नमाज

स्मरण:
मानवीय जीवनाचे उपासनेत परिवर्तन करण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या विचारबुद्धीत ही जाणीव प्रत्येक क्षणी व प्रत्येक वेळी ही बाब स्पष्ट, ताजी, सजीव आणि क्रियाशील असावी की, तो ईश्वराचा दास असून त्याला या जगात जे काही करावयाचे आहे, ते एक दास आणि सेवकाचेच कार्य करावयाचे आहे. या दासत्वाची त्यास वारंवार जाणीव करून देण्याचे कारण असे की, वस्तुतः तो ज्याचा दास आहे तो त्याच्या दृष्टिसमोर नसतो, तसेच त्याच्या पंचेंद्रियांपासून दूर असतो. परंतु याउलट एक सैतान स्वतः मानवामध्ये असतो आणि तो प्रत्येक वेळी मानवास शिकवण देत असतो की, तू ईश्वराचा दास नसून माझा दास आहे. अशा प्रकारे लक्षावधी आणि कोट्यवधी सैतान असा दावा करतात की, तू ईश्वराचा दास नसून माझा दास आहेस व हे सैतान चोहीकडे पसरलेले असतात. हे सैतान माणसाला जाणवतात व दिसतातही आणि हरतऱ्हेने आपल्या असुरी शक्तींचे दर्शन घडवितात. ‘मी केवळ ईश्वराचाच दास व भक्त असून इतर कोणाचाही दास नाही’ ही जाणीव या असुरी शक्तींमुळे मामसाच्या अंतःकरणातून व बुद्धीपटलावरून नष्ट होण्याच्या मार्गावर असते. ही जाणीव सदा ताजी आणि सक्रीय ठेवण्यासाठी केवळ एवढ्यावर भागणे शक्य नाही की, माणसाने फक्त आपल्या मुखाने ईश्वरास आपला उपास्य स्वीकार करावा अथवा केवळ वैचारिकदृष्ट्या आणि सैद्धांन्तिक स्वरुपात मान्य करावे, तर यासाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे की, आपल्या अंतःकरणातील दासत्वाच्या जाणिवेचे वारंवार नूतनीकरण व्हावे, त्याच्या बुद्धीपटलावर वारंवार या जाणिवेची नोंद व्हावी, हाच उद्देश नमाज पढण्यामुळे पूर्ण होतो. सकाळी उठताच सर्व कामे सुरू करण्यापूर्वी या जाणिवेची आठवण व नूतनीकरण होते. मग जेव्हा माणूस आपल्या दैनंदिन व्यवहारांत पूर्णतः मश्गूल असतो, त्या वेळीसुद्धा ही जाणीव थोड्या-थोड्या वेळाने दोनदा करून देण्यात येते. मग संध्याकाळी थोड्या वेळाने याची परत जाणीव करून देण्यात येते, की तुम्ही आपल्या अभिलाषा आणि सैतानाचे दास नसून केवळ ईश्वराचेच दास आहात. यानंतर मग रात्र सुरू होते. अशी रात्र की, ज्यामध्ये सैतान आणि सैतानी कर्म करणारी माणसे आपल्या पातक कर्मांना झाकून घेण्यासाठी दिवसभर वाट पाहात असतात. परंतु परत एकदा नमाज माणसांना खबरदार करते की, तुमचे काम सैतानाचे दासत्व (अर्थात पाप) नसून ईश्वराचेच दासत्व करणे आहे.
नमाज पढण्याचा हा पहिला लाभ असल्यानेच दिव्य कुरआनात ‘नमाज’ला ‘ईश्वरीय दासत्वाचे स्मरण करून देणारी उपासना’ असे म्हटले गेले आहे. जर नमाजमुळे ईश्वरीय दासत्वाचे स्मरणच झाले असते तरी इस्लामचे मुख्य स्तंभ असण्यासाठी पुरेसे ठरले असते. कारण याच्या फायद्याच्या महत्त्वावर जेवढा जास्त विचार करू तेवढा जास्त या गोष्टींवर विश्वास वाढत जाईल की, नमाज पढल्याशिवाय म्हणजेच दासत्वाची जाणीव करून दिल्याशिवाय माणूस हा वस्तुतः ईश्वराचा दास होऊन राहू शकत नाही.
कर्तव्याची जाण:
या जीवनात माणसाला प्रत्येक पावलावर ईश्वराच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्यामुळे ईश्वराने त्याच्यावर सोपविलेली सेवा निश्चित वेळेवर पूर्णपणे पार पाडणे आवश्यक आहे. म्हणून माणसामध्ये कर्तव्याची जाण निर्माण होणे व हे कर्तव्य काटेकोरपणे आणि आज्ञाधारकतेसह पूर्ण करण्याची सवय त्याच्या स्वभावात निर्माण होणे नितांत आवश्यक आहे. ज्या माणसाला हेच माहीत नसते की, कर्तव्य काय असते आणि कर्तव्यपूर्तीचा अर्थ काय असतो, तो कधीच कर्तव्य पूर्ण करू शकत नाही व त्याची त्यामध्ये पात्रता व लायकीसुद्धा असू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या माणसास कर्तव्याचा अर्थ तर समजतो परंतु त्याच्या कर्तव्यपूर्तीच्या प्रशिक्षणातच एवढी कमतरता असेल की, त्यास कर्तव्यपूर्तीची मुळीच पर्वा नसते, तेव्हा त्याच्या आचरणावर विश्वासही ठेवता येत नाही. तसेच तो एखाद्या क्रियात्मक सेवे (Active Service) च्या लायकीचाही नसतो. ज्या लोकांवर सेवेची जवाबदारी टाकण्यात येणार असते, त्यांच्यासाठी कर्तव्याची जाण आणि आदेशपालनाच्या प्रशिक्षणाचीसुद्धा व्यवस्था करणे आवश्यक असते. याचा केवळ एवढाच फायदा नसतो की, यामुळे कर्तव्यनिष्ठ माणसे तयार होतात, तर यापुढेही याचा हा फायदासुद्धा होतो की, रोजच्या रोज पात्र आणि अपात्र माणसे वेगवेगळी होतात. तसेच हेसुद्धा लक्षात येते की, जे लोक सेवा पार पाडण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यापैकी कोणते विश्वास ठेवण्यालायक आहेत व कोणते नाहीत, हा फरक स्पष्ट होतो. समस्त क्रियात्मक सेवेंसाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे की, त्यांची कार्यात्मक परीक्षा (Practical test)घेऊन त्यांना पारखण्यात यावे. यामुळे अपात्र लोकांना आणि विश्वासास पात्र न ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करता येईल. याचे उदाहरण आपल्याला लष्करी सेवेत स्पष्टपणे आढळून येते. तेथे ड्युटी अर्थात कर्तव्यपूर्तीची जाण आणि कर्तव्य बजावण्याचा सराव पाहण्यात येतो. दिवसा व रात्री कधीही बिगुल वाजविण्यात येतो. लष्करी जवानांना एके ठिकाणी जमा होण्याचा आदेश देण्यात येतो. त्यांच्याकडून कवायती करून घेण्यात येतात. हे सगळे कशासाठी? तर याचा पहिला उद्देश हा असतो की, शिपायांमध्ये आदेशपालनाची सवय निर्माण व्हावी. त्यांच्यात कर्तव्याची जाण निर्माण व्हावी, त्यांच्यात एका व्यवस्थेसाठी काम करण्याचा गुणधर्म आणि प्रवृत्ती निर्माण व्हावी. तसेच याचा दुसरा उद्देश असा की, दररोज शिपायांचे परीक्षण करण्यात येते. यामुळे ही बाब स्पष्ट होते की, त्यांच्यापैकी कामासाठी तत्पर कोण आहे आणि आळशी व अपात्र कोण आहेत. अर्थात आळशी आणि अपात्र लोकांना या सेवेत सामावून घेण्यात येत नाही. कारण ऐनवेळेवर बिगुल वाजताच ते सेवेसाठी हजर राहतीलच याचा विश्वास नसतो.
वर्षानुवर्षे कधीतरी अचानक ओढावणाऱ्या संकटसमयी तयार करण्यात येणाऱ्या लष्करासंबंधी इतकी काळजी घेणे आवश्यक ठरते आणि दररोज त्यांचे प्रशिक्षण व कवायती करून घेण्यात येतात, परंतु इस्लाम ज्या लोकांना एका उच्चकर्तव्याची पूर्ती करण्यासाठी तयार करतो, ते कार्य वर्षानुवर्षे कधीतरी एकदाचे नसून प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी व प्रत्येक पावलावर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी ते दक्ष आणि तयार असावे लागतात. अर्थात ते जन्मापासून मरेपर्यंत चोवीस तास ड्युटीवरच (On duty)असतात. त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी युद्धसदृश परिस्थिती असते. कर्तव्यपूर्तीसाठी प्रत्येक क्षणी असुरी शक्तींशी लढावे लागते, ईश्वरीय मर्यादांचे रक्षण करावे लागते. तसेच ईश्वरीय आदेश लागू करावे लागतात. इस्लाम धर्म हा केवळ श्रद्धात्मक उपासना व कर्मकांडापुरता मर्यादित नसून तो मानवाच्या संपूर्ण कार्यपद्धतींना व्यापलेला, तसेच कार्यपद्धतीसुद्धा अशी की, त्यातून कोणत्याच प्रकारची सुट्टी अथवा पळवाटेची मुळीच संधी नाही. रात्रंदिवस चोवीस तास केवळ कर्तव्यपूर्तीच होय. लष्कराच्याच उदाहरणास समोर ठेवून विचार करा की, अशा कडक स्वरुपाच्या कर्तव्यपूर्ती आणि अतिमहत्त्वाच्या सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी किती कडक शिस्त आणि जबरदस्त प्रशिक्षण आवश्यक असते. केवळ मौखिक श्रद्धेचा अशा ठिकाणी उपयोगच काय? श्रद्धेची मौखिक घोषणा तर केवळ या सेवेत रुजू होण्यासाठी उमेदवारीची घोषणा असून, ही घोषणा झाल्यावर या शिस्तबद्ध व्यवस्थेशी अत्यंत निष्ठेने स्वतःस बांधायचे असते. या शिस्तबद्ध व्यवस्थेचे नाकात वेसन घालून घेतल्याशिवाय तो इस्लामच्या काहीच कामाचा नसतो. कर्तव्यपूर्तीची हाक देताच तो धावत येत नसेल, तसेच आदेशपालनासाठी नेहमी तत्पर नसेल, तर तो इस्लामच्या काहीच कामाचा नसतो. ईश्वराला आपल्या धर्मासाठी अशा आळशी लोकांची मुळीच गरज नाही. याच दोन्ही गरजांच्या पूर्ततेसाठी ज्यांच्यावर दिवस-रात्र पाच वेळा नमाज अनिवार्य करण्यात आली आहे. जणू ती दररोज पाच वेळा बिगुल वाजवून ईश्वरीय शिपायांना याकरिता हाक देते की, त्यांनी हे बिगुल वाजताच धावत येऊन हे सिद्ध करावे की, त्यांना कर्तव्याची प्रखर जाण आहे व ते ईश्वराचे प्रामाणिक आज्ञाधारक आहेत. ईश्वरीय सत्तेचा तन-मन-धनाने स्वीकार करतात आणि त्याचा प्रत्येक आदेश प्रत्येक क्षणी पाळण्यास तत्पर असतात. अशा तऱ्हेने एकीकडे शिपायांना प्रशिक्षित करण्यात येते. तर दुसरीकडे ईश्वरावर सच्ची श्रद्धा ठेवणाऱ्यांत आणि दांभिक वा पाखंडीजणांत फरक स्पष्ट होतो. जे लोक ही हाक ऐकून नित्यनेमाने आणि नियमबद्धरीतीने कवायत करतात, त्यांच्यात कर्तव्याची जाण, दक्षता, तत्परता आणि आज्ञाधारकतेचा गुणधर्म विकास पावतो. याउलट जे लोक ही हाक ऐकून आपल्या जागेवरून हलत नाहीत, त्यांना कर्तव्याची जाण नसते, अथवा ही जाण असूनही कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर नसतात किवा ते ईश्वरीय सत्तेचा (Authority)स्वीकार करीत नाहीत किवा त्यांची मानसिक आणि बौद्धिक परिस्थिती इतकी खालावलेली आहे की, ज्या शक्तीस ते आपला उपास्य, स्वामी आणि पालनकर्ता स्वीकारतात, त्या शक्तीच्या अगदी पहिल्याच आणि सर्वांत जास्त महत्त्वाच्या आदेशाचे पालन करायलासुद्धा तयार नसतात. त्यांची ईश्वरावर श्रद्धा असली, तरी ते सच्चे श्रद्धावंत (True to their Conviction) नाहीत. जी बाब सत्य स्वीकारण्यात आली, तिच्यानुसार कार्य करण्याची तसदी घेण्याचा गुणधर्म आणि पात्रता त्यांच्यात नाही.
या पहिल्या परिस्थितीनुसार विचार केल्यास ते मुस्लिम नाहीत आणि जर दुसऱ्या परिस्थितीनुसार विचार केला, तर ते एवढे अपात्र आणि नालायक आहेत की, ते इस्लामी संघटनेत राहायच्या लायकीचे नाहीत.
म्हणूनच दिव्य कुरआनात नमाजसंबंधी बजावण्यात आले की,
‘‘जे लोक ईश्वराचे भय बाळगून त्याचे आदेशपालन आणि दासत्व करण्यासाठी तयार नाहीत, अशा लोकांनाच नमाज पढणे कष्टदायक वाटते.’’ (दिव्य कुरआन)
दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, नमाज पढणे ज्यांना कष्टदायक वाटते, ते स्वतःच ही बाब सिद्ध करतात की, ते ईश्वराचे दासत्व आणि आदेश पालन करण्यास तयार नाहीत. म्हणूनच दिव्य कुरआनात म्हटले आहे की,
‘‘जर त्यांनी (अधर्म आणि अनेकेश्वरवादापासून) तौबा केली (अर्थात सोडून दिले) आणि (नित्यनेमाने) नमाज अदा केली व जकात दिली, तरच ते तुमचे धार्मिक बांधव आहेत.’’ (दिव्य कुरआन)
अर्थात नमाजशिवाय माणूस इस्लाम धर्माच्या भाऊबंदकीत सामील होऊ शकत नाही. म्हणूनच दिव्य कुरआन म्हटले आहे की,
‘‘हा ग्रंथ (दिव्य कुरआन) केवळ अशा ईशपरायण लोकांसाठी दिव्य मार्गदर्शन आहे, जे डोळ्यांनी न दिसणाऱ्या वास्तविकतेवर श्रद्धा ठेवतात आणि नमाज नित्यनेमाने पढतात, तसेच जी उपजीविका मी (स्वयं ईश्वराने) त्यांना प्रदान केली आहे, त्यातून ईश्वराच्या मार्गात खर्च करतात.’’ (दिव्य कुरआन)
याच आधारावर दांभिकांचा हा गुमधर्म दिव्य कुरआनात वर्णन करण्यात आला आहे की,
‘‘अर्थात ते नमाजकरिता जेव्हा उठतात, तर अशा तऱ्हेने उठतात जणू त्यांना खूप कष्टाच्या कामास्तव उठविण्यात येत आहे, जणू त्यांच्या जीवावर बेतले आहे.’’ (दिव्य कुरआन)
‘‘ईश्वराचा दास आणि ईशद्रोह्यात केवळ ‘नमाज’चाच तेवढा फरक आहे.’’ (दिव्य कुरआन)
अर्थात नमाज पढणे म्हणजेच ईश्वराचे दासत्व आणि नमाज न पढणे हा उघड ईशद्रोह होय. म्हणूनच अत्यंत दयाळू प्रेषित मुहम्मद (स) यांनीसुद्धा म्हटले आहे,
‘‘जे लोक ‘अजान’ची हाक ऐकूनही घरातून बाहेर पडत नाहीत, मला वाटते की त्यांची घरे जाळून टाकावीत.
नमाजच्याच आधारावर आपण सर्व मानव आपसांत बांधव आहोत. ज्याने नमाज पढली नाही, तो ईशद्रोही असून त्याचा आमचा काहीच संबंध नाही.
आचरणनिर्मिती:
‘नमाज’चे महत्त्वाचे कार्य असे की, ती मानवास इस्लामी जीवनप्रणालीच्या साच्यात ढाळते, म्हणजेच मानवाचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या दासत्वात परिवर्तीत करते.
या जगात आपण पाहतो की, एखाद्या चळवळ अगर संघटनेस जशा स्वरुपाचे कार्य करावयाचे असते किवा जो उद्देश तिच्या समोर असतो, त्यानुसारच आचरणनिर्मिती करण्याची व्यवस्था व नियोजन करण्यात येते आणि याचे रीतसर व सुनियोजित प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, नागरी सेवेचा (Civil Service) उद्देश हा प्रामाणिकपणे देशाची व्यवस्था सांभाळणे असतो. याकरिता नागरी सेवा प्रशिक्षणात प्रशिक्षाणार्थीच्या प्रामाणिकतेवर पूर्णपणे जोर देण्यात येतो. तसेच त्याच्या राज्याच्या व्यवस्थापनाचे (Administration) विशेष प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय येथे ईशपरायणता आणि मनपावित्र्याचा तर प्रश्नही नसतो. व्यक्तिगत जीवन हे कितीही वाईट असले तरी, तो नागरी सेवेत भरती होऊ शकतो व भरती न होण्याचे काही कारणसुद्धा नाही. कारण शासनाने सत्य आणि रास्तबाजीच्या नियमांशी बांधील असणे आणि नीतिमत्तेच्या आधारावर राज्यकारभार चालविणे हा तेथे उद्देशच नसतो मुळी. अशाच प्रकारे लष्कर उभारणीचा हेतु हा युद्धकौशल्य निर्माण करणे असल्यामुळे शिपायांना केवळ लढण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांच्याकडून शिस्तबद्ध काम करण्याच्या कवायती करून घेण्यात येतात. शत्रूलष्कराला ठार करण्यासाठी शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. शासनास वाटेल त्या ठिकाणी व वाटेल त्या वेळी लष्करास पाठविणे शक्य होण्यासाठी त्यांच्यात आज्ञाधारकतेचा गुणधर्म निर्माण करण्यात येतो. याव्यतिरिक्त कोणतीही उच्च नीतिमत्ता निर्माण करण्याचा उद्देश नसतो. म्हणून लष्करी जवानांमध्ये नैतिक परायणता निर्माण करण्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. शासनाला त्यांच्यातील केवळ शिस्तबद्धताच अपेक्षित आहे. मग त्यांचे वैयक्तिक जीवन किती जरी वाईट असले किवा तो कितीही दारूडा, व्यभिचारी, अत्याचारी व अन्यायी का असेना !
याच्या अगदी उलट इस्लाम एक असा समुदाय आणि संघटन उभारू इच्छितो की, त्या समुदाय वा संघटनेचा प्रथम उद्देश हा नेककर्म व चांगुलपणा कायम करणे आणि पातककर्म व अन्यायाचा नायनाट करणे आहे. राज्यकारभार, न्यायव्यवस्था, व्यापार, उद्योग, युद्ध आणि तह, आंतरराष्ट्रीय संबंध, तसेच जीवनातील सर्व क्षेत्रांत नैतिकतेच्या कायमस्वरुपी नियमांचे काटेकोर पालन करणे, हा या समुदायाचा प्रथम उद्देश आहे. ज्याला धरतीवर ईश्वरीय विधान स्थापन करायचे आहे, तो हा हेतु साध्य करण्यासाठी आपल्या सेवकांना व अधिकाऱ्यांना विशिष्ट प्रकारची सेवा देण्याची जवाबदारी सांभाळता येण्यासाठी उच्च नीतिमत्तेचे धडे अथवा प्रशिक्षण देण्यात येते. ही आचरणपद्धतीच मुळात श्रद्धेशी संबंधित आहे. ईश्वराचे भय, त्याच्याशी प्रेम व त्याची प्रसन्नताच आपल्या जीवनाचा उद्देश समजणे, ईश्वरालाच आपला वास्तविक स्वामी व आदेशदाता स्वीकारणे, त्याच्यासमोर जाब देण्याची जाणीव ठेवणे व याची पण जाणीव ठेवणे की, एक दिवस ईश्वर प्रत्येक कर्माचा हिशेब घेईल. याच वास्तविकतांच्या आधारावर इस्लामी आचरणपद्धतींची इमारत उभी आहे. ईश्वर हा आपणास प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत पाहतो आहे, त्यास आपल्या प्रत्येक कर्माची पूर्णपणे ओळख आहे. अंधारात व एकांतातही झालेल्या कर्मांची त्यास खबर आहे, माणसाच्या मनात येणारा विचारही त्यास माहीत असतो, त्याच्या विचारबुद्धीत येणाऱ्या सर्वच विचारांची त्यास खबर आहे, माणूस स्वतःस संपूर्ण जगवासियांपासून लपवू शकतो, परंतु ईश्वरापासून मुळीच लपवू शकत नाही. संपूर्ण जगाच्या शिक्षेपासून स्वतःस वाचवताही येईल, परंतु ईश्वराच्या शिक्षेपासून स्वतःची सुटका करून घेणे अशक्य आहे. या जगात पुण्यकर्माचा मोबदला कदाचित मिळणारही नाही, एवढेच नव्हे, तर पुण्याच्या बदल्यात अत्याचारांची कडू फळेसुद्धा चाखावी लागतात, परंतु ईश्वराजवळ पुण्याचा मोबदला पुण्य आणि पापाचा मोबदला ईश्वरीय कोप निश्चित आहे. या जगातील कृपाफळे मर्यादित आहेत, परंतु ईश्वरीय कृपाफळे अमर्याद आहेत. या जगातील लाभ व तोटा क्षणभंगुर आहे, परंतु ईश्वराजवळील नफा व तोटा कायमस्वरूपी आहे. याच वास्तविकतेवरील विश्वास माणसाला ईश्वरीय आदेशांचे आणि त्याच्या नियमांचे पालन करण्यास प्रेरित करतो. हाच विश्वास माणसाला वैध आणि अवैध वा निषिद्धच्या मर्यादांतील फरक समजून घेण्यास प्रेरित करतो. याच विश्वासामुळे माणूस आपल्या स्वैर इच्छा व हव्यासाच्या गुलामी व जोखडातून, निषिद्ध व अनैतिक वासनापूर्तीतून व अनैतिक स्वार्थाच्या अघोरी कचाट्यातून स्वतःस मुक्त करतो. याच विश्वासामध्ये एवढी शक्ती आहे की, तिच्यामुळे माणसास सत्य, न्याय, विवेक आणि नैतिकतेच्या सरळ मार्गावर वाटचाल करता येते आणि मानवजगताच्या सुधारणेचीही कठीण जवाबदारी सांभाळता येते. या विश्वासाचे वारंवार नूतनीकरण नमाजमुळे होत असून त्याची मुळे मानव बुद्धीमध्ये खोलवर रुजतात. आपण जर विचार केला तर हे लक्षात येईल की, नमाज पढण्याचा निश्चय करताच इस्लामी आचरणाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होते आणि मग आपोआपच माणसाचे आचरण इस्लामी आचरणाच्या पद्धतीशी एकरूप होते.
नमाज पढण्याचा निश्चय करताच सर्वप्रथम आपण हे पाहतो की, आपण पवित्र आहोत की अपवित्र, आपले कपडे पवित्र आहेत की अपवित्र, आपण वुजू (नमाजकरिता चेहरा, हात-पाय धुण्याची अनिवार्य क्रिया) केला की नाही. जरा विचार करा की, आपण पावित्र्याबाबत हे सर्व कशासाठी पाहतो? आपल्या पावित्र्य आणि अपावित्र्याची खबर आपल्याशिवाय कोणाला असते? कारण कोणालाच याची माहिती नसते. परंतु आपण पवित्र आहोत की नाही, आपले वस्त्र पवित्र आहेत की नाहीत, याची माहिती केवळ ईश्वरालाच असते. ही बाब आपल्याला चांगल्याप्रकारे माहीत असते की, लोकांना माहीत असो वा नसो, ईश्वराला आपली परिस्थिती माहीत असते. आपली कोणतीच बाब व रहस्य ईश्वरापासून मुळीच लपलेले नसते. शिवाय आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की, आपल्याला या कर्माचा जाब ईश्वरासमोर द्यावाच लागणार आहे. याच जाणिवेमुळे नमाजसाठी आवश्यक असलेल्या शुचिर्भूततेचे नियम काटेकोरपणे आपण पाळतो. नसता या जगात असा कोणीच नाही व कोणतीच शक्ती नाही, जी आपल्याकडून हे कर्म करून घेऊ शकेल.
यानंतर आपण नमाज पढण्याची सुरुवात करतो. या ठिकाणी आपण नमाजच्या ‘कयाम’, ‘रुकुअ’, ‘सजदा’ व ‘कायदा’ (नमाजमधील उभे राहण्याची व नतमस्तक वगैरे होण्याची प्रक्रिया) च्या अवस्थेत ज्या पद्धतीने कुरआनच्या आयती पठण करण्याचा आदेश देण्यात आला आहे, त्याच पद्धतीने व त्याच नियमानुसार पठण करणे आवश्यक असते. मग विचार करण्यासारखी ही बाब आहे की, अशा नियमांचे बंधन पाळण्याचे कारण काय? या संपूर्ण आयती तर हळू आवाजात पठण करण्यात येतात. आपण या आयती जर पठण केल्याच नाहीत अथवा नियमानुसार असलेला क्रम बदलून पठण केल्या तर ते इतरांना समजणारही नाही. मग शेवटी कोणाच्या भयास्तव या पठणनियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते? शेवटी कोणाला या नियमपालनाची जाण देण्याची जाणीव आपल्यात असते व कोणावर असलेली श्रद्धा आपल्याला अचूक नियमानुसार नमाज पढण्यासाठी भाग पाडते?
शिवाय आपण विविध अवस्थेत असतो तेव्हा नमाज पढण्याची वेळ येते. कारण नमाज पढण्याचे वेळापत्रकसुद्धा इस्लामने ठरवून दिलेले आहे. निश्चित वेळेनुसार जेव्हा नमाज पढण्याची वेळ येते, तेव्हा आपण कामधंद्यात, व्यवसायात मग्न असतो, कधी शेतीवाडीत तर कधी एकांतात व कधी मनोरंजनात्मक कार्यात मग्न असतो. कधी कधी तर अशा कार्यात मग्न असतो की, डोके बाहेर काढण्याचीही सवड नसते. कधी कधी रखरखत्या उन्हात घरातून बाहेर पडू वाटत नाही. कधी कधी थंडीमुळे वा पाऊसपाण्यामुळे घर सोडूसे वाटत नाही. अशा सर्वच कठीण परिस्थितीतसुद्धा नमाज पढण्यासाठी मस्जिदीकडे आपली पावले वळविण्यामागे कोणती प्रेरणा असते? अर्थात ईश्वरावर श्रद्धा, ईश्वराच्या जबरदस्त श्रवणशक्ती व दृश्यशक्तीवरील विश्वास, ईश्वराच्या नाराजीची काळजी, त्याच्या प्रसन्नतेचे आकर्षण व त्यास जाब देण्याची प्रखर जाणीव हीच ती प्रेरणा होय. माणसाच्या दृश्यविवेकात या वास्तव कल्पना नेहमी ताज्या नसल्या तरी मुळात आचरणनिर्मिती ही अदृश्य विवेकपटलांमध्ये होत असते. विवेकशक्तीच्या तळापर्यंत अगदी खोलवर जी कल्पना रुजते, मुळात तीच कल्पना स्थायी आणि कायमस्वरुपी असून यामुळेच कायमस्वरुपी गुणधर्म आणि स्वभावाची निर्मिती होते.
आता आपण नमाजमध्ये पठण करण्यात येणाऱ्या बाबींवर विचार करु या. या पठण करण्यात येणाऱ्या समस्त बाबी इस्लामच्या मौलिक कल्पना व प्रेरणांनी ओतप्रोत भरलेल्या आहेत. या बाबींच्या वारंवार पठणांमुळे इस्लामी आचरणनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या आधारभूत श्रद्धांचे वारंवार नूतनीकरण होत असते.
नमाज पढण्यासाठी लोकांना आवाहन करण्याकरिता सर्वप्रथम अजान देण्यात येते. दिवसातून पाच वेळा देण्यात येणाऱ्या अजानमध्ये निम्नलिखित शब्दांचा वापर करून नमाजचे आवाहन करण्यात येते,
अल्लाहु अकबर ईश्वर सर्वांत महान आहे,
अल्लाहु अकबर ईश्वर सर्वांत महान आहे,
अश्हदु अल लाइलाहा इल लल्लाह मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीही उपास्य नाही,
अश्हदु अल लाइलाहा मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीही उपास्य नाही,
अश्हदु अन्ना मुहम्मदुर्रसू लुल्लाह मी साक्ष देतो की, मुहम्मद (स) ईश्वराचे प्रेषित आहेत,
अश्हदु अन्ना मुहम्मदुर्रसू लुल्लाह मी साक्ष देतो की, मुहम्मद (स) ईश्वराचे प्रेषित आहेत,
हैया अलस्सला या नमाजकडे,
हैया अलस्सला या नमाजकडे,
हैया अलल फलाह या यशाकडे,
हैया अलल फलाह या यशाकडे,
अल्लाहु अकबर ईश्वर सर्वांत जास्त महान आहे,
अल्लाहु अकबर ईश्वर सर्वांत जास्त महान आहे,
ला इलाहा इल लल्लाह ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नाही.
केवढे जबरदस्त आवाहन आहे हे! दररोज पाच वेळा ही आवाहनात्मक दवंडी किती स्पष्ट स्वरुपात माणसाच्या अंतःकरण्यास साद घालते की, या भूतलावर जे कोणी तथाकथित उपास्य आणि स्वामी असण्याच्या तंद्रीत फिरत आहेत, ते सर्वच अत्यंत दुर्बल असून त्यांचे सामर्थ्य व शक्ती अतिशय क्षुल्लक आहे. या विश्वाचा खरा स्वामी आणि उपास्य हा केवळ एकमेव ईश्वरच आहे. तोच सर्वांत महान आणि सामर्थ्यशील व शक्तीशाली असून उपासना, आराधना, भक्ती व दासत्व केवळ त्याचेच करावे. केवळ त्याचीच उपासना करण्यात तुमच्या ऐहिक आणि पारलौकिक यशाचे रहस्य दडलेले आहे. हे आवाहन ऐकून कोणत्या माणसाचे अंतःकरण हेलावणार नाही! ज्याच्या मनात आपल्या एकमेव निर्माता, पालनकर्ता व उपास्याविषयी सच्ची श्रद्धा आहे, तो हे जबरदस्त आवाहन आणि साक्ष ऐकून आपली जागा न सोडता नमाजकडे का वळणार नाही? अथवा आपल्या वास्तविक स्वामी असलेल्या ईश्वरासमोर नतमस्तक होण्याकडे धाव का घेणार नाही?
यानंतर आपण नमाज पढण्याकरिता उभे राहतो, आपला चेहरा किबल्याकडे (पश्चिम दिशेला-काबागृहाकडे) असतो. स्वच्छ आणि पवित्र होऊन आपण या सृष्टीच्या वास्तविक स्वामी आणि बादशाहच्या समोर हजर होतो, तेव्हा सर्वप्रथम आपण ही आयत पठण करतो,
‘‘इन्नी वज्जह तु वजहिया लिल लजी फतरस्समावाती वल अर्ज हनीफंव वमा अना मिनल मुश्रिकीन.’’
(अर्थात) ‘‘मी एकाग्र होऊन आपला चेहरा त्या (ईश्वरीय) अस्तित्वाकडे केलेला आहे, ज्याने आकाश व पृथ्वीची निर्मिती केली आहे आणि मी त्या लोकांपैकी (मुळीच) नाही, जे अनेक उपास्यांचा स्वीकार करतात.’’
ही स्पष्ट भुमिका घेऊन आपण कानापर्यंत दोन्ही हात उचलतो, जणु नमाजसाठी आपण या व्यावहारिक जीवनातून वेळ काढतो आणि मग ‘अल्लाहु अकबर’ (ईश्वर सर्वांत महान आहे) असे म्हणून दोन्ही हात बांधून अतिशय नम्रपणे आपल्या वास्तविक स्वामीसमोर उभे राहतो. यानंतर आपण ईश्वरासमोर त्याच्या महिमत्वाचे गुणगान करतो ते या शब्दांत,
‘‘सुब हानः कल्ला हुम्मा व बि हम्दिकः व तबार कस्मुक व तआला जद्दुकः व ला इलाहः गैरुक’’
(अर्थात) ‘‘हे ईश्वरा! तू पवित्र आहेस. प्रशंसा व गुणगान तुझ्यासाठीच आहे. तुझ्या नावात बरकत आहे. तुझे महिमत्व सर्वांत श्रेष्ठ असून तुझ्याशिवाय कोणीच उपास्य नाही.’’
‘‘अऊजु बिल्लाहि मिनश्शैता निर्रजीम’’
(अर्थात) ‘‘धिक्कारित सैतानाच्या उपद्रवापासून मी ईश्वराचे संरक्षण इच्छितो.’’
‘‘बिस्मिल्ला हिर्रह्मा निर्रहीम’’
(अर्थात) ‘‘ईश्वराच्या नावाने आरंभ करतो, तो परम दयाळू व कृपाळू आहे.’’
यानंतर दिव्य कुरआनाची पहिली सूरह पठण करण्यात येते,
‘‘अल हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याकः नअबुदू व इय्याकः नस्तईन इह दिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लजीनः अन अमतः अलैहिम गैरिल मग जूबी अलैहिम व लद्दालीन (आमीन)’’
(अर्थात) ‘‘स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे, जो सर्व सृष्टीचा ‘पालनकर्ता’ आहे. एकमात्र कृपावंत आणि दयावंत, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुजपाशीच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्ग दाखव. त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस. कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.’’ (दिव्य कुरआन)
यानंतर दिव्य कुरआनच्या काही आयतींचे पठण करण्यात येते. या आयतींपैकी प्रत्येक आयतीमध्ये इस्लामचे मौलिक नियम, त्याच्या नैतिक शिकवणी, कार्यात्मक मार्गदर्शन वगैरे स्पष्ट करण्यात आलेले असून रास्तबाजीच्या मार्गदर्शनात्मक खुणा आहेत व या खुणा वा मार्गदर्शन दाखविण्याची ईश्वरदरबारी प्रार्थना या अगोदरच्या सूरह पठणात करण्यात आली आहे. उदाहरणार्थः
‘‘वल अस्रि इन्नल इन्सा नलफ खुस्र इल लललजीना आमनू व आमिलुस्सालिहाति व तवा सौबिल हक्कि व तवा सौ बिस् सब्र’’
(अर्थात) ‘‘काळाची शपथ! मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.’’ (दिव्य कुरआन)
या छोट्याशा सूरहच्या माध्यमाने मानवास हे दाखविण्यात आले आहे की, जोपर्यंत माणूस ईश्वराची उपासना, चांगले आचरण व कर्म करीत नाही आणि हे चांगले आचरण व पुण्यकर्म वैयक्तिकरीत्या न करता सामूहिकरीत्या करणे आवश्यक आहे, यासाठी त्याच्या समाज व सोसायटीमध्ये सत्य जोपासनेचा आत्मा असावयास पाहिजे आणि इतिहास या वास्तविकतेची साक्ष देत असावा, तोपर्यंत माणूस यशाची फळे चाखू शकत नाही.
या व्यतिरिक्त दुसरी सूरह पठण केली असल्यास की,
‘‘अ रआयतल्लजी युकज्जबु बिद्दीन फ जालि कल्लजी यदू उलयतीम वला यहुद्दुआला तआमिल मिस्कीन फ वैलुल मुसल्ली नल्लजीनः हुम अन सलातिहिम साहून अल लजीनः हुन युरा ऊन व यम नऊनल माऊन.’’
(अर्थात) ‘‘तू पाहिले नाहीस त्या व्यक्तीस जी अंतिम न्यायाच्या दिवसाचा इन्कार करते, अशीच व्यक्ती अनाथांना धक्के देऊन हाकलून देते आणि गरिबांना जेवण देण्यासाठी इतरांना प्रेरित करीत नाही.’’
या छोट्या-छोट्या आणि प्रभावी वाक्यांतून ही शिकवण देण्यात आली आहे की, पारलौकिक विश्वास हा मानवाच्या नैतिकतेवर कसा प्रभाव टाकतो आणि हा विश्वास नसल्याने माणसाच्या सामूहिक वर्तन, तसेच वैयक्तिक व्यवहारातून प्रामाणिकता कशा प्रकारे निघून जाते.
ही तर एक-दोन उदाहरणे झालीत. यावरून स्पष्ट होते की, प्रत्येक नमाजमध्ये दिव्य कुरआनचा काही अंश पठण करणे अनिवार्य करण्याचे कारण काय? याचे कारण हेच आहे की, प्रत्येक नमाजमध्ये थोडा-थोडा भाग पठण करणे अनिवार्य का ठरविण्यात आले आहे? याचा हाच उद्देश आहे की, दररोज कितीतरी वेळा अल्लाहचे आदेश, मार्गदर्शन आणि शिकवण माणसाला वारंवार निदर्शनास आणून द्यावे. हे जीवन कर्मगृह असून याच उद्देशपूर्तीसाठी माणसास या जगात पाठविण्यात आले आहे. तसेच हे जीवन सार्थक होण्यासाठी वा सरळमार्गी राहण्यासाठीच थोड्या-थोड्या वेळाने व्यवहारकार्यातून एकीकडे (अर्थात नमाजकरिता) बोलावण्यात येत असते, जेणेकरून या जगात त्याला ज्या मार्गदर्शनानुसार कर्म करावयाचे आहे, त्या मार्गदर्शनाच्या नियमांचा विसर पडू नये.
या आयतीतून मार्गदर्शनाचे स्मरण झाल्यानंतर आपण ‘अल्लाहु अकबर’ (अल्लाह महान आहे) असे म्हणत ‘रुकुअ’मध्ये जातो. म्हणजे गुडघ्यावर हात ठेवून समोरच्या दिशेस झुकतो आणि वारंवार असे जप करतो की,
‘‘सुब हानः रब्बीयल अजीम’’
अर्थात – ‘‘पवित्र आहे माझा पालनकर्ता जो अतिमहान आहे.’’
ही कृती म्हणजे अल्लाहसमोर आत्मसमर्पण करण्याच्या अवस्थेत वृद्धी होय, जी आपण नमाज सुरू करतेवेळेस दोन्ही हात कानापर्यंत उचलून केली होती. मग परत सरळ उभे राहून म्हटले जाते की,
‘‘समि अल्ला हुलिमन हमिदः’’
अर्थात ‘‘अल्लाहने (नमाज पढणाऱ्याच्या मुखावर आलेली अल्लाहची) प्रशंसा ऐकली. मग ‘अल्ला हु अकबर’ म्हणत सजदा करतो अर्थात जमिनीवर माथा टेकवितो.
(हीच कृती माणसाच्या आत्मसमर्पणाचे पूर्णत्व होय. याचा अर्थ असा की, अल्लाहच्या दासाने आपले शीर, ज्यामध्ये अहंकार आणि गर्व तसेच फाजील आत्मप्रतिष्ठा व स्वाभिमान असतो. अल्लाहसमोर जमिनीवर टेकवून हे मान्य करतो की, तुझा हा दास स्वतःस पूर्णतः तुझ्या स्वाधीन करतो.) आणि हे शब्द उच्चारतो,
‘‘सुबहानः रब्बियल आ अला’’
अर्थात ‘‘पवित्र आहे माझा स्वामी, जो सर्वांपेक्षा महान आहे.’’
मग दोन वेळा सजदा केल्यावर अदबशीरपणे बसतो आणि हे पठण करतो की,
‘‘अत्त हिय्यातु लिल्ला हिस्सलवातु व तय्यिनातुस्सलामु अलैकः अय्युहन ननिय्यु व रहमतुल्लाहि बरकातुहु अस्सलामु अलैना व अला इबा दिल्ला हिस्स्वालिहीन अश् हदु अल ला इलाहः इल लललाहु व अश हदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलहु.’’
अर्थात ‘‘आमच्या सलामी, आमच्या नमाजी आणि आमचे पुण्यकर्म अल्लाहसाठी आहेत. प्रेषितावर सलाम असो, अल्लाहचा कृपावर्षाव असो. तसेच सलामती असो आम्हावर आणि अल्लाहच्या ठोक (सद्वर्तनी) दासांवर. मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीच उपास्य नाही आणि मी साक्ष देतो की, मुहम्मद (स) अल्लाहचे दास आणि प्रेषित आहेत.
अशा शब्दांत साक्ष देण्यात येते. या वेळी अंगठ्याजवळचे बोट उचलण्यात येते, कारण की, ही कृपा नमाजमध्ये मुस्लिमाच्या श्रद्धेची घोषणा आहे. या मौखिक घोषणेच्या वेळी विशेषकरून या बाबींकडे लक्ष वेधण्यात येते.
यानंतर हे पठण केले जाते,
‘‘अल्ला हुम्मः स्वल्लि अला मुहम्मदिव व अला आलि मुहम्मदिन कमा स्वलै तआला इब्राहीमः व अला आलि इब्राहिमः इन्नकः हमीदुम मजीद.
अल्ला हुम : बारिक अला मुहम्मदिव व अला आलि मुहम्मदिन कमा बारक तआला इब्राहीमः व अला आलि इब्राहीम इन्नकः हमीदुल मजीद.’’
अर्थात – ‘‘हे अल्लाह ! मुहम्मद (स) प्रेषितांवर आणि त्यांच्या वंशावर कृपांचा असा वर्षाव होऊ दे जसा प्रेषित इब्राहीम (अ) आणि त्यांच्या वंशजांवर केला होता. तू प्रशंसनीय आणि अतिमहान आहेस. हे अल्लाह! बरकतींचा वर्षाव कर, प्रेषित मुहम्मद (स) वर आणि त्यांच्या वंशजांवर, जसा प्रेषित इब्राहीम (अ) आणि त्यांच्या वंशजांवर केला होता. तू प्रशंसनीय आणि अतिमहान आहेस.’’
‘‘अल्लाहुम्मा इन्नी आऊजु बिकः मिन अजाबि जहन्नमः व अऊजुबिकः मिन अजाबिल कब्रि व अऊजुबिकः मिन फित नतिल मसी हिद् दज्जालि व अऊजुबिका मिन फित नतिल महयः वल ममाति व अऊजुबिकः मिनल मअ्सिमि वल मुग्रम.’’
अर्थात ‘‘हे अल्लाह! माझे रक्षण कर नरकाग्नीपासून, माझे रक्षण कर दज्जालच्या अरिष्टापासून मृत्यूच्या अरिष्टांपासून पातक कर्मांपासून माझे रक्षण कर. तसेच इतरांचे अधिकार पूर्ण करण्याची शक्ती प्रदान कर.’’
अशा सद्वचनांचे दिवसांतून पाचवेळा पठण होते. मात्र रात्री झोपण्यापूर्वी शेवटच्या नमाजमध्ये शेवटच्या रकअतमध्ये आणखी एक प्रार्थना म्हटली जाते, तिला ‘दुआए-कुनूत’ असे म्हणतात. हा एक जबरदस्त करारनामा आहे, जो निवांत वेळी अल्लाहसमोर सादर करण्यात येतो. ही प्रार्थना अशी आहे,
‘‘अल्ला हुम्मा इन्ना नस्तई नुकः व नस्तगफिरुकः व नुअ मिनु बिकः व नतवक्कलु अलैकः व नुस्नि अलैकल खैर व नश्कुरुकः वला नक फुरुकः व नख लऊ व नत् रुकु मंय् यफ्जुरुकः अल्ला हुम्मः इय्याकः नअबुदु व लकः नुसल्ली व नस् जुदु व इलैकः नस्आ व नहफदु व नर्जू रह मतकः व नख्शा अजाबकः इन्नः अजाबकः बिल कुफ्फारि मुल्हिक.’’
अर्थात – ‘‘हे अल्लाह! आम्ही तुझी मदत मागतो, पापांची क्षमा मागतो, तुझ्यावर श्रद्धा ठेवतो, तुझ्यावरच विश्वास ठेवतो आणि तुझी उत्तम प्रशंसा करतो. आम्ही तुझी कृतज्ञता व्यक्त करून, कृतघ्न होणार नाही, जो तुझी अवज्ञा करील, त्याला सोडून देऊ व त्याच्याशी संबंध ठेवणार नाही.
हे अल्लाह! आम्ही तुझीच उपासना करतो, तुझ्याचसाठी नमाज पढतो आणि सजदा करतो. आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न आणि धावपळ तुझी कृपा मिळविण्यासाठीच करतो आणि तुझ्या प्रकोपाचे भय बाळगतो (कारण) की, निश्चितच तुझा प्रकोप तुझ्या अनुग्रहाची कृतघ्नता करणाऱ्यांवर असेल.’’
वरील मजकुरावरून हे स्पष्ट होते की, इस्लामने नागरिक, फौज आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे प्रशिक्षण कोणत्या हेतुने आणि कशा प्रकारच्या उद्दिष्ट-भावनांनी केले. या प्रशिक्षणाद्वारे लोकांच्या विचारबुद्धीमध्ये कशा प्रकारचे विचार आणि गुणधर्म निर्माण करण्याचा हेतु आहे. केवळ परेड करून तयार करण्यात आलेल्या लष्कराचा काय उपयोग? केवळ उपाययोजना व व्यवस्थापनात पटाईत नागरी सेवेची गरजही नाही, केवळ जबरदस्तीने लोकांना शिस्त लावणारी फौजही नको, तर या उलट असे लष्कर, असे सेवक आणि असा समाज पाहिजे, ज्यांच्यात ईशपरायणताही असावी, बलप्रयोगाबरोबरच समाजाचे मनपरिवर्तन करण्याची लायकीही असावी, व्यवस्थापन पाहण्याच्या पात्रतेबरोबरच नागरिकांत योग्य सुधारणा घडविण्याची अफाट शक्ती असावी. या दृष्टिकोनानुसार पाहिल्यास आपल्याला निश्चितच मनापासून वाटेल की, इस्लामच्या या उद्दिष्टपूर्तीसाठी नमाजशिवाय दुसरा पर्याय नाही. जी व्यक्ती या व्यवस्थेनुसार योग्य प्रकारे प्रशिक्षण घेईल, त्याच व्यक्तीकडून अशी आशा बाळगली जाऊ शकते की, या जीवनात अनामतदारी, जवाबदारी आणि मानवाधिकाराचे ओझे ती समर्थपणे सांभाळील.
याच आधारावर दिव्य कुरआनने दावा केला आहे की,
‘‘इब नस्सलातः तनहा
अनिल फहशाइ वल मुन्कर’’
अर्थात – ‘‘निश्चितच नमाज ही निर्लज्जता आणि वाईट कर्मांपासून रोखते.’’
यामुळे पूर्वीपासूनच नमाज इस्लामी चळवळीचा आत्मा राहिला आहे. या जगात जेवढे प्रेषित आले, त्या सर्वांच्या कायद्यांत नमाजीस प्रथम स्थान होते. कारण की, इस्लामी चळवळ ज्या ज्या वेळी नष्ट झाली, ती नमाजच्या अभावामुळेच झाली. कारण नमाजमुळे जे प्रशिक्षण (Training)मिळते, तेच बंद झाले, परिणामी आध्यात्मिक विकास आणि शिस्त नष्ट झाली. दिव्य कुरआनत म्हटले आहे की,
‘‘त्यांनी ‘नमाज’ची साथ सोडली आणि मनमानी सुरु केली. ते लवकरच या मार्गभ्रष्टतेचे परिणाम भोगतील.’’
याचे कारण अगदी स्पष्ट आहे. इस्लामी मार्गावर चालण्यासाठी इस्लामी आचरण आवश्यक असून हे आचरण नमाजच्या प्रशिक्षण पद्धतीनेच शक्य आहे. मग जेव्हा ही प्रशिक्षण पद्धतीच नष्ट होईल, तेव्हा समाज असो वा कोणतीही चळवळ असो, तिचे पतन हे निश्चित आहे.
आचरणनिर्मितीबरोबरच ‘नमाज’ माणसात आपल्या इंद्रियांवर ताबा मिळविण्याची शक्ती निर्माण करते. कारण याशिवाय उच्चकोटीचे आचरण निर्माण होणे शक्य नाही. तसे पाहता आचरणनिर्मितीचे स्वकार्य केवळ एवढेच आहे की, यामुळे मानवीय स्वभावाची योग्य जडणघडण होऊन ते सुसंस्कृत व्हावे, परंतु या सुसंस्कृत स्वभावास नियंत्रणात ठेवण्याकरिता शारीरिक आणि आत्मिक शक्तींवर वस्तुतः पूर्णपणे ताबा नसेल, तर त्याचे वर्तन सुसंस्कृत आणि प्रामाणिक राहू शकत नाही. याचे आकलन होण्यासाठी आपण असे गृहित धरु या की, माणूस हा एक मोटारगाडी आणि तिच्या ड्रायव्हरचे सामूहिक नाव आहे. या समूहाचे कार्य योग्यप्रकारे अशाच अवस्थेत होऊ शकते की, जेव्हा मोटारगाडीची संपूर्ण यंत्रणा अर्थात
मोटारीचे स्टीअरिंग, क्लच, ब्रेक, गीयर्स वगैरे ड्रायव्हरच्या ताब्यात असतील, त्याचप्रमाणे ड्रायव्हर प्रामाणिक, सुस्वभावी, प्रशिक्षित व जाणकार असावा. तुम्ही ड्रायव्हरला गाडी चालविण्याचे योग्य प्रशिक्षण दिले असेल, परंतु त्याचा जर गाडीवर ताबा नसेल, अथवा स्टीअरिंग वा ब्रेकवर त्याचा पूर्णपणे ताबा नसेल, तर अशा परिस्थितीत ड्रायव्हर स्वतः गाडी चालवीत नसून गाडीच ड्रायव्हरला वाटेल तसे चालवीत असेल. मोटार केवळ चालतच असते व तिला केवळ धावणेच येते. मग कोठे धावायचे, रस्त्यावर की रस्ता सोडून धावायचे, कोणत्या रस्त्यावर आणि किती गतीने धावायचे, हे तिला मुळीच माहीत नसते. अशा परिस्थितीत मात्र ही मोटार सैरावैरा आणि वाटेल त्या गतीने ड्रायव्हर महाशयांना घेऊन धावतच राहील. या उदाहरणानुसार मानवाच्या शारीरिक शक्ती, त्याच्या अभिलाषा व कामना किवा त्याचा मोह व हव्यास आणि बौद्धिक पात्रता हे मोटारगाडीसम आहे. त्याचप्रमाणे माणसाचा आत्मा हा ड्रायव्हरसम आहे. ही मोटारगाडी खरोखरच्या लोखंडी गाडीप्रमाणेच अज्ञान व आंधळी आहे, फरक एवढाच की, ती लोखंडाची मोटार निर्जीव आहे आणि ही मोटार सजीव आहे. या मोटारीत इच्छा, आकांक्षा, लोभ आणि हव्यास असतो. त्याचप्रमाणे तिची नेहमीच ही धावपळ असते जणु, तिच्यावर ड्रायव्हरचा ताबा नसावा. उलट तीच ड्रायव्हरवर ताबा मिळविण्याचा व त्यालाच चालविण्याचा जोरदार प्रयत्न करते. समस्त प्रेषितांच्या शिकवणींचा उद्देश हाच होता की, या ड्रायव्हरमध्ये अशी जबरदस्त पात्रता आणि शक्ती निर्माण करावी की, ज्यामुळे त्यास या गाडीवर पूर्णतः प्रभुत्व व ताबा मिळावा आणि तिला योग्य वाटेवर व योग्य गतीने चालविता यावे. त्याचप्रमाणे तिचे आपल्यावर प्रभुत्व प्रस्थापित होऊ देऊ नये. तिच्यावर पूर्णपणे ताबा मिळवून पाहिजे असलेल्या गंतव्य स्थानावर न्यावे. या उद्दिष्टपूर्तीसाठी केवळ एवढ्यावर भागणार नाही की, ड्रायव्हरला रस्त्यांची माहिती, गाडी चालविण्याचे कौशल्य व कसब आणि इतर बाबींचे ज्ञान असले तर झाले, ही माहिती व कौशल्ये शिकवून त्यास सुसंस्कृत आणि प्रामाणिक बनविण्यात आले, यासाठी या बंडखोर आणि वाटेल त्या दिशेने व वाटेल त्या गतीने धावण्याची विलक्षण मानसिकता असलेल्या गाडीच्या स्टीअरिंग, ब्रेक व एक्सलेटरवर प्रत्येक क्षणी जबरदस्त पकड असण्याची गरज आहे.
नमाजमध्ये ‘दुआ’ (प्रार्थना) आणि ‘तस्बीह’ (अल्लाहच्या महिमेचा जप) बरोबरच वेळेचे बंधन आणि ‘तहारत’ (पावित्र्य) वगैरेंसारखा अटींना शारीरिक हलचालींची जोड देण्यात आली आहे. याचे कारणच हे आहे की, लोभी, मोह असलेली, बंडखोरीवर उतरणारी आणि सैरावैरा धावण्याचा गुणधर्म असणारी, तसेच सर्वांत जास्त हे की, ड्रायव्हरवरच ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणारी ही मोटारगाडी ड्रायव्हरच्या ताब्यात असावी आणि आपल्या इच्छा व मर्जीनुसार ही मोटारगाडी आपल्या ताब्यात घेऊन चालविण्याची ड्रायव्हरमध्ये प्रचंड शक्ती निर्माण व्हावी. अशा प्रकारे या मोटारीचे बंड मोडण्यासाठी दिवसांतून पाच वेळा नमाज पढण्यात येते. सकाळच्या वेळी, जेव्हा माणूस साखरझोपेत असतो, उठावेसे वाटत नाही, तेव्हा आपली इच्छा व अभिलाषा आपल्याला पडून राहण्याचीच सूचना देते. परंतु नमाज सूचना देते की, ‘‘वेळ झाली चला उठा, शुचिर्भूततेची गरज असेल तर स्नान करा. थंडी पडत असेल तरीही उठा. गरम पाणी नसेल तर थंड पाण्याचा वापर करा आणि मस्जिदकडे चला!’’ या दोन परस्पर भिन्न सूचनांपैकी तुम्ही जर आपल्या इच्छा आणि अभिलाषेची सूचना स्वीकारली तर समजा तुमचा गाडीवरील ताबा सुटला आणि तुम्हीच गाडीच्या स्वाधीन झालात. या उलट तुम्ही जर नमाजने केलेली सूचना पाळली तर मग तुम्ही तुमच्या गाडीवर ताबा मिळविला. याचप्रमाणे जुहर, असर, मगरिब व इशाच्या नमाजच्या वेळेससुद्धा तुम्हास तुमच्या इच्छा व अभिलाषा, फायदे व तोटे, मनोरंजन आणि समस्या वगैरेंच्या निमित्ताने तुमच्यात दुर्बलता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि एवढे दुर्बल करतात की, तुमचा तुमच्या गाडीवर ताबाच राहू नये. परंतु नमाजमुळे दर वेळेस आणि प्रत्येक क्षणी तुमच्यात प्रचंड शक्ती निर्माण करीत असते. ती तुमच्या इच्छाशक्तीत अफाट वाढ निर्माण करते. परिणामी तुम्हास मोटारगाडी चालविण्यासाठी पूर्णपणे सक्षम बनविते. ड्रायव्हरशी मोटारगाडीच्या या बंडखोरीचा संबंध प्रत्येक वेळी येतच असतो. विभिन्न अवस्था, प्रवासा, आनंद व मनोरंजनाच्या समयी आणि समस्या-संकटांच्या समयी हे द्वंद्व चालूच असते. याच हमरीतुमरीत तुमची कसोटी असते. जर इच्छा व अभिलाषांना बळी पडाल, तर समजा तुम्ही चारीमुंड्या चित झाला आणि तुमचा ताबेदारच तुमच्या ऊरावर बसेल. आंधळ्या आणि अज्ञान मोटारगाडीच्या ताब्यात तुम्ही जाल. आता ही मोटारगाडी वाटेल तिकडे आणि वाटेल त्या गतीने तुम्हाला घेऊन फिरत राहील आणि तुम्ही मात्र अगदी विवश आणि लाचार होऊन तिच्याबरोबर फरफटत जाल. याच्या अगदी उलट तुम्ही जर नमाजची सूचना पाळली, तर तुम्ही या बंडाळ मोटारीची बंडखोरी मोडून काढाल. तिच्यावर प्रभुत्व मिळवाल. तिच्यावर तुमचे पूर्ण वर्चस्व स्थापन होईल. तसेच तुमच्यात या गोष्टीची क्षमता येईल की, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तिला चालवाल.
याच आधारावर दिव्य कुरआनाने नमाज न पढण्याचा तत्काळ होणारा दुष्परिणाम अशा प्रकारे स्पष्ट केला आहे की,
‘‘ज्यांनी नमाज वाया घालविली आणि आपल्या इच्छा व हव्यासांमागे लागले, ते लवकरच या मार्गभ्रष्टतेचा दुष्परिणाम पाहतील.’’
इथपर्यंत जे काही वर्णन करण्यात आले आहे, ते नमाज पढण्याच्या लाभाची केवळ एक बाजू आहे. अर्थात समाज घडविण्यात व मानवांच्या विकासात नमाजची किती महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आता याच नमाजची दुसरी बाजू अशी आहे की, व्यक्तीनिर्मितीत नमाजची किती महत्त्वाची भूमिका आहे. नमाजाच्या या कार्यक्रमावर आपण दृष्टिक्षेप टाकू या. या कार्यक्रमाचे पाच भाग आहेत.

  • १) मानवाच्या विचारबुद्धीत या वास्तविकतेची जाण आणि विवेकता जिवंत ठेवणे, मानव हा या जगातील स्वतंत्र प्राण वा अस्तित्व नसून तो समस्त विश्वांच्या एकमेव निर्मात्याचा दास आहे. तसेच या जगात ईश्वरदासत्व हेच त्याचे मूळ स्थान आहे. याचे नेहमीच भान ठेवून त्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात कार्य करावयाचे आहे.
  • २) अल्लाहचा दास असण्याच्या नात्याने त्याला कर्तव्यदक्ष बनविणे आणि त्यास कर्तव्यपूर्तीची सवय घालून देणे.
  • ३) कर्तव्यदक्ष आणि बेजबाबदारीत फरक करून दोन्ही प्रकारच्या लोकांतून कर्तव्यदक्ष जणांना निवडणे.
  • ४) वैचारिकतेची परिपूर्ण व्यवस्था, एक परिपूर्ण ‘आयडीयॉलॉजी’ माणसाच्या बुद्धीत निर्माण करणे व या माध्यमाने त्यास चांगल्या आचरणांसाठी तयार करणे.
  • ५) माणसात ही शक्ती आणि पात्रता निर्माण करणे की, आपली श्रद्धा आणि दृष्टिकोनानुसार जी प्रणाली त्यास योग्य वाटत असेल,
    ती अमलात आणावी, तसेच याकरिता त्याने आपल्या शारीरिक आणि स्वशक्तीचा पुरेपूर वापर करावा. त्याच्या वर्तनात अशा प्रकारची दुर्बलता असता कामा नये की, एखादी बाब त्याला योग्य वाटत असूनही आपल्या अभिलाषा व हव्यासापोटी अथवा स्वार्थापोटी चुकीच्या बाबी तो स्वीकारेल.

इस्लाम ज्या समाजाची उभारणी करू इच्छितो, त्या समाजाची प्रत्येक व्यक्ती नमाजच्या माध्यमानेच घडवितो. दहा वर्षांचे वय होताच समाजाच्या प्रत्येक मुलगा व मुलगीवर नमाज पढणे बंधनकारक होते. तसेच वयात आल्यावर तर नमाज पढणे हे प्रत्येकावरच अनिवार्य होते. यामध्ये मात्र शुद्धी हरपलेली, वेडी व्यक्ती आणि शुचिर्भूतता न लाभलेली स्त्री त्यांचा अपवाद आहे. तसेच अगदी प्रवास असो, संकट वा कोणत्याही गंभीर प्रकारच्या समस्या किवा आजार असो, एवढेच नव्हे तर युद्धजन्य परिस्थिती असो, नमाज पढण्यावाचून पर्याय नाही. उठणे-बसणे शक्य नसेल तर बसून, तेही शक्य नसेल तर अंथरूणावर पडल्या पडल्या, हात-पाय निष्क्रिय असतील, तर इशाऱ्यानेच पढावी. पाणी नसेल तर ‘तैमूम’ करून (अर्थात वजूसाठी पाणी न मिळाल्यास मातीवर हात ठेवून चेहरा व हातपायावर हात फिरविले) नमाज पढावीच लागेल. त्यातून कोणालाच सुटका नाही. हे कर्तव्य पूर्ण करावेच लागेल.
हे सांगण्यास मुळीच संकोच नाही की, या जगामध्ये इस्लामशिवाय दुसरी कोणतीच सामुदायिक व्यवस्था अशी नाही की, ज्या व्यवस्थेने या विखुरलेल्या घटकांना अर्थात समाजाच्या सभासदांना व्यक्तिशः तयार करण्याची अशी परिपूर्ण योजना व व्यवस्था तयार केली असेल. या जगातील इस्लामेतर सामुदायिक व्यवस्थेमध्ये सामान्यतः समुदायाचे स्वरुप देण्यावरच आणि व्यक्तींना बाह्य बंधनात जखडण्यावरच पूर्णपणे जोर देण्यात येतो. परंतु इस्लामी व्यवस्था समाजाच्या प्रत्येक व्यक्तीस आंतरिकरीत्या प्रेरित करून सामुदायिक नियमांनुसार जगण्यासाठी तयार करते. कारण समुदाय हा एका मजबूत भितीप्रमाणे असावा लागतो. या भितीच्या सर्व विटा एक-दुसऱ्यांचा आधार असतात आणि प्रत्येक वीट दुसऱ्या विटेशी घट्टपणे जुळलेली असते. विटा जर मजबूत नसतील तर भित मजबूत राहणार नाही. याप्रमाणे समाजातील व्यक्तींचे आचरण मजबूत नसेल, त्यांचे विचार सामुदायिक नियमांवर आधारित नसतील व आपसात एक-दुसऱ्यांचा आधार बनण्याची भावना नसेल तर मात्र सामुदायिक मार्गावर चालण्याची इच्छा असूनदेखील केवळ बाहेरील बंधनाचा काहीच उपयोग नाही. परिणामस्वरुप समाजात बंड होऊन समाजव्यवस्था कोलमडून जाईल.
समुदाय नियोजन
आता आपण नमाजच्या दुसऱ्या बाजूवर दृष्टि टाकू या. ही बाब स्पष्ट आहे की, व्यक्तिशः एखाद्याचे आचरण चांगले असून त्याचा पाहिजे तसा लाभ होत नाही. चांगले आचरण हे सर्व समुदायांत असावे लागते. अन्यथा कोणतीही व्यक्ती आपले लक्ष्य गाठू शकत नाही. कारण यासाठी व्यक्तींना एक-दुसऱ्याचे सहकार्य असणे गरजेचे असते. समुदायाची साथ मिळाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीस आपण विश्वास ठेवत असलेल्या नियमांवर चालणे अशक्य असते. कारण प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण जीवन आपले भाऊबंद, स्नेही, मित्र आणि शेजारपाजार व अशा प्रकारच्या असंख्य लोकांशी असणाऱ्या संबंधांशी बांधील असते. माणसास ईश्वरातर्फे यासाठीच नेमण्यात आले आहे की, या सामुदायिक जीवन आणि सामाजिक संबंधांत ईश्वराचा कायदा अमलात आणावा. याचेच नाव इस्लामी परिभाषेत ‘उपासना’ होय. यालाच भक्ती आणि आराधना म्हणतात. जर माणूस अशा लोकांदरम्यान असेल, जे एक-दुसऱ्यांना सहकार्य करण्यास तयारच नसतील, तर त्या एकट्या व्यक्तीस व्यक्तिगतरीत्यासुद्धा यावर आचरण करणे अशक्य होते.
शिवाय मुस्लिमांसाठी हे जीवन अत्यंत खडतर, धावपळीचे, सदा प्रयत्नशील राहण्याचे व नेहमीच असत्याचा सामना करण्याचे क्षेत्र आहे. येथे ईश्वराविरुद्ध बंड करणारे मोठमोठे समूह आहेत. ते स्वतःच तयार केलेले कायदे लागू करण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत. या मानवनिर्मित व जुलमी आणि अत्याचारी कायद्यास नष्ट करण्याची मुस्लिमांवर मोठी जवाबदारी आहे. कारण ईश्वरीय कायदा लागू करणे हा काही पोरखेळ नव्हे. ही मोठी जवाबदारी एकटा मुस्लिम पूर्ण करूच शकत नाही. या जगात कोट्यवधी मुस्लिम जरी असले आणि त्यांनी सामुदायिक प्रयत्न न करता व्यक्तिगत प्रयत्न केले तरी ईश्वरीय कायदा लागू होणे शक्य नाही. याकरिता हे आवश्यक आहे की, ईश्वराची उपासना करू इच्छिणारे सर्व ईश्वरोपासक संघटित व्हावेत, त्यांनी आपसात सहकार्य करावे आणि सर्वांनी मिळून सत्य-प्रस्थापनेचे प्रयत्न करावे. या दोन्ही उद्देषपूर्तीसाठी मुस्लिमांनी केवळ एकत्र होऊन चालणार नाही, तर योग्य पद्धतीने संघटित होणे गरजेचे आहे. यासाठी इस्लामी नियमांनुसारच मुस्लिमांचे आपसातील संबंध, व्यवहार, स्नेह, सहकार्य, वैचारिक आणि कार्यात्मक ऐक्य असावे. सर्वांत ईश्वराचे दासत्व व उपासना करण्याच्या सामुदायिक भावनांबरोबरच प्रत्यक्ष कृतीशीलता असावी. कृतीशीलता ही मुळात त्यांच्या स्वभावातच समरूप झालेली असावी. यातील प्रत्येकास हे पूर्णपणे माहीत असावे की, त्याच्यावर नेतृत्वाची जवाबदारी आल्यास संघटनेत त्याची भूमिका काय असावी आणि प्रत्येकास हेसुद्धा चांगले माहीत असावे की, आपल्या नेत्याचे अनुकरण कशा रीतीने करावे, कशा प्रकारे त्याच्या आदेशांवर कृती करावी, त्याच्या आदेशपालनाच्या सीमा काय आहेत आणि कोणत्या मर्यादेस गेल्यावर त्याच्यावर आपल्या प्रमुखाचा आदेश झुगारू शकतो.
सामूहिक नमाज
व्यक्तिगत आचरणनिर्मितीबरोबरच सामुदायिक व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचे जबरदस्त कार्य नमाज करते. ही सामुदायिक व्यवस्था नमाजमुळेच उभी राहते व कायमही राहते. नमाज दिवसातून पाच वेळा माणसास कृतीशील ठेवण्याचे कार्य करते. याच पाच वेळच्या सामुदायिक नमाजला ‘नमाज बा जमाअत’ असे म्हणतात. म्हणून नमाज सामुदायिकरीत्या अदा करणेसुद्धा इस्लामने बंधनकारक ठरविले आहे. इस्लामी कायद्यानुसार, प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिशः नमाज पढून या कर्तव्यापासून मुक्त होऊ शकत नाही. यासाठी सर्व मुस्लिमांचे मस्जिदमध्ये एकत्र येऊन सामुदायिकरीत्या नमाज पढणे बंधनकारक आहे. यास केवळ एवढाच अपवाद आहे की, जर एखादा अशा ठिकाणी असेल की त्याला याची संधीच मिळाली नाही, तर गोष्ट वेगळी. नमाज ही सामूहिकरीत्या पढण्याच्या अनिवार्यतेचे कारण आणि हेतू हाच आहे की, मुस्लिमांनी सामुदायिक व्यवस्था कायम आणि कृतीशील असावी. मस्जिदमधील पाच वेळा मुस्लिमांचे एकत्र येणे ही त्यांच्या सामूहिक योजनेची आधारशिला आहे. या आधारशिलेच्या भक्कमपणावरच संपूर्ण व्यवस्थेचे स्थैर्य टिकलेले आहे.
अजान
इस्लामने असा आदेश दिला आहे की, ‘अजान’चा आवाज कानी पडताच आपली सर्व प्रकारची कामे सोडून मस्जिदकडे निघावे. ही अजान ऐकून सर्वच मुस्लिमांचे एका केंद्राकडे धाव घेणे हे लष्करास पाचारण करण्यासाठी बिगुल वाजताच लष्करी जवानांनी आपल्या लष्करप्रमुखाची हाक ऐकून त्याच्याकडे धाव घेण्यासारखे आहे. या प्रसंगी सर्वांची मानसिक स्थिती सारखीच असते आणि ती म्हणजे लष्करप्रमुखाच्या आदेशाचे पालन होय. बिगुल वाजताच लष्कराचे सर्वच जवान आपापली कामे सोडून एकेठिकाणी गोळा होतात. लष्करात ही पद्धती ठेवण्याचे कारण काय? याचे कारण हे आहे की, प्रथमतः सर्वच शिपायांत आदेशपालन करणे आणि मुस्तेदीसह आज्ञापालनाची प्रवृत्ती निर्माण व्हावी, तसेच अशा प्रवृत्तीच्या संपूर्ण शिपायांचा एक जथा, एक समुदाय, एक टीम तयार व्हावी आणि त्यांना याची सवय व सराव व्हावा की, लष्करप्रमुखाचा आदेश मिळताच एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वांनी गोळा होऊन एखाद्या मोहिमेवर निघावे. हाच सराव लष्करी जीवनाचा आत्मा आहे. एखाद्या लष्करात जर अशाप्रकारे जमा होण्याची सवय नसेल, तर लष्करातील जवान कितीही शूरवीर असूनही मोहीम फत्ते करू शकणार नाही. अशा बेशिस्त लष्कराच्या हजार जवानांना सळो की पळो करण्यासाठी शिस्तबद्ध असलेल्या लष्कराच्या फक्त पन्नास तुकड्या पुरेशा होतील. अगदी याच हेतुस्तव मुस्लिमांसाठीसुद्धा हा नियम यासाठीच ठेवला आहे की, ‘अजान ऐकल्यावर कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही कामात असताना सर्वकाही सोडून त्याने मस्जिदकडे धाव घ्यावी. या प्रकारचा सराव दररोज दिवसातून पाच वेळा यासाठी करून घेण्यात येतो की, या ईश्वरीय लष्कराची ड्युटी अथवा कर्तव्य जगातील सर्वच फौजांपेक्षा जास्त कठीण आहे. वर इशारा केल्याप्रमाणे, इतर लष्करांवर तर कधीतरीच मोहिमेवर जाण्याचा प्रसंग येतो, परंतु या ईश्वरीय लष्करास प्रत्येक क्षणी मोहिमेवरच असावे लागते. या लष्करासाठी ही चांगली सवडच म्हणावी लागेल की, चोवीस तासांत फक्त पाच वेळा त्याकडून सराव घेण्यात येतो. अर्थात अजानचा बिगुल वाजताच ईश्वरीय छावणीत (मस्जिदमध्ये) गोळा होण्याचा आदेश देण्यात आला.
‘मस्जिद’मध्ये जमा होणे
वर आपण ‘अजान’चा लाभ पाहिला, आता आपण नमाजकरिता मस्जिदमध्ये जमा होण्याच्या फायद्यांवर लक्ष पुरवू या. तसे याचे अगणित फायदे आहेत. मस्जिदमध्ये आपण एक-दुसऱ्यांना पाहतो, ओळखतो, परिचित होतो, याचा खूप मोठा लाभ आपल्याला मिळतो. ही ओळखपाळख आणि परिचय कोणाच्या वतीने आणि हेतूने आहे? तर केवळ एवढाच हेतू की, आपण सर्वच ईश्वराचे दास आणि प्रेषित मुहम्मद (स) यांचे अनुयायी, दिव्य कुरआनावर श्रद्धा ठेवणारे, एकच उद्देश घेऊन जीवन जगणारे आहोत. हेच या सर्वांचे आपसातील नाते होय. याशिवाय येथे जमा होण्याचा व मेळावा भरविण्याचा कोणताही स्वार्थ नसतो. म्हणूनच मस्जिदच्या बाहेर गेल्यावरसुद्धा केवळ हेच नाते समोर ठेवून प्रामाणिक जीवन जगावे. अशा प्रकारचा परिचय आपल्या मनात आपोआपच एक विचार निर्माण करतो की, आपण सर्वजण एकच आहोत, एकाच समूहाचे आहोत, एकाच पार्टीचे सैनिक आहोत एक-दुसऱ्यांचे बंधू, मित्र, स्नेही आणि पाठराखे आहोत. या जगात आपले हेतू, सौख्य, लाभ आणि तोटे हे सर्वकाही सामाईक आहेत. आपले जीवन एक-दुसऱ्यांशी संबंधित आहे. सर्वजण मिळून उठू आणि सर्वजण मिळून बसू अर्थात प्रत्येक कृती ही सर्वजण सामाईकरीत्या करू. या संमेलनात आपण जेव्हा एकमेकांना पाहतो ते स्नेहभावाने आणि बंधुभावानेच पाहतो. अशा भावनेने पाहताना आपल्याला आढळून येते की, आपला एखादा भाऊ फाटक्या कपड्यांत आहे, एखादा दुःखी आणि कष्टी आहे, तर एखादा आजारी आणि भुकेला आहे, एखादा अपंग अथवा आंधळा वा लुळा-पांगळा आहे, तर आपल्या अंतःकरणात निश्चितच त्याच्याविषयी कळवळा आणि सहानुभूती निर्माण होईल. त्याचे दुःख पाहून आपले अंतःकरण व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही. परिणामी आपल्यापैकी जे समर्थ लोक असतील, ते ह्या दुःखितांच्या मदतीस धावतील आणि त्यांस सुखी जीवन जगण्यासाठी उभे करतील. अशा प्रकारे एकमेकांच्या समस्यांचे निराकरण होईल. एकमेकांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होण्याचे भाग्य सर्वांनाच प्राप्त होईल. एकार्थाने हे संमेलन एक-दुसऱ्यांना स्नेहबंधनांत जोडण्याचे महान कार्य करते. शिवाय आणखीन एका बाबीवर आपले लक्ष जाते की, आपण येथे कशासाठी जमलेलो आहोत? ज्या ठिकाणी आपण जमलो आहोत, ते एक पवित्र ठिकाण (मस्जिद) असून एका पवित्र कर्मासाठी जमलो आहोत. एखाद्या चित्रपटातील नटाला अथवा नटीला पाहण्यासाठी, दारूचे पेले कंठात रिचविण्यासाठी, जुगार व सट्टा खेळण्यासाठी मुळीच जमलेलो नाही. हे दुराचाऱ्यांचे संमेलन नाही. हे तर ईश्वराच्या नेक आणि धर्मपरायण दासांचे संमेलन आहे. अल्लाहच्या दारी, सर्वचजण आपले दासत्व सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. अशा प्रसंगी श्रद्धावंत आणि नेक व्यक्तीच्या मनात आपोआपच आपल्या चुका व पापांविषयी घोर पश्चात्तापाची भावना निर्माण होते. शिवाय वाईट कर्मांपासून रोखून सत्यमार्ग दाखविण्याची मुस्लिमांमध्ये प्रवृत्ती असल्याने ते एकमेकांना सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतील. या अनुषंगाने हे संमेलन तर कमालीचे लाभदायक ठरेल. अशा रीतीने हा पूर्ण समुदाय धर्मपरायण आणि सुधारित होईल.
‘सफबंदी’ अर्थात पंक्तीबद्धता
मस्जिदमध्ये जमा होण्याचे लाभ आपण पाहिले. आता आपण सामुदायिकरीत्या म्हणजे पंक्तीबद्ध होऊन नमाज पढण्याच्या फायद्यांवर चर्चा करु या.
सर्वच मुस्लिम मस्जिदमध्ये समान दर्जाचे असतात. एखादा गरीब मस्जिदमध्ये प्रथम आल्यास त्यास प्रथम रांगेत जागा मिळेल आणि एखादा श्रीमंत जरी असला आणि तो जर मस्जिदमध्ये उशिरा आला असेल, तर त्यास दुसऱ्या वा तिसऱ्या पंक्तीतच जागा मिळेल. कोणत्याही आणि कितीही मोठा असलेल्या माणसास मस्जिदमध्ये आपली जागा राखीव करून ठेवता येत नाही. कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच एका रांगेत एक-दुसऱ्याच्या खांद्यास खांदा लावून उभे राहावे लागते. येथे कोणीच वरिष्ठ वा कनिष्ठ नसतो. बाजारात झाडू मारून पोट भरणारा माणूससुद्धा राज्यपालास खेटून उभा राहून नमाज पढतो. हे असे सामुदायिक लोकतंत्र आहे की, जे फक्त इस्लामनेच आपल्याला दिले. इस्लामशिवाय कोणालाच अशा उच्चकोटीची समता, न्याय आणि बंधुत्व स्थापन करणे शक्य झाले नाही. येथे दररोज समाजातील सर्वजण दिवसातून पाच वेळा सर्व प्रकारचे भेदभाव विसरुन जमा होतात आणि एकाच पंक्तीत सर्वांनाच नमाज पढावी लागते. यामुळे आपल्यातील फाजील अहंकाराच्या भावना नष्ट होतात. दुर्बलांतील दुर्बलतेची जाणीव नष्ट होते आणि सर्वांत महत्त्वाचे हे की, सर्वांनाच या गोष्टीची जाणीव करून देण्यात येते की, अल्लाहच्या नजरेत सर्वजण समान आहेत.
या पंक्तीबद्धतेत ज्याप्रमाणे वर्गवारी फरक नष्ट करण्यात येतो, त्याचप्रमाणे वंश आणि वर्णभेदसुद्धा समूळ नष्ट करण्यात येतो. गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, लहान-मोठा, सशक्त-दुबळा वा कोणतीही भाषा बोलणारा व कोणत्याही ठिकाणचा रहिवासी असो, सर्वांना एकाच पंक्तीत नमाज पढावी लागते. दररोज पाच वेळा हा सराव होत असल्याने आणि एकत्र येत असल्याने समस्त वैरभाव आणि द्वेषभावना नष्ट होतात. मानवांमध्ये ऐक्य प्रस्थापित होते. प्रत्येक मानव हा अल्लाहचीच निर्मिती आणि अल्लाहचाच दास असल्याची जाण झाल्याने वैरभाव आणि द्वेषभावनेचा प्रश्नच येत नाही. मग अल्लाहची उपासना सर्वांनी मिळून आणि खांद्यास खांदा लावून केली तर मानवांत प्रचंड ऐक्य निर्माण होते, कार्यात्मक समरुपता निर्माण होते आणि ईशोपासनेत एक-दुसऱ्यांशी जुळून सर्वजण एका शरीरासमान होतात.
इमामत (नेतृत्व)
नमाज ही सामुदायिक उपासना असून ती इमामावाचून (प्रमुखाशिवाय) शक्य नाही. अनिवार्य असलेल्या नमाजसाठी दोन माणसे जरी असतील, तर त्यांनी ही नमाज एकत्रित पढावी आणि यासाठी या दोघांपैकी एकाने नमाजचे नेतृत्व करावे आणि दुसऱ्याने अनुकरण करावे. सामूहिक नमाज चालू असल्यास विभक्तपणे नमाज पढणे हे मोठे पाप आहे. असो! नमाज पढविण्यासाठी इमामची अर्थात नमाजचे नेतृत्व करणाऱ्याची आवश्यकता असते. याच प्रमुखास ‘इमाम’ असे म्हणतात. ‘इमाम’ निवडण्यासाठी त्याचा रंग, वर्ण, वंश अथवा श्रीमंती आड येत नाही. समाजातील कोणताही माणूस मग तो अतीसामान्य का असेना ‘इमामत’ करू शकतो. इस्लामने मात्र त्यासाठी काही अटी लावल्या आहेत, त्या अशा प्रकारच्या आहेत की,
‘जमाअत’ (समुदाय) मध्ये इमाम आणि त्याच्या मागे नमाज पढणाऱ्यांचा संबंध ज्या बाबींनुसार प्रस्थापित करण्यात आला आहे, त्यातील प्रत्येक बाब अर्थाने ओतप्रोत भरलेली आहे. यामध्ये वस्तुतः प्रत्येक मुस्लिमास नेतृत्व आणि त्याच्या नेतृत्वाच्या पालनाचे प्रशिक्षण देण्यात येते. यात मस्जिदमध्ये नमाजचे नेतृत्व करणे आणि इमामच्या मागे नमाज पढणे, हे तर केवळ एक ‘मॉडेल’ आहे. मस्जिदच्या बाहेरील वास्तविक जीवनातसुद्धा असेच घडायला हवे. मस्जिदमध्ये मुस्लिमांची जी सामुदायिक व्यवस्था आहे तीच व्यवस्था मस्जिदच्या बाहेरील व्यवहारात असावी. इमामत (नेतृत्वा)चे स्थान, जवाबदारी व कर्तव्ये काय आहेत? त्याचे अधिकार काय आहेत? इमाम (प्रमुख) असण्याच्या नात्याने त्याचे वर्णन कसे असावे? तर त्याच्या अनुयायांना इस्लामने असा आदेश दिला की, ‘इमाम’ अशा व्यक्तीस बनविण्यात यावे की, समुदायातील मोठा वर्ग त्याचा विरोधक नसावा. काहीजण विरोधक असतील, तर काही हरकत नाही. येथेसुद्धा समुदायाचा प्रमुख निवडण्याचा नियम स्पष्ट होतो की, इमामच्या वर्तनाने समुदायातील बहुसंख्य लोक नाराज नसावेत, त्याच्यात असे वाईट गुण नसावेत की, लोकांना त्याची चीड निर्माण व्हावी.
इस्लामचा असा आदेश आहे की, इमामने नमाज पढविण्यात वृद्ध आणि दुर्बलांचे भान ठेवावे, नमाजच्या ‘रकअती’ इतक्या दीर्घ नसाव्यात की, ज्यामुळे वृद्ध आणि दुर्बलांना जास्त वेळ नमाजकरिता उभे राहण्यात त्रास होईल. या नियमानुसार समुदायाच्या प्रमुखास ही शिकवण देण्यात आली की, त्याने इतरांवर त्यांच्या शक्ती आणि क्षमतेपेक्षा जास्त ओझे टाकू नये.
इस्लामचा आदेश आहे की, नमाज पढवितेवेळी इमामवर एखादे असे संकट आले की, ज्यामुळे नमाज पढविणे त्याच्यासाठी कठीण वा अशक्य झाले, तर त्याने स्वतः बाजूला होऊन आपल्या मागील इसमास पुढे करावे. यावरून हे स्पष्ट होते की, समुदायप्रमुख नेतृत्वाच्या लायकीचा नसेल, तर त्याने प्रमुखपदाचा त्याग करून इतर सक्षम आणि पात्र इसमास प्रमुखपद द्यावे.
इस्लामचा आदेश आहे की, इमाम ज्या वेळी नमाज पढवितो, त्या वेळी त्याच्या आदेशापूर्वी अनुयायांनी कोणतीही कृती करू नये. अर्थात इमामच्या ‘रुकूअ’ वा ‘सजदा’मध्ये जाण्यापूर्वी लोकांनी या कृती करू नयेत. यावरून ही शिकवण समोर येते की, व्यावहारिक जीवनातही लोकांनी आपल्या प्रमुखाच्या आज्ञांचे पालन करावे.
इस्लामचा असा आदेश आहे की, नमाजमध्ये इमामकडून चूक घडल्यास इस्लामी नियमानुसार इमामला टोकण्यात यावे आणि इमामनेसुद्धा चुकीची सुधारणा करावी. मात्र जर इमामला चूक न झाल्याचा विश्वास असेल, तर गोष्ट वेगळी यावरून हे सिद्ध होते की, आपला प्रमुख जर एखादी चूक थकून वा जाणूनबुजून करीत असेल, तर जनतेने त्यास चुकीची बिनधास्तपणे जाणीव करून द्यावी आणि इमामने अर्थात समाजप्रमुखाने आपली चूक दुरुस्त करावी. इमामला या गोष्टीचे वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो चुका करणे स्वाभाविक आहे. सत्यापेक्षा इमाम आणि प्रमुखच काय, कोणीच मोठा नसतो. म्हणून लोकांना त्याच्या चुकांवर उघडपणे टीका करण्याचा व त्याच्यात सुधारणा घडविण्याचा अधिकार इस्लामने दिला. जनता इमाम वा प्रमुखाचे नेतृत्व हे सत्याच्या नेतृत्वाखाली स्वीकारते. प्रमुखाचे अनुकरण हे सत्यानुकरणाच्या चौकटीत असते. म्हणून जनता आणि जनतेचा प्रमुख या दोघांना एक-दुसऱ्याच्या सुधारणा करण्याचा आदेश इस्लामनेच दिला आहे.

संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *