Home A blog A निकाह हलाला गैरसमज व वास्तव

निकाह हलाला गैरसमज व वास्तव

काही दिवसांपूर्वी ‘निकाह-हलाला’ आणि इतर बाबींची संवैधानिक वैधता ठरवण्याकरिता प्रकरण संवैधानिक खंडपीठाकडे वर्ग केले होते. त्याबाबत वृत्तपत्रांत ही  बातमी प्रकाशित झाली   होती. सदर बातमी प्रकाशित करताना ‘निकाहहलाला’बद्दल जसा उल्लेख करण्यात आला त्यावरून असे दिसून येते की समाजात ‘निकाह-हलाला’बद्दल बरेच गैरसमज आहेत. मुस्लिम  पर्सनल लॉ (शरियत अप्लिकेशन) अधिनियम, १९३७ नुसार विवाह / घटस्फोटाबद्दल भारतातील सर्व न्यायालये इस्लामी शरियतप्रमाणे न्यायनिवाडा करतात.

गैरसमज
समाजात ‘निकाह- हलाला’ एक प्रकारची विवाहपद्धती असल्याचा चुकीचा समज आहे. ‘निकाह-हलाला’ या प्रकारच्या कोणत्याही विवाहपद्धतीचे इस्लामी शरियतमध्ये अस्तित्व नाही. असाही गैरसमज आहे  की मुस्लिम पुरूषाने आपल्या पत्नीला तलाक  दिल्यानंतर जर त्या पतीला त्याच स्त्रीशी पुन्हा लग्न करायचे असेल तर तिला एखाद्या परपुरुषाशी निकाह (विवाह) करून त्याच्याशी  शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतरच त्याच्याकडून घटस्फोट झाल्यानंतर तिचा पहिला पती तिच्याशी पुन्हा विवाह करू शकतो. पत्नीची इच्छा नसतानाही बळजबरीने ‘निकाह-हलाला’  या नावाने तिला एका परपुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावा लागतो, परंतु हे सर्व समज अत्यंत चुकीचे आहेत. पहिल्या पतीशी विवाह करण्याच्या उद्देशाने ही पद्धत इस्लामी  शरियतमध्ये वर्ज्य आहे. हा गैरसमज मुस्लिम पुरुषांच्या तलाक कायद्याच्या अपूर्ण ज्ञानामुळे निर्माण झालेला आहे.

‘निकाह-हलाला’ची वास्तविकता
‘निकाह-हलाला’बद्दल गैरसमज व  त्याचे वास्तव समजावून घेण्याकरिता इस्लामी शरियतप्रमाणे दांपत्य जीवनशैली, तलाक/घटस्फोटबद्दल तरतुदींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. इस्लामी शरियतप्रमाणे मुस्लिम  पती-पत्नीला आपली जीवनशैली पवित्र कुरआन व हदीस (पैगंबर मुहम्मद स. यांची जीवनशैली) प्रमाणे जगणे अपेक्षित आहे. पती-पत्नी दोघांना समान हक्क आहेत. (कुरआन, २:२२८)  इस्लामी शरियतप्रमाणे पत्नीचा निर्वाह करण्याची जबाबदारी पूर्णत: पतीवर आहे. स्वयंपाक करण्याची जबाबदारी पत्नीची नाही. पतीची जबादारी आहे की तयार जेवण पत्नीस उपलब्ध  करून द्यावे. तसेच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पूर्णत: पतीवर आहे. (कुरआन, २:२३३) पत्नी जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यास बाध्य नाही. जर  पत्नीने बाळाला दूध पाजले तर विशिष्ट परिस्थितीत ती दूध पाजल्याबद्दलचा मोबदला मागू शकते. (कुरआन, ६५:६) पती-पत्नीने आपसात प्रेमाने राहाणे हे इस्लामी शरियतला अपेक्षित  आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, ‘‘सर्वांत उत्तम व्यक्ती ती आहे जिचा व्यवहार आपल्या कुटुंबाशी चांगला आहे.’’

पती-पत्नींमध्ये जर वाद झाल्यास पतीला असे सुचविले आहे की त्याने आपल्या पत्नीची चूक माफ करावी व तिच्यात काही कमतरता आढळून येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे,  कारण अल्लाहने (ईश्वराने) तिच्यात इतर काही चांगले गुण, संस्कार प्रदान केले आहेत त्या आधारे पतीने आपले वैवाहिक जीवन सुरळीत चालवावे. (कुरआन, ४:१९) जर वाद वाढतच  जात असेल तर त्या वेळेस पतीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दोघांनीही आपसात भांडण मिटवून घेतले पाहिजे. (कुरआन, ४:१२८) त्यानंतरही वादाचे निवारण  होत नसेल तर इस्लामी शरियतप्रमाणे असे अपेक्षित आहे की पती व पत्नीने त्यांचे वाद संपुष्टात आणण्याकरिता त्यांनी त्यांच्याकडून एक एक मध्यस्थ नेमला पाहिजे आणि त्या  मध्यस्थामार्फत आपला वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (कुरआन, ४:३५) मध्यस्थामार्फत वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सफल होत नसेल तर पतीने तलाक /  घटस्फोटाबद्दल विचार करावा. जर पतीच्या मताप्रमाणे त्याला पत्नीला घटस्फोट देणे आवश्यक झाले असेल तर अशा परिस्थितीत त्याने आपल्या पत्नीस तिची मासिक पाळी संपून ती  पवित्र झाल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध न ठेवता एक तलाक द्यावा. अशा प्रकारच्या तलाकला ‘तलाक-ए-रजई’ म्हणतात. सदर तलाक दिल्यानंतरही पतीला तो तलाक पुढी तीन  मासिक पाळीच्या काळात किंवा चांग्रमासाच्या आत रद्द करता येतो. त्या काळात पतीने आपल्या पत्नीस घराबाहेर काढू नये. सदर काळात पत्नी आपल्या पतीच्या घरातच राहील. अशा  परिस्थितीत तिला असे सूचित केले आहे की तिने चांगला बनाव शृंगार करावा जेणेकरून पती तिच्याकडे आकर्षित व्हावा आणि त्याने दिलेला तलाक रद्द करण्यास तो प्रेरित व्हावा. पती  दिलेला तलाक जाहीरपणे रद्द करू शकतो किंवा त्याने जर आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर दिलेला तलाक आपोआप रद्द होतो. (कुरआन, २:२२९ व सूरह अल तलाक मध्ये याबद्दल सविस्तर उल्लेख आहे.) कदाचित पतीने दिलेला एक तलाक परत न घेतल्यास तीन मासिक पाळीच्या काळात किंवा चांग्रमासानंतर ती तलाक कायम होईल.  म्हणजेच ती तलाक ‘तलाक-ए-बायन’मध्ये परिवर्तीत होईल, या तलाक पद्धतीला ‘तलाक-ए-अहेसन’सुद्धा म्हणतात.
आता तलाक कायम झाल्यानंतर पती पत्नीपासून स्वतंत्र झाली. ती कोणाशीही लग्न करू शकते. त्याचबरोबर आपल्या पहिल्या पतीशी लग्न करण्याची तिला मुभादेखील आहे. पती  स्वत: होऊन पुन्हा आपल्या पत्नीशी लग्न जुळवू शकत नाही. पत्नीच्या संमतीने दोघे पुन्हा लग्न नवीन महर रक्कम ठरवून करू शकतो. जर पत्नीने होकार दिला आणि त्यांचे पुन्हा  लग्न झाले तर हे त्यांचे दुसरे लग्न होईल. गैरसमजुतीप्रमाणे त्यांच्या या पुनर्विवाहाला ‘हलाला’ करण्याची बाधा नाही. पुनर्विवाह झाल्यानंतरही पतीपत्नीला वरीलप्रमाणे जीवनशैली अमलात आणावी लागेल आणि पुन्हा वाद झाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे पद्धत वापरावी लागेल. दुर्दैवाने त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि तो वरीलप्रमाणे संपुष्टात आला नाही तर  उपरोक्त पद्धत वापरून पती आपल्या पत्नीस दुसऱ्यांदा एक तलाक-ए-रजई देऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट काळात तलाक रद्द न केल्यास पत्नी पुन्हा आपल्या पतीपासून  स्वतंत्र होईल. परंतु पहिल्या तलाकप्रमाणे ही दुसरी तलाक दिल्यानंतरही पती-पत्नी पुन्हा नवीन महर रक्कम ठरवून पुन्हा लग्न करू शकतात. अशा प्रकारे हा आपसात तिसऱ्यांदा  विवाह (दुसरा पुनर्विवाह) होईल, ज्याला ‘हलाला’ची आवश्यकता राहाणार नाही. तिसऱ्यांदा विवाह (दुसरा पुनर्विवाह) झाल्यानंतरही असे अपेक्षित आहे की पती-पत्नीने आपली जीवनशैली  इस्लामी शरियतप्रमाणे चालवावी व दुदैर्तवाने पुन्हा वाद झाल्यास वरीलप्रमाणे निवारण करण्याचा प्रयत्न करावा. जर वाद संपुष्टात आला नाही तर पतीने तलाक देण्यासाठी  वरीलप्रमाणेच पद्धत अमलात आणावी. परंतु पतीने तिसऱ्यांदा तलाक दिली त्याच क्षणी ती तलाक म्हणजे ‘तलाक-एमुगल्लजा’मध्ये परिवर्तीत होईल. त्यांचे पती-पत्नीचे नाते संपुष्टात  येईल आणि पत्नी पतीपासून कायमची स्वतंत्र होईल. आता तो पती आपल्या पत्नीशी पुन्हा लग्न करू शकत नाही. त्याचे सर्व हक्क संपुष्टातयेतील. (कुरआन, २:२३०)
आता पत्नी तिच्या इच्छेनुसार कोणासोबतही लग्न करू शकते, परंतु आपल्या पहिल्या पतीशी लग्न करू शकत नाही. वरीलप्रमाणे तीन वेळा तलाक झाल्यानंतर पत्नी आपल्या  इच्छेनुसार इतर व्यक्तीशी लग्न केले तर तिला व तिच्या दुसऱ्या पतीला आपले जीवन वरील पद्धतीनेच जगावे लागेल. वादविवाद झाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे त्यांनी आपले  वादविवाद संपुष्टात आणावेत, अशीच इस्लामी शरियतची अपेक्षा आहे.  वाद संपुष्टात न आल्यास वरील पद्धतीप्रमाणे दुसरा पती तिला तलाक देऊ शकतो. दोन वेळा तलाक देऊन परत  घेऊ शकतो व तिसऱ्या वेळेस तलाक दिल्यास तिला परत घेता येणार नाही. दोन वेळा ‘तलाक-एरजई’ तीन मासिक पाळीच्या काळात किंवा तीन चांद्रमासाच्या काळात परत घेऊ  शकतो. परंतु न घेतल्यास ती तलाक ‘तलाक-ए-बायन’मध्ये परिवर्तीत होईल. अशा प्रकारे नैगसर्गिकरित्या ‘तलाक-ए-बायन, ‘तलाक-ए-अहसन’ किंवा ‘तलाक-एमुगल्लजा’ होताच ती  आपल्या दुसऱ्या पतीपासूनसुद्धा कायमची स्वतंत्र होईल. आता ती आपल्या दुसऱ्या पतीशी पुन्हा लग्न करू शकत नाही. आता ती इतर कोणा व्यक्तीसोबत लग्न करण्यास स्वतंत्र होईल.  परंतु ती इच्छेनुसार आता आपल्या पतीसोबतच्या लग्नाला होकार देऊ शकते. (कुरआन, २:२३०, २३२) अशा प्रकारे पहिला पती पुन्हा तिच्याशी लग्न करू शकतो. या सर्व प्रसंगाला  ‘हलाला’ म्हणतात. परंतु हे सर्व नैसर्गिकरित्या घडले पाहिजे. जर कोणी ठरवून असे करत असेल तर ते धर्मात वर्ज्य, अमान्य व निषिद्ध आहे. इस्लामी शरियतप्रमाणे विवाह उभय  पक्षांत एक दिवाणी स्वरूपाचा करार आहे. स्त्री त्या करारास एक स्वतंत्र पक्ष आहे. तिच्यावर बळजबरी करून कोणी विवाह करू शकत नाही अथवा पुनर्विवाहाकरिता बळजबरी करू  शकत नाही. निश्चितच कोणतीही पत्नी असा तीन वेळा पुनर्विवाह करून तीन तीन वेळा तलाक देणाऱ्या पतीशी पुन्हा लग्न करणार नाही. वर नमूद सर्व बाबींचा विचार करून आपण  समजू शकतो की कोणी स्त्री ठरवून अशा प्रकारचा अमल करून आपल्या पहिल्या पतीशी लग्न करावयास तयार होणार नाही. हा गैरसमज आहे की, इस्लाम धर्मात स्त्रीला स्वातंत्र्य   नाही व तिच्या संमतीशिवाय तिचा विवाह किंवा पुनर्विवाह केला जातो. वस्तुत: स्त्रीला आपले निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. परंतु वरील इस्लामी शरियत पद्धतीची माहिती न  घेता या पद्धतीबाबत भरपूर गैरसमज करण्यात आलेले आहेत.
जुन्या काळात अरब देशात अमलात असलेली तलाक पद्धत व नियमवरील सर्व तलाक व पुन्हा विवाह पद्धती समजून घेण्याकरिता पैगंबर मुहम्मद (स.) या जगात आले त्या वेळेस  असलेली परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. त्या वेळेस कोणत्याही धर्मात किंवा कायद्यात विराह झाल्यानंतर घटस्फोट घेण्याची पद्धत किंवा नियम अस्तित्वात नव्हता. परंतु अरब  देशात घटस्फोट/तलाकची पद्धत विचित्र स्वरूपात अस्तित्वात होती. त्या वेळेस अरब देशात पती आपल्या पत्नीवर खूप अन्याय करत होते. छळ करण्याचे स्वरूप त्यांनी असे निवडले  होते की अरब समाजातील पती आपल्या पत्नीस एक तलाक द्यायचे व पुढील तीन मासिक पाळीच्या काळात किंवा चांद्रमासाच्या आत ती तलाक रद्द करून टाकायचे. अशी तलाक  देऊन तलाक रद्द करण्याचा अमल आपल्या पत्नीबरोबर ते हजारो वेळा करायचे. आपल्या पत्नीस विवाहसंबंधाच्या सुखापासून कायमचे वंचित ठेवायचे आणि तिला आपल्यापासून स्वतंत्र   पण होऊ देत नसत. त्या वेळच्या तलाक नियमाप्रमाणे ती रद्द केल्यामुळे पत्नी आपल्या पत्नीच्या लग्नसंबंधात अडकून राहायची व तिचा छळ होत राहायचा. अशा प्रकारे ती आपल्या  पतीपासून स्वतंत्र व्हायची नाही आणि पती तलाक नियमाचे खेळ करत राहायचे. त्या काळात इस्लामी शरियतप्रमाणे पतीचे तलाक रद्द करण्याचे अधिकार फक्त दोनदा मर्यादित  करण्यात आले आणि पत्नी तिसऱ्या वेळेस तलाक देताच आपल्या पतीपासून आपोआप स्वतंत्र होऊन जायची. अशा प्रकारे स्त्रियांचा छळ संपुष्टात आला.
मुस्लिम समाजाला आवाहनउपरोक्त तलाक पद्धत (‘तलाक-ए-रजई’ म्हणजेच ‘तलाक- ए-अहेसन) हीच पद्धत सर्वोत्त तलाक पद्धती आहे. जर वर नमूद पद्धत न अवलंबता तलाक दिली  तर त्याचा अमल होत असला तरीही आणि इतर तलाक पद्धती जरी इस्लामी शरियतप्रमाणे मान्य असेल किंवा त्याचा अमल लागू होत असेल तरीही सर्व इस्लाम धर्मीयांनी वरीलप्रमाणे  एकच तलाक पद्धत अंमलात आणावी व इतर तलाक पद्धती आपल्या स्मरणातून वगळून टाकाव्यात. अशा प्रकारे सर्व समाजाचे इस्लामी शरियत नियम व पद्धतीबद्दल गैरसमज दूर होतील आणि सर्व भारतीय समाजाला याची जाणीव होईल की ठरवून ‘निकाह-हलाला’ करण्याची कोणतीही पद्धत इस्लाम धर्मात नही आणि असे ठरवून करणे इस्लामी शरियतप्रमाणे
वर्जित, अमान्य व निषिद्ध आहे.

– शेख अकबर शेख जाफर
(न्यायाधीश व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी)

संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *