प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की, जर तुमच्या समोर प्रलय येऊलागला आणि आता काही क्षणांतच हे जग संपून जाणार आहे, जगाची शेवटची घटिका समोर येताना दिसत आहे. आणि अशा वेळी जर तुमच्या हातात एखाद्या फळझाडाचे रोपटे असेल तर ते लावून टाका, ते फेकून देऊ नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करा.
प्रेषितांनी असे सांगितले नाही की आता या भीतीच्या वातावरणात तुम्ही काय करू शकता, शेवटची घटिका समोर दिसत आहे, आता एखाद्या झाडाचे रोपटे लावल्याने काय होणार आहे, कितीतरी वर्षे लागतील त्याला फळे यायला. आता काही क्षणांतच सर्व काही संपून जाणार आहे. तुम्ही फक्त ईश्वराच्या नावाचे स्मरण करा. सर्व काही सोडून द्या. प्रेषित म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. बाकी त्या झाडाचे काय होणार याची काळजी करणे तुमचे काम नाही.
मानवी जीवनात झाडाचे काय आणि किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे. झाड लावणे म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन दान देण्यासारखे आहे. जगाचा शेवट समोर दिसत असताना देखील प्रेषितांनी अशी शिकवण दिली की तुम्ही आपल्या जगण्याची इच्छा सोडता कामा नये. पुढे काय होणार हे तुमच्या सकारात्मक क्रियाशक्तीवर अवलंबून आहे. जी काही आपत्ती कोसळणार आहे ती कोसळणारच, पण तिच्या कोसळण्याआधीच तुम्ही निराश होता कामा नये. शेवटपर्यंत संघर्ष करा. जगातले सर्व अडथळे, कठीण प्रसंग आणि नैराश्य माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काहीच नसतात. या शिकवणीत प्रेषितांना हेच सांगायचे आहे की आणखी इच्छाशक्ती ढळू देऊ नका. समोर डोंगरासारख्या समस्या असल्या, शत्रुंचे बलाढ्य सैन्य असले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण जे काही माणसाला लाभते ते प्रयत्नांती लाभते. समोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड दिल्याशिवाय आपले ध्येय साधता येत नाही. पक्का विश्वास करून संघर्ष करत राहा. पुढे काय होणार याची काळजी करू नका. अशा विश्वासाने आपण आपल्या हातातील रोपटे जमिनीत लावून टाका, पुढे काय होईल हे पाहणे तुमचे काम नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांना जीवे मारण्याची एक योजना मक्केच्या लोकांनी आखली होती, ती प्रेषितांना कळली. प्रेषित आपले एक अनुयायी अबूबकर (र.) यांना घेऊन मक्केबाहेर एका गुहेत जाऊन लपून बसले होते. इतक्यात मारेकरी त्या गुहेपर्यंत पोहोचले. अबूबकर काहीसे घाबरले. त्यावर प्रेषित त्यांना म्हणाले, “घाबरू नका. दुःखी होऊ नका. ईश्वर आपल्या बाजूने आहे.” त्या मारेकऱ्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि निघून गेले.
0 Comments