता अधिक प्रमाणात दिली तर दुसऱ्या माणसाला वेगळी क्षमता अधिक प्रमाणात दिली. तुम्ही हे पाहता की काही माणसांमध्ये शारीरिक श्रम करण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते. काही माणसात एखाद्या विशिष्ट कलेची अगर विशिष्ट व्यवसायाची उत्पन्न क्षमता असते व बाकीचे त्यापासून वंचित असतात. काही माणसे इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. काही माणसे उपजत सेनापती असतात. काही माणसात विशिष्ट शासकीय योग्यता असते. काही माणसे असामान्य वक्तृत्वाची क्षमता घेऊन जन्माला येतात. काही माणसांमध्ये लेखन कलेचे अचाट सामर्थ्य स्वाभाविकतःच असते. एखादा मनुष्य असा जन्मतो की त्याची बुद्धी गणितशास्त्रात अत्यंत तीक्ष्ण असते. ती इतकी की, या शास्त्रातील अत्यंत कठीण प्रश्न व समस्यांची तो अशी चुटकीसारखी सोडवणूक करतो जी इतरांच्या आवाक्याबाहेर असते. दुसरा एखादा मनुष्य असा होऊन जातो जो अद्भूत वस्तु निर्माण करतो व त्यांना पाहून सर्व जग आश्चर्याने थक्क होऊन जाते. आणखी एखादा मनुष्य अशी अपूर्व कायदेविषयक निपुणता बाळगतो की वर्षानुवर्षे कायद्यातील एखाद्या समस्येवर चिंतन केल्यानेही ती सुटू शकत नाही, अशा समस्येवर त्याची दृष्टी आपोआपच पडते. या सर्व ईश्वरी देणग्याच होत. कोणीही आपल्यामध्ये अशा प्रकारच्या क्षमता स्वतः निर्माण करु शकत नाही. शिक्षण व संस्काराने या गोष्टी उत्पन्न होऊ शकत नाहीत. खरे तर या सर्व उपजत क्षमता असून ईश्वर आपल्या चातुर्यानेच त्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीलाच त्या प्रदान करतो.
ईश्वराच्या या देणग्यांवरही विचार व चिंतन केल्यास असे आढळून येते की, मानवी संस्कृतीसाठी ज्या योग्यता व क्षमतांची गरज जास्त प्रमाणात असते, त्या जास्त माणसात निर्माण होतात आणि ज्या क्षमतेची गरज कमी प्रमाणात असते त्या क्षमता कमी लोकांत आढळून येतात. शिपाई जास्त तयार होतात. किसान, सुतार, लोहार व अशाच प्रकारची इतर कामे करणारी माणसे बहुसंख्येने तयार होतात. परंतु विद्वान व बौद्धिक सामर्थ्य असणारे कमी असतात. तसेच सेनापतित्व व राजकीय थोर योग्यता असणारे थोड्या प्रमाणांत जन्माला येतात. जे एखाद्या कलेत व शास्त्रात अत्यंत व असामान्य ज्ञान व क्षमता बाळगतात ते अत्यंत दुर्लभ असतात. कारण त्यांच्या कर्तृत्वाने मानवजातीला शतकानुशतकापर्यंत त्यांच्यासारख्या विद्वानांची गरज उरत नाही.
जनमानसातून इंजिनियर, गणितज्ञ, वैज्ञानिक व कायदेपंडित, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व भिन्न भिन्न व्यवस्थांची क्षमता बाळगणारे लोकच जन्माला यावेत; केवळ हीच एक गरज मानवजातीला या जगात यशस्वी व सफल होण्यासाठी नाही, याचाही विचार व्हायला हवा. या सर्वांहून मोठी आणखी एक गरज आहे व ती अशी की माणसांना ईश्वराचा मार्ग दाखविणाराही कोणीतरी हवा. इतर लोक तर केवळ इतकेच दाखविणारे आहेत की, जगात मनुष्यासाठी काय काय आहे व त्यांचा कशारीतीने वापर व उपयोग केला जाऊ शकतो. परंतु खुद्द माणसाचे अस्तित्व जगात कशासाठी आहे, हे सांगणारा व दाखवून देणाराही कोणीतरी पाहिजेच. तसेच मनुष्याला विश्वातून ही सर्व साधन-सामग्री कोणी प्रदान केली? त्या प्रदान करणाऱ्याची इच्छा काय आहे? हे ही सांगणारा पाहिजेच, जेणेकरून मनुष्याने त्यानुसार आचरण करून निश्चित व शाश्वत सफलता प्राप्त करावी. ही मनुष्याची वास्तविक व सर्वांत मोठी गरज आहे. ज्या ईश्वराने आमची लहानसहान गरज पुरी होण्याची परिपूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे, तो ईश्वर इतक्या महत्त्वपूर्ण गरजेची पूर्तता करण्याबाबत बेसावध असेल; ही गोष्ट मान्य करण्यास बुद्धी नकार देते. असे कदापिही नाही. ज्या प्रकारे ईश्वराने प्रत्येक विद्येची प्रत्येक कलेची व विज्ञानाची योग्यता व क्षमता बाळगणारी माणसे जन्माला घातली त्याचप्रमाणे अशा माणसांनाही जन्माला घातले ज्यांच्यात खुद्द ईश्वरालाच ओळखण्याची सर्वोच्च पात्रता होती. ईश्वराने त्यांना ‘‘दीन’’ (जीवनधर्म), नैतिकता व आचारशास्त्र (शरिअत) चे ज्ञान आपल्याकडून दिले व इतरांना त्यानी या गोष्टींची शिकवणूक द्यावी या सेवा कार्यासाठी त्यांना नियुक्त केले. हेच ते लोक होत ज्यांना आमच्या भाषेत ‘‘नबी’’ अथवा ‘‘रसूल’’ किंवा ‘‘प्रेषित’’ (ईशदूत, संदेष्टा) असे म्हटले जाते.
प्रेषितांची ओळख
ज्याप्रमाणे अन्य विद्या व कलांमध्ये नैपुण्य व कौशल्य असणाऱ्या व्यक्तीमध्ये विशेष प्रकारची बुद्धी व विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती उपजतच असते, अगदी त्याचप्रमाणे प्रेषितसुद्धा एक विशिष्ट मनोवृत्ती घेऊनच जन्माला येतात.
एखाद्या जन्मजात कवीचे काव्य ऐकल्यावर आमच्या चटकन लक्षात येते की त्याच्यामध्ये उपजतच काव्यप्रतिभा आहे, कारण इतरांनी हवा तितका प्रयत्न करूनही तशी काव्यरचना त्यांना साधत नाही. त्याचप्रमाणे एखादा जन्मजात वक्ता, एखादा जन्मजात प्रतिभासंपन्न लेखक, एखादा जन्मजात संशोधक, एखादा उपजत नेतृत्वगुण असणाऱ्याची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे स्पष्टपणे पटते. कारण हे सर्व त्यांच्या अंगी असलेल्या अनन्यसाधारण योग्यतेची चमक प्रकट करतात जी इतर लोकांत नसते. ठीक अशीच स्थिती प्रेषितांचीही असते. त्यांची बुद्धिमत्ता अशा गोष्टींची उकल करते जी इतरांच्या कल्पना-विचारातही नसते. तो अशा विषयांचे विवरण करतो ज्याचे विवरण व विश्लेषण त्यांच्याखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही. त्यांची दृष्टी अशा सूक्ष्म बाबीपर्यंत खोलवर जाते जेथे इतरांची दृष्टी वर्षानुवर्षाच्या चिंतनानंतरही पोहोचू शकत नाही. तो जे काही सांगतो त्याचा आपली बुद्धी स्वीकार करते आणि आपले मन अशी ग्वाही देते की, अवश्य हेच सत्य आहे. जगातील अनुभवावरून व ब्रह्मांडातील निरीक्षणावरून त्यांची प्रत्येक गोष्ट खरी असल्याचे सिद्ध होते. परंतु आपण स्वतःच तशा गोष्टी सांगण्याची इच्छा करू लागलो तर आम्ही ते सांगू शकत नाही. यानंतर त्याची मनोवृत्ती इतकी सोज्वळ, सात्विक व पवित्र असते की तो प्रत्येक व्यवहारात सचोटीचा सद्वर्तनी व सालसपणाचा मार्ग अंगीकार करणारा असतो तो कधीही चुकीची गोष्ट उच्चारत नाही, कसलेही दुष्कर्म करीत नाही आणि सतत चांगुलपणा व सत्यनिष्ठेची शिकवण देत असतो. इतरांना तो जे काही सांगतो त्यावर स्वतः आचरण करून दाखवितो. त्याच्या जीवनात असे एकही उदाहरण आढळून येत नाही की त्याच्या उक्तीविरुद्ध त्याची कृती आहे. त्याच्या कथनात व कृतीत कसलेही स्वहित आढळत नाही. तो इतरांच्या भल्यासाठी स्वतः हानी पत्करतो आणि स्वतःच्या भल्यासाठी इतरांचे नुकसान कदापिही करीत नाही. त्याचे संपूर्ण जीवन सचोटी, सभ्यपणा, पावित्र्य, उच्च व उदात्त विचारसरणी तसेच पराकोटीच्या उच्च माणुसकीचा एक आदर्श असतो. त्यामध्ये शोधूनही कसला दोष आढळत नाही. हे सर्व माहीत झाल्यानेच स्पष्टपणे ओळखता येते की हा मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *