पवित्र कुरआनात नाहक हत्या करण्यास मोठा अपराध ठरवला गेला आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. “जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा वध केला आणि ती हत्या न्याय्य मृत्युदंड नसेल अथवा धरतीवर उपद्रव माजवण्यासाठी नसेल तर अशा व्यक्तीने जणू साऱ्या मानवजातीची हत्या करण्यासारखे आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने कुणाचा जीव वाचवला तर त्याने साऱ्या मानवजातीला वाचवण्यासारखे आहे.” (पवित्र कुरआन-५:३२) यावरून हे स्पष्ट होते की इस्लामच्या नजरेत नाहक हत्या करणे भयंकर अपराध आहे आणि जर कुण्या व्यक्तीने एखाद्या निष्पाप माणसाला वाचवले तर हे पुण्याचे कर्म आहे. नाहक जीव घेणारा खऱ्या अर्थाने समाजाशी बंड करून मानवतेविरूद्ध पाऊल उचलतो. अशा माणसास मानवी जीवनाची किंमत नसते, तेव्हाच तो असे अत्याचार करण्यास धजावतो. हा असा माणूस सबंध मानवजातीला धोकादायक ठरतो. या उलट जो मनुष्य निष्पाप व्यक्तीला मृत्युच्या दाढोतून वाचवतो तो फक्त एक पुण्यकर्म करतो. इतकेच नव्हे तर तो मानवजातीची आणि मानवी प्राणाची कदर करतो. मानवतेचा हितचिंतक असतो. अशीच माणसे समाजात वावरण्यायोग्य असतात. कारण तो समाजात रक्षक असतो. म्हणूनच कुरआनने असे म्हटले आहे की निष्पाप व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. दुसऱ्या ठिकाणी पवित्र कुरआन असे म्हणतो की नाहक हत्या करणे म्हणजे उपद्रव माजविण्यासारखे आहे आणि उपद्रव माजवणारे लोकच त्यास बळी पडतील असे नाही तर इतरांनाही त्याच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या समाजात जर उपद्रव माजविणारे काही लोक असतील तर त्यांच्यावर अंकुष ठेवणे सबंध समाजाचे कर्तव्य ठरते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अर्थ अशा कृतींना समाजामध्ये थारा देण्यासारखे असेल जे समाजासाठी घातक आहे.
0 Comments